Sunday, May 8, 2016

थ्रील....!!!!!

कधी कधी काही काही आठवणी आपला कधीच पिच्छा सोडत नाहीत. अगदी सावलीसारख्या आपल्याशी जोडल्या गेल्या असतात. अशीच एक आठवण माझ्याही आठवणीत आहे. जी आजही मला रात्रीची झोपू देत नाही. आजही ती रात्र माझ्यासमोर अगदी जशीच्या तशी उभी आहे. आजही तो झाला प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो.
माझ नाव अमोल परब. गोष्ट तशी साधारण दहा बारा वर्षापूर्वीची. मी नुकताच बी.ई. पास आऊट झालो होतो. ते ही फर्स्ट क्लास विथ डिक्टिंशन. भरीसभर म्हणून मुंबई युनिर्व्हसिटीमधुन तिसराही आलो होतो. घरच्यांच्या आणि खासकरून बाबांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. ते फार खुश झाले होते. येता जाता प्रत्येकासमोर माझे कौतुक करत होते. अगदी काय करू आणि काय नको असे झाले होते त्यांना. तशी मला फ़र्स्ट क्लासची गेरेंटी होती पण युनिर्व्हसिटी मधून तीसरा बिसरा येईन याची कल्पना मलाही नव्हती. मी मिळवलेल्या ह्या यशाबद्दल बाबा मला बाईक घेण्याच्या तयारीत होते. पण मला ती माझ्या पैश्याने घ्यायची होती. जवानीचा अव्यवहारी जोश दुसर काय. पण कुणाच ऐकतील ते बाबा कुठले? त्यांनी सरळ माझ्या मित्रांना गाठलं. अंकुर गायकवाड आणि अमोल परवडी हे माझे शाळेपासुनचे मित्र त्यांना माझ्या सगळ्या आवडीनिवडी माहिती होत्या. अंकुरने नुकतीच सहा महिन्यांपुर्वी नवीन बजाज डिस्कव्हर घेतली होती आणि परवडी तर दहावीला असल्यापासुनच त्याच्या वडिलांची हीरोहोंडा चालवायचा. बाबांनी अगदी योग्य माणसं निवडून लगोलग पुढच्याच आठवड्यात मला माझी आवडती बजाज पल्सर गिफ़्ट देऊन टाकली. आता मीही माझा पुर्वीचा तोरा सोडून मोठ्या खुशीने बाईक एन्जॉय करू लागलो. हळुहळु मला माझ्या बाईकचा आणि बाईकला माझा अंदाज येऊ लागला. वर दररोजच्या प्रेक्टिसमुळे रस्त्यावरचा कोन्फ़िडंसही बर्यापैकी वाढला होता. अश्याच एका वीकेंडला मी परवडीकडे गेलेलो असताना तिथे अंकुरही बसला होता. बराच वेळ आम्ही गप्पा मारत होतो की अचानक अंकुरने परवडीला विचारलं
"आज नक्की ना?"
"अरे आज शनिवार आहे ना... मग जाउया की नक्की पण बाकीचे तयार आहेत काय?" परवडीने विचारले.
" हो रे ...... चप्पा आणि चिनू दोघेही तयार आहेत. फ़क्त ह्यावेळेस चप्पा बोलला की बाईक त्याला चालवायचीय निदान येताना तरी"
"ठीक आहे मी माझी बाईक देईन त्याला चालवायला " परवडी अगदी सावकाराच्या अर्विभावात म्हणाला.
मला कसलाच संदर्भ लागत नव्हता मी हळूच विचारले.
" काय रे कुठे चालला आहात एकटे एकटे ?"
" एकटे कुठे चांगले चौघेजण आहोत की...." सवयीप्रमाणे अंकुरने पीजे मारला.
" तेच विचारतोय कुठे चालला आहात चौघेजण???" मी त्याच्याकडे दुर्लक्ष्य करत विचारलं.
" अरे कुठे नाही रे, हल्ली आम्ही दर एक-दोन महिन्यानी गोराईला पलिकडे उत्तन रोड्वर बाईक चालवायला जातो......रात्रीचे. सॊल्लीड मज्जा येते मोकळ्या रस्त्यावर सुसाट बाईक चालवायला." परवडीने माझ्या शंकेचे निरसन केले
" हम्म....इट्स साउंड्स थ्रीलींग..... ए मग मी पण येउ काय रे.......?" मी उत्सुकतेने विचारलं.
" अरे ये की, पण तुला तुझी बाईक आणायला लागेल कारण आम्हा दोघांच्याही बाईक्स फ़ुल्ल आहेत" अंकुर बोलला.
अनायसे बाबा कालच आठवड्याभरासाठी गावी गेले होते. आज रात्री मित्रांसोबत बाहेर जेवायला जातोय हे कारण सांगुन घरुन रात्रीची बाईक चालवायची परमिशन अगदी सहज काढता येण्यासारखी होती. मनातल्या मनात सगळ्या गोष्टी व्यवस्थित जुळत आहेत कि नाही ह्याची खातरजमा करुन मी माझ कन्फ़र्मेशन देउन टाकले.
" रात्री बरोबर आठ वाजता जेट्टीवरवर भेट. जास्त उशीर करु नकोस. रात्री साडे बाराची शेवटची बोट असते पलिकडुन.’ परवडीने ताकिद दिली.
बोरिवलीच्या पश्चिमेला समुद्राच्याकिनारी गोराई गाव वसलेलं आहे. तसा तो भाग फ़क्त बोरिवलीपासुन लवकर पोहचता येत म्हणुन फ़क्त बोरिवलीत गणला जातो. अस म्हणायला मुख्य कारण म्हणजे बोरिवली शहर परिसर आणि गोराई गाव ह्यामध्ये पसरलेली गोराई खाडी. गोराईची ही खाडी काही जास्त रुंद नाही. अजुनही इथे पुर्वीपासुन रहदारीचे साधन असलेल्या डिझेल बोटीच चालतात. ह्या बोटीमधुन माणसेच काय तर दुचाकी वहानेही आरामात एका किनार्यावरुन दुसर्या किनार्यावर नेता येतात. खर तस गोराई गाव भायंदरशी भुप्रदेशाने जोडलेल आहे पण भायंदरवरुन गोराई गावात जायच म्हणजे चांगलाच वळसा पडतो. भायंदरवरुन एक रस्ता सरळ गोराई गावात येतो तिथुन तो पुढे मनोरीला जाउन संपतो. ह्याच रस्त्यावर मध्येच गोराईसारखे एक गाव लागते तेच हे "उत्तन". ह्या रोडला त्यामुळेच काही लोक उत्तनचा रस्ता असे ही बोलतात. हा एक फ़ार मोठ्या पल्ल्याचा रस्ता आहे. दिवसादेखिल तिथे भायंदर ते गोराई ही एस.टी सोडली तर वहानांची वर्दळ तुरळकच असते. मग रात्रीची तर गोष्टच सोडा. अश्या ह्या सामसुम रस्त्यावर नाईट बाईकिंगच्या "थ्रील" चा अनुभव घेण्यासाठी मी उत्सुक होतो. कधी एकदा आठ वाजताहेत असे मला झाले होते.
*************************************************************************************************************************
मी ठरलेल्या वेळेवर गोराई जेट्टीवर पोहचलो. ठरल्या वेळेवर पोहचणार्यापैकी मी एकटाच होतो. पलिकडे गोराईला जाणारी बोट आत्ताच जेट्टीवरुन सुटली होती.मगासपासूनचा गोंगाट आता थोडा निवळला होता. थोड्याच वेळात बाकीचे सगळे आले. अंकुरच्या बाईकवर मागे चिनू तर परवडीच्या मागे चप्पा बसला होता. आजच्या ट्रिपला मलापण आलेला पाहून ते दोघे म्हणजेच चप्पा आणि चिनू दोघेही खुश झाले. सुरुवातीचे नमस्कार चमत्कार झाल्यावर माझ्या नवीन बाईकचे कौतुक सुरु असतानाच मगासचची बोट फिरून परत जेट्टीला लागली. प्रथम लोकांना चढायला देऊन मागाहून आम्ही चढलो. बोटीवरल्या एका माणसाने आमच्या बाईक्स बोटीवर चढवून दिल्या. तसा पल्ला जास्त लांबचा नव्हता मोजुन पंधरा ते वीस मिनिटांचा प्रवास. पण तो ही माझ्या जीवावर आला होता. माझी पलिकडे गोराई गावात बाईक घेउन जायची ही पहिलीच वेळ होती. पाण्यावरुन संथ पणे जातानाही बोटीच्या हेलकाव्यामुळे मला बोटित बाईक धरून उभं रहाताना फार कसरत करावी लागत होती. शेवटी एकदाचा तो प्रवास संपला. बोट आता गोराई गावाच्या जेट्टीला लागली होती. मगासच्याच क्रमाने सुरुवातीला बोटितली प्रवासी उतरले मग आम्ही आणि सगळ्यात शेवटी आमच्या बाईक्स. बोटितल्या मगासच्या अनुभवामुळे आमच्या बाइक्स बोटीत चढवणार्या आणि उतरवणार्या त्या काकांबद्दल मला एकदम आदर वाटु लागला. माझी बाईक सगळ्यात शेवटी खाली उतरवून ते जात असताना मी स्वत:हुन त्यांच्या हातावर दहाची एक नोट ठेवली. ते थोडासे गडबडले. बहुदा अशी बक्षिसी मिळायची त्यांचीही ही पहिलीच वेळ होती.
"साल्यांना फ़ुकटच्या सवयी लावू नकोस रे .."
त्या इसमाची पाठ वळल्या वळल्या अंकुरने माझ्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली. मी परवडीकड़े पाहिल तर त्याच्याही नजरेत मला अंकुरच्या वैतागाचे समर्थन दिसले. उत्तरादाखल मी फ़क्त मान डोलावली. एव्हाना आमच्या अगोदर उतरलेली माणसे बाहेर उभ्या असलेल्या रिक्षामधुन आपापल्या मुक्कामावर कधीच मार्गस्थ झाली होती. आम्हाला इथवर घेउन आलेली बोटही आता इकडले दोन तीन प्रवासी घेउन पुन्हा बोरीवलीच्या दिशेने निघाली. आता जेट्टीवर आम्ही पाचजण आणि आमच्या तीन बाईक्स एव्हढेच उरलो होतो. पाठीमागे बोरिवलीची जेट्टी स्पष्ट दिसत होती. मुंबई शहर आणि गोराई गाव ह्यातला फरक मला समोरासमोर दिसत होता. समोरच्या किनार्यावर रोषनाईचा सूर्य तळपत असताना इथल्या किनार्यावरचा उरला सुरला उजेडही जाता जाता ती बोट आपल्यासोबत घेउन गेली होती.
"हम्म्म.... चला निघुया......." परवडीने बाईक सुरु करताना म्हटले.
लगोलग सगळ्याच्या बाईक सुरु झाल्या. मगासच्याच जोड्या होत्या तश्याच कायम होत्या म्हणजे अंकुरच्या मागे चिनू आणि परवडीच्या मागे चप्पा. माझ्या बाईक चालवण्याच्या स्किलवर अजुन तेव्हढा कुणाचा कोन्फ़िडंस नव्हता हे मला माहिती होते म्हणुन मीही त्यांच्यापैकी कुणाला माझ्या गाडीवर बसा म्हणून आमंत्रण दिलं नाही. जेट्टीच्या तोंडाशी असलेल्या गेट ओलांडुन गोराई ते भायंदरपर्यंतच्या प्रवासात इतकी वर्ष आजतागायत एकट्याचीच मोनोपॉली असणार्या त्या गोराईच्या रस्त्यावर आम्ही आमच्या बाईक्स पळवु लागलो. हा रस्ता तिकडचा एकमेव हमरस्ता असूनदेखिल एकाच वेळी फ़क्त दोन कार पास होतील एव्हढ्याच रुंदीचा होता. रस्त्यावर एकाबाजुला एका विशिष्ट अंतरा अंतरावर आणि खासकरून वळणावर काही ट्युबलाईटस लावल्या होत्या. तेव्हढाच काय तो प्रकाश होता त्या रस्त्यावर. आमच्या बाईक्स वेगात पळत होत्या. सुरुवातीला परवडीची बाईक, मध्ये माझी आणि शेवटी अंकुरची अशी सिक्वेन्स होती. मोकळ्या रस्त्यावर पहिल्यांदाच अशी बाईक चालवायला मिळत असल्याने माझी अवस्था वारा प्यायलेल्या वासरागत झाली होती. स्वत:ला इतरासमोर प्रुव्ह करण्याच्या नादात मी एक्सिलेटर दिला आणि उजव्याबाजुने परवडीला ओव्हरटेक केल. आता मी पुढे, मागे परवडी आणी शेवटी अंकुर असा क्रम झाला. मी साईड मिररमध्ये पहात मी नेहमीच पुढे कसा राहिन ह्याची काळजी घेत होतो. थोड्या वेळाच्या ड्राईव्हनंतर समोर एका वळणावर काही दिवे लुकलुकताना दिसले. गावाची हद्द सुरु झाली होती बहुतेक. गावात शिरल्या शिरल्याच पहिल्या काही मिनिटातच एक तिठा लागला. तिठ्याच्या मधोमध डाव्या बाजुला मनोरी आणि उजव्या बाजुला उत्तन असा मार्ग दाखवणारा बोर्ड होता. मला पुढचा रस्ता माहिती नव्हता. मी बाईक स्लो केली. त्या बोर्डाच्या बाजुलाच एक चहावाला होता. तो तिथ होता म्हणून ह्या गावात ह्यावेळेस कुणीतरी जाग आहे अस म्हणायला वाव होता.
"उजवीकडे........"
परवडीे गाडी न थांबवताच पुकारा करत पुढे निघुन गेला. मागोमाग अंकुर गेला. जाता जाता चिनु मला चिडवून गेला. आता मगासच्याच क्रमवारीत मी शेवटला होतो. उजवीकडे वळल्यानंतर चारपाच घरांनंतर एक ही घर नव्हत मला नवल वाटलं कि एव्हढ्या चार पाच घरांच्या आवारातच गावाची हद्द कशी संपली. गावाची हद्द संपल्यासंपल्या रस्त्या शेजारच्या ट्युबलाईट्सनीही स्वत:चा आमच्या सोबतचा प्रवास आता आवरता घेतला होता. रस्त्यावर आता आमच्या हेडलाईट्सचाच काय तो एकमेव प्रकाश होता, बाकी जिथे नजर जाईल तिथे नुसता काळोखच काळोख. एव्हाना गाव मागे पडल होत. रस्त्याच्या दोन्ही बाजुला दुरदुर पर्यंत मानववस्तीचा कुठलाच पुरवा दिसत नव्हता. रस्तानेही आपल सरळसोट व्यक्तिमत्व सोडुन दिल होत. प्रत्येक अर्ध्याएक किलोमीटर नंतर अवघड वळण तरी येत होती नाहीतर चढण तरी. मागे बसलेला चिनु आणि चप्पाला आता कंठ फ़ुटला होता. त्याची अखंड बडबड चालु होती. आजुबाजुचे रातकिड्यांची किरकिर, सोबत आमच्या बाईक्सची घुरघुर आणि त्यात चप्पा व चिनुची बडबड. अंकुर आणि परवडीही त्यांना अधुन मधुन प्रतिसाद देत होते. ह्या पुर्ण प्रवासात मी एकटाच असा होतो की ज्याच सगळं लक्ष्य हे फ़क्त आणि फ़क्त रस्त्यावर होत. पण रात्री बाईक चालवायची मजा काही औरच होती. सभोवतालचा काळोख मी मी म्हणत अगदी अंगावर येत होता आमच्या तिन्ही गाड्याचे हेडलाईट्स त्याच्या मुजोरीपुढे थिटे पडत होते.
आणि अचानक..............
पुढच्या दोघांनी मला काही कळायच्या आत आपापल्या गाड्यांचे हेडलाईट्स ऒफ़ करुन टाकले आता फ़क्त माझ्याच बाईकच्या हेडलाईट्सचा प्रकाश होता. चप्पाने ओरडुन सांगितले
" अमोल.........हेडलाईट्स ऒफ़ कर.........."
" काय्य्य्य्य्य्य...................." मी गोधळलेलो. हे अस कायतरी माझ्यासाठी एकदम नविनच होतं
" अरे येडया......हेडलाईटस ऒफ़ कर........." चप्पा वैतागुन डाफ़रला.......
मी लाईट्स ऒफ़ केले. इतका वेळ दबा धरुन बसलेल्या आजुबाजुच्या त्या काळोखाने लाईट बंद केल्या केल्या माझ्यावर झडप घातली. मला दोन सेकंदासाठी समोरच काही दिसतच नव्हतं. डोळ्यांच्या समोर एक हिरवा प्रकाश साचुन राहिला होता. परवडी आणि अंकुर मात्र अगदी सराईतपणे बाईक चालवत होते. हळुहळु माझी नजरही आता ह्या अंधुक प्रकाशाला सरावली होती. आता रस्त्यावर अंकुर आणि परवडीच्या टेल लाईटसचा अंधुकसा प्रकाश माझ्यासमोर पळत होता. त्याच्याच जोरावर मीही माझी बाईक पळवत होतो. लाईटस बंद केल्याने मला एक गोष्ट समझली होती की वाटत होता तितका आजुबाजुचा काळोख गडद नव्हता. मी वर पाहिल तर चंद्र पुर्ण भरात होता. छान चांदण पडलं होत. त्यांचा प्रकाश खुप नसला तरी मनातुन काळोखाची भिती काढण्या इतपत नक्किच होता. चंद्राच्या त्या निळ्या प्रकाशात आजुबाजुच्या सगळ्या गोष्टी निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या शेड्स दाखवत होत्या. समोरचा रस्ता एका नदिसारखा वाटत होता आजुबाजुच्या झाडे, समोर दिसणारी टेकडी हे सगळे काळसर निळ्या केनव्हासवर गडद जांभळ्या रंगाने रंगवल्यासारखे दिसत होते. ह्या निळसर अंधारात समोरच्या टेल लाईटच्या अंदाजाने बाईक चालावायला आता मलाही फ़ार थ्रिलिंग वाटत होतं. समोरुन छातीला भिडणारा गार वारा डोक्यात अजुन उन्माद वाढवत होता. अचानक आजुबाजुच्या शांत वातावरणात परवडीने गाडीला दिलेला एक्सिलेटर घुमला. अंकुरने मिळालेल्या ह्या इशारतीवर स्वत:च्या बाईकाचा नेक्स्ट गिअर टाकला. पुढच्याच क्षणाला त्या दोनही टेल लाईटस वेगाने माझ्यापासुन दूर जाउ लागल्या. मला कळेपर्यंत ते बरेच दूर गेले होते. माझ्याकडेही आता वेग वाढवण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. आता आमच्या बाईक्स मगासच्यापेक्ष्या बर्याच वेगात पळत होत्या. मला त्यांच्यासोबत स्पीड राखताना दमछाक होत होती. परवडी आणि अंकुर कमालीच्या वेगाने आपापल्या बाईक्स पळवत होते. मला समजुन चुकले की मी बाईक चालवण्याच्या बाबतीत त्याच्यापेक्षा कितीतरी लेव्हल मागे होतो. मघाशी मी त्याना ओव्हरटेक केल्याच्या आगाऊपणाची त्यांनी सव्याज परतफ़ेड केली होती. पुढच्याच एका वळणावर त्या दोन्ही टेल लाईट्स उजवीकडे झपकन वळल्या. मला रस्त्याचा नीट अंदाज येत नव्हता, मी उगाच रिस्क नको म्हणुन बाईक थोडी हळु केली आणि सावधपणे ते वळण निगोशियट केले. वळण पुर्ण केल्याकेल्या थोड सावरल्यावर समोर नजर टाकली तर माझी चांगलीच फ़ाफ़लली. मला माझ्या समोर आतापर्यंतच्या माझ्या गाईड लाईन्स असलेल्या त्या टेल लाईटसच दिसत नव्हत्या. मी अतिशय काळजीपुर्वक पाहिल पण माझी शंका खरी ठरत होती. अंकुर आणि परवडी मला मागे एकटा सोडुन फ़ार पुढे निघुन गेले होते. ह्या अंधारात अश्या निर्जन जागेवर रात्रीच्या अश्या वेळेस मी अगदी एकटा आहे ही कल्पना डोक्यात येताच भितीची एक लहर अंगातुन वहात गेली. मी गाडीचे हेडलाईट्स ऒन केले आणि होर्न वाजवू लागलो. त्या निशब्द परिसरात माझ्या बाईकच्या होर्नचा आवाज केव्हढ्यानं तरी वाजत होता. पण त्या आवाजाने मला आधार मिळण्याऐवजी तो आवाज मला माझा एकटेपणा अजुन जाणवून देत होता. मी आता गाडी जोरात चालवून त्यांना गाठायचा प्रयत्न करु लागलो.
जवळपास पाच दहा मिनिटे सलग चालवूनसुध्दा त्याचा काही हासभास लागला नाही. मला वाटत होते त्याहीपेक्षा ते लोक फार पुढे निघून गेले होते. मला तर विश्वासच बसत नव्हता की अस कस काय होउ शकत? त्या वळणा अगोदर माझ्या नजरेसमोर असणारी ही माणसे काही क्षणात अशी एकाएकी गायब कशी काय होउ शकतात? मला तर काही सुचतच नव्हत. तेव्हढ्यात इतका वेळ न सुचलेली गोष्ट माझ्या लक्ष्यात आली. मी त्यांना फोन लावायचा ठरवला. गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. तशी खर तर एव्हढी खबरदारी घ्यायची काही गरज नव्हती. कारण त्या अख्ख्या रस्त्यावर माझ्या आणि माझ्या बाईकच्या व्यतिरिक्त दुसर कुणीही नव्हत पण तरीही मी नवशिक्या ड्राईव्हर असल्याने ट्राफ़िकचे सगळे नियम पाळण्याची मला तेव्हा सवय होती. घरून निघतानाच मोबाईल बैटरी शेवटच्या घटका मोजत होती आणि आता पाहिलं तर तिने केव्हाच दम सोडला होता. माझा त्यांना गाठायचा हा प्रयत्नही फोल ठरला होता. आता मात्र ही खरच माझ्यासाठी चिंतेची बाब होती. साला मी ह्यांच्यासोबत इथे यायलाच नको हव होते. हे साले अस काहीतरी करणार आहेत हे मला अगोदर माहिती असते तर मी अजिबात आलो नसतो. पण आता हा विचार करण्याची वेळ निघुन गेली होती. मी आठवायचा प्रयत्न करू लागलो की रस्त्यात मधे कुठे एखादा फाटा तर लागला नव्हता ना? मी रस्ता तर चुकलो नव्हतो ना? लगोलग मेंदुने तर्कशुध्द उत्तर दिल की अजिबात नाही कारण जेट्टीपासुन इथवर येईपर्यंत गावातल्या त्या तिठ्याखेरिज दूसरा कुठलाच रस्ता दिसला नव्हता किंवा तशी काही खूणही आढळली नव्हती.आणि दूसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते दळभद्री वळण येण्याअगोदर पासून एक गोष्ट मला जाणवली होती की रस्त्याच्या दुतर्फा दगडांच्या ज्या कुंपणवजा भिंती घातलेल्या होत्या, त्या अजुनही मला सोबत करत होत्या. सध्याच्या ह्या परिस्थितीत आता माझ्याकडे फ़क्त दोनच पर्याय होते. एक तर तडक मागे फिरायचं किंवा इथून पुढे त्यांच्या मागावर जायचं. मी पुढे जायचं ठरवलं त्याला दोन कारणं होती. एकतर माझा मोबईल बंद होता आणि दुसर म्हणजे मला वाटत होत की मी त्यांच्या सोबत नाही हे आता त्यांच्याही लक्ष्यात आले असणार. माझा फोन बंद आहे हे कळल्यावर ते मला शोधायला मागे फिरले असतील तर वाटेतच आमची गाठ पडेल. मी बाईक स्टार्ट केली आणि पुढे निघालो. मला अजुनही अस वाटत होत की हे लोक साले माझी मस्करी करत असणार बहुतेक. देव करो आणि तसेच व्होवो मनातल्या मनात देवाला हाक मारली. बाईक चालवून थोडावेळच गेला असेल की मला एक आशेचा किरण दिसला. मला समोर रस्त्याच्या डाव्याबाजुला उजेडासारखं काहीतरी दिसत होत. एक बल्ब जळत होता. एस.टी महामंडळाच्या विनंती थांब्यासारखं काहीतरी होत. मी गाडी थोडी स्लो केली. तो थांबा जस जसा जवळ येउ लागला तस मला दिसल की त्या थांब्यावर दोन व्यक्ति उभ्या आहेत. तिथे एक 30-35 ची बाई आणि एक 5-7 वर्षाची मुलगी उभी होती. चला कुणीतरी माझ्याशिवाय इथे आहे ही भावनाच मनावरचा बराचसा ताण हलका करुन गेली. पण मागोमाग मेंदुने सावधानीचा इशारा दिला. की एव्हढ्या रात्री ह्या दोघी अश्या निर्जन रस्त्यावर अश्या अवेळी कुठल्या बसची वाट बघताहेत? काही लफ़डं तर नाही ना? मी वेळेचा अंदाज बांधला तर आता कमीत कमी 10:30 तरी वाजायला हवे होते. चल काहीतरीच काय अश्या गोष्टी रात्रीच्या बाराच्यानंतर बाहेर पडतात अस कुणीतरी सांगितलेले आठवले आणि आता तर बाराला अजुन वेळ होता. त्यांच्याकडुन काही मदत मिळते का? किंवा माझे मित्र इथून पुढे जाताना त्यांनी पाहिलय का? ह्याची चौकशी करण्यासाठी मी गाडीचा वेग अजुन मंदावला आणि गाडी रस्त्याच्या अगदी डाव्या बाजुला आणली. माझी गाडी जस जशी त्याच्या जवळ जाऊ लागली तशी मला एक गोष्ट जाणवलीं की त्या दोघी माझ्याकडे टक लावून बघत होत्या. मलाही त्या आता स्पष्ट दिसत होत्या. दोघिहीजणी तिकडच्याच कुठल्यातरी रहाणार्या वाटत होत्या. त्या बाईने साधी सहावारी साडी नेसली होती पण ती साडी थोड़ी अस्त्यावस्त किंवा घाईघाईत नेसल्यासारखी वाटत होती. तिच्या केसांचा बुचडा बहुतेक सुटल्यासारखा वाटत होता. एका हातात प्लस्टिकची पिशवी आणि दुसऱ्या हाताने तीने त्या मुलीचा हाथ पकडला होता.ती मुलगी तिच्या डाव्याबाजुला उभी होती. थोडक्यात सांगायच तर ती बाई थोडी \विचित्रच वाटत होती. त्या मुलीने एक ड्रेस की काहीतरी घातला होता. दोघी एकदम शांत उभ्या होत्या एकटक माझ्याकडे पहात जणुकाही इतका वेळ ज्याच्यासाठी थांबल्या आहेत तो मीच आहे. थांब्यावर अडकवलेला बल्ब नेमका त्या दोघींच्या डोक्यावर होता. दिव्याखाली अंधार ह्या म्हणीनुसार त्या दोघींचे ही चेहरे मला नीटसे दिसत नव्हते. मी त्यांच्यासमोर गाड़ी थांबवणार एव्हढ्यात मला त्या दोघींची एक गोष्ट नजरेला खुपली. त्या छोट्या मुलीने जो ड्रेस घातला होता तो शाळेचा होता. पाठीमागे दफ्तर होते. वेण्या व्यवस्थित पाठीमागे बांधलेल्या होत्या, गळ्यात वोटर बोटल होती. मुलगी एकतर शाळेत जायच्या तयारीत होती किंवा नुकतीच शाळेतुन सुटली होती अश्या पेहरावात होती. थोडक्यात ती मुलगी अगदी अप टु डेट होती पण तिच्यासोबतच्या बाईच्या अगदी परस्पर विरोधी. आता मी त्यांच्या बरोबर समोर आल्याने मला त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत होते. दोघीचेही चेहरे पांढरे फ़ट्ट्क होते. त्यांच्या चेहऱ्यावर कुठले म्हणजे कुठलेच भाव नव्हते. बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या दोघीच्या परस्पर विरोधी असताना त्या दोघींमध्ये एक गोष्ट मात्र सेम होती ती म्हणजे त्या दोघींच्याही कपाळावर डोळ्यांच्या वरच्या भागावर एक मोठी खोक पडल्यासारखी वाटत होती. कुठल्यातरी मोठ्या अपघाताची निशाणीसारखी. त्यांचे डोळे अजुनही माझ्यावरच रोखलेले होते. हा सगळा प्रकार नेमका काय असू शकतो हे मला समजायला अजुन कुठल्याही पुराव्याची गरज नव्हती. मी त्यांच्यासमोर जेमतेम थांबायला आलेली गाड़ी पुन्हा जोरात सुरु केली आणि सुसाट सुटलो. न राहून मी पुढे जाऊन पुन्हा एकदा मागे वळुन पाहिले तर त्या दोघी अगदी तश्याच उभ्या होत्या अगदी शांत माझ्यावर नजर रोखुन. माझी तर आता चांगलीच तंतरलेली. मी जेव्हढ्या जोरात चालवू शकत होतो तितक्या जोरात बाईक पळवत होतो. माझी अवस्था इकडे आड़ आणि तिकडे विहीर अशी झाली होती. पुढे कुठे जायचयं हे माहीती नव्हतं आणि पाठीमागे त्या दोघी उभ्या होत्या. कुठली अवदसा सुचली आणि आज हे असलं थ्रील अनुभवायला आलो. मोठा बाईकर समझतो स्वत:ला. मी स्वत:च स्वत:ला शिव्याची लाखोली वहात होतो. सद्यपरिस्थीत मला ह्याशिवाय दुसर काही सुचतही नव्हते. मला खुप रडायला येत होत. डोळ्यांसमोर सारख्या त्या दोघीच येत होत्या. तेव्हढ्यात कुणीतरी मागुन माझ नाव घेतल्यासारखे वाटले. पहिल्यांदा मला वाटलं की मला भास झाला असावा.
"अमोल......."
पण आत्ताचा हां आवाज अगदी स्पष्ट आला होता. हो... कुणीतरी मागुन माझ्याच नावाचा पुकारा करत होते. मी थांबुन मागे वळुन पहाणारच होतो पण पुन्हा मला त्या दोघीची आठवण झाली. त्या माझ्या मागावर येउन मला बोलावत तर नसतील... ह्या विचारासरशी भितीची एक सणक मणक्यांतुन पार डोक्यात गेली. नाही...अजिबात मागे वळुन पहायचे नाही मी घाबरून अजुन जोरात बाईक पळवु लागलो. आता तो आवाज परत आला नाही. माझी खात्री पटली की म्हणजे त्या दोघीच मला बोलवत होत्या तर. याचाच अर्थ की त्या अजुनही माझ्या मागावर होत्या.
हे राम ......देवा प्लीज सोडव मला ह्या सगळ्यातुन. मी मनातल्या मनात कुलादैवतेला साकडं घातलं. मी बाईक चालवता चालवता एका हाताने माझे डोळे पुसत होतो.
"अमोल....."
अचानक माझ्या उजव्या बाजूने अगदी जवळुन हाक ऐकू आली. मी दचकून बाजुला पाहिल तर....
ते परवडी आणि अंकुर होते. परवडी बाईक चालवत होता आणि अंकुर मागे बसला होता. मला तर माझ्या डोंळ्यावर विश्वासच बसत नव्हता. मी अविश्वासाने त्याच्याकडे पहात होतो.
"अरे... बघतोस काय चुतिया.... गाडी थांबव पहिली......"
परवडीच्या आवाजाने मी भानावर आलो. मनातून त्या दोघांचा संशय येत होता. पण आता गाडी थांबवण्याखेरिज माझ्याकडे दूसरा काही पर्याय नव्हता. तस ही आता त्या दोघांनी आता मला गाठलच होत. मी गाडी साईडला घेतली. परवडीची बाईक माझ्यासमोर येउन थांबली. दोघेही उतरून माझ्याकडे आले. दोघेही जाम भडकलेले होते.
"कुठे चालला होता रे तू?? आणि होतास कुठे इतका वेळ??"
अरेच्चा साले, इतका वेळचा माझा हा प्रश्न हे लोक मलाच विचारत होते.
"साल्या.....बराच वेळ तुझी काही चाहुल लागली नाही म्हणून आम्ही मागे वळुन बघितलं तर तू गायब झालेला. आम्हाला वाटल तू आमच्या मागेच आहेस. आम्ही बाईक्स स्लो केल्या तरी तु काही आला नाहीस. गाड्या साईडला घेउन बराच वेळ तुझी वाट पाहिली तरी काही उपयोग झाला नाही. सरतेशेवटी तुझा फोन ट्राय केला तर तो पण स्विच्ड ऑफ़. आम्हाला तुझी काळजी वाटायला लागली. मग आम्ही ठरवल की दोघांनी पुढे जाऊन शोधायचं आणि दोघांनी मागे जाउन. ज्याला तू पहिला सापडशील त्याने दुसर्याला फ़ोन करून कळवायच. आता बोल ना कुठे होतास तू इतका वेळ??" परवडी मला विचारत होता. त्याच्या बोलण्यातुन त्याची माझ्याविषयीची काळजी स्पष्ट कळत होती. मी काहीच बोललो नाही. आता त्याची हालत बघता त्यांना मगासचा घडलेला प्रकार कितपत समजेल हा मोठा प्रश्न होता आणि तसही जे काही घडलं होत ते सांगायची ही वेळही नव्हती अन जागाही. अंकुरने लगोलग चप्पाला फोन लावला आणि मी भेटल्याच सांगुन टाकल.
"तुम्ही कुठे आहात......OK.........नको आता पुढे नका येऊ......तुम्ही आहात तिथेच उभे रहा आम्ही येईपर्यंत" एव्हढ बोलून त्याने फ़ोन कट केला.
" पहिल मला सांग तू आमच्या पुढे कसा काय आला? आणि तू साल्या जेव्हा आम्ही पाठून हाका मारत होतो तेव्हा थांबला का नाहीस? ऐन वक्ताला गाडीचा हॉर्न बंद पडला आणि त्यात तू ही तुझी बाईक मायकल शुमाकर सारखी पळवतोय" मला त्याही परिस्थीतीत अंकुरचं जनरल नॉलेज पाहून हसू आले. मला हसताना पाहून अंकुर अजुन भडकला. तो काही पुढे बोलणार तेव्हढ्यात
"चल बे ......ह्याला नंतर बघू अगोदर जेट्टीवर पोहचायाला लागेल. साडेबाराची लास्ट बोट असते. ती चुकली तर वाट लागेल. चल अमोल लवकर आणि मघाशी जशी चालवलीस तशीच जोरात बाईक चालव आणि हो आता आमच्या पुढे रहा आणि राईट मिरर मध्ये आम्हाला ठेव..." परवडीने मला इन्स्ट्रक्शन्स देऊन बाईक स्टार्ट केली. मी म्हटल " प्लीज माझी बाइक कुणी चालवेल का?" त्या दोघांनी एकामेकांकडे वैतागुन बघितलं. अंकुरने माझ्याकडून बाईकचा ताबा घेतला. मी गुपचुप त्याच्या मागे बसलो. आता त्या दोनही बाईक्स वाऱ्याच्या वेगाने जेट्टीच्या दिशेने पळत होत्या. अंकुरच्या मागे बसून परत जाताना मला जाणवलं की मी ह्या सगळ्या घडामोडीत बराच पुढे आलो होतो. परतीच्या मार्गावर तो मगासचा विनंती थांबा कुठे दिसतो का ते मी पहात होतो. पण बराच वेळ होऊनदेखिल तो काही दिसत नव्हता. मगाशी त्या थांब्यावरुन पुढे जाताना लागलेल्या वेळेनुसार परतीच्या वाटेवर एव्हाना खरंतर तो यायला हवा होता.
जाऊ दे..... मरू दे....साला तो विषयपण नको आणि ती आठवणपण. मी थकून अंकुरच्या खांद्यावर डोक टेकलं.
**************************************************************************************************************************
अचानक मला बाईकचा स्पीड कमी होत असल्याचा जाणवला.अंकुरच्या खांद्यावरुन समोर पाहिल तर रस्त्याच्या कडेला एक बाईक साईड लाईट ऑन करून उभी होती. आणि त्याच्या शेजारी दोन व्यक्ति एकामेकांना अगदी बिलगुन उभ्या होत्या. लांबुन बघताना एखाद कपल अंधाराचा फ़ायदा घेउन काहीतरी चाळे करतय अस वाटत होत. दोन्ही गाड्याचे हेडलाईट्स एकदम त्यांच्यावर पडले आणि समोरचे दृश्य पाहून आम्ही गडबडुन गेलो. समोर चिनूला बहुतेक फ़िट आल्यासारखी वाटत होती. त्याने डोळे फिरवले होते. दात कचकच वाजवत तोअंगाला एकसारखे झटके देत होता. त्याला त्या परिस्थितीत आवरताना चप्पाची हालत खराब होत होती. आम्ही धावत त्यांच्याकडे पोहचलो आणि विचारलं काय झालं?
आधी इथनं चला मग सगळं सांगतो" रडवेल्या आवाजात चप्पा म्हणाला.
परवडीच्या बाईकवर मध्ये चिनुला बसवून चप्पा त्याच्या मागे बसला. आता माझी आणि अंकुरची बाईक रिकामी होती. आता परत जाताना सगळ्यांत पुढे परवडी, मागे मी आणि सगळ्यांत शेवटी अंकुर असा सिक्वेंस होता. जवळपास वीस पंचवीस मिनिटात आम्हाला आमच्या समोर जेट्टीचा गेट दिसू लागला आणि सोबत बोटिचा निघण्याअगोदर ह्या दिवसाताला शेवटचा होर्नही ऐकू आला. त्या बरोबर अंकुरने बाईकचा हॉर्न वाजवायला सुरुवात केली. मला अंकुरच्या ह्या प्रसंगावधानाचं कौतुक वाटलं. बोट आमच्यासाठी जेट्टिवर थांबली होती. आम्ही बोटिजवळ पोहचलो. मगासचे काका मला पाहून तत्परतेने पुढे आले आणि माझी बाईक उचलून आत ठेवली. आता ह्या शेवटच्या फेरीला प्रवासी म्हणुन आम्ही पाचजणच होतो. बाकी बोटिचा ड्राईव्हर आणि ते काका असे दोघेच जण होते. चिनू आता बर्यापैकी सावरला होता. पण त्याची थरथरी काही अजुन कमी झाली नव्हती. सगळे एकदम शांत होते. कुणी कुणाशी काही एक बोलत नव्हते.
"काय झाले रे चिनुला????" अंकुरने शांततेचा भंग करत चप्पाला विचारले.
"अहं....." चप्पा कसल्यातरी तंद्रीतुन बाहेर आल्यासारखा बोलला. चप्पाने एकवेळ आम्हा तिघांकडे पाहिल आणि सगळ्यांत शेवटी चिनूकडे पाहून सांगायला सुरुवात केली.
" आयला काय झालं, कसं झालं तुम्हाला काय सांगु? कळतच नाहीय मला. अंकुर तुझा फोन आला तोवर आम्ही अमोलला गावापर्यंत शोधून आलो होतो. पण अमोल काही सापडला नाही. तिठ्यावरच्या चहावाल्याकडे इथून एखादी ब्लेक पल्सर पास झाली काय याची चौकशी केली. त्याने सांगितले मघाशी तुम्हा तिघांच्या गाड्या गेल्या तेव्हढ्याच त्यानंतर इथून कुठलीच गाडी गेली नाही. आम्हाला आता अमोलची सॉलिड काळजी वाटायला लागली. मला काही सुचत नव्हतं. चिनू म्हणाला आपण परत मागे जाऊ आणि पुन्हा एकदा रस्त्यावर अमोलला शोधू. मला चिनुच म्हणण पटलं. आम्ही परत निघालो. डोक्यात नको नको ते विचार येत होते. अमोल असा कसा काय गायब झाला काहीच कळत नव्हतं . आम्ही रस्त्याच्या कडेला निरखून पहात होतो. पण काही उपयोग होत झाला नाही. एव्हाना आम्ही अमोल जिथून शेवटचा दिसला होता त्याच्याही पुढे निघून आलो होतो. तेव्हाच तुझा मला फोन आला की अमोल सापडला म्हणुन आणि तू सांगितलस की आहात तिथे थाबुंन रहा म्हणुन. अमोल सापडला हे ऐकून माझा जीव भांड्यात पडला. मी लागोलग ही गोष्ट चिनुला सांगितली. तोही खुश झाला. आम्ही आता तुम्ही सांगितल्या प्रमाणे गाडी फिरवून उभे राहिलो. गाडी बंद केली. सिंगल स्टेण्ड्ला गाडी उभी केली आणि साईड लाईट ऑन करून आम्ही एका आडोश्याला जाउन हलके होउन आलो. आजुबाजुचा परिसर अगदी निवांत होता. बाईक बंद केल्यावर तर आजुबाजुच्या शांततेत अजुन भर पडली होती. चंद्राच्या प्रकाशात आजुबाजुचा परिसर अगदीच स्पष्ट नाही पण बर्यापैकी व्हिजिबल होता. मी सहज वर पाहिले तर आज पोर्णिमा असल्यासारखे वाटले. मी आणि चिनू एकामेकांशी गप्पा मारत तुमची वाट पाहू लागलो. तेव्हा माझ लक्ष्य चिनुच्या मागे जाणवलेल्या हालचाली कड़े गेले. तिथे अंधारात रस्त्याच्या कडेला दोन आकृत्या उभ्या होत्या. त्यातली एक आकृती एका बाईची आणि दूसरी आकृती लहान मुलीची होती. मी गडबडुन पुन्हा पाहिले तर तिथे कुणीच नव्हते मला वाटलं की मला भास् झाला बहुतेक. मी पुन्हा गप्पा मारायला सुरुवात केली. पुढच्याच क्षणाला चिनुच्या ड़ोक्यामागे काहीतरी फ़डफ़डताना दिसलं. मी निरखून पाहिल तर एक 30-35 ची बाई चिनुच्या मागे एका हाताच्या अंतरावर उभी होती. तिच्यासोबत एक मुलगी पण होती. शाळेचा ड्रेस घालून. दोघी एकदम विचित्र दिसत होत्या. मला अचानक शांत झालेला पाहून चिनू नेही मागे वळुन पाहिले. त्या दोघींना पहाताच घाबरून चिनू दोन पावलं मागे सरकला आणि मला येउन धड़कला. त्या दोघी मात्र आहेत त्या जागेवर अगदी शांत आणि निश्चल उभ्या होत्या. चंद्राच्या प्रकाशात त्याचा चेहरा आता स्पष्ट दिसत होता. दोघिंचेही चेहरे एकदम निर्जीव होते. त्यांच्या कपाळावर कसलीतरी मोठी खोक पडलेली दिसत होती. त्यांनी त्यांचे डोळे आमच्यावर रोखलेले होते. आमची तर वाचाच बंद पडली होती. घश्याला कोरड पडल्यासारखे वाटतं होते. जोरदार ओरडावेसे वाटत होते पण भीतीने तोंडातुन शब्दच फुटत नव्हता. इतक्यात त्या छोट्या मुलीने एकाएकी जोरदार किंचाळ्या फोडायला सुरुवात केली. त्या निशब्द वातावरणात तिच्या त्या किंचाळ्यांचा आवाज केवढ्यानं तरी घुमत होता. आम्हाला तर आमचे कानच बसल्यासारखे वाटले. अचानक तिच्या किंचाळ्याचा आवाज थांबला. आम्ही त्यांच्याकडे पाहिले तर त्या तश्याच शांत आणि निर्विकार उभ्या होत्या आमच्याकडे टक लावून पहात. आता ती बाई अचानक जोरजोरात हसायला लागली. त्यावेळेला तीचे ते अस बेसुर हसणे अंगावर काटा आणतं होत. आमची तर भीतीने बोबडीच वळली होती. अचानक ती बाई हसता हसता रडायला लागली. स्वत:चा उर दोन्ही हातांनी बडवायला लागली. तिचे दोन्ही हाथ मोकळे पाहून, आमचं लक्ष्य मघापासून तिचा हाथ धरून उभ्या असलेल्या तिच्या त्या मुलीकडे गेले तर ती जागेवर नव्हती मी इकडे तिकडे पाहिले तर ती उलटी होऊन पाठिची कमान करून दोन्ही हात तिने जमिनीला लावले होते पण सगळ्यात विचित्र म्हणजे ह्या असल्या पोझिशन मध्ये तिचा चेहरा उलटा असायला हवा होता. पण नाही तो सरळच होता. ती आता खेकड्यासारखी चालून आमच्याभोवती घिरट्या घालत होती. आमच्या भोवती घिरट्या घालताना ती मुलगी अगम्य भाषेत काहीतरी बडबडत होती. मध्येच आमच्याकडे पाहात दात विचाकावुन फिसकारत होती. तिच्या डोळ्यांच्या बाहुल्याच गायब झाल्या होत्या. इकडे ती बाई स्वत:चा उर बडवता बडवता आता जोरदार घुमायला लागली होती. तिच्या केसांनी तिचा चेहरा आता पुर्ण झाकला होता. तीच रडणं अगदी असह्य होत होते. आम्ही अगदी रडकुंडिला आलो होतो. अचानक चिनू थरथरायला लागला मला काही कळायच्या अगोदर चिनू एकदम हातपाय झाडायला लागला ते पाहून त्या दोघी अजुन जोरजोरात हसायला लागल्या. मी घाबरून जोरात ओरडलो " चिनू………"
माझा आवाज मला स्वत:लाच केव्हढ्याने तरी ऐकू आला. आजुबाजुला पाहिलं तर सगळं एकाएकी एकदम शांत झालं होतं. मी आजुबाजुला नजर टाकली. घाबरून त्या दोघी कुठे लपल्या आहेत का? ते पाहू लागलो. पण आता त्या रस्त्यावर मी आणि चिनू शिवाय दुसरे कुणीच नव्हते. तेव्हढ्यात दुरून दोन लाईटस आमच्या दिशेने येताना दिसल्या. जवळ आल्यावर कळल की त्या तुमच्या बाईक्स होत्या. तुम्ही आलात आणि विचारायला लागलात की काय झालं म्हणून. आता हे सगळं मी तुम्हाला तिथ कसं सांगणार....."
एव्हढं बोलून चप्पा रडायला लागला. मी चप्पाला जवळ घेतलं. अंकुर आणि परवडीच्या चेहर्यावर भिती स्पष्ट दिसत होती. चप्पानेही तत्कालीन परिस्थीतीत तेव्हा काहीही न सांगण्याचा माझाच पर्याय निवडला होता. पण चप्पाने त्या दोघींचा विषय काढताच मला त्या दोघींचे चेहरे पुन्हा डोळ्यांसमोर दिसू लागले. आजच्या रात्रीच हे थ्रील आम्हा सगळ्यांना भलतचं भोवलं होत.
" कुठं गेला होता रे तुमी सगली इतक्या रातच्याला......" त्या बाईक उतरवणार्या काकांनी मला विचारलं. मी उत्तर दिल नाही. बहुदा त्यांनी आमच बोलण ऐकल होत.
" नका सांगु.....पण तुमच्या बोलण्यावरुन मला समदं कळलय की तुमी कुठं जाउनश्यान आला ते. पुन्यांदा असा शानपना करू नका. तुमच्या आई बापाची पुण्याई म्हणुनश्यान सस्तात वाचलात. अरे निदान दिस बगुन तरी निघायच. अरे...आज पोर्णिमा हाय ना रे. काय बर वाईट झाल असत तर कोण जिम्मेदार होत....." आम्हाला आमची चुक कळत होती. समोर चिनू अजुनही थरथरत होता. काकांनी चिनुकडे पाहिलं आणि म्हणाले" आदि ह्या पोराला पाणि पाजा आणि ह्याला घरात नेण्या अगुदर ह्याच्यावरून तीन येळा नारल ओवालुन काढा. आणि तो नारल कुठल्यातरी तिठ्यावर नेउन फोडून टाका. आणि हो.... नारल फोडून माघारी येताना काय बी झाल तरी मागं वळुन पाहायच नाही..... समझलात काय?" आम्ही माना डोलावल्या. बोट बोरिवलीच्या जेट्टीला लागली. आम्ही खाली उतरलो. काकांनी आमच्या बाईक्स उतरवून दिल्या. मी काकांना पुन्हा दहाची नोट पुढे केली तर काकांनी माझा नोट धरलेला हात हातात घेतला आणि म्हणाले
" नको राजा मला पैका नको फकस्त तुमी लोक सवताला जपा. असल जिवावरच धाडस पुन्यांदा कंदि करू नका. माझ लई नुसकान झाल हाय ह्या असल्या तुमच्या खेळापाई .....अरे तुमच्या एव्हढाच होता रे तो............" एव्हढ बोलून काकांनी शर्टाच्या बाहिने आपले डोळे पुसले आणि बोटीत चढले.
परवडीने माझ्या खांद्यावर हात ठेवून निघायचा इशारा केला. बाहेर येईपर्यंत कुणी कुणाशी बोलत नव्हते. चिनूला घरी सोडायची आणि काकांनी सांगितलेले सोपस्कार पुर्ण करायची जबाबदारी परवडीने घेतली. चप्पा अंकुर सोबत निघाला. मी घरी पोहचेपर्यंत एक वाजला होता. आईने दरवाजा उघडला. आईने मला काही विचारण्या अगोदरच मी तिला मिठी मारली. आईने काय झाल विचारल्यावर मग सांगतो अस निसटत उत्तर देऊन गुपचुप वर आपल्या खोलीत गेलो.
आज ह्या गोष्टीला वर्ष लोटली. सगळेजण आज देवाकृपेने सुखरूप आहेत. त्या रात्रीच्या त्या अनुभवानंतर रात्रीचे ते थ्रील कायमस्वरूपी बंद झाली. आता आमच्यापैकी कुणीही त्या रात्रीविषयी चुकार शब्दही काढत नाही. पण मला ठावूक आहे की ती रात्र दररात्री माझ्याच काय तर आम्हा सगळ्यांच्या आठवणीत जागी असते.
- अमोल परब

भूतकथा - "दुराई"

कोकणच्या समुद्रकिनार्याावरील कुचवडे गावची गोष्ट ... पक्या आणि तुक्या हे दोघे जिगरी दोस्त , सकाळी उठायचे .. मिश्री लावून चहा पीवून गावात फिरायला जायचे आणि आवश्यक ते “संशोधन” करून १० वाजेपर्यंत घरी परत यायचे ,... मग न्याहारी करून १२ वाजता सख्याच्या अड्ड्यावर जावून पावशेर गावठी दारू ढोसायची आणि मग घरी येवून जेवायचे आणि मस्तपैकी सहा वाजेपर्यंत ताणून द्यायची हा त्यांचा नेहमीचा उद्योग ....त्यांचा दिवस खर्याी अर्थाने सुरू व्हायचा तो रात्री दहा वाजल्यावर ! सगळीकडे नीजांनीज झाल्यावर मग हे दोघे वाड्यांतून आंबा काजू बागा धुंडाळायला बाहेर पडायचे !. नाही म्हणायला रविवार अन बुधवारी मात्र न चुकता ते जोडीने बाजाराला जायचे . जवळच असलेल्या गोठणे गावात आठवडी बाजार भरायचा ... रविवारी मच्छी मटन आणि बुधवारी भाजी चा .. पण पक्या तुक्या दोघेही नेमाने दोन्ही बाजार करायचे ...जाताना पिशव्या अन गोणी भरभरून आंबे –काजू न्यायचे अन बाजारात विकायचे आणि येताना भरल्या खिशाने यायचे .... पोराबाळांना आणि बायकोला नवीन कपडे लत्ते किंवा मच्छी मटन आणायचे ...त्यामुळे पोरही खुश असायची .... असं असलं तरीही गावात त्यांना “बॅटरी आंबा वाले” म्हणूनच ओळखत असत ... “बॅटरी आंबा” म्हणजे दुसर्यायच्या बागेतून चोरून आणून बाजारात विकलेला आंबा ..... त्यामुळे आंब्या-काजुच्या दिवसात पक्या-तुकयाची चंगळ असली तरी बरीच लोक दबक्या आवाजात त्यांना चोर ठरवून मोकळे होत .....
तर एका बुधवारी बाजार करून पक्या –तुक्या गोठणे वरुन कुचवडे ला परत येत होते ,येताना वाटेत आबा सोनाराची आंब्याची बाग लागली ... मग काय ? दोघेही लगेच दगडी कुंपणा वर चढून शोधक नजरेने बागेत आंबे कुठे आहेत त्याची टेहळणी करू लागले... इतक्यात कुठूनतरी राख पक्याच्या अंगावर पडली... काय झाले म्हणून बघतो तर बागेत आबा सोनार आणि मांत्रिक भगत “दुराई चेपण्याचा “ विधी करत होते .... हा “दुराई चेपणे “विधी म्हणजे भगताच्या सहाय्याने तेथील रखवालदार भुताला नारळ कोंबडा देणे व बागेचे रक्षण करण्यास सांगणे. शेवटी तो कोंबडा कापून नारळ एका लाल कापडात बांधून बागेतील एका झाडावर बांधायचा व त्यानंतर अभिमंत्रित भस्म सर्व दिशेला उडवायचे ..... तेच भस्म नेमके पक्याच्या अंगावर पडल्याने त्याची जाम टरकली होती ... तसाच तो कुंपणावरन खाली उतरला आणी तुक्या ला सोबत घेवून धावत धावत कसाबसा घरी पोहोचला.... पण भीतीने त्या दोघांची जाम गाळण उडाली होती ....
असेच काही दिवस गेले... आता आंब्याचा सीझन संपत चालला होता ... आता चोरी कुठे करायची असा प्रश्न त्या दोघांना पडला कारण बर्यादच बागांतील आंबे मालकांनीच काढून नेले होते आणि काहींनी चोर्याच होतात म्हणून नेपाळी गुरखे राखणेसाठी आणून ठेवले होते ... ते गुरखे चोर दिसताच कुकरी घेवून धावत यायचे ...त्यामुळे पक्या-तुक्या सारख्या चोरांनी त्याचा चांगलाच धसका घेतला होता .... शेवटी एकच उपाय ... आबा सोनारची बाग ... कारण तिथे गुरखे नव्हते आणि आंबेहि अजून बरेच शिल्लक होते .... पण पक्याच्या मनात “दुराई”ची भीती बसलेली होती ,त्यामुळे त्याचे मन काही आबा सोनाराकडे चोरी करायला धजेना...
पण आता पावसाळा जवळ आला होता आणि पोरांना शाळेत नवीन वर्षाच्या साठी वह्या पुस्तके घ्यायला दोघांकडेही पैसे नव्हते ... त्यामुळे शेवटी नाईलाज झाला ... तुक्या ने कशीतरी पक्याची समजूत काढली आणि मग दोघांनी संध्याकाळीच फुल्ल दारू प्यायली आणि त्या रात्री आबा सोनाराच्या बागेवर डल्ला मारण्याचा विचार पक्का झाला
.....
ती नेमकी वैशाख अमावास्येची रात्र होती. चारी बाजूला मिट्ट काळोख पसरलेला ... आकाशात थोडेफार ढग होते ,त्यामुळे चांगलेच उकडत होते ,त्यामुळे त्रासलेले लोक अंगणातच झोपून पावसाची आतुरतेने वाट पहात होते . अशातच रात्री अकराच्या सुमारास पक्या अन तुक्या बॅटरी घेवून आबा सोनाराच्या बागेकडे निघाले . सोबत दोरी आणि दोन गोणी (मोठ्या पिशव्या /पोते ) घेतल्या होत्या आंबे आणायला. थोड्याच वेळात दोघे बागेत पोहोचले आणि पक्या एका मोठ्या झाडावर चढून आंबे काढू लागला . तुक्या झाडाखाली उभा राहून दोरीने गोणी खाली घेणार होता आणि चारी बाजूला लक्षं देखील ठेवणार होता ....
पंधरा वीस मिनिटे गेली आणि पहिली गोणी पक्याने खाली सोडली ... तुक्या ने गोणी सोडवून घेतली आणि तंबाखूचा बार भरला . इतक्यात पक्याच्या कानात आवाज आला ” आता बस्स कर ... पुरे झाले ....” पक्याला वाटले तुक्या च बस्स म्हणतोय ... म्हणून त्याने तुकयाला शिव्या घालायला सुरुवात केली ... “अरे साल्या ... तू सांगितलस म्हणून तर आलो ना आंबे चोरायला ? मग बस्स काय म्हणतोस ?” तुक्या बोलला “मी कुठे काय बोललो? “ ...मग बरीच बाचाबाची झाली ... शेवटी पक्या नशेत असल्यामुळे त्याने काहीतरी आवाज ऐकला असेल ,ए म्हणून त्यांनी आवाजाकडे दुर्लक्ष केले आणि पुन्हा दुसरी गोणी भरून आंबे काढायला सुरुवात केली ...
दुसरी गोणी भरली आणि ती खाली सोडून पक्या झाडाखाली उतरला ... आता दोघेजण एकेक गोणी खांद्यावर घेवून निघणार इतक्यात चमत्कारच झाला.... .... तुक्या कडची गोणी एकदम हलकी आणि पक्या कडची एकदम जड झाली होती... आता त्यावरून पुन्हा भांडणे सुरू झाली ... आणि दोघांनीही एकमेकांची आई-बहीण काढायला सुरुवात केली ...”साल्या ,मी इतका मर-मरून जीव धोक्यात घालून आंबे काढतोय आणि तु वाटणीत घोटाला करतोस काय? आधी माझ्या वाटणीचे आंबे दे “ असे तुक्या ने म्हणताच त्या दोघांमध्ये तूफान हाणामारी चालू झाली... शेवटी चल आंबे बाहेर काढ ... असे पक्याने म्हणताच तुक्या जड असलेली गोणी उघडू लागला .... गोणी उघडताच एक काळी आकृती गोंनीतून बाहेर पडली .... आणि पक्याची मानगुट पकडून अक्राळ विक्राळ हसत म्हणाली .... “ अरे हरामखोर चोरांनो..... मी इथला रखवालदार भूत आहे... आबा सोनारा ने दुराई चेपून मला आंबे राखायला बसवलं आहे ...... तरीपण मी तुम्हाला एक गोणी आंबे द्यायला तयार होते ,… पण ह्या पक्याने माझं ऐकलं नाही .... आता भोगा आपल्या कर्माची फळं .... तुमचे आंबे मीच गायब केलेत ...... हरामखोरांनो आजपासून हे चोरीचे धंदे सोडा आणि गपगुमान मोलमजुरी कष्ट करून जगा ....बोला आहे कबुल ?नाहीतर आत्ताच तुमचा दोघांचा जीव घेते ..... “
पक्या तुक्या तर भीतीने अर्धमेले झाले होते ... दोघांनाही दरदरून घाम फुटला होता.... . त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता ..... तरीपण दोघांनी त्या भूताच्या हातापाया पडून कशीबशी सुटका करून घेतली ... आणि बॅटरी ,दोरी ,गोणी सगळे तिथेच टाकून धूम ठोकली ... येताना अडखळत –ठेचकाळत कसेबसे अंधारातून घरी पोहोचले ... आणि दोघेही तापाने फणफणले होते ... नंतर आठ दिवस तो ताप उतरलाच नाही.... डॉक्टरी उपचारावर बराच पैसा खर्च झाला ... शेवटी गोठणेच्या नागू भगता कडे दोघांना नेण्यात आले... नागू भगता ने सांगितल्यानुसार आबा सोनारच्या बागेच्या कुंपणावर एक नारळ विडा ठेवून माफी मागावी लागली ,आणि पुन्हा आयुष्यात चोरी करणार नाही , अशी शपथ दोघांनी तिथे घेतली...... त्यानंतर दोनच दिवसात मग ते बरे होवून हिंडू फिरू लागले .... दोघांनीही आता तात्या बामणा च्या मळ्यात कामाला जायला सुरवात केली ..... आयुष्यात परत त्यांनी कधीच चोरी केली नाही ... मात्र दुराईचा हा किस्सा गोठणे अन कुचवडे च्या पंचक्रोशीत सगळीकडे फेमस झाला ! आणि त्यामुळे त्या पंचक्रोशीतल्या आंबा –काजुच्या चोर्याा मात्र एकदम बंद झाल्या ...........!

गूढकथा - आग्या वेताळ



तो काळ होता सन 1960. महाराष्ट्रातले एक खेडेगाव- धामनेर! आमच्यासोबत ते सगळे अनाकलनीय घडले ते याच गावात. ऐकायचं आहे का काय घडलंय घडलं ते?
एखादी अनवधानाने केलेली चूक सुद्धा काय काय भोगायला लावते ते ऐकायचं आहे?
आता मी येथे एका झाडावर बसलो आहे. पोळ्यातला मध कुणी चोरत तर नाही ना यावर जातीने लक्ष देतोय...मी झाडावरच बसलेला असतो. कंटाळा आलाय या आयुष्याचा पण, मी काही करू शकत नाही.
या बसा! झाडाखाली बसा, सांगतो सगळं!
माझे वडील धामनेर पासून जवळ तालुक्याच्या ठिकाणी शिंकपूर येथे प्राथमिक शिक्षक होते. नुकतीच तिथे त्यांची बदली झाली होती. आम्ही दोघे त्या वेळेस 14 वर्षांचे होतो. मी आणि माझा दोन मिनिटांनी लहान भाऊ राज. दिसायला आम्ही अगदी एकसारखे नव्हतो. आम्ही दोघे धामनेर गावातल्याच शाळेत जायचो. कारण सगळ्यांना रोज तालुक्याला जा-ये सध्यातरी परवडली नसती आणि तालुक्याचे गाव राहायला थोडे महागच होते म्हणून आम्ही धामनेरला राहत होतो!
“जय? झाली का अंघोळ? राज थांबलाय अंघोळीचा! लवकर ये बाहेर! ” मातीच्या चुलीवर भाकरी थापत त्या दिवशी माई मला म्हणाली. आम्ही आमच्या आईला माई म्हणत असू! सकाळचे नऊ वाजले होते.
“चल आटोप लवकर! रोज माझ्या आधी नंबर लावतोस आणि अंघोळीला वेळ लावतोस! ” राज खेकसला.
अर्धवट अंग पुसतच मी मोरीतून पडदा बाजूला करून बाहेर आलो. तसा राज माझ्या डोक्यावर टपली मारून मध्ये घुसला.
“माई, बघ ना हा. रोज उशिरा उठतो आणि वर अंघोळीला जायची घाई पहिले असते. ” राज माईला म्हणाला.
तात्या- माझे वडील, शाळेत जायची तयारी करता करता रेडिओ ऐकत होते. आमचा दोघांचा आवाज ऐकून ते रेडिओ बंद करून पांढरा कुर्ता, धोतर आणि गांधी टोपी असा रोजचा पोशाख घालून बाहेर आले आणि आमच्या दोघांवर ओरडले, “गप्प बसा रे, नालायकांनो! रोज सकाळच्या वेळेला कशाला अंघोळीसाठी भांडता? ”
तात्यांनी त्यांची सायकल पुसायला घेतली.
“तुमची शिदोरी बांधलीय. ठेचा, काकडी, कांदा, भाकरी बांधलीय! पापडाचा चुरा पण दिलाय तेल मीठ टाकून! ” माई त्यांना कापडात बांधलेली शिदोरी देत म्हणाली.
“बाळांनो, नीट शाळेत जा, अभ्यास करा आणि गोंधळ घालून घरी तुमच्या माईला त्रास द्यायचा नाही बरं का? ” माझ्या पाठीत एक धपाटा घालत ते म्हणाले आणि सायकलवर टांग टाकून जायला निघाले.
मी रडत म्हणालो, “भांडतो आम्ही दोन्ही आणि फक्त मलाच मार बसतो!”
“उद्या त्याची पाळी मार खायची! ” तात्या म्हणाले आणि सायकलवर निघून गेले.
राज मला मोरीतून चिडवत होता, “बघा बघा, आग्या वेताळ कसा रडतो! ”
लहान मुले एकमेकांना आग्या वेताळ असे चिडवायचे. आग्या वेताळ काय आहे ते त्यांना माहितीही नव्हते. आमचे भांडण झाले की राज मला असे चिडवायचा कारण त्याला माहीत होते की, कोण जाणे का पण मी आग्या वेताळ या नावाचा धसका घेतला होता. त्या सकाळी शाळेत जाताना फक्त आग्या वेताळाचाच फक्त विचार करत होतो.
राज शाळेत त्याच्या मित्रांसोबत वेगळा जायचा आणि मी माझ्या!
मी आणि माझा मित्र भानू शाळेत सोबत जात होतो. कच्ची पायवाट होती. त्यावरून आम्ही दोघे चालत होतो. शाळा चार किलोमीटर दूर होती. मध्ये एक छोटासा ओढा लागायचा. मी उदास का आहे असे त्याने विचारले पण मी जवळ आग्या वेताळाचा विषय काढला नाही. कदाचित तो मला हसला असता.
आम्ही इतर गप्पा गोष्टी करत असताना ओढ्याजवळून चालत असताना एक मधमाशी माझ्या डोक्यावर घोंघावू लागली पण मी तिला हाताने हाकलून दूर केले पण ती परत परत येऊ लागली. तेव्हा डाव्या बाजूला मला एका झाडावर मधमाश्यांचे पोळे दिसले. राजवरचा राग मधमाश्यांवर काढण्यासाठी मी एक गुळगुळीत दगडगोटा उचलला आणि त्या पोळ्याकडे वेगाने मारून फेकला. तो दगड पोळ्याला लागून पुन्हा त्याच वेगाने जोरात माझ्या दिशेने आला, तो मी पटकन झेलला आणि थोडक्यात बचावलो नाहीतर माझा डोळाच फुटला असता…
त्या पोळ्यातील मधमाश्यांना काहीच झाले नाही. उलट त्या सगळ्या एकत्र आल्या आणि त्यांचा एकत्रितपणे हवेतच एक मोठा गोळा तयार झाला. जणू काही त्या माश्या एकमेकांच्या कानात काहीतरी कुजबुजत आहेत..!
भानू म्हणाला, “अरे कशाला त्या जीवांना त्रास देतो उगाच? ”
“अरे, मी तर सहजच!”,असे म्हणून मी विषय टाळला आणि म्हटले, “निघू इथून आता आपण! ”
तो दगडगोटा मी सहज खिशात टाकला आणि आम्ही शाळेकडे निघालो..
दुपारी चार वाजता शाळेतून घरी परत आलो. आमच्या घराच्या पाठीमागे थोडे दूर एक शेत होते. त्या शेताजवळ एक झोपडी होती. त्याजवळ एका खांबाला बैलांना बांधून ठेवले जात असे. त्या बैलांच्या गळ्यातील घंटानाद कानाला नेहमी सुमधुर वाटे! मध्येच एखादी थंडगार वाऱ्याची झुळूक यायची आणि त्या झुळुकेचा आस्वाद घेत घेत मी त्या बैल जोडीकडे नेहमी तासनतास बघत राहायचो, घंटांची किण किण ऐकत राहायचो.
माईला मी शाळेतून घरी आल्याची आरोळी दिली, अंगणातील भल्या मोठ्या रांजणातून एक तांब्याभर पाणी काढून पिले आणि अंगणातील एका बाजेवर (खाट) अंग टाकले. काल रात्री माईला आम्ही दोघांनी लाडू बनवायला मदत केली होती. त्यामुळे जागरण झाले होते. म्हणून मला जवळजवळ आता झोपच येत होती. तोपर्यंत माईने आमच्या मातीच्या घरासमोर शेणाने सारवायला सुरुवात केली.
अचानक खिशातल्या दगडाकडे माझे लक्ष गेले, कारण तो अचानक अतिशय गरम झाला होता. का, कुणास ठाऊक? त्याचा चटका सहन न होऊन तो मी जोराने भिरकावून फेकून दिला…!
मी बाजेवर पहुडलो असताना एक मधमाशी येऊन कानाजवळ त्रास देऊ लागली. गुर्र गुन्न असा आवाज काढू लागली. मी तिला हाकलले पण ती हट्टी होती आणि इकडे माझी झोप पण डोळ्यात मावत नव्हती. अचानक त्या मधमाशीचा आकार हळू हळू मोठा होत गेला, तिचे कानाजवळचे गुर्र गुर्र गुंन्न गुन्न सुद्धा वाढले आणि पाहता पाहता ती हवेत वर वर ढगापर्यंत जाऊ लागली आणि तिचा तो गुर्र गुर्र गुन्न गुन्न आवाज सुद्धा खूप मोठा होत गेला.
ती जसजशी दूर जात होती तसतसा तिचा आकार अधिकाधिक मोठा होत गेला...
त्यामुळे अधिकाधिक अंधार होत गेला. गुर्र गुन्न आवाज आकाशभर येत होता. ती ढगात पोहोचली आणि अचानक जळाली. मग तो मोठा ढग सुद्धा जळाला. ढगांतून ज्वालांचा पाऊस पडायला लागला...
ज्वाळांचे थेंब माझ्या दिशेने येत होती. त्या मधमाशीचे विद्रूप, काळे आणि आकाश व्यापायला निघालेले भयंकर ध्यान पाहून मी घाबरलो. तसेच तो भयंकर गुर्र गुन्न असा आवाज असह्य होवू लागला...
ते ज्वाळांचे थेंब माझेकडे येत आहेत असे पाहून मी किंचाळलो आणि कानावर हात ठेवत बाजेवर ताडकन उठून बसलो. आधीच दुपारचा उकाडा आणि त्यात घाबरल्यामुळे आलेल्या घामाच्या धारा!!
इकडे तिकडे पाहतो तो काय, आजूबाजूला मधमाशी कुठेच नव्हती!
वरचे ढग सुद्धा शांत होते. मग मला जाणवले की ते मला दिवसा पडलेले भयंकर स्वप्न होते. कदाचित दुपारी शाळेत जातांना मी मधमाश्यांच्या पोळ्याला दगड मारल्याने तर मला असे होत नाही ना, असा विचार माझ्या मनात थोड्या वेळाकरता आला. माईला मी स्वप्न सांगितले जरी असते तरी तिने पाठीत एक धपाटा घातला असता आणि गृहपाठ कर म्हणून पिटाळले असते, म्हणून मी ते स्वप्न विसरून जायचे ठरवले.
संध्याकाळी तात्या आले. गृहपाठ वगैरे आटोपल्यानंतर आणि अंगणात खेळून झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी रात्री अंगणात कंदिलाच्या आणि चंद्राच्या उजेडात खिचडी आणि लोणचे असे जेवण केले. आज सोबत काकडीसुद्धा होती. तात्यांनी येताना आणली होती.
आमचेकडे घरी अजून वीज नव्हती. वीज आम्हाला अजून परवडत नसे! कंदील लावूनच आम्ही दिवस (की रात्र) काढायचो. जेवण झाल्यावर आम्ही अंगणात बाजा आणि त्यावर अंथरून टाकले. कंदील विझवून चंद्राच्या उजेडात अंगणात सगळे झोपी गेले.
रात्री दहा वाजले असतील तरी मी अजून झोपलो नव्हतो. खाटीवर पडले पडले एका ढगाकडे लक्ष गेल्यावर मला दुपारचे स्वप्न आठवले आणि छातीत धस्स झाले. ते स्वप्न आठवल्यावर दुपारी कानाला सुखद वाटणारी त्या बैल जोडींच्या गळ्यातील किणकिण, आता मात्र थोडी गूढ वाटायला लागली. पण नंतर हळू हळू मला झोप यायला लागली!
पण आकाशातल्या ढगातून दोन मधमाश्या निघाल्या. खाली येऊ लागल्या. मग आणखी चार, आठ.. असे करत करत असंख्य मधमाश्या त्या ढगातून निघाल्या जसे काही ते ढग म्हणजे एक मोहोळच होते!
पावसाच्या धारांसारख्या त्या खाली बरसू लागल्या…
मी प्रचंड घाबरलो. इतका की मला लघुशंका लागली.
आणि बघतो तो काय? तो एक भास होता! ढगांत काहीही नव्हते! तो खरंच भास होता? पुन्हा मी बघितलेले स्वप्न होते का ते?
आता नक्की मध्यरात्र उलटून असेल, असे मला वाटले. घरात एकटा जाऊ घड्याळ बघण्याची माझी हिंमत काही झाली नाही. मी उठलो आणि मोरी मध्ये गेलो.
मोरीतल्या खिडकीतून समोरचे एक जीर्ण आणि महाकाय वडाचे झाड दिसत होते. त्याच्या पारंब्या चंद्राच्या उजेडात वेगळ्याच भासत होत्या. एका क्षणाकरता मला समोर असे दिसले की त्या पारंब्या नाहीत तर उलट्या लटकलेल्या असंख्य माणसांचे हातच आहेत!
या विचारात असतानाच त्या झाडामागून एक संपूर्णपणे सफेद अशी मानवाकृती बाहेर आली. चंद्रप्रकाशात ती आकृती आणखीनच सफेद दिसत होती. तो एक पांढराशुभ्र माणूस होता. (की सैतान?) तो माझेकडे एकटक बघू लागला. माझी नजर त्याच्या नजरेशी अचानक बांधली गेली.
मग, विचित्र हावभाव करत तो खाली बसला. पुन्हा हातपाय वेडेवाकडे करत उभा राहिला. पुन्हा खाली बसला. पुन्हा विकट हास्य हसत हसत तो वेडावाकडा उभा राहिला. मग तो झाडाला टेकला. थोडा वेळ चंद्राकडे त्याने एकटक पाहिले. चंद्राकडे पाहून तो ओळखीचे हसला. जणू काय चंद्रावरून त्याला कुणीतरी माणसाने हात हालवून ओळख दिली!
मग अचानक त्याने झाडाच्या दोनचार पारंब्या पकडल्या आणि त्यांना लटकत लटकत तो झोके घेऊ लागला. झोके घेताना तो एकटक माझेकडेच नजर लाऊन एकसारखा बघत होता. सोबतच इतर पारंब्या सुद्धा आपोआप हालू लागल्या. झोके घेताना तो काहीतरी बडबडत होता पण ते बडबडणे अर्थहीन आणि अतर्क्य वाटत होते...
आता माझी जवळपास दातखीळ बसायचीच बाकी होती.
शहारलेल्या अवस्थेत पटकन लघुशंका आटोपून मी पळत पळत तात्यांच्या खाटेजवळ गेलो. त्या गडबडीत मोरीचा पडदा ताणला गेल्याने डोक्यावर पडला आणि तसाच मी पळत सुटलो.
तात्यांना जोरजोराने हालवत मोठ्याने म्हणालो, “त..त... तात्या.. तात्या. भुरा सैतान! भु.. भु... भुरकट भूत! ”
ते ऐकून माई जागी झाली पण अजून तात्या जागे होत नव्हते. मी पडदा काढून बाजूला फेकला. तोपर्यंत तात्या जागी झाले. मी त्यांना कसेबसे सांगितले की मी वडाच्या झाडाखाली काय काय पाहिले.
त्यांनी प्रथम मला शांत केले आणि आम्हाला म्हणाले, “शांत बैस जय. पहिले शांत बैस! मुलांची आई, तुम्ही मध्ये जा! राजला घेऊन मध्ये घरात बसा! मी बघतो काय ते!”
राज सुद्धा यायचा आग्रह धरू लागला पण “मदत लागली तर तुला बोलवेन. तू माई सोबत घरात थांब” असे म्हणून त्यांनी त्याला येऊ दिले नाही. माई आणि राज घरामध्ये गेले.
तात्यांनी मला पाणी प्यायला दिले, स्वतः पाणी पिले आणि शांतपणे कंदील पेटवला आणि म्हणाले, “जय, कुठे आहे रे तो सैतान? दाखव बरं मला! ”
आमचे ते मातीचे घर थोडे मुख्य वस्तीपासून बाजूलाच होते. दूरवरच्या घरातील लोक गाढ झोपले असावेत आणि आमचे आवाज त्यांचे पर्यंत पोचले नसावेत कदाचित, कारण कुणीही जागे झालेले वाटत नव्हते. मग तात्या मला बरोबर घेऊन वडाच्या झाडाखाली आले. मी घाबरत घाबरत त्यांच्यासोबत आलो. पारंब्या थोड्या थोड्या हालत होत्या. तो पांढरा सैतान तेथे दिसत नव्हता.
“इथेच तर होता तो! झो.. झो .. झोके घेत होता”, ते भयंकर नजरबंदी चे खेळ असणारे “त्याचे” झोके मनात आठवून मी थरथर कापत म्हणालो.
“चल, झाडाच्या त्या बाजूने पाहू, जेथून तो बाहेर आला असे तू सांगतोस”, तात्या हिंमत एकवटून मला धीर देत म्हणाले.
आम्ही झाडाच्या मागच्या बाजूला आलो. बाहेर रातकिडे किर्र किर्र करत होते. बैलांच्या गळ्यातील घंटा किण किण करत होत्या. आमच्या पावलांमुळे जमिनीवरच पाला पाचोळा आवाज करत होता.
बाजूचे अंधारे शेत!
शेतात तीन बागुलबुवा हात पसरवून उभे होते.
उभ्या काड्या आणि त्यावर मोठे मडके आणि त्यावर खडूने काढलेले दोन मोठे डोळे! मी तिकडे बघून भयंकर शहारलो.
“व्हयोम…... व्हयो ssss म्”, असा भयंकर आवाज करत पारंब्यांना पायाने पकडून उलटा लटकलेला तो अभद्र सफेद सैतान तात्यांच्या चेहऱ्याजवळ वरून एकदम झोके घेत झेपावला. त्याचे डोळे आता लाल प्रखर प्रकाशाने पेटले होते. त्या डोळ्यांनी क्षणभर तात्या सुद्धा घाबरले पण ते लगेच सावरले.
मी तर जोरात किंचाळलो, “हाच तो सै.. सै..सैतान!”
तात्यांनी हिंमत करून त्याची हनुवटी धरून त्याला जोरात खाली ओढले. तो जमिनीवर धाडकन आदळला. तात्यांच्या या धाडसाचे मला त्या वेळेस कोण कौतुक वाटले म्हणून सांगू? सांगता सोय नाही! एका भयंकर सैतानाला आपण इतके घाबरलो होतो आणि त्याला तात्यांनी झाडावरून खाली पाडले! वा!
त्याला तात्यांनी जोरात ओढल्याने एक क्षण ते झाड थरथरले. सगळ्या पारंब्या जोराजोराने हेलकावे घेऊ लागल्या. तो सैतान खाली पडला. जमिनीवरच्या पानांचा जोरात आवाज झाला. एका वाळलेल्या पानांच्या ढिगाऱ्यावर तो अचानक पडल्याने बावचळला. मी झाडाला टेकून थोडा दुरूनच हा प्रकार बघत होतो. तात्यांनी कंदील झाडाच्या ढोलीत ठेवला. ते आजूबाजूला कुठे काठी दिसते का ते बघू लागले. त्यांना थोड्या अंतरावर एक काठी दिसली. ती काठी उचलायला ते थोडे बाजूला झाले आणि म्हणाले, “बघतोच आता तूला, या काठीनेच झोडपतो आणि उद्या पोलिसांच्या स्वाधीन करतो. तू कसला सैतान? तू तर कुणीतरी बहुरूपी मूर्ख वाटतो मला!”
तेवढ्यात तो सफेद सैतान जमिनीवरून वेगाने उठला….
आणि त्याने गावाच्या दिशेने पळायला सुरुवात केली. तो तात्यांच्या तावडीत सापडला नाही. सगळे अचानक घडल्याने तात्यांना सुद्धा सावरायला वेळ लागला तेवढ्यात तो पळाला. आता त्याच्या मागे पळून उपयोग नव्हता कारण तो जिकडे पळाला तेथे काटेरी झाडे झुडुपे होती. पळताना त्याने एकदा थांबून एक विखारी नजर आमच्यावर टाकली. तो क्षण आम्ही दोघे जण एकमेकांकडे बघू लागलो आणि जबरदस्त घाबरलो..
नंतर पुन्हा पळून तो सैतान एका अंधाऱ्या झुडुपातून गायब झाला...
तात्यांनी कंदील घेतला, काठी घेतली आणि मला म्हणाले, “चल जय! घरात जाऊया आता! ”
“तात्या! तुम्ही खूप शूर आहात! ” मी म्हणालो.
त्या घटनेनंतर रात्रभर आम्ही सगळ्यांनी जागून काढली. सकाळी पाच वाजता आम्हाला थोडी झोप आली...
***
दिवस उजाडला. सकाळचा नेहेमीचा सूर्य गूढ आणि भकास वाटत होता.
सकाळी पेंगुळलेल्या अवस्थेत सगळ्यांनी आपापली कामे आटोपली…
तात्यांच्या शाळेत त्यांच्या सहकारी शिक्षकांसोबत आणि धामनेर गावात काही मित्रांसोबत तात्यांनी रात्रीच्या त्या अनुभवाविषयी नक्की चर्चा केली असावी. कारण, त्या दिवशी उशिरा संध्याकाळी शाळेतून घरी आल्याबरोबर पाणीही न पिता तात्यांनी मला एकच प्रश्न दरडावून विचारला, “तू काल एखाद्या मधमाश्यांच्या पोळ्याला त्रास दिला होतास काय? ”
मी घाबरत होतो. मला वाटले आता मला नक्की मार बसेल. राज आणि माई आमच्या दोघांकडे बघत होते. एकटक! आता काय होणार?
तात्या पुन्हा गर्जून म्हणाले, “ अरे सांग ना! मी काय विचारतोय तुला? ”
मी थरथरत म्हणालो, “मी … मी…दु दु दुपारी.. ”
तात्या आता सौम्य झाले, “ अरे सांगून टाक! नाहीतर आपले काही खरे नाही! मी तुला रागावणार नाही! सांग! ”
असे म्हटल्यावर मी थोडा दिलासा येऊन म्हणालो, “हो हो, मी … मी…दु दु काल दुपारी शाळेत जातांना सहज त्या ओढ्याजवळच्या एका मधमाश्यांच्या पोळ्याला दगड मारला होता... पण पण.. ”
तात्या मला गदागदा हालवत म्हणाले: “अरे पण काय? बोल पुढे लवकर! ”
मी म्हणालो, “तो दगड पोळ्याला लागून वेगाने पुन्हा माझेकडे आला, पण मी तो चुकवला नाहीतर.. ”
तात्या: “अरे आता.. काय उपयोग? तुझ्याकडून एक मोठी चूक झाली आहे! ”
मी: “चूक.. कोणती चूक? ”
तात्या: “ आज मला चर्चेतून माहीत पडलं आहे की या गावात कुणीही मधमाश्यांचे नाव घेत नाही. त्रास देत नाही. आणि पौर्णिमेच्या आसपास तर मुळीच नाही. त्यांचे मध कुणीच काढत नाही. जर का तसे केले तर मधमाश्यांचा रक्षक म्हणजेच “आग्या वेताळ” त्यांचे रक्षण करतो, बदला घेतो. ”
मग मला हळू हळू लक्षात यायला लागले की मला मधमाश्यांचे भीतिदायक स्वप्न का पडले ते! पण मी ते कुणाला सांगितले नाही!
तात्या पुढे म्हणाले, “शाळेत जातांना जो पाण्याचा ओढा लागतो त्या ओढ्याच्या उजव्या बाजूला दूरवर एक पर्वत दिसतो. त्यावर अनेक मोठी झाडे दिसतात. मग पर्वत चढून गेले असता तेथे एक पडका छोटासा ऐतिहासिक किल्ला आहे. खरे तर तो किल्ला नाही तर एक ऐतिहासिक काळापासूनचे एकमेव बांधकाम उरले आहे जे आता पडझड होवून खराब झाले आहे. पण गावातले सगळेजण त्याला किल्लाच म्हणतात. काही लोकांनी बघितल्यानुसार बरेचदा रात्री पौर्णिमेच्या रात्री त्या पडक्या किल्ल्यातून एक जाळ निघतो आणि तो हळूहळू त्या झाडांजवळ जातो. तो जाळ अधांतरी तरंगत तरंगत जातो. आग लागलेला वेताळ म्हणजेच “आग्या वेताळ” असे लोक त्याला म्हणतात. ”
मी आवंढा गिळून विचारले: “मग, काल रात्री जो सैतान आला होता तोच आग्या वेताळ होता का? ”
आता आम्ही सगळेजण अंगणात खाली सतरंजी टाकून बसलो होतो... बाजूला कंदील होता. चंद्राचाही उजेड होता!
तात्या: “ नाही! तो या गावातला एक वेडा माणूस आहे. ”
मी: “वेडा माणूस? ”
मध्येच माई म्हणाली, “याला कशाला त्या मधमाश्यांची नाव घ्यायची दुर्बुद्धी सुचली कुणास ठाऊक? ”
राज: “ अगं माई! पहिले ऐक तर खरं तात्या काय म्हणत आहेत! ”
तात्या: “ऐका तर! मी काय सांगत होतो की कालचा तो भुरा सैतान एक वेडा आहे. तो एकदा आग्या वेताळाच्या तावडीत सापडला होता आणि त्यानंतरच त्याचे असे हाल झाले आहेत. तसा या गावात तो अनेक दिवस राहत आहे. त्या पर्वतावरच्या पडक्या किल्ल्यात तो राहतो. पण काही दिवस तो या गावातून गायब झाला होता. ”
माई पुन्हा म्हणाली, “आणि आमचा कारटा बघा, कसा गायब लोकांना परत आणतो ते? भलता हुश्शार आहे! ”
राज, “ माई गं! पहिले ऐक तर खरं पूर्ण हकीगत! ”
तात्या, “मी आपली रात्रीची हकीगत आणि वेड्याचे वर्णन सगळ्यांना सांगितल्यावर त्यांना वाटले की तो तोच वेडा आहे आणि तो काल रात्री या गावात परत आला होता. मला वाटते तू पोळ्याला दगड मारल्याने आग्या वेताळ पुन्हा जागृत झाला आणि तो वेडा पण परत आला! ”
मी घाबरत विचारले, “पण आग्या वेताळाने त्या वेड्याला का तावडीत पकडले होते? ”
तात्या सांगू लागले, “मी ज्यांना आपली कालची घटना सांगितली त्यांनी बड्या बुजुर्ग लोकांकडून असे ऐकलेय की एकदा धामनेर गावात एक मध चोरणारी आणि तो भरपूर मध वेड्यासारखी पोटभर पिणारी एक टोळी आली होती. त्या टोळीच्या नादी लागून त्या वेड्याने (जो आधी वेडा नव्हता) विनाकारण लाखो मधमाश्यांना जाळून जाळून ठार मारले होते. पैश्यांकरता!…ती रात्र पौर्णिमेची होती. त्यांनी त्या झाडांवरील मधमाश्यांत खूप बेधुंदपणे खळबळ माजवून खूप मध गोळा केला.”
राज मध्येच म्हणाला, “अशी भयंकर टोळी आली तरी कुठून? आणि ती टोळी एवढा मध का प्यायची?”
तात्या पुढे म्हणाले, “ती टोळी कुठून आली होती कुणालाच माहीत नाही. ती म्हणे अघोरी राक्षसांचीच एक प्रजाती होती! ती टोळी मधाची खूप भुकेली असते. चंद्राच्या उजेडात पौर्णिमेला ते एक अघोरी यज्ञ करत आणि मध पिऊन यज्ञाला बसत. यज्ञात मधाची आहुती देत. त्यामुळे त्यांना कसलीतरी अघोरी सिद्धी मिळत असे. पण त्या टोळीने जेव्हा तो मध त्या रात्री पडक्या किल्ल्यात बसून पोटभर पिला तेव्हा त्या सगळ्या जणांच्या शरीरावर फोड उगवले आणि त्या फोडांतून जाळ बाहेर येऊन त्यांना वेदना होऊ लागल्या. सकाळी ते सगळे मृतावस्थेत दिसले. त्यानंतरच त्या जळून मेलेल्या लाखो मधमाश्या भूत बनून म्हणजेच आग्या वेताळाचे रूप घेऊन पुन्हा आल्या, कारण मधमाश्यांचा एवढा भयानक संहार या आधी आजपर्यंत कधीच कुठेच झाला नव्हता म्हणे! त्या वेड्याने म्हणे निर्घृणपणे मधमाश्यांना जाळून मारण्याचे विविध उपाय त्या टोळीला सुचवले होते! पैशांकरता!”
सगळे श्वास रोखून ऐकत होते.
मी विचारले, “पुढे काय झाले? ”
तात्या सांगू लागले, “त्या वेड्याने तेव्हा मध पिला नव्हता पण तो आग्या वेताळाचा अभद्र आकार बघणे त्याच्या नशिबी आले. त्याच्याच कर्मामुळे! त्या आग्या वेताळाच्या तावडीत तो सापडला. त्या भयंकर अक्राळ विक्राळ वेताळाने त्याला घेरले, त्याच्या सर्वांगावर कडाडून चावे घेतले आणि त्या पौर्णिमेच्या मध्यरात्री गावाकडे पाय नेतील तिकडे भयानकपणे ओरडत तो पळत सुटला!”
राज म्हणाला, “बापरे, किती भयंकर आहे हे सगळे! पुढे काय घडले?”
तात्या पुढे म्हणाले, “पुढे आणखीन भयंकर प्रकार घडला. त्याने पळता पळता स्मशानात सुद्धा अनेक मुडदे पायदळी तुडवले. इतके की त्याला गणतीच नाही. काही लोकांनी ते बघितले तेव्हा त्यांना अभद्राची चाहूल लागली. गावात तो आल्यावर रात्री अर्धे अधिक गाव जागे झाले. मधमाश्यांना अकारण त्रास देऊन मारण्याची शिक्षा त्याला मिळाली सगळ्यांनी त्याला पिटाळून गावातून हाकलून दिले. कुणी म्हणे तो त्यानंतर पडक्या किल्ल्यात राहायला गेला. पोलीस सुद्धा त्याला पकडू शकले नाहीत. “
मी म्हणालो, “मग पुढे काय? तो गावात पुन्हा आला का?”
तात्या म्हणाले, “ मी ऐकल्याप्रमाणे त्या वेड्याच्या अंगात कधी कधी आग्या वेताळ येतो, विशेषतः पौर्णिमेच्या रात्री आणि त्याआधीच्या व नंतरच्या काही रात्री! अंगात आल्यावर तो वेडा इतका भयंकर दिसतो आणि वागतो की सांगता सोय नाही! ”
हे सगळे ऐकून आम्ही सगळेजण अत्यंत भयभीत झालो होतो.
राज ने विचारले: "आणि काल तो वेडा पळून कुठे गेला असेल? ”
तात्या: “आज सकाळी पाच वाजता गावातल्या अनेकांनी त्याला पर्वतावरच्या शिखरावर जाऊन छाती ठोकून आकांत करताना पहिले. सगळीकडे वाऱ्यासारखी खबर पसरली आहे की वेडा परत आलाय.. ”
मी विचारले, “मग आता आपण काय करायचे? "
तात्या म्हणाले, "आता आपण एकच करू. मला काहींनी सुचवल्यानुसार या गावातून आता बाडबिस्तरा गुंडाळून माझी शाळा ज्या गावात आहे त्या शिंकपूर या गावी जाऊया. तेच योग्य आहे. नाहीतर तो वेडा किंवा तो आग्या वेताळाच्या रूपातील मधमाश्या तुला किंवा आपल्या सगळ्यांना त्रास देण्याची शक्यता आहे! मी उद्या त्या गावात भाड्याच्या खोलीची चौकशी करतो आणि आपण लवकरच स्थलांतर करूया! आणि गावातली लोकही आपल्याला त्रास देऊ शकतात कारण आपण आग्या वेताळाला जागृत करायला कारणीभूत ठरलोय! ”
माई उद्वेगाने उद्गारली, “काय याने नसती ब्याद करून ठेवली! ”
मी: “माई, मी मुद्दाम थोडेच केले? आणि माझ्या दगडाने त्या मधमाश्यांना काहीही झाले नाही. उलट दगडच उलट्या पावली माझ्या कडे परत आला! उलट माझाच डोळा फुटता फुटता वाचला! ”
माई म्हणाली, “अरे पण तू पौर्णिमेच्या जवळपास त्यांचे नाव घेतले ना! ती पांढरी ब्याद आपल्या मागे लावलीस ना तू त्यामुळे!! दगड परत आला तेव्हा तुला काहीतरी संशय यायला हवा होता आणि त्या मधमाश्यांची माफी मागून घ्यायला हवी होती तू! "
मी: "आता मला काय माहिती होते असे? मी तो दगड खिशात टाकून आणला होता काल? "
माई: “काय? तू तो दगड घरी घेऊन आलास? फेक तो दगड!"
मी: "त्याच दिवशी म्हणजे काल दुपारी फेकला मी तो दगड त्या वडाच्या झाडावर! "
माई: "अरे अरे, हे काय केलेस करनाळ्या? "
तात्या: “जाऊद्या मुलांची माई! गप्प बसा! जे झाले ते झाले. आता फक्त आपण या गावातून स्थलांतर करेपर्यंत सुरक्षित कसे राहायचे ते बघायचे! मी उद्या आणखी चौकशी करून आपण सुरक्षित राहण्यासाठी यावर आणखी काही उपाय आहेत का ते तपासतो! तोपर्यंत सगळ्यांनी सावध राहा आणि कोणतीही गडबड नको! काय? कळलं ना? ”
राज ला विज्ञान आवडायचे. तो म्हणाल

हाडळीचा मुका


मानसं मस जमलि व्हति. म्हनजि तसं कारन घडलं व्हतं. शुंगार टेलर वाल्या का़का टेलरचं पोरगं घर सोडुन गेल्तं. काका टेलर अन त्याच्या बायकुचं रोजचं कडाक्याचं भांडान असायचं म्हनुन कोनच त्येंच्या घरच्या भानगडित पडायचं नाय. पण काल रातच्याल काकीचा लैच येगळा आवाज आला अन तिनं हांबरडा फोडला का, तवाच पब्लिक जमा झालं.
पोरगं लैच कटाळलं अन म्हनुन घर सोडुन गेलं असं समदं म्हनत व्हतं. पन ते ज्या दिसंला गेलं असं पुजारी म्हनला त्ये आइकूनच काकाचं अवसान गळुनशान पडलं व्हतं. पोरगं घरातुन गेलं तवा भांडान अंगात आलं व्हतं. काका अन काकी एकमेकात बोलत नव्हतं. बोलायचं तेबी फकस्त भांडायला. बाकि समदं इशा-या इशा-यात चालयचं. त्येंच्या खानाखुना बघुन गावच्या पोरांची लै करमनुक व्हायचि. पन त्येंच्या अशा वागन्यानं पोटच्या पोराला लैच चिडवायची गावातली पोरं.
पुजा-यानं पोरगं जंगलाकडं जाताना पाहिलं तवा त्येची आरती अन प्रसादाचि तयारि चाललि व्हती. पोरगं घर सोडुन चाललं आसल म्हनुन त्येला तरी काय कल्पना ? जात असंल हितंच कुटं दोन नंबरला नायतर रात्रिचं आंबं पाडायला चाललं असंल असं त्येला बी वाटलं. नायतर रातिच त्येनं अडवलं असतं. पन सकाळ्च्याला बोम्ब झाल्याचं कानावर आलं अन पोरगं काय घरला आलं नाहि हे जवा त्याच्यापत्तुर आलं का, तवाच त्येच्या मनात बी घबराट झालि.
पोरगं जंगलाच्या दिशेनं गेलेलं त्यानं बघितलंच व्हतं. रातच्याला कोनतरी इचारायला आल्तं तवा सांगिरलं बी व्हतं. जंगलात गेलं असंल तर काय नाय, पन जंगलातल्या वाड्यात गेलं तर काय हाच इचार आत्ताच्याला समद्यांच्या मनात व्हता. पोराला शोधुन काय बी उपेग नाही असं जे ते म्हनत व्हतं. पन बापाचं आतडं गप्प बसंल व्हय ? बसलं तरी आयचं आतडं त्या आतड्याला बसुं देनार व्हय ? काका टेलर गुमान उठला अन सकाळच्यालाच जंगलाकडं चालाय लागला. तसं काकाला आमि तुज्या सोबत हाय म्हननारं समदं मागं सरकलं. काका शेवटाला एकलाच राहिला अन जंगलाची वाट चालु लागला.
जंगलातल्या वाड्यात कोनबी जात नव्हतं. त्या वाटेनं बी कोन येत जात नव्हतं. पन पोराटोरांचं काय सांगावं ? दर सालाला कोन ना कोन तिकडं जायाचं अन वापस येतच नव्हतं. वाड्यातल्या हाडळीनं त्यांना खाल्लं असं जुनी मानसं म्हनायची.
हाडळ लैच पॉवरबाज व्हती. वाड्याजवल गवत बी उग्वत नव्हतं. साप, इंचू, किडा, मुंगी कायबी तिथं जित्तं राहत नव्हतं. कुनाची बकरी गेली कि वापस येत नव्हती.
काका जंगलाची वाट चालत व्हता. सोत्तालाच लई कोसत व्हता. बायकुला लैच तरास दिला असं सोत्ताला सांगत व्हता. सोत्ताच्या बायकुला बी त्यो हाडळ म्हनायचा. बायकुबी त्येला नाहि नाहि त्ये बोलायचि. तुझ्यापरिस येक से येक लाईनमधि उभं व्हतं म्हनायचि. तसं म्हनलं कि काकाचं डोस्कं औट व्हायचं. मग त्यो सौताच्या पोरावरुन तिला नाय नाय ते बोलायचा. हाडळीचं पोर म्हनायचा. भान्डत नसली कि मग घर शान्त असायचं. पोराच्या कानावर कधिच मम्मी डॅडी चा आवाज पडायचा नाय. फकस्त खानाखुना. मंग त्ये बी तसंच करायचं. गावातल्या पोरांना लैच मज्जा यायचि.
पोराला लैच भोगावं लागलं असं काका मनात म्हनत व्हता. इचारात जंगल कधि चालु झालं समजलंच नाय. काकानं झाड न झाड बघाय सुरुवात केली. पोराला हाका मारत मारत शोध चालला व्हता. हिकडं काकीनं रडून रडून आकांत मांडला . माजं पोरगं गेलं आता धनीबी गेला असं वरडत रडत ती ज्येला त्येला सांग्त व्हती. कुना येकाला असं न्हाईच, पन तिचा नुस्ताच आकांत चालला व्हता. आता तिला लैच पस्तावा झाला व्हता. आपन त्येला लैच टोचुन बोललु हे आठवुन सौताल कोसत व्हती. असं टोचुन बोलल्यावर कुठला गडी जित्ता -हाईल असं मोठमोठ्यानं वरडत व्हती. तिच्या असल्या वरडन्यानं त्या प्रसंगातबी गडीमानसांना हसाय येत व्हतं अन ते बिडी माराय निघुन जात व्हते. बायामानसं त्वांडाला पदर लावत व्हत्या. त्यामुळं त्या हसत्यात का रडत्यात कायबि समजत नव्हतं.
येक म्हातारं म्हनलं, काकाच्या मदतिला का जात न्हाई, तर म्हाद्या मनला तु का नाई जात म्हाता-या ? बायामानसं बी म्हाता-याला वरडल्या. तुजी लाकडं मसनात गेली, तुला हडळीनं धरलं तरी काय बी फरक पडत नाई, दोन दिसानी जायचं ते आज जाशीला म्हनु लागल्या. पन आपल्या घरातल्या गडीमानसाला हाडळ धरंल असं त्यांना पक्कं वाटत व्हतं. काय काय नटव्या बायांना बी गावात हडळच म्हनायच्या गावातल्या बायका. त्या हाडळीबी गडीमानसांना झपाटतात असं नळावर पानी भराय जाताना बाया म्हनायच्या. जंगलातल्या हाडळीकडं मातर कुनीच कुनाला जाऊ दिलं नसतं.
काकानं जंगल शोधुन शोधुन बसकन मारली. भुक, तहान अन पोराची काळजि यानं त्याला काय करावं अन काय नाय हे सुचत नव्हतं. अंधार व्हायला आला व्हता. अंधारात वाडा काळाजर्द सावलीसारखा दिसत व्हता. आता कसलं काय म्हनत काकानं वाड्याचा रस्ता धरला.
वाड्याभवती लईच जुनाट झाडि व्हती. ही कशी टिकली ते काकाला उमगंना. या झाडावर बसुन हाडळ झोकं घेत असंल असं त्येला वाटलं. त्यानं फाटक ढकललं तर केव्हडा आवाज झाला. घुबडं बी उडाली घाबरुन. डोईवर आत्ताच्याला चांदनं येत निघालं हतं. काकानं वाड्याच्या दरवाजावर हात टेकला अन मोठ्ठा आवाज करत दार आत गेलं. लै मोठ्ठा आवाज झाला अन आतल्या बाजूला घुमला. त्या आवाजानं काकाच्या पोटात खड्डा पडला. आतनं वागळं फडफड करत भाईर आली तवा काका घाबरलाच.
पन पोरापायी त्यानं आत पाऊल टाकलं. वाड्यातली हाडळ वाश्याला लटकली व्हती. फाटक उघडल्याचा आवाज कानात गेल्याबरुबर तिनं कानुसा घ्यायला सुरुवात केलि. या रस्त्यानं जानारं येक बी सावज तिनं आजवर सोडल्यालं नाहि असं मानसं म्हनायचि हे तिला बि म्हाईत व्हतं. हाडळ हाडळीसारखीच व्हती. पन लैच साजुक इचारांचि व्हती. तिच्या काळात मानसं लैच धर्मानं आचरन करत व्हती. जित्ती असतान तिनं कधिच वंगाळ इचार मनात येऊं दिलं नव्हतं. आजबि तेच सात्विक सन्स्कार तिच्यावर व्हतं. पन ति हाडळ असल्यानं तिची लैच बदनामि झालि व्हती. पन तिला सौत्ताला तिचं कॅरेक्टर म्हाईत व्हतं. ती म्हराटि पिक्चरमधल्या अलका कुबल सारखी धुतल्या तान्दलासारखि व्हती. हिन्दी पिक्चरमधल्या हिरविनीगत पान्याखालि धुतल्यासारखि नव्हति. तिनं तिच्या आयुष्यात येकच हिन्दी पिक्चर बगितला व्हता. सत्यम शिवम सुन्दरम. देवाधर्माचा असल्यानं बगितला व्हता. अन जत्रंतल्या खेळात जय सन्तोषि मा बघितला व्हता. बास. बाकि तिच्या आयुश्याचा सगळा म्हराटी पिक्चर व्हता.
पन तिच्यावर सन्शय घिउन तिच्या नव-यानं तिला येकदा इतकी झोडलि कि ती आजारिच पडलि. तवा त्यानं घाबरुन तिला रानातल्या या वाड्यात आनुन ठिवली. पन तिथंच तिचा जीव गेला अनं ती हाडळ झाली. हाडळ झाल्यावर तिला दिवस दिवस मानुस दिसायचं नाय. मंग कोन वळखीचं मानुस आलं कि ती त्येला वळख दावाय जायची पन त्ये मानुस घाबरुन हातातलं असंल नसंल ते खालि टाकुन पळत सुटायचं. कधी कधी तिला त्यात खायला भेटायचं. मंग तिला मज्जाच वाटाय लागली. मानसं बी आता घाबराय लागली व्हती. काहि काहि तर इतकी घाबरायची की छाती फुटुन मरायची.
काका वाड्यात पोराला शोधु लागला तसं हाडळीच्या चेह-यावर हासु उमटलं. लै दिसानी मानुस हितपर्यंत आलं व्हतं. आता याला वळख दावाय लागल असं मनात म्हनत व्हती. पन त्यो काय करतु त्ये बी तिला बगाय्चं व्हतं. आलेला मानुस दारामागं, खिडकीतून बाहेर काइतरी शोधत व्हता. हाका मारत व्हता. हाडळीला वाटलं आता मज्जा कराय पायजे.
हिकडं काका जेरिस आला व्हता. पोरगं काय ओ देईना. त्ये देवु बी शकलं नसतं. खरं म्हन्जी भूक, तहान अन काळजीनं त्येचं डोकं औट झालं व्हतं. पोराचं नाव मस हानम्या ठिवलं व्हतं. पन ते गावक-यांशी बोलतानाचं वापरलं जायचं. काकीला काका जवा बोलायचा तवाच पोराशीबी बोलायचा. ते बी भाडनातच. दोगं बोलत नव्हति म्हनुन पोराला बि बोलता येत नव्हतं म्हनुन समदी त्येला मुका म्हनायची तवा काकाबी त्येला हाडळीचा पोर न म्हनता हाडळीचा मुकाच म्हनाय लागला व्हता. काकाला आता हे समदं आठवलं.
हाडळीनं वरून हवेत सूर मारला अन काकाच्या फुड्यात येऊन ठाकली त्याच वक्ताला काका हाक मारत व्हता हाडळीचा मुका ...अन पुढंचा शीन बघून त्याची दातखिळच बस्ली. हिकडं हाडळीची अवस्था बी मेल्याहून मेल्यागत झाली. देवदेवाच्या पिक्चरमधल्या आशा काळेला कोनि मुका मागितला तर तिची अ‍ॅक्टिंग कशी असल डिक्टो तशिच तिचीबी झालि.
हिकडं काका घाबरला व्हता. पन पोराच्या काळजीनं त्येला भानावर आनलं अन त्यो हाडळीच्या पाया पडू लागला.
मला फकस्त हाडळीचा मुका घेऊन जाऊ दि म्हनाय लागला. त्याबरुबर हाडळीनं त्वांड फिरवुन घितलं. आता घाबरायची पाळि तिची व्हती. तिच्या गालावर गुलाबि रन्ग चडला असं अंधाराला वाटत व्हतं. काका इरंला पेटून मला हाडळीचा मुकाच पायजे असं म्हनत व्हता. त्याबरुबर हाडळ पळाय लागली अन काका तिच्यामागं. मला काय नकु, फक्त हाडळीचा मुका दी... पायजे तर नंतर माझा जीव घि पर मला आत्ता मुका दी असं काका रडत रडत वरडत व्हता अन हाडळ हादरली व्हती. ती आता धर्मसंकटात सापडली. तिच्या आख्या आयुष्यानंतर असा प्रसन्ग तिनं पायला नव्हता. अशा वक्ताला काय करायचं तिला ठाऊक नव्हतं. हा मानुस काय चान्गला नाय. जनमभर जे जपलं. ज्येच्यापायी जीव सोडला पन पाऊल वाकडं पडून दिलं न्हाय त्ये आत्ताच कसं काय पडूं द्यायचं या इचारानं तिनं आपली इज्जत वाचवायची ठरवलं अन वाड्याच्या भाईर पडून ती पळाय लागली.
हिकडं काकाला वाटलं, ती पोराकडं निघाली म्हनुन त्यो बी जोरात तिच्या मागं लागला. हाडळीचा मुका दी, माझ्या हाडळीचा मुका दी असं म्हनत त्यो जोरात निगाला, तशी हाडळ बी वरडत पळायला लागली. हाडळीला कायबी समजंना तसं काकालाबी. हितक्यात काकाचा पाय एका दगडावरुन घसरुन त्यो उडाला अन उतारावरून खाली गडगडत गेला. दगडांचा लैच आवाज झाला. हाडळीनं मागं न बघताच जी धूम ठोकली ती बोंब मारत जंगल सोडूनच निघून गेली.
काका पडला अन तिथंच शुद्ध गेली. सकाळच्याला कुनीतरी तोन्डावर पानी मारलं तसा काका जागा झाला. तोन्डावर कुनी पानी मारलं म्हनुन बगतुय तर त्येचा हाडळीचा मुका !! मग त्यानं आनंदानं येडा व्हत त्येला छातीला आवळलं अन त्येचे मुके घ्यायाला सुरुवात केली.
रातच्याला म्हाता-याच्या शिव्या ऐकुन दोनचार तरुन गडी जंगलाकडं निगाले व्हते. काकाचा आवाज आला म्हनुन त्येंनी लांबुनच पायलं तर काय काका मागं हाडळ पुढ, काका मागं हाडळ पुडं. त्यो शीन बगून त्येंची बोबडीच वळली. पन त्या वक्तालाबी काकाच्या हिमतीला दाद देत मंडळी जागच्या जगीच हुभी -हायली. हडळीला पाय लावुन पळताना समद्यांनीच बघितलं. ती जंगल सोडून गेली हे बी त्यांनी पायलं. पन अचानक काका गायब झाला. अन मग त्याची शोधाधोध सुरू झाली. काकाला आवाज दिला तर आवाज बी येईना.
काकाचं पोरगं लैच उदास झालं व्हतं. मुकं असल्यानं बोलता बी यायचं न्हाय. त्यात दोघंबी लै भांडायची. न्हाईतर अबोला चालु असायचा. गावातली पोरं लै म्हंजी लैच चिडवायची. परवा भांडान सुरू झालं तवाच कनाटाळुन त्येनं घर सोडलं. येका पिशवीत दोन मैन्ह्यामागचं दिवाळीचं उरलेलं समदं भरून जंगलाची वाट धरली. पन जंगलात शिरल्यावर त्येला रस्ताच सुधरंना. त्यात हाडळीच्या गोष्टी आइकून भीतीच वाटाय लागली म्हनुन येका वडाच्या झाडावर मोठी ढोली पाहून त्यात शिरून बसला. सकाळच्याला पाच सहा करन्ज्या हानल्यावर जवळच पानी मिळालं. आनि पुन्यांदा येऊन तो झोपला. काका त्या झाडाजवळुन गेला तरी त्येला काहि हा पोरगा दिसला नाहि. आनि मंग रातच्याला गोंधळ झाला तवा काकाचा आवाज ऐकुन मुका उठला. आपल्यालाच हाका मारतुय म्हनुन त्यो बी तिकडं पळाय लागला. त्येला ओ देता येत नव्हती म्हनुन काकाला हात लावुन साण्गायचा इचार त्यानं केला. अचानक काका उडालेला दिसला अन नंतर गायब झाला तसा मुका त्याला शोधाय लागला. सकाळच्याला काका दिसल्यावर त्येनी पानी आनलं आनि पुढचं आपन पायलंच.
आनि मंग गावात काकाचं लैच जंगी स्वागत झालं, हाडळीला पळवुन लावल्याबद्दल सत्कार बी झाला. काका आता गावात मोठा मानुस झाला. त्येच्या पोराला बी आता कोन चिडवत नाय. काकी आता नीट वागति.टोचुन बोलत नाय. आता दोगं बी बोलत्यात. गावातली लोकं काकाचं नाव काडत्यात. जवळच्या रस्त्यानं आता जाता येतंय. वाड्यातली हाडळ आता निघुन गेलीय. काका काकीला हाडळ म्हनत नाय. घरात दोगं बोलाय लागल्यावर मुक्याला बॉ बोलावं वाटु लागलंय. आता बाबा, दादा म्हनतंय. शिकंल त्ये बोलायला.
आता हाडळीचा मुका घ्यायला काकाला कुटं जायला लागनार नाय.
- बाबुराव
( नाव बि घातलं अन काय काय मिष्ट्येकच्या चुका व्हत्या त्या बी दुरुस्त केल्या )
कॉपी मारु नये ही इनंती. अन मारलीच तर आमचं नाव घाला वं त्यात समजून उमजून.

भय

दिनकरराव भोसल्यांची एक सवय होती, त्यांना रात्री उशीरापर्यंत नीट झोप येत नसे व पहाटे डोळा लागतो न लागतो तोच, बबलीच्या म्हणजे त्यांची नात श्रेयाच्या हाकेने त्यांची झोपमोड होई. मधाळ आवाजात हाक मारत बबली म्हणे, “आजोबा गुड मॉर्निंग, मी शाळेत जाऊन येते हं !” एवढ्याशा, चार-सहा वर्षांच्या मुलांना सकाळी सात वाजता घर सोडावं लागतं याचं त्यांना वाईट वाटे. झोपेतून उठून दिनकरराव तीला बाय-बाय करित असत.
आजही बबलीच्या हाकेने जाग आली तीला “बाय-बाय बेटा” असे म्हणत दिनकरराव उठले. आपली चाळीच्या व्हरांड्यातली अंथरूणाची वळकटी केली आणि समोरुन येणा-या राहूलला विनंती करून ती वळकटी खिडकीच्या वरती लावलेल्या लाकडी फळीवर ठेऊन घेतली. पटापट सर्व विधी आटपून हॉस्पिटलला निघायची लगबग चालू होती. त्यांची ही लुडबूड दिपकला त्यांच्या एकूलत्या एक मुलाला खपली नाही. “हे काय चाललंय अण्णा अहो रात्रपाळी करून थकून आलोय, जरा आंघोळ करून चहा-नाश्ता करून झोपावं म्हणतोय तर तुमचं हे मधे-मधे “
“बाळा मला केममध्ये जायचंय रे ! आज रक्त तपासायचं आहे”.
“ अहो पण अर्धा तास उशीर झाला तर काय लगेच तुमचं हॉस्पिटल बंद होणार नाही. मला आज पून्हा सेकंडला जायचंय ! दोन चार तास झोप मिळेल तेवढीच”.
दिनकरराव दीनपणे बाहेर व्हरांड्यात आले. मोडक्या खुर्चीत बसून राहिले. साधारणत: पाऊण तासाने पाहिले तर दिपक झोपलेला दिसला. मग पुन्हा त्यांची लगबग चालू झाली. खरंतर त्यांना ठाऊक होते की विचारून काही उपयोग होणार नाही, तरी त्यांनी दिपकला बरोबर येण्याची विनंती केली. पण नाईट शिफ्ट करून आल्याचा बहाणा करून दिपकने नकार दिला. एवढ्यात कल्पना, त्यांची सूनही लेकीला शाळेत सोडून परतली होती. दिनकररावांनी तिलाही बरोबर येण्याविषयी विचारले. तशी तिनं फणका-यानं सुनावलं, “ तूमचं हे नेहमीचंच झालंय, म्हणून काय मी माझी सगळी कामं सोडून हॉस्पिटलला वेळ फुकट घालवू ?”
शेवटी दिनकरराव एकटेच निघाले, आता त्यांना पत्नीची वत्सलाची प्रकर्षानं आठवण होऊ लागली, ती होती तेव्हा माझ्या भटकण्याच्या सवयीवर नेहमी वैतागायची म्हणायची “असं एकट्यानं गाव भटकत जाऊ नका, जरा घरी शांत बसा, पेपर वाचा, टि.व्ही. बघा.”
“ पण वत्सले आज तूझ्याविना मला नाईलाजानं एकटं जावं लागतंय गं ! तू असतीस तर झेपत नसतानाही पाय ओढंत माझ्याबरोबर आली असतीस. एकट्याला हॉस्पिटलात जाऊ दिलं नसतंस.”
दिनकररावांनी काठी घेतली, काठी म्हणजे काय ? तर जूना काढून टाकलेला पडद्याचा रॉड. त्याच्या वरच्या भागाला हाताला लागतो म्हणून सूतळीनं मुठ तयार केलेली, पण तरीही त्यातून रॉडचं वरचं टोक हाताला बोचत असे. तळ हाताला गोल खड्डा पडून हात लालबूंद होई, वेदनेने जीव जातोय की काय असे वाटे, पण दुसरा पर्याय नव्हता. कारण कित्येकदा मिन्नतवा-या करूनही दिपक काही साधी लाकडी काठी आणून देत नव्हता. हॉस्पिटलजवळच्या दुकानात तशी काठी ऐंशी रुपयांना मिळत होती, पण दिनकररावांकडे तेवढे पैसे नसत. प्रत्येक वेळी मुला-सुनेकडे हात पसरून ‘जे काही’ पदरात पडत असे, त्यावर काटकसरीने आपले खर्च भागवावे लागत असत. आताही तसंच होतं. कल्पनाने काल दिलेले पन्नास रुपये शिल्लक होते.
हेच दिनकरराव एका खाजगी कंपनीत टाईमकिपर असताना त्यांचा रुबाब पहाण्यासारखा असे. त्या नोकरीतही त्यांनी पै-पै जमवून वीस हजार रुपये पागडी भरून ही चाळीतली जागा घेतली होती. आणि रिटायर्ड होताना जवळ जवळ चार लाख रुपये जमवले होते. दोन वर्षांपूर्वी दिपक आणि कल्पनाने एकच घोषा लावला होता की, ही खोली लहान पडते, अडचण होते, प्रायव्हसी मिळत नाही. सतत ऐकवून ऐकवून आणि गोडीगुलाबीने दिनकररावांकडून त्यांच्या नावावर असलेली एफडी मोडून पाच लाख रुपये काढून घेतले आणि दिपकने सोसायटीतून लाखभर लोन काढून सहा लाखात विक्रोळीस एक नवा कोरा वन बीएचके फ्लॅट घेतला आणि मग रहायला जाण्यापेक्षा भाड्याने दिला तर जास्त फायदा होतो म्हणून तो भाड्याने दिला व दोघेही आजही त्याच चाळीतल्या खोलीत रहात होते. आता अचानक सर्व अडचणींचा विसर पडला होता.
“पूर्वी हे दोघे किती आदबीने आणि प्रेमाने वागायचे, आता माझ्याकडचे सगळे पैसे काढून घेऊन मला कफल्लक केला आणि आता हाडतूड करताहेत.” दिनकरराव मनातल्या मनांत चरफडत घराबाहेर पडले. हॉस्पिटलात साडे आठ वाजता बोलावलं होतं, एव्हाना नऊ वाजले होते. आता रक्त तपासणी होते की नाही कोणास ठाऊक. आता बससाठी थांबायची हिंमत नव्हती म्हणून त्यांनी टॅक्सीवाल्याला विचारले की, “केमला जायचे किती होतील? “ टॅक्सीवाल्याने अंदाज दिला की, तीस रुपयांपर्यंत होतील. मग मनाचा हिय्या करून दिनकरराव टॅक्सीत बसले. हॉस्पिटलला पोहोचले, तिथल्या गुळगुळीत फरशीवर त्यांच्या हातातला रॉड थांबत नव्हता. फरशीवर धातूचा रॉड सारखा पुढे पुढे घसरत होता आणि चालायला अजूनच त्रास होत होता. तोल सांभाळण्यासाठी घेतलेल्या काठीचा उपयोग होण्याऐवजी हॉस्पिटलमधील त्या गर्दीत ती काठी कोणाला लागू नये म्हणून सांभाळत चालण्याची कसरत करावी लागत होती.
ब्लड टेस्टच्या ओपीडीजवळ पोहोचले, समोर पहातात तर ही भली मोठी रांग. त्यांची तर दातखिळीच बसली, घाबरतच ते काऊंटरजवळ गेले काऊंटरवरच्या मुलाला विचारलं. “ साहेब, मला साडे आठला बोलावलं होतं. पण यायला उशीर झाला आहे, माझी ब्लड टेस्ट होईल का?” “हो होईल जा लाईनमध्ये बसा.” त्या मुलाने जराही दिनकररावांकडे न पहाता उत्तर दिलं. त्याच्या या वागण्याने दिनकररावांना वाईट वाटलं. पण ते काहीच न बोलता रांगेत जाऊन बसले. साधारणत: तासाभराने त्यांचा नंबर लागला, त्यांच्या मागे कुणीच नव्हते. त्यांची फाईल पाहून काऊंटरवरच्या मुलीने विचारलं, “बहात्तर वय आहे तुमचं?”
म्हटलं तर प्रश्न साधाच होता. पण दिनकररावांचा सकाळपासून धरलेला संयम सुटला आणि त्यांच्या डोळ्यात पाणी तराळले. त्या मुलीने दुसरा प्रश्न विचारला, “ तुमच्या बरोबर कुणी नाही?”
दिनकरराव गप्पच राहीले, पण त्या मुलीला बहुधा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असावीत. तीने फाईलवर काही नोंदी केल्या आणि ती फाईल शेजारी बसलेल्या त्या मुलाकडे दिली, त्या मुलाने काही चिठ्ठ्या तयार करून दिनकररावांना दिल्या व आतमध्ये जाण्याचा बोटानेच इशारा केला तेव्हा त्या मुलीने त्याला सांगितले, “अरे ते एकटेच आलेत, त्यांना टेक्नीशियनकडे सोड.”
तेव्हा तो मुलगा काऊंटरच्या बाहेर आला, काही न बोलता दिनकररावांच्या दंडाला पकडून लॅबमध्ये घेऊन गेला, आणि थेट टेक्नीशियनच्या समोर नेऊन बसवलं. आतमध्ये रांग असूनही दिनकररावांना अग्रक्रम मिळाला होता, या लहानशा घटनेने ते काहीसे सुखावले. त्यांच्या रक्ताचा नमुना घेऊन झाल्यावर टेक्नीशियनने त्यांना सांगितले की, “दुपारी बारा वाजता जेऊन दीड वाजता परत यायचं.”
“कशाला रिपोर्टर्स घ्यायला?” दिनकररावांनी विचारले.
“नाही पुन्हा रक्त घ्यायचं आहे.” टेक्नीशीयनने सांगितले त्यावर दिनकरराव पुन्हा काही विचारणार येवढ्यात त्या मुलाने त्यांना दंडाला धरून बळेबळेच उठवले आणि म्हणाला “मी सांगतो काय ते; चला बाहेर चला.” त्याने बाहेर आणून बसवले आणि म्हणाला “कसं आहे आजोबा, जेवणापूर्वी आणि जेवणानंतर रक्तातल्या साखरेचं प्रमाण तपासले जाते. आता जेवणापूर्वीचं तुमचं रक्त घेतलं, जेवणानंतर दोन तासाने जेवणानंतरचं रक्त घेणार म्हणून बारा वाजता जेवायचं, दोन वाजता रक्त द्यायचं.” एवढं बोलून तो मुलगा निघून गेला. दिनकररावांना प्रश्न पडला आता काय करायचं? घरी जावं तर पोहोचायलाच बारा वाजतील बरं घरी पोहोचल्यावर बारालाच काय दोन वाजेपर्यंत जेवण मिळण्याची शक्यता फारच कमी. बरं इथेच काही खावं तर किमान वीस-पंचवीस रुपये लागणार, मग घरी जायला बसचं तिकीट कसं काढावं? मग ते भित-भित पुन्हा काऊंटरजवळ गेले, ती मुलगी जरा बरं बोलत होती म्हणून तीच्याकडे चौकशी करूया असे वाटून ते तीच्यासमोर आले.
“मॅडम, मी घाटकोपरला रहातो, एवढ्या कमी वेळात घरी जाऊन जेऊन परत येणं जमणार नाही मी इथेच काहीतरी खाऊन घेतलं तर चालेल?”
“हो चालेल पण घरच्यासारखं वरण-बात, पोळी-भाजी असं संपूर्ण जेवण घ्या नुसतं वडा सांबार वगैरे खाऊ नका.”
“ चहा बिस्किटं खाल्ली तर चालतील?” दिनकररावांनी हिशेब लावला, पंधरा रुपये खर्च झाले तरी चालेल.
“का?”
“मी बाहेरचं काही खात नाही” त्यांनी खोटंच सांगितलं.
“पैसे आहेत का तुमच्याकडे” मुलीने विचारलेल्या थेट प्रश्नाने ते गांगरलेच. पण सावरत म्हणाले “हो..हो आहेत थोडेसे.”
“घरी कोणकोण असतं तुमच्या?”
“मुलगा आणि सून आहेत पण ते दोघे आपापल्या कामात फार बीझी असतात.”
त्या मुलीने शेजारच्या मुलास हाक मारली “आकाश” त्यानंतर त्या काऊंटरवरील मुला-मुलींत नजरानजर झाली. तो मुलगा म्हणाला “आजोबा बसा थोडा वेळ मग पाहूया काय करायचं ते” तो मुलगा लॅबमध्ये गेला, त्याच्या पाठोपाठ ती मुलगीही गेली. बराच वेळ झाला मग तो मुलगा बाहेर आला आणि दिनकररावांना दंडाला घरून उठवत म्हणाला “चला आजोबा”
“कुठे?”
“जेवायला”
“नको, नको मी जाईन मला फक्तं हॉटेल कुठे आहे ते सांगा”
“तुमच्याकडे पैसे आहेत ना? माझ्याकडे नाहीत, तूम्ही मला जेवायला घालणार आहात”
“पण माझ्याकडे थोडेच पैसे आहेत.”
“हरकत नाही तो कँटीनवाला माझा मीत्र आहे त्याला नंतर पैसे देतो म्हणून सांगू”
दोघे कँटीनमध्ये गेले, दोघांसाठी लंच मागवलं, आणि मग निघताना आकाशनेच दोघांचे पेसे दिले. दिनकररावांच्या मनांत आलंच, “या मुलाचं काही कळतंच नाही, आतापर्यंत हा मुलगा एकदाही सरळ बोलला नव्हता, आणि वागण्यात इतका दिलदार? या मुलाच्या वागण्यात आणि बोलण्यात इतकी भिन्नता? “
आकाशने त्यांना पून्हा लॅबच्या बाहेर आणून बसवलं साधारणत: दोनच्या सुमारास आकाश पून्हा बाहेर आला. दिनकररावांशी एकही शब्द न बोलता दंडाला पकडून घेऊन गेला, रक्त काढून झाल्यावर पून्हा बाहेर आणून बसवलं. आता जाऊ की बसू असं विचारायची हिंमतही दिनकरराव दाखवू शकले नाहीत. तो मुलगा चांगला वागला तरी त्याच्याशी बोलायची भितीच वाटत होती. पंधरा मिनिटांनी तो मुलगा पुन्हा आला त्याने पुन्हा त्यांना दंडाला धरून उठवले, आणि बाहेरच्या दिशेने चालू लागला दिनकरराव निमूटपणे त्याच्या मागोमाग गेले. त्या मुलाने समोर उभ्या असलेल्या टॅक्सीत त्यांना बसवले, आणि त्यांच्या खिशात पन्नासची नोट बळेबळेच कोंबली. आणि तो निघूनही गेला. टॅक्सी घरासमोर थांबली तेव्हा नेमकं कल्पनाने पाहिलं. मग काय त्या दिवशी रात्री झोपायच्या वेळेपर्यंत दिनकररावांच्या टॅक्सीने फिरण्याच्या सवयीवर टोचून बोलणं चालू राहिलं. इतकं की त्यांना जीव नकोसा झाला होता. आज दिवसभरात किती अतर्क्य अनुभव येत राहिले. घरातल्या लोकांनी ज्याला अडगळ समजले होते त्याच म्हाता-याशी ज्यांचा यत्किंचतही संबंध नाही अशा लोकांनी किती ‘सहृदय’ आणि ‘आश्वासक’ वागणूक दिली होती.
सकाळ झाली तरी कल्पनाचे टोमणे थांबले नव्हते. दिनकररावांना आता असह्य झालं होतं. ते बबलीच्या हाकेने उठले सर्वांची लगबल थांबल्यावर ते तयार झाले, शांतपणे घराबाहेर पडले. सावकाशपणे चालत ते स्टेशनपर्यंत आले. रांगेत उभे राहून त्यांनी एक प्लॅटफॉर्म तिकिट घेतले आणि प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर एका बाकड्यावर बसले. आज ते आपल्या जीवनाचा अंत करणार होते. पण अजूनही धीर होत नव्हता, बराच वेळ वत्सलेशी मनांतल्या मनांत हितगूज झल्यावर धीर एकवटवून ते उठले, काठी तशीच बाकड्याजवळ राहीली होती, सावकाश चालत ते प्लॅटफॉर्मच्या कडेला आले, समोरून येणारी गाडीही दिसू लागली होती, बस!!! आता काही क्षणांतच गाडी जवळ येईल आणि आपण उडी मारायची ....झालं.... सुटका.... एवढ्यात एक माणूस ओरडला “ओऽऽऽ आजोबा मरायचंय काय? मागे व्हा !” त्याच्या त्या आवाजासरशी दिनकरराव मागे हटले आणि तोल जाऊन पाठीवर पडले. लोकांनी त्यांना उठवून पुन्हा बाकड्यावर बसवले. प्रत्येकजण आस्थेने चौकशी करत होता. “कुठे जायचंय?” “बरं वाटंत नाही का?” पण त्यांना मुर्च्छा आली होती.
काही वेळावे ते भानावर आले. हळू-हळू त्यांच्या भवतालची गर्दी पांगली. दिनकरराव विचारात पडले “नक्की काय घडलं? मी जिवंत आहे की?....त्यांनी काठीसाठी हात सरसावला पण काठी त्यांच्या हाताला लागली नाही एवढ्यात एका चिमूरडीने त्यांची काठी त्याच्या हातात सरकवली. तीला त्यांनी पाहीले ती लोकलमध्ये भिक मागणारी असावी. त्यांनी थँक्यू म्हणत काठी घेतली तशी ती मुलगीही ठँकू म्हणत दूर पळू लागली... क्षणबर ती बबलीच असल्यासारखे वाटून गेले. ते तसेच बसून होते आणि काल सकाळपासूनचा दिनक्रम आटवून आठवून विचार करत राहिले. किती वेळ ते तीथे बसून होते त्यांनाही कळले नाही. “मला जे हवंय ते मिळत नाही, असं का? मला जसं दिसतं तसं ते नसत, असं का? मला जे वाटतं त्यापेक्षा ते वेगळं असत, असं का? .... नाही ही केवळ नाण्याची एकच बाजू आहे. मी ज्याची अपेक्षा ठेवत नाही, तेही मला कधी कधी मिळून जातं. जसं ओळख नसताना हॉस्पिटलात अग्रक्रम, बसच्या प्रवासाचे वांदे असताना टॅक्सीने घरापर्यंत प्रवास. यापुढे आयुष्यात कधीही शक्य नसलेले दुपारी बारालाच मिळालेले जेवण. नाही माझीच काहीतरी गफलत होतेय, हे जग वाईट नाही. माणसं वाईट नाहीत, कदाचित त्यांची प्रत्येकाची काही मजबूरी असेल. मग माझं काय चुकतंय? .... परत आपण या क्षणापासून मागे जाऊया..... मी आता इथे बसलोय.... मला लोकांनी इथे बसवलं आणि आस्थेने चौकशी केली ओळख नसताना... त्याआधी मी मरायचा प्रयत्न केला मग मेलो का नाही? ..... येस!”
त्यांचा चेहरा उजळला, त्यांना साक्षात्कार झाला होता, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकच होतं.... “भिती..... हो नक्कीच, भितीच माझा शत्रू आहे. मघाशी मला मुर्च्छा आली त्यावेळची परीस्थिती कशी होती... शून्य केवळ एक शून्य होते.... किती सुखावह स्थिती होती, मला कसलीच चिंता नव्हती त्या क्षणी, मी त्या क्षणी मी नव्हतोच, माझे असे काही नव्हते, मला काहीच नको होते, किती सोपं आहे हे सगळं, आणि मी प्रत्येक वेळी माझ्यातल्या ‘मी’ ला मध्ये आणून जगत आलो. म्हणूनच सोबत भितीही आली. परिस्थितीला घाबरून मी पळ काढायचं ठरवलं. मग जगण्याला घाबरून मी मरायचं ठरवलं. मरणाच्या दारातही विदाऊट तिकिट पकडलं जाण्याला घाबरलो, आणि मरण्याचा प्रयत्न करताना अपरिचिताने दिलेल्या आवाजाला मी घाबरलो आणि मग मरणालाही घाबरलो.”
ते स्टेशनमधून बाहेर आले. इच्छा झाली तेव्हा एक मस्त वडापाव खाल्ला. शांतपणे दुकानांच्या आडोशाला असलेल्या सावलीतून घरी निघाले. वाटेत एका दुकानात एक काठी दिसली, सुंदर नक्षिकाम केलेली, झोकदार मुठ लावलेली, पहाताचक्षणी मनाला आवडली. दिनकरराव सहज दुकानात शिरले काठीची किंमत विचारली एकशे तीस रुपये होती. काही क्षण ते विचारात पडले बराचवेळ काठी उलट सुलट करून निरखून पाहिली. मग काहीतरी मनाशी ठरवून त्यांनी खिशातील चाळीस रुपये काढले. दुकानदाराच्या समोर ठेवत म्हणाले, “ हे चाळीस रुपये ठेव आणि ही काठी बाजूला काढून ठेव उरलेले पैसे घेऊन येईन तेव्हा ही काठी घेऊन जाईन.” त्यांच्या शब्दात निश्चय होता.
“अहो मग पैसे आणाल तेव्हा घेऊन जा ना एवढी काय घाई आहे?” दुकानदार म्हणाला
“ नाही मला हीच काठी आवडली आहे आणि मी हीच काठी घेणार आहे.”
“ आजोबा ही काठी तूमचीच झाली केव्हाही या आणि घेऊन जा”
“नाही माझ्याकडे एकदम एकशे तीस रुपये जमणार नाहीत, मिळतील तसे दहा-बारा दिवसांत देईन. पण मधल्या काळात दुस-या कोणी ही काठी घेऊ नये म्हणून मी बुक करतोय.” दिनकररावांचे बोलणे ऐकून दुकानदार विचारात पडला, एवढ्यात त्याला त्यांच्या हातातला रॉड दिसला. ते पाहून त्याला काय वाटले नकळे तो पुढे आला, त्याने चाळीस रुपये घेतले आणि म्हणाला “आजोबा काठी तूम्ही घेऊन जा बाकी पैसे केव्हपण दिले तरी चालतील जय मातादी.” असे म्हणू तो दुस-या गि-हाईकाकडे वळलासुद्धा.
दिनकररावांना आत्ता या क्षणाला खूप आनंद झाला होता, खरंतर म्हाता-याची काठी ही काही चैनीची वस्तू नव्हे पण ती मिळणं इतकं कठीण होऊन बसलं होतं आणि आता चुटकीसरशी प्रश्न सुटला होता. ते आनंदातच घरी निघाले. वाटेत कुठेही ती काठी जमीनीला न टेकवता घरी आणली. आणि मुद्दाम ती सर्वांना दिसेल अशी ठेऊन दिली. मग शांतपणे एक जूनी डायरी काढली. आणि ती काठी पाहून कल्पना कशी रागावेल, काय काय टोमणे मारेल ते सगळं लिहून काढू लागले. आता त्यांना नविन खेळ मिळाला होता. त्यांनी लिहिल्याप्रमाणे कोणत्या प्रसंगी आपल्याला कोणता टोमणा मारला जाईल ते जुळले की मग त्यावर दिनकरराव टीक करणार होते.

Tuesday, March 29, 2016

अरे रिक्षा जरा हळू चालव. पाऊस किती पडतोय? पावसात जर रस्त्यावर
ऑइल सांडलेले असेल तर गाडी लगेच स्लीप होते रे बाबा. . . . . ”
मी रिक्षावाल्या प्रदीपला
म्हणालो. तातडीने पुण्याला जायचे होते म्हणून मी गावाहून रिक्षाने रत्नागिरीला निघालो होतो. तिथून मग रात्री पुण्याची बस पकडणार होतो. रिक्षा रत्नागिरी सीटीत प्रवेश करत
होती तेवढ्यात रस्त्याच्या कडेला समीरची मोटरसायकल उभी दिसली म्हणून मी रिक्षा
थांबवली आणि खाली उतरलो. समीर समोरच्या दुकानातच सिगारेट घेत होता, मी हाक
मारली तसा वळून माझ्याकडे बघून हसू लागला. “अरे भल्या माणसा आहेस कुठे? किती वर्षांनी
भेटलास? ” मी म्हणालो.
मग मी रिक्षातून बॅग काढून घेतली आणि प्रदीपला रिक्षाचे भाडे देवून समीर
बरोबर निघालो. बसला अजून 2/3 तास वेळ होता. इतक्या वर्षांनी भेट झाली तर चला
सेलिब्रेट करू म्हणून मग आम्ही बारमधये बसलो आणि बियरच्या संगतीने जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम सुर झाले. . . .
समीरची आणि माझी पहिली भेट अठरा वर्षांपूर्वी झाली. मी कॉलेज पूर्ण करून
नुकताच रत्नागरीतील एका कंपनीत जॉइन झालो होतो. आमची तिघा जणांची टीम होती. मी,
समीर आणि अल्ताफ ! समीर आणि अल्ताफ मला सीनियर होते. . पण आमची दोस्ती मात्र एकदम पक्की झाली होती. मी नवखा असल्याने मला फारसे काही कळत नव्हते. मग अल्ताफ आणि समीरने मला सांभाळून घेत सर्वकाही शिकवले. आमची कंपनी भगवती बंदरला होती
आणि मी गावाहून रत्नागिरीला अप डाउन करत असे, मग एस टी स्टॅन्ड पासून भगवती बंदर
पर्यंत सकाळी आणि संध्याकाळी परत असे आम्ही तीघे एकाच बाईकवरून जायचो !
पुढच्याच महिन्यात आम्हाला तिघांना कंपनीतर्फे तीन महिन्यासाठी विजयदुर्ग बंदरावर कामाला पाठवण्यात आले. तिथे पावसाळ्यात दोन मोठी जहाजे रीपेयरसाठी आली
होती. मग काय? आमच्या तिघांचीही राहायची सोय विजयदुर्ग किल्ल्यावर एका धर्मशाळेत
करण्यात आली. जेवण तिथेच एका हॉटेलमध्ये ! या तीन महिन्यात आम्ही खूप धूम धमाल केली सकाळी आठ ते संध्याकाळी आठ पर्यंत बोटीवर काम चालायचे! मग घरी येवून आंघोळ वगैरे करून जेवायला निघणार इतक्यात तिघांपैकी एकाला हुक्की यायची. मग
बाइक काढून देवगडला 40 कीमी जायचे आणि खंबा आणायचा. आमच्याबरोबर चंदू गाडगीळ
म्हणून बोटीवरचा एक कर्मचारीदेखील असायचा ! मग जेजेवण पार्सल घेरून रानात रात्री 2/3
वाजेपर्यंत पार्टी चालायची. . . सकाळी पुन्हा कामावर हजर! खरोखर ते दिवस अविस्मरणीय होते यात शंका नाही
ते तीन महिने संपल्यावर आम्ही परत रत्नागिरीला आलो आणि आणखी सहा महिने आम्ही एकत्र होतो. नंतर मग मी आणि अल्ताफने तो जॉब सोडला. अल्ताफ दुबईला गेला तर
मी दाभोळकर पॉवर कंपनीत जॉइन झालो. पण समीर मात्र तिथेच होता. आणखी 3 वर्षे. तीन
वर्षांनी त्यानेदेखील जॉब बदलला आणि रत्नागिरीतच दुसर्‍या कंपनीत जॉइन झाला. या
दरम्यान समीरने कंपनीतीलच एका मुलीशी लग्न केले आणि त्यांना तीन गोंडस मुले देखील झाली.
मी मग नोकरीनिमित्त गल्फला गेलो. अल्ताफचा दुबईलाच दुर्दैवी मृत्यू झाला
आणि. . . . . . . . . . . . .
मी एकदम चपापलो. चार वर्षांपुर्वीच समीर मॅसिव हार्ट अ‍टॅकने गेला. असे
कसे? काहीतरी गडबड आहे. आपण आता समीर बरोबरच तर बसलो आहोत बियर पीत ! मग.
. . . मग. . . . . तो चार वर्षापूर्वीचा गेलेला? असे कसे काय? बियरची सगळी धुंदी उतरली आणि
मी निरखून समीरकडे पाहू लागलो. काहीतरी गडबड आहे. . . काळजीपूर्वक विचार केल्यावर मला समजले की समीरचे शरीर पारदर्शक दिसतेय. एक वेगळीच चमक त्याच्या डोळ्यात होती. . . . .
तरीही मी धीर करून समीरला बोललो. . .
मी- अरे समीर पण तू तर. ? चार वर्षांपुर्वी तू गेलास रे. हार्ट अटॅक ने. मग आता
इथे कसा काय?
समीर - तुला काय वेड लागलंय का? काहीतरी बडबड करतोय? बियर जास्त
झाली काय तुला? मी- नाही रे समीर, आईशप्पथ. तुझ्याबरोबर काम करणार्‍या पाटीलने मला
सांगितले यार. .
1 डिसेंबर 2011. . . त्या दिवशी संध्याकाळी साडेचार वाजता तू काम संपवून
कंपनीतून निघालास, गाडीवर बसून किक मारलीस तेव्हाच छातीत कळ आली आणि तू तिथेच
जागेवर कोसळलास. समीर हसत होता. माझं बोलून झाल्यावर समीरने आणखी २ बियर
मागवल्या. काय भंकस लावलीस तू पण , बियर पी. एक मला दिली आणि एक त्याने स्वतःच्या
ग्लास मध्ये ओतली.
त्या दिवशी बार मध्ये दारू पिता पिता कधी वेळ निघून गेली समजलच नाही. अचानक माझ्या लक्षात आलं आपल्या बसची वेळ निघून गेली. मी समीरला बोललो सम्या अरे
माझी गाडी निघून गेली. समीर बोलला जाऊ दे रे, कशाला काळजी करतोस. आज वस्तीलाच
थांब माझ्या घरी, खूप वर्षांनी आपली भेट झाली आहे. मी पण विचार केला ठीक आहे पहाटेची
बस पकडली तरी मी पुणयात वेळेत पोहोचेल. संध्याकाळी साधारण ९ वाजता आम्ही दोघेही बार मधून घरी निघालो. पण मला समीरचं शरीर स्पष्ट दिसत नव्हतं. आपण नशेत आहोत म्हणून अस होत असणार, मनाला समजावत मी
त्याच्या पाठोपाठ निघालो. समीरने झाडाखाली उभी असलेली आपली बाईक काढली, मला
बोलला बस मागे आणि गाडी बाहेर रस्त्यावर काढली.
गाडीवर बसल्यावर थोड्या वेळाने मी माझा हात त्याच्या खांद्यावर टाकला, पण
माझा हात थेट सीट वर पडला. बियर खूप झाल्यामुळे होतय डोळे झाकायला लागले होते म्हणून जो काही प्रकार घडत होता तो माझ्या लक्षात येत नव्हता मी पुन्हा त्याच्या खांद्यावर हात टाकला पुन्हा माझा हात खाली सीट वर पडला. मी त्याच्या डोक्यावरच्या केसांना हात लावला पण हाताला काहीच लागत नव्हतं. आता माझी नशा उतरली. मी त्याला बोललो समीर गाडी थांबव मला लघवीला झाली आहे. त्याने गाडी थांबवली नाही उलट हायवेवर भरधाव वेगाने गाडी पळवत होता. बोलला अरे आपल्याला घरी जायला उशीर होतोय पुढे थांबवतो. मी बोललो अरे थांबव इथेच पुढे नको. तो ऐकायला तयार नव्हता. मी खूप घाबरलो. चालत्या
गाडीवरून उडी मारायचा मनात बेत ठरवला. तेवढ्यात त्याच्या छातीत कळ आली, तो जोरात
ओरडला, मी बोललो काय झालं समीर. त्याचा एक हात त्याने छातीवर ठेवला मोटरसायकल
डगमग करायला लागली, गाडीचा तोल गेला आणि आम्ही दोघेही रसत्यावर पडलो, मागून भरधाव वेगाने एक डंपर येत होता. गाडी माझ्या पायावरून गेली आणि समीरच्या अंगावरून. डंपर वाला थांबला नाही तो निघून गेला. माझा पाय मोडला आहे हे माझ्या आधी लक्षातच आलं नाही. समोर समीरच्या शरीराच्या चिंध्या चिंध्या झाल्या होत्या. ते बघून माझं शरीर थरथर कापायला लागलं. बाजूने गाडय़ा जात होत्या पण कोणीच थांबत नव्हतं. हळूहळू माझ्या पायातून वेदना यायला सुरवात झाली. मी कसा बसा घसपटत आपला जीव वाचवण्यासाठी रस्त्याच्या बाजूला गेलो. आता रस्ता निवांत झाला होता एकही गाडी नव्हती चांदणे पडले होते. मी जमीनीवर उताना पडलो होतो. माझ्या लक्षात आलं कोणीतरी मला उचलतंय. मी डोळे उघडले आणि बघितलं समीर चं ते फाटलेलं शरीर रक्ताच्या धारा वाहणारं ते विद्रूप शरीर माझा हात पकडून मला उचलत होतं. समीर मोठ्या मोठ्याने हसत होता. बोलत होता चल चल माझ्या सोबत. आणि मी बेशुद्ध पडलो. नंतर काय झालं मला काहीच माहिती नव्हतं.
डोळे उघेले, खिडकीतून येणारा उजेड दिसला. आजूबाजूला बघितलं मी हाॅस्पीटल मध्ये होतो.
बायको आणि आई माझ्या बाजूला बसल्या होत्या. ३-४ नातेवाईक पण होते. गावातली २ माणसं होती. माझ्या पायाला प्लास्टर लावलं होतं.
आई रडत रडत बोलली, बाबू हाॅस्पीटल मध्ये आहेस. चांदोरकर हाॅस्पीटल - रत्नागिरी
माझ्या जीवात जीव आला. आपण मरणाच्या दारातून परत आलोय या विचारानेच निश्वासाचा श्वास सोडला आणि निश्चिंत झालो. दुपारी बायको एकटीच माझ्या बाजूला बसली होती. मी तिच्याकडे विषय काढला. झाली घटना तिला सांगितली. गावातल्या २-३ जणांना पण सांगितली नंतर गावातल्या माणसांकडून समजलं की माझा अपघात त्याच ठिकाणी झाला होता ज्या ठिकाणी समीर मोरे ५-६ वर्षापुर्वी मोटरसायकल वरून पडून मेला होता. हे ऐकून मी थक्क झालो.
१५ दिवसांनी हाॅस्पीटल मधून डिस्चार्ज मिळाला, आणि मी महिना भराने
एकदा त्याच मार्गाने चाललो होतो, ज्या ठिकाणी माझा अपघात झाला होता,
समीर
पहिलयांदा मला जो भेटला तो त्याच ठिकाणी जेव्हा मी रिक्षा पकडून रत्नागिरीला चाललो होतो.
समीर २०११ याच वर्षी मेला होता, मला भेटलेला समीर हा समीर
नसून त्याचं भूत होतं. झाला प्रकार आजही आठवला की अंगावर शहारे येतात.