साहेबांची बदली झाली आहे आणि त्यांच्या जागेवर कोणी जोग नावाचे साहेब रुजू होणार आहेत एवढं अनूच्या कानांवर आलं होतं . पण तिच्या मनात कसली शंकाही आली नव्हती . ऑफिसचे चार्ज दिले घेतले गेले असतील , अगदी वरच्या पातळीवर ओळखी करून देण्यात आल्या असतील , तिच्यापर्यंत त्यातलं काहीच पोहोचण्यासारखं नव्हतं आणि जेव्हा शिपाई सांगत आला की , ' बाई ! साहेबांनी केबिनमध्ये बोलावलंय ! ' तेव्हाही ती स्वतःच्याच विचारांच्या तंद्रीत केबिनमध्ये गेली होती . इतरांच्या , विशेषतः पुरुषांच्या मतांबद्दलची बेफिकिरी तिच्या रक्तातच भिनल्यासारखी झाली होती . तिला साहेबांवर प्रभाव पाडायचा नव्हता , त्यांची मर्जीही संपादन करायची नव्हती - तिचं काम ती प्रामाणिकपणे करणार होती .
त्यामुळे ती इतकी बेसावध होती . पण म्हणून तो धक्का जास्तच तीव्र होता . साहेबांच्या खुर्चीत शरद जोग बसला होता . शरद जोग !
मनातले सर्व विचार गोठले . आपण कोठे आहोत , काय करत आहोत हेच ती क्षणभर विसरून गेली . आधी शरीर बधीर झालं होतं . मग तिला वाटलं , आपण आता चक्कर येऊन खाली कोसळणारच आहोत . आधारासाठी ती भिंतीला टेकून उभी राहिली…. आणि मग मनाच्या अगदी आतल्या गाभ्यातला कठोर निर्धार तिच्या मदतीला आला . लटपटतं शरीर परत ताठ झालं . मनाचा तोल पुन्हा एकदा सावरला होता .
तिला जाणवलं की , आपला चेहरा घामाने डवरला आहे . डाव्या हाताने तिने पदराला चेहरा टिपला आणि मग परत एकदा नजर समोर वळवली .
शरद जोग . चेहरा अजूनही बदलला नव्हता . केस कपाळावरून जरासे मागे गेले होते . दाढीचा नितळपणा जरासा कमी झाला होता . पण तेच ते किंचित टोकदार नाक . तीच ती अरुंद जिवणी . आणि तेच ते घारे , किंचित जवळजवळ वाटणारे डोळे - जे आता तिच्यावर एक प्रकारच्या मिश्कीलपणे खिळलेले होते .
पण म्हणजे त्याला माहीत होतं की , आपण या ऑफिसचे काम करतो आणि मुद्दामच त्याने आपल्याला बोलावून घेतलं होतं - असा धक्का देऊन आपली प्रतिक्रिया काय होते याची गंमत पाहायला ? मनात खोलवर कोठेतरी संतापाचा स्फुल्लिंग जन्माला आला …. नसांच्या शाखाशाखांतून शरीरभर ती धग पसरत गेली - कदाचित तिच्या डोळ्यांत त्याला ती रक्तवर्णी आग दिसली असावी…. कारण तो खुर्चीत एकदम सावरून बसला . घसा साफ करीत तो त्याच परिचित , लाघवी आवाजात म्हणाला , ' अनू ! मला माफ कर हं ! गेले तीन-चार दिवस मी तुला बाहेरच्या ऑफिसात पाहात आहे… तेव्हा म्हटलं , एकदा बोलावून घ्यावं …. पाहावं ओळख तरी पटते का ते ! '
ओळख पटते का पाहणार होता ! वीस वर्षांपूर्वी ज्याला तिने शय्यासोबत दिली होती , ज्याच्या मिठीत ती तासच्या तास सुखावली होती , ज्याने तिच्या कानात प्रीतीच्या आणाभाका हलकेच पुटपुटल्या होत्या , ज्याच्या मुलाची ती आई होणार होती…. त्याची ओळख तिला पटणार नाही ? वीस वर्षंच काय , कालांतरापर्यंत तरी ती त्याला विसरणं शक्य होतं का ? माणूस किती निर्लज्ज , किती नादान होऊ शकतो ? ….
मनाच्या तळाखाली लाव्हारस खदखदत होता . कोणत्याही क्षणी त्याचा उद्रेक झाला असता…. सावधान ! सावधान ! सर्व प्रक्षोभक , स्फोटक विचार दडपून टाकायची मनाला वीस वर्षांची सवय होती … मोठया प्रयासाने तिने मनावर नियंत्रण आणलं . ती बोलली तेव्हा आवाजात कंप होता , स्वरावर ताबा नव्हता , प्रत्येक शब्द तिला घशातून ओरबाडून काढून बाहेर ढकलावा लागत होता - पण ती बोलत होती -
'ओळख कशी विसरणार ? पण - पण इथे भेट होईल ही मात्र कल्पना नव्हती… हा जरासा … जरासा शॉकच होता . '
त्याचा अस्वस्थपणा आता गेला होता . तिच्या मवाळ सुराने , निरुपद्रवी शब्दांनी त्याचा आत्मविश्वास परत आला होता .
'आता ऑफिसातच आहेस… गाठी होतील , नाही का ?'
' हो. ' ती नाही कसं म्हणणार ?
'मग ठीक आहे …. गेलीस तरी चालेल …. '
ती खालच्या मानेनं केबिनबाहेर पडली .
ती खुर्चीत बसली होती खरी पण आता तिच्याभोवती ऑफिसमधल्या टेबल-खुर्च्या , टाईपरायटरची खटखट , कर्मचाऱ्यांची ये-जा , टेलिफोनच्या घंटांची खणखण नव्हती…. ती मागे भूतकाळात गेली होती . असं म्हणतात की , माणूस स्वप्नातले प्रसंग रोजच्या व्यवहारातल्यापेक्षा दसपट किंवा शंभरपटही वेगाने , अतिशीघ्रतेने अनुभवत असतो… तो अनुभवाचा पट तिच्या डोळ्यांसमोरून सरसरत गेला …. त्यात भावनांचे किती विविध रंग भरले होते ! ती सतरा वर्षांची होती - वयसुलभ संकोच होता , लज्जा होती , शरीरावर रोमांच उठवणारी स्वप्नं होती… त्यांच्या वाडयात शरद जोग भाडेकरू म्हणून राहायला आला होता . तरणाबांड , उमदा , संभाषणात वाकबगार , लाघवी-आर्जवी आवाजाचा , आकर्षक व्यक्तिमत्वाचा … तिच्या अननुभवी मनावर मोहिनी पडली नाही तरच नवल !
प्रीतीचा गुलाबी रंग होता…. प्रथम स्पर्शाची गहिरी संवेदना होती…. धुंद करणारी मर्दानी शरीराची ती जवळीक…. भीतीने आणि अपेक्षेने धडधडणारं काळीज… कुस्करल्या शरीराच्या वेदनांतून जन्माला आलेलं अतीव सुखाचं सुवर्णकमळ … वर वर सोनेरी दुनियेत घेऊन जाणारा , मनाला बेभान , बेफिकीर बनवणारा तो जादूचा आकाशपाळणा….
पण शेवटी तो पाळणा जमिनीलाच येउन टेकला होता . पायांखाली रेशमी , मुलायम रजया नव्हत्या , कठीण कातळच होता …. शेवटी सोनेरी वर्ख अनुभवाच्या आम्लाखाली ओघळून गेला होता ….
दोन पाळ्या चुकल्या याचा अर्थ काय ते समजण्याइतकं तिचं वय खासच होतं . ते एका संध्याकाळी तिने त्याच्या कानात सांगितलं होतं . तिची त्याच्या डोळ्यांवर नजर नव्हती … त्याच्या डोळ्यांत एकाएकी आलेला हिशेबी थंडपणा तिला दिसला नव्हता .
त्याने सामान केव्हा , कसं हलवलं ते त्यांना समजलंच नाही . तिला दिसली ती मोकळी , रिकामी , भकास खोली .
आई-बाबांपासून ती आपलं गुपित एक दिवससुद्धा लपवून ठेवू शकली नाही . घरात अनर्थ माजला . ती बिचारी मध्यममार्गी , पापभिरू , समाजाला भिऊन वागणारी माणसं - पण भीडेखातर अशीच माणसं अतिशय क्रूर होऊ शकतात , निर्दय होऊ शकतात . संतापाच्या भरात कधी नव्हे तो बाबांनी तिच्या अंगावर हातही टाकायला मागे-पुढे पाहिलं नाही . मग ओळखीच्या कोणी सुचवलेली आंबट… तिखट… खारट औषधंही झाली … मग वेडेवाकडे व्यायामही झाले… पोटाला घट्ट आवळलेला पट्टा … दिवसभर माळ्यावरच्या खोलीतला बंदिवास … पण शरीरात तो नवा जीव वाढतच होता .
तेव्हा मग एका आडगावी राहणाऱ्या बहिणीकडे रवानगी झाली . तिथे मग आणखी काही अघोरी उपचार … पण कशाचाही उपयोग झाला नाही … केवळ शरीरावर जखमा मात्र झाल्या .
एका काळोख्या रात्री अनू प्रसूत झाली आणि व्याजोक्ती अशी होती की , बालक जन्मतःच मृत होतं . त्यांनी तर तिला ते दाखवलंही नाही . त्याचं काय केलं त्यांचं त्यांनाच माहीत …. पण सुईणीने पोट रगडून-रगडून आतला स्त्राव काढून टाकला तेव्हा अनूला वाटलं की , याबरोबरच आपल्या मनातल्या साऱ्या भावनाही पिळवटून काढल्या जात आहेत . ते मृत बालक जाताना स्वतःबरोबर अनूच्या मनातील सर्व करुणा , सर्व प्रेम , सर्व आशा , सर्व सहानुभूती सारं काही घेऊन गेलं होतं .
त्या भयानक आचेत जणू तिच्या मनाचा साचाच वितळला . जेव्हा त्यातून ती बाहेर आली तेव्हा मनाची रचना , जडण-घडण सर्वच बदललं होतं . तिला आता जगाला काही द्यायचं नव्हतं , जगापासून काही अपेक्षाही नव्हती . तिची अलिप्तता काही वेगळीच होती . एका वर्षाच्या खंडानंतर तिचं कॉलेज पुन्हा सुरु झालं . ती ग्रॅज्युएट झाली , यथावकाश एका ऑफिसात क्लार्क झाली .
आई-बाबांनी वर्षभर तिचं मन लग्नासाठी वळवण्याचा आटापिटा केला , मग तो नाद सोडून दिला . तिला त्यांच्या रागाची फिकीर नव्हती , धमक्यांची पर्वा नव्हती - शारीरिक आणि मानसिक वेदनेची परिसीमा गाठून परत आलेली ती - ती आता कशाला भिणार होती ?
कोठेतरी तिनं वाचलं होतं की वेड लागलेल्या लोकांवर मेंदूची शस्त्रक्रिया करतात . त्यांच्या मेंदूचा एक भाग कापूनच टाकतात - मग ती माणसं अगदी थंड , अगदी मवाळ , अगदी सांगकामे बनतात . तिला वाटायचं मेंदूच्या ज्या भागात हे प्रेम , आपुलकी , सहानुभूती यांचे विकार उगम पावतात , तो आपल्या मेंदूचा भागच छाटला गेला आहे , निकामी झाला आहे .
बाबा निवृत्त होऊन घरी बसले , थकले , वारले . त्यांच्या मागोमाग दोन वर्षांतच आईही जग सोडून गेली .
आता त्या वाड्यात अनू एकटीच राहात होती . कधी काळी तिला भेटायला येणाऱ्या तिच्या मैत्रिणी मनाशी नवल करीत - या एवढ्या मोठ्या , ओसाड , अंधारलेल्या वाड्यात ही एकटी अनू राहते कशी ? तिला भीती वाटत नाही ? वारा उठला की जुन्या खिडक्यांची पालं खडखडत असतील … उन्हाने तापलेले वासे रात्रीत थंड झाले की करकर आवाज करीत जुन्या कुसांवर विसावत असतील …. वळचणीची पाखरं रात्री अपरात्री फडफडाट करीत असतील …. घरभर घुमणारे हे आवाज …. हिला भीती कशी वाटत नाही ?
त्यांना काय माहीत , की ती मनाने अशा भयाण प्रदेशात जाऊन आली होती , की त्यापुढे या सर्व कल्पना फिक्या ठराव्यात ? मनाभोवती एक कठीण कवच तयार झालं होतं … सामान्य भावना काचेवर पडलेल्या पाण्यासारख्या त्यावरून ओघळून जात होत्या …. काहीही अंश मागे न ठेवता . कोळपून गेलेल्या निखाऱ्यासारखी मनातली धगच लोप पावली होती . स्वतःचाच नाश करणारी एक विलक्षण अलिप्तता मनात आली होती . कोणाचा सहवास नको होता , जवळीक नको होती , कोणाच्या स्पर्शाचा तर विचारही असह्य होत होता .
परिचितांपैकी फारच थोडयांना तिचा पूर्वेतिहास माहीत होता . अगदी सत्तावीस-अठ्ठावीस वर्षांची होईपर्यंत तिच्या मैत्रिणी तिच्या लग्नची गोष्ट तिच्यापाशी काढीत . ' तू अजून छान दिसतेस . ' त्या म्हणत , ' तुझा बंध अजून शिडशिडीत आहे …. केसांची महिरप अजूनही छान आहे …. कोठेही तू सहज पसंत पडशील … अशी एकटया एकटयाने सारा जन्म का काढणार आहेस ? ' पण तिच्या नजरेत चाललेले भाव पाहून त्यांचे शब्द अडखळत व शेवटी थांबत .
एखादया अळीने जमिनीखाली विवरात निवारा घ्यावा तशी ती स्वतःच्याच अंधाऱ्या कोषात गुरफटून बसली होती . एका फसव्या सुरक्षिततेच्या भावनेने .
आणि एका तडाख्यात क्रूर नियतीने तिचा कोष टरकावला होता , तिला उघड्यावर आणलं होतं . नजर फिरवणाऱ्या गतीने भूतकाळातले हे प्रसंग तिच्या नजरेसमोरून सरकले होते . हातांनी डोकं गच्च धरून , टेबलावर कोपरं टेकवून ती बसली होती .
पुढच्या काही तासांत आपण काय केलं हेही तिला आठवत नव्हतं . तिला जरा भान आलं तेव्हा ती घरातल्या खोलीत रेडिओसमोर आरामखुर्चीत बसली होती . शेवटी मनाने या गोष्टीचा स्वीकार केला होता की , केवळ दुर्लक्ष करून , मातीत डोकं खुपसून बसून , हा प्रसंग टळणार नाही . त्याला सामोरं जायलाच हवं , मुकाबला करायलाच हवा .
शरदशी गाठ तर आता रोजच पडणार होती . मनातली जुनी जखम हिसकली गेली होती . वाहायला लागली होती . शरदची रोजची गाठ म्हणजे त्यावर मीठ चोळण्याचाच प्रकार होता . अर्थात नोकरीची तिला आवश्यकता नव्हती . पण केवळ नोकरी सोडण्याने तिच्यामागचा हा ससेमिरा संपणार होता का ? तिने दोन पावलं मागे घेतली तर तो दोन पावलं पुढे येणार नाही कशावरून ? मागच्या ओळखीच्या सबबीवर तो तिच्या घरी येणार नाही कशावरून ?
पण माघार घ्यायचा विचार तिच्या मनाला शिवलाही नव्हता . एकदा तिने एकाकीपणे खूप खूप सोसलं होतं … आता पुन्हा नाही .
पण शरद पुढे काय करतो यावर बरंच अवलंबून होतं .
त्याला त्याच्या गतकृत्याचा काही पश्चात्ताप होत होता का ? आपल्या भेकडपणाची काही शरम वाटत होती का ? ज्या परिस्थितीत ती सापडली होती त्याबद्दल मनात काही अनुकंपा होती का ?
का तो अजून आपल्या पुरुषी तोऱ्यातच होता ? अजूनही त्याच्या हिशेबी स्त्री म्हणजे क्षणभर चैनीखातर उपभोगण्याची वस्तूच होती ? फळ चोखून फेकून द्यावं तितक्या बेफिकीरपणे वागण्याची ?
आणि तिची अटकळ होती की हा शरद कोणत्याही कसोटीला उतरणार नाही . हिणकस ते हिणकसच . वर्खावर फसणारा मूर्ख .
तिचा अंदाज चुकला नव्हता . पहिल्याच रविवारी सकाळी तो वाडयावर हजर झाला . अनूला फारसं नवल वाटलं नाही . बाहेरच्या व्हरांड्यात दोघं समोरासमोर खुर्चीवर बसले होते . संभाषणात सुरुवातीस जरासा अवघडलेपणा होता…. पण शरदच्या बोलण्यात , अनूच्या नाही .
' खूप दिवस झाले नाही भेटल्याला ? पंधरा वर्षं ? '
' वीस . ' ती ठामपणे म्हणाली .
' कसे दिवस जातात नाही ? '
ती काहीच बोलली नाही . काय बोलणार ?
'एकटीच असतेस इथे ? आई ? बाबा ? '
' दोघेही वारले . '
'मग विवाह वगैरे - ?'
तिने नुसती मान हलवली . नाही . तिने जास्त स्पष्टीकरण दिलं नाही .
' ऑफिसात किती दिवस आहेस ?'
' आता पंधरा वर्षं होत आली . '
'काय योगायोग आहे नाही ? ' त्याचा आत्मविश्वास क्षणाक्षणाला वाढत होता . ' माझी या गावी बदली होणं आणि त्याच ऑफिसात तू…. '
' मी गावातून हललेलीच नाही . '
' वेल् , मी परत आलो आहे…. पूर्वी आपण एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो नाही ? मधून मधून भेटायला हरकत नाही . नाही का ?'
' नाही , काहीच हरकत नाही. ' ती शांतपणे म्हणाली . हलकट , नादान , स्वार्थी , भेकड , मनात ती शिव्यांची लाखोली मोजत होती .
' वाडयात एकटीच असतेस ? ' दारातून खोलीत नजर टाकीत तो म्हणाला . त्याच्या मनात काय होतं ते तिने बरोबर ओळखलं .
' हो , एकटीच असते . ' ती शांतपणे म्हणाली . काही वेळाने ती उठत म्हणाली , ' चहा आणते हं . '
तिने बाहेर चहा आणला तेव्हा तो स्वतःशी गुणगुणत होता . अनू इतर काहीही विसरली असली तरी हे विसरली नव्हती . खुशीत आला की स्वतःशीच गुणगुणायची शरदची सवय जुनी होती .
चहा झाल्यावर शरद जायला निघाला . खुर्चीला वळसा घालून जाताना त्याच्या हाताचा हलकासा स्पर्श तिच्या कोपराला झाला . एखादया तीव्र आम्लाचा थेंब पडल्यासारखी तिथे झाल्यासारखं तिला वाटलं . दातांनी घट्ट दाबून तिने स्वतःला आवरलं . तो गेल्यावर बेसिनपाशी राहून ती साबणाने तिथला भाग कितीतरी वेळ पुन्हा पुन्हा धूत होती .
आरशातल्या स्वतःच्या चेहऱ्याकडे तिने एकदाच पाहिलं - मग पुन्हा नजर वर केली नाही . आरशातल्या प्रतिमेच्या डोळ्यांत अगदी मागे काहीतरी
आलं होतं . सागरतळाच्या कर्दमातूनच अचानक वर पृष्ठावर आलेल्या एखादया अभद्र हिडीस आकारासारखं काहीतरी…
***
दोनच दिवसांनी ऑफिस सुटल्यावर तो तिच्या वाड्यावर आला . तिच्या अपेक्षेपेक्षा एखादा दिवस लवकर - पण तेवढाच . यावेळी तो एखादया सराईतासारखा घरात वावरत होता . ( एकदा तो खरोखरीचाच सराईत होता ! तिला धक्का बसून जाणवलं )
त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं याचा अनूने जास्त खोलात जाऊन विचार केलाच नव्हता - म्हणजे तिची हिंमत झाली नव्हती - एखादया अंधाऱ्या जागेत जाण्यासारखं ते होतं…. तिथे समोर काय येईल याची शाश्वती नव्हती… पण आतापुरतं ती त्याच्या वागण्याचं , त्याच्या बोलण्याचं ( आणि तो स्वतःशीच धरून चाललेल्या गोष्टींचंही ) निरीक्षण करीत होती . आता त्याच्यासमोर बसताना , त्याच्याशी बोलताना , गतायुष्यातल्या प्रसंगांवर चर्चा करताना तिला अवघड वाटत नव्हतं .
' म्हणजे , तू लग्न केलंच नाहीस ? ' त्याने विचारलं . तो विचारणार याची तिला खात्रीच होती… अनेक वेळा त्या प्रश्नापर्यंत येऊन तो बुजल्यासारखा
दूर झाला होता .
' मला पुरुषांच्या सहवासात आकर्षण राहिलं नव्हतं . ' त्याच्या नजरेला नजर देत ती शांतपणे म्हणाली . त्याचीच नजर आधी घसरली .
' तेव्हा… तेव्हा मला अचानक जावं लागलं…. ' तो पुटपुटला .
' मला दिवस गेले आहेत हे कानांवर येताच तुम्ही गेलात…. '
' पण मला कळवलं असतंस तर खात्रीने परत आलो असतो ! '
' फक्त आपला पत्ता द्यायचा विसरला होतात . ' ती त्याच शांत आवाजात म्हणाली .
' म्हणजे काय आहे…. त्यावेळी लग्नाची जबाबदारी पेलली नसती…. '
' कदाचित मी तुमच्यावर लग्नाची सक्ती केलीही नसती… नुसते जवळ राहिला असतात तरी मला धीर आला असता.. '
' मला… मला कशाचीच कल्पना नव्हती… ' हलकेच .
' नाही…. तुम्हाला कशाचीच कल्पना नव्हती… ' ती म्हणाली . मग एक उसासा सोडून ती सावरून बसली .
' पुरे झाली माझ्या कर्माची हकिकत…. तुमच्याबद्दल काही सांगा की ! '
' पत्नी…. विमल… फटकून वागते… मला कधी समजून घ्यायचा प्रयत्नच करीत नाही…. संसारात सुख कसं मिळेल , सांग ना ! '
तिच्या त्याच्याबद्दलच्या अपेक्षा किती तंतोतंत खऱ्या ठरत होत्या !
' कदाचित तुम्हीही तिला समजून घेत नसाल . '
' वा ! असं कसं म्हणतेस ! घर आहे , पगारदार नवरा आहे… आणखी काय हवं ?
बरोबर आहे… आणखी काय हवं ? दावणीला बांधलेली गायच की नाही ! छपराचा गोठा आहे , गव्हाणीत आंबोण आहे… आणखी काय हवं ?
' आहे तरी कोठे घर ? '
त्याने नागपूरच्या महल भागातला एक पत्ता सांगितला . अनूने तो नीट लक्षात ठेवला . शरदच्या मिठ्ठास , लाघवी आवाजातील मखलाशीकडे तिचं अर्धवटच लक्ष होतं . त्याला काय हवं असणार याची तिला आधीच कल्पना आली होती . त्याची नजरच पुरेशी बोलकी होती…. अनूच्या मनात संकोच नव्हता, भीती नव्हती , काळजीही नव्हती… स्वतःबद्दल तिला पूर्ण विश्वास होता . मनात खोलवर दुसरेच विचार चालले होते .
त्यांचीच तिला भीती वाटत होती . त्या क्षणी तिला वाटलं , आपल्या शरीराचा ताबा दुसऱ्याच कोणीतरी घेतला होता…. तिची इच्छा नसतानाही तिने शरदबरोबर शनिवारी संध्याकाळी सिनेमाला जायचं कबूल केलं होतं .
नदीकाठच्या एका अरुंद बोळाच्या शेवटाला ते घर होतं . रंग कधी दिलाच नव्हता . वरच्या झाडाच्या सावलीने प्रकाश आणखीनच कमी होत होता . अनू दाराच्या आत उंबऱ्यापाशीच बसली होती . त्याने तिला तिथेच बसायला सांगितलं होतं . बोलावलं असतं तरी ती आत गेली असती का नाही शंकाच होती . आत अंधार होता . खोली कडवट उग्र दर्पाने भरली होती . आत विजेचा दिवा नव्हता . एक लहानशी तेलाची चिमणी होती . कदाचित त्याला परवडत नसेल . कदाचित छंदिष्टपणाही असेल . पण मिणमिणता प्रकाशच बरा . या खोलीत जी बोलणी होत , ज्या क्रिया होत ते सर्व अंधारातच झालेलं बरं , तिला वाटलं .
' तू अशी शिकली सवरलेली…. कोर्टकचेऱ्या करणाऱ्यांपैकी…. इकडची वाट कशी काय घेतलीस ? ' तो घोगऱ्या आवाजात विचारत होता .
' मला जे हवं ते तुमच्याजवळ आहे म्हणून . '
' माझे पैसे दयायला तुला परवडेल… पण मागाहून जन्मभर ज्या यातना सहन कराव्या लागतील त्यांचा विचार केला आहेस का ?'
' गेली वीस वर्षं काय सोसते आहे मग मी ? ' ती संतापाने म्हणाली , ' त्याला जाऊ दे त्यातून…. '
' पण पुरुषांच्या शरीरावर…. ' तो थांबला .
' अशक्य नाही ना ? '
' अशक्य काय आहे ? मातीचं तर बाहुलं ! '
' तुम्ही भीत नाही ना ? तुम्ही कच खात नाही ना ? '
' पोरी , तुला कल्पनासुद्धा येणार नाही अशा गोष्टी मी केल्या आहेत आणि धोका असला तर तो मला नाही - तुला आहे ! चांगलं बांधून घेतल्याशिवाय आम्ही यात पाऊल टाकत नाही समजलं ? '
' समजलं . ' अनूचा आवाज तितकाच थंड होता . ' सांगा . '
' नीट विचार कर हं…. अर्ध्यावर सोडता येत नाही …. '
आठ दिवसांतच शरदची मजल अनूचा हात हातात घेण्यापर्यंत पोहोचली होती . गेल्या कित्येक वर्षांत अनूच्या नजरेत अशी लकाकी दिसली नव्हती . तिच्या शरीराला अशी उभारी दिसली नव्हती . तिचं शरीर आतून एका अनामिक शक्तीने रसरसल्यासारखं वाटत होतं . बिचारा शरद ! त्याला वाटलं , ही अजून आपल्यावर भाळलेलीच आहे…. मनात जरासा रुसवा आहे… तो काय पाहता पाहता दूर करता येईल….
उताराला लागलेल्या वाहनासारखी अनू त्या एका मार्गावर अविरोध चालली होती . त्या गतीचीच मनावर भूल येत होती . शरदची प्रत्येक चाल तिच्या अपेक्षेप्रमाणेच होत होती…. तोही तिच्यासारखाच स्वतःच्याच एका भ्रमचक्रात सापडला होता . त्याला प्रोत्साहन द्यायची आवश्यकताच नव्हती .
मग एका संध्याकाळी निरोप घेताना शरदने अनूला क्षणभर हातांच्या मिठीत घेतलं आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले . तो जाईपर्यंत अनूने स्वतःवर कसातरी ताबा ठेवला…. आणि मग बाथरूममध्ये जाऊन चेहरा साबणाने कितीदा तरी धुतला , ओल्या टॉवेलने पुन्हा पुन्हा पुसला .
मनातली शिसारी काही केल्या कमी होत नव्हती . आपण जे काही मनात योजलं आहे ते आपल्या हातून पार पडणार आहे की नाही याची तिला शंका वाटत होती… मनाची तयारी होती , शरीराच्या प्रतिक्रिया तिच्या नियंत्रणाबाहेर गेल्या तर ?
त्याने अनूला पदार्थांची एक यादी दिली होती . मध , कोरफड , आवळा यांसारख्या काही वस्तू सहज उपलब्ध होत्या . पण बाकीच्या ? एक एक करीत तिला त्या जमवाव्या लागल्या . काही मुळ्या होत्या , काही झाडांच्या साली वाटत होत्या , काही फळं होती…. काही प्राण्यांचे अवयव होते…. त्यांच्यासाठी मात्र तिला आपल्या मुस्लीम आणि ख्रिस्तीयन सहकाऱ्यांची मदत घ्यावी लागली . तिची मागणी ऐकताच त्यांच्या भुवया उंचावल्या होत्या . पण अनूने त्यांना काही स्पष्टीकरण - समर्थन दिलं नाही आणि तिने माघारही घेतली नाही . शेवटी सर्व वस्तू हातात तर आल्या .
मग ते कुटणं , खलणं , उकळवणं , गाळणं , वाळवणं , त्याची वस्त्रगाळ भुकटी करणं , मधात मिसळून ठेवणं .
" त्या " रात्री तीन तास आधी दोन चमचे घ्यायचं - गर्भधारणा हमखास होण्यासाठी .
गळाला लागलेल्या माशाला खेळवावं तशी ती शरदला खेळवत होती . कधी त्याच्या सलगीला प्रतिसाद देई तर कधी त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत असे . प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या एखादया पारदर्शक आवरणाखाली ठेवलेल्या घड्याळातील चक्रांची हालचाल जशी सहज स्पष्ट दिसते , तितके शरदचे विचार आणि इच्छा तिला स्पष्ट दिसत होत्या . तो दिवस
( किंवा ती रात्र ! ) अनू लांबणीवर टाकत होती ते केवळ त्याच्या शरीराचा स्पर्श , शरीराची जवळीक जास्तीत जास्त टाळण्यासाठीच .
आणि मग एका सकाळी मनातला खोलवरचा कोणता तरी खटका दाबला गेला आणि तिने आपला निर्णय घेतला .
आजचीच रात्र .
.
.
.
भाद्रपदातली अंधारलेली , पावसाळी , किंचित उदासवाणी संध्याकाळ . ऑफिसमधून बाहेर पडताना अनू शरदकडे पाहून नुसती हसली होती .
साडेसहाला तो तिच्या वाडयावर हजर झाला .
निसर्गही तिला पळवाट राहू देत नव्हता की काय कोण जाणे .
पावसाने अशी काही झड धरली की , बाहेर पाय टाकणं मुश्कील .
अनूने चहा केला…. मग आठला पुन्हा एकदा चहा केला .
' आता कशाला लॉजवर जाता ? ' शेवटी ती म्हणाली , ' इथेच राहा आजची रात्र . इथे कसलीच अडचण नाही . '
परवलीचे शब्द .
जेवायला तिने साधेच पदार्थ केले होते . पण शरदचं कशाकडं लक्षच नव्हतं . ताटातले पदार्थ तो हलवत होता , प्रत्येक घास पाण्याबरोबर घशाखाली
ढकलत होता .
' तुला… तुला… अवघड नाही ना वाटणार माझ्या राहण्याने ? '
' मला ? अवघड का वाटावं ? तसं पाहिलं तर मला आणि या घरालाही तुम्ही परके थोडेच आहात ? '
' ते खरं आहे म्हणा…. पण… पण… '
' बायका संकोचतील… पण तुम्ही ? पुरुषासारखे पुरुष ?'
तो काहीच बोलला नाही . जेवण झाल्यावर तो बाहेर रेडिओ लावून बसला . तिने स्वयंपाकघरातली आवराआवर केली आणि मग टॉवेलला हात पुसत पुसत ती बाहेर आली आणि म्हणाली ,
' तुमची मागची खोली तयार करते बरं का ! '
तो काहीच बोलला नाही .
अनू त्या खोलीत गेली . याच खोलीत तिच्या आयुष्याचा संक्रमणकाळ गेला होता . इथेच तिचा स्त्रीत्वात प्रवेश झाला होता. इथेच तिने अतीव सुखाचे आणि दारूण निराशेचे क्षण अनुभवले होते . मनाला हिसका देण्याची शक्ती त्या आठवणीत इतक्या दीर्घ कालावधीनंतरही होती . काय झालं असतं आणि प्रत्यक्षात घडलं काय ! वाया गेलेली , वैराण , वीस वर्षं ! सर्व आयुष्याची माती ! मनातला निर्धार जर जरा कमजोर झाला असला तर तो त्या खोलीतल्या दहापंधरा मिनिटांच्या वावरानंतर पक्का झाला .
तिने पलंगावरची चादर काढून टाकली . तिथे कपाटातली धुतलेली , इस्त्रीची चादर घातली . उशा हाताने थोपटून सरळ केल्या . एक पातळसर शाल पायागती उलगडून ठेवली . पलंगाच्या रेलिंगवर लहान नॅपकिन ठेवला , शेजारच्या स्टुलावर तांब्या-भांडं ठेवलं .
मग ती माजघरात आली . अंधाऱ्या , कोपऱ्यातल्या कपाटात ती बाटली ठेवली होती . तिच्यातले दोन चमचे तिने वाटीत काढून घेतले , वाटी स्वयंपाकघरात नेली , डाव्या हातात तिखट मिरची घेतली , डोळे घट्ट मिटून वाटीतला द्राव घटाघटा घशाखाली उतरवला आणि दातांनी मिरची कचाकचा चावली. नाकाडोळ्यातून पाणी आलं . जिभेची कशी आग आग झाली . त्या कल्लोळातच ती चव मनाबाहेर घालवण्याची ताकद होती
त्याच्या समोरच्याच खुर्चीवर ती बसली होती . आताच्या संदर्भात रेडिओवरील संगीत अर्थशून्य पण आवश्यकच होतं . संभाषणात खंड पडला की , येणारी निःशब्दता शरदला अस्वस्थ करीत होती . शरीराचा सारखा बदलत होता ; हातांची , पायांची , मानेची सतत अस्वस्थ हालचाल करीत होता . अनू शांतपणे बसली होती .
' मागच्या खूप आठवणी येतात नाही ? ' तो शेवटी म्हणाला .
ती काहीच बोलली नाही .
' अनू , माझी चूक झाली . ' तो शेवटी म्हणाला , ' आता त्याला इतकी वर्षं होऊन गेली आहेत… तू , मी , जग , संसार , सारंच बदललं आहे . काळाचं चाक तर उलटवता येत नाही…. '
' तशी वेळ पुन्हा आली तर ती चूक तुम्ही करणार नाही ? '
' नाही… नाही… नक्कीच नाही… ! तू माझ्याशी बोलतेस कशी याचंच मला नवल वाटतं ! एखादीने संतापाने आक्रस्ताळेपणा करून शिव्यांची लाखोली वाहिली असती !. '
' संतापानं काय साध्य होतं ? आपल्याच मनाला पीळ घालून घ्यायचा… आता इतकी वर्षं गेली…. प्रेम , राग , माया-दवेष सारंच बोथट होतं…. आणि समजा तुम्ही माझ्या आयुष्यात आला नसतात… कोणास ठाऊक माझ्या आयुष्याला कोणती दिशा मिळाली असती ! आणि मी सुखी झालेच असते अशी कोण खात्री देऊन सांगू शकतं ? '
रेडिओने अकरा वाजता आपले कार्यक्रम संपवले . शरद खुर्चीवरून उठला , एक आळस देत म्हणाला , ' झोपावं आता , नाही ? पण अनू , माझ्यावर तुझा राग नाही हे ऐकून मला फार बरं वाटलं - '
शरद गेल्यावर पंधरा-वीस मिनिटं अनू तशीच बसून होती . मग तिने उठून दिवा मालवला , दारांचे कड्या-बोल्ट तपासले आणि ती आपल्या खोलीत आली . आपल्या मागं तिनं दार नुसतं लोटून घेतलं .
.
.
.
अनूला झोप लागली नव्हती . झोप लागणं शक्यही नव्हतं . सुमारे दीड तासाने ती ज्या आवाजाची वाट पाहात होती , तो आवाज आला .
खोलीचं दार सावकाश सावकाश करकरत उघडलं .
बाहेरच्या अंधुक प्रकाशाविरुद्ध तिला शरदची छायाकृती दिसत होती . अजूनही ती स्वतःला थांबवू शकली असती , अजूनही ती मागे फिरू शकली असती .
' जा .' एवढा एकच शब्द पुरेसा झाला असता .
पण ओठ घट्ट मिटून घेऊन अनू गप्प पडून राहिली .
' अनू ? ' शरदचा आवाज घोगरा झाला होता . ती काहीच बोलली नाही . तो जवळ आला , तिच्या पलंगाच्या कडेवर बसला . कॉट करकरली . तरीही अनू काहीच बोलली नाही . ' अनू ? ' त्याने पुन्हा विचारलं आणि तिच्या गालावर हलकेच हात ठेवला . पहिलीच पायरी अतिशय अवघड होती… तेही तिने केलं . आपला हात त्याच्या हातावर टेकवला .
मग तिला प्रत्यक्ष काहीच करावं लागलं नाही . फक्त नाटक करावं लागलं . त्या मूर्खाची कल्पना होती की , ही भोळीभाबडी अनू आपल्या स्पर्शाने सुखावली आहे . आपल्या हातांच्या मिठीत अगदी विरघळत आहे . हळूहळू त्याचा बावरेपणा कमी झाला , आत्मविश्वास परत आला - तसतसा त्याच्या स्पर्शातला राकट धसमुसळेपणा वाढत चालला… पंधरा - वीस मिनिटं …. पण अनूला वाटलं ती कालांतरापर्यंत ताणली गेली आहेत , कधी संपणारच नाहीत.
शेवटच्या क्षणीचं त्याच्या गळ्याभोवती हात टाकायचं नाटकही तिने हुबेहूब वठवलं .
तो दूर झाला तेव्हा ती एवढंच म्हणाली ,
' आता इथे थांबू नका…. मला एकटीला झोपू द्या . '
.
.
.
सकाळी पाऊस पडला होता . चहा होताच शरद गेला . रात्रीचा उल्लेख दोघांपैकी कोणीच केला नाही . उंदीर गट्ट केलेल्या मांजरासारखा शरद सुस्त , स्वसमाधानी दिसत होता . आपल्या पुरुषार्थाचा त्याला अभिमानही वाटत असेल… खाशा बैठकीत एखादा पेग जास्त घेतला की , खुलवून सांगता येण्यासारखा प्रसंग… अमकीतमकीला कशी हातोहात वश केली ते…
तिला समजत होतं आपण स्वतःला विनाकारण क्लेष करून घेत आहोत.… पण शरदमागे तिने दाराचा बोल्ट सरकवला तेव्हाच कोठे तिच्या मनाला आणि शरीराला दिलासा मिळाला
वाट पाहणं सर्वात कठीण होतं . पहिली पाळी चुकली - पण तो योगायोग , मानसिक ताणाचा परिणाम असण्याची शक्यता होती . पण लगोलग दुसरी पाळी चुकली तेव्हा तिची खात्री झाली , पण तरीही तिनं एकदा वैदयकीय तपासणी करून घेऊन खात्री करून घेतली .
मग संध्याकाळची तिने परत एकदा त्या नदीकाठच्या अंधारलेल्या घराला भेट दिली . तो त्याच्या मिणमिणत्या चिमणीपासून हलला तरी होता का नाही कोणास ठाऊक .
' झालं ? '
' हो , डॉक्टरी तपासणीही झाली . '
' अजून विचार बदललेला नाहीस ? शेवटपर्यंत जायचं ठरवलं आहेस ? '
' हो . '
' पापांची क्षमा हीसुद्धा एक घोर शिक्षा होऊ शकते… त्याचं मन त्याला जन्मभर छळत राहील . '
' त्याची जात तसली नाही… आणि गोष्टी आता फार पुढे गेल्या आहेत . '
' ठीक आहे . आज रात्री झोपताना हे घे…. उद्याचा आणि नंतरचे दोन चार दिवस वाईट जाणार आहेत . . '
काय करायचं ते त्याने तिला सांगितलं . स्मशानातली काळी माती , विषारी वेलांची पानं , काटेरी झुडपांचे काटे आणि इतर सर्व तिलाच घेऊन यायचं होतं . आठ दिवसांनी ती आली तरी चालणार होतं .
परत येताना विचार करता करता अनूला वाटायला लागलं की , ही सर्व जमवाजमव , हा सर्व अभद्र वस्तूंचा संच हा एक वेगळा बाह्यसंकेत आहे . खरी कार्यकारी शक्ती आपल्या मनातल्या द्वेषाचीच आहे .
.
.
.
वेदना होतील तो म्हणाला होता…. पण या तर असह्य होत्या . ही तर वेदनेची परिसीमा होती . संध्याकाळनंतर तर ओटीपोटाशी गरम पाण्याची पिशवी धरून ती पलंगावर कासावीस होऊन अक्षरशः गडाबडा लोळत होती . शरीर तापानं फणफणलं होतं . शेवटी शेवटी तर तिला तोंडात रुमालाचा बोळाच कोंबावा लागला .
रात्री बारा वाजता शरीरातून एक तापलेली सळई आरपार गेल्यासारखी तीक्ष्ण वेदना झाली…. तिला क्षणभर वाटलं , आपली आता शुद्धच हरपणार आहे… पण बेशुद्धीच्या काठावरून ती लटपटत मागे आली . वेदनेची तीव्रता कमी कमी होत गेली…. अॅस्पिरीनच्या दोन गोळ्या आणि सोनारीलची एक गोळी तिने गार पाण्याबरोबर घेतली आणि मांडीवर मांडी घट्ट दाबून ती झोपली .
सकाळी केवळ ताप आणि थकवा होता .
टॉवेलवर एक रक्ताळलेला मांसल गोळा होता . तो तिने चाकूने खरडून काढून बाटलीत भरून ठेवला आणि टॉवेलवर रॉकेल ओतून टॉवेल जाळून टाकला .
दोन दिवस ती पडूनच होती .
मग ताप ओसरला . शरीरात हळूहळू शक्ती आली . दहा दिवस ती ऑफिसमध्ये गेली नव्हती . शरद दोनदा येऊन गेला होता . फ्ल्यू आहे एवढंच ती म्हणाली होती . त्याच्या मदतीच्या सूचनेला तिने नकार दिला होता .
आवश्यक ते सर्व साहित्य तिनं जमा केलं होतं . शेवटचे दोन-तीन दिवस ती स्वतःशी खूप विचार करीत होती . यापुढचं पाऊल निर्णायक होतं - मग माघार घ्यायची संधी मिळणार नव्हती . तिने नागपूरमधल्या आपल्या एका मैत्रिणीला पत्र लिहून शरदचा पत्ता कळवला होता आणि त्या पत्त्यावर जाऊन माहिती काढण्यास सांगितलं होतं .
दुसऱ्या आठवडयात मैत्रिणीचं उत्तर आलं .
' किती दिवसांनी - वर्षांनीच आठवण झाली गं माझी तुला अने ! तुझं काम केलं बरं का…. आणि हा कोण शरद जोग आहे ना , त्याच्यापासून अगदी जपून राहा बरं का ! त्याच्या घरच्या पत्त्यावर गेले होते… त्याची बायको घरात होती… अने , काय गं तिची दशा ! नुसती प्रेमाने चौकशी केली तर ढसाढसा रडायलाच लागली की गं ! काय घराची अवकळा ! भांडी नाहीत , सामान नाही , कपडेलत्ते नाहीत…. तिकडे राहतो तरी का ? का तिलाच एकटीला गोठ्यातल्या गाईसारखं तिथं बांधून ठेवलंय गं ? त्याच्यापासून जपून राहा गं ! नंबर एकचा बदफैली , व्यसनी , खोटारडा आहे बरं का तो ! …. '
.
.
.
त्याने तिला अकरा वाजताची वेळ दिली तेव्हा मात्र तिच्या मनाने जराशी कच खाल्ली होती… पण ती क्षणभरापुरतीच . त्याने दिलेल्या वेळी ती तिथे हजर झाली होती . स्मशानातल्या मातीत नदीचं पाणी मिसळून तिला त्याने लगदा बनवायला सांगितला . मग लगद्याची बाहुली बनवायला सांगितली . गोळ्याचं डोकं , लहान लहान हात , पाय , पोट , अगदी लहानशा जननेंद्रियासह .
मग त्याने बाहुलीच्या पोटाला चाकूने चीर पाडायला सांगितलं .
' आता काढ तुझी ती बाटली …. त्यात ते भरून ठेवलं आहेस ना ? वाळलं असलं तर पाण्याचे दोन थेंब टाक - चाकूने खरवडून काढ बाहेर…. घे… घे… हातात घे… त्याची गोळी कर .
त्याला बोटाने स्पर्श करण्याच्या क्षणी मात्र ती खरोखरच कचरली . पण शेवटी तिने तो लगदा हातात घेतला .
' भर ते बाहुलीच्या पोटात…. कर बंद पोट आता…. '
डोळ्यांच्या जागी दोन काचेचे हिरवे मणी बसवले होते . दातांच्या जागी दोन लहान गारगोट्या बसवल्या होत्या . अणकुचीदार .
' जा आता हात धुऊन ये आणि ही काळी साडी नेस . '
खोलीत दोन पाट मांडले होते . एक मोठा . एक लहान . मोठया पाटावर त्याने अनूला बसवलं . लहान पाटावर मातीची बाहुली बसवली .
' आता शांत बसून राहा . काही बोलू नकोस . काही विचारू नकोस . बरोबर मध्यरात्री मी जे जे सांगेन तेवढं माझ्या मागोमाग म्हणायचं . त्याचा अर्थ सांगीन- अर्थ समजून घेऊन म्हणायचं… इतर एक अक्षरही बोलायचं नाही… मागे-पुढे , खाली-वर , डावी-उजवीकडे पाहायचं नाही… समजलं ? मग बस पाटावर शांतपणे . '
अजूनही तिचा संपूर्ण विश्वास बसत नव्हता . विश्वास बसणं खरोखरच कठीण होतं . काही पाला , काही मुळ्या , काही रक्ताळलेले मांसल अवशेष…
बाराला पाच मिनिटं कमी असताना तो उठला… डोक्यावरच्या छपरातलं एक कौल त्याने सरकवलं . खोली वरच्या अवकाशाला खुली झाली .
' आधी त्या शक्तीला आवाहन करायचं…. बोलवायचं… शब्दशः अर्थ असा होईल… अरे , काळोखाच्या फटीतून वावरणाऱ्या…. इथं त्याचं नाव !… आता माझ्यासमोर हजर हो… तुझ्यासाठी एक पात्र बनवलं आहे त्यात प्रवेश कर… जुन्या कराराप्रमाणे तुला रक्तामांसाची जागा दिली आहे… आता माझ्यावर तुझी वखवखलेली हिंस्त्र नजर वळवू नकोस… कार्याच्या अखेरीस तुला तुझा बळी मिळणार आहे…
आता नीट ऐक पोरी . माझ्यामागून एक-एक शब्द स्पष्टपणे म्हण . ती भाषा तुला समजणार नाही . त्यातलं नाम कोणतं , विशेषण कोणतं , संबोधन कोणतं, क्रियापद कोणतं हे कळणार नाही - ज्याला तू जागवणार आहेस त्याचं नावही कळणार नाही… कारण त्याचा मनोमन विचारही धोक्याचा आहे…. तेव्हा आता म्हण…. '
किती विलक्षण शब्द ! जिभेला गाठी पाडणारे हेंगाडे उच्चार…. व्यंजनांच्या ओळीच्या ओळी…. आणि मध्येच केव्हातरी बाहेर सोसाटयाचा वारा उठला . घरावरच्या झाडांची पानं सळसळली , फांद्या करकरल्या…. छपराला केलेल्या चौकोनी खिडकीतून त्या वादळी वाऱ्याचा एक अंश खोलीत आला… खोलीभर भिरभिरला… किती गार ! अंगावर शहाराच आला !
' पुन्हा एकदा म्हणूया - हं - '
पुन्हा त्या विलक्षण शब्दपंक्तीचा उच्चार…. आणि मध्येच , अगदी अचानक एक विलक्षण तीव्र वेदना तिच्या पोटातून गेली… कोणीतरी अणकुचीदार काटेरी शस्त्राने पोट आणि आतडी खरवडून काढल्यासारखी…
आता शब्दाशब्दागणिक वेदनेच्या लाटा शरीरावरून जात होत्या .
खोलीत गार वारा भिरभिरत होता .
चिमणीची ज्योत फडफडत होती .
लहान पाटावरच्या बाहुलीचे लहानसे हातपाय हलत होते .
हिरव्या काचमण्यांचे डोळे चमकून उठत होते .
अनूचा श्वास धपाधप येत होता . हातापायात पेटके येत होते . त्याने हात वर केला . खोलीत विलक्षण शांतता पसरली .
' आता पुढचा भाग . तुझी वेळ झाली की मिळेल त्या मार्गाने बाहेर ये . तुझा बळी घे आणि परत तुझ्या काळोखाच्या फटीत नाहीसा हो . तुला क्षणमात्र जीवन आणि पोषण देणाऱ्या माझी ही आज्ञा तुला पाळलीच पाहिजे . तुझा बळी तू घे आणि या जगातून नाहीसा हो . '
' आता म्हण…. '
तिचा प्रत्येक उच्चार तो बारकाईने ऐकत होता . त्याने तिला पाच वेळा त्या ओळी पुन्हा पुन्हा म्हणायला लावल्या , ' एकाही अक्षराची , एकाही कानामात्रेची चूक होऊन चालणार नाही…. नाहीतर ते जन्मभर तुझ्या उरावर बसेल… ' तो म्हणत होता .
मग शेवटी त्याचं समाधान झालं . नंतर त्याच्या आवाजात जराशी नरमाई आली . ' अनू , तू त्याच्यावर फारच भयंकर सूड घेतला आहेस . आयुष्याची उरलेली वर्षं तुला सुखासमाधानाने जाणार नाहीत . हा क्षण तू कधीही विसरू शकणार नाहीस . ईश्वर तुझ्या मनाला शांती देवो . '
तो खोलीतल्या सामानाची आवराआवर करीत होता .
शेवटी तो म्हणाला , ' आता तू गेलीस तरी चालेल . ही बाहुलीही बरोबर घेऊन जा . महिन्याभरातच तुला बदल दिसायला लागेल . '
' तुमचे पैसे द्यायला केव्हा येऊ ? '
' सगळा कारभार आटोपला म्हणजे सावकाश ये… माझ्या पैशांची मला कधीच घाई नसते… आणि काळजीही नसते .
ज्या कागदी खोक्यात तिने सामान नेलं होतं , त्याच खोक्यात ती बाहुली घालून अनू खालच्या मानेने त्या घराबाहेर पडली .
घड्याळाची काचेची लहानशी शोकेस रिकामी करुन अनूने त्या शोकेसमध्ये ती बाहुली ठेवली होती . निरर्थक आहे हे माहीत असूनही तिने शोकेसला बाहेरून एक लहानसं कुलूप लावलं होतं . किती तकलादू ! त्या बाहुलीत वास करून असलेल्या प्रलयंकारी शक्तीला लहानसं कुलूपच काय , एक फूट जाडीचा सेफ व्हॉल्टचा पोलादी दरवाजाही रोखू शकला नसता .
दिवसातून एकदा तरी अनू काचेचं लहानसं दार उघडून त्या बाहुलीकडे पाहात असे . मनाची अवस्था दोलायमान होती . काय बदल दिसेल किंवा काही बदल दिसेल का नाही याची तिला काहीच कल्पना नव्हती . कधी कधी तिला वाटे हे सारं थोतांडच आहे - भोळसटासारखा आपण त्यावर विश्वास ठेवत आहोत . काहीही होणार नाही…. ( आणि कदाचित तेच बरं नाही का होणार ? तिला वाटे . )
पण एका सकाळी ( सुमारे दीड महिन्याने ) तिचा सर्व संशय फिटला .
बाहुलीच्या सपाट पोटाला खालच्या अंगाला किंचित फुगीरपणा आला होता .
अंगावर शहाऱ्यामागून शहारे येत होते . ती राक्षसी आणि विकृत शक्ती कार्यप्रवण झाल्याचा हा प्रत्यक्ष पुरावा होता . त्या मध्यरात्री तिने आवाहन केलं होतं आणि त्याला साद देऊन काहीतरी या जगात आलं होतं .
काहीतरी प्राचीन , अमानवी , महाशक्तिमान .
झाडाखालच्या अंधारलेल्या घरात मिणमिणत्या चिमणीच्या प्रकाशात त्याने अनूला काही काही सांगितलं होतं ते तिला आता आठवत होतं .
' सर्वसाधारणपणे नखाचा तुकडा , केसाची एखादी बट , रक्ताचा एखादा थेंब वापरतात . आपण तर त्याचं बीजच वापरणार आहोत…. एखाद्या शिकारी कुत्र्याला कपड्याचा वास देऊन पाठलागावर सोडतात ना ? मग आपण तेच करीत आहोत…. शरीराचा हा अंश मिळाला की ते त्या व्यक्तीचा वेध घेत बरोबर त्याच्यापाशी पोहोचतं… अंतर कितीही असो… माग कसा काढतं मला विचारू नकोस आणि एकदा संपर्क स्थापन झाला की , बाहुलीचं नातं स्थापन होतं . सर्व शारीरिक बदल त्या बाहुलीत प्रतिबिंबित होतात . नाती कशी उलटी होतात पाहिलंस ना ? आधी बाहुली हा केवळ संकेत असतो… दिशा दाखवणारा बाण…. बाहुलीवर केलेले उपचार इतरत्र प्रकट होतात…. पण नंतर तिकडे होत असलेले बदल बाहुलीत दिसायला लागतात… '
तिला शब्दन् शब्द आठवत होता .
म्हणजे आता शरदला -
.
.
.
ऑफिसमध्ये गेल्या दोन महिन्यांत कामाव्यतिरिक्त ती शरदशी बोललीच नव्हती . त्याच्यात बाह्यतः तरी तिला काही बदल दिसला नव्हता . पण आज ? आज काही फरक दिसणार होता का ?
पण शरद ऑफिसला आलाच नाही .
पुढील घटनांची नांदी ?
ती रात्र आणि त्यानंतरच्या अनेक रात्री अनूला फार वाईट गेल्या .
स्वप्नं पडत होती . स्वप्नं भयानक होती , पण त्यांच्यातला लहानसा अंशही सकाळी जाग आली की आठवणीत राहात नसे .
दुसऱ्याही दिवशी शरद ऑफिसला आला नाही .
ऑफिस रेकॉर्ड चाळतानाच तिला त्याच्या लॉजचा पत्ता मिळाला .
त्या पत्त्यावर जाण्याआधी तिने बराच वेळ विचार केला होता . कारण बाहुली खरोखरीच त्याची अवस्था दाखवत होती का याचीही शहानिशा होणार होती .
( एक अंधुक आशा - प्रत्यक्षात तसं नसेलही ! कारण मनाभोवती आता एक भयाचं कंकण आलं होतं . )
ती सकाळच्या वेळी गेली . शरद खोलीतच होता . तिला पाहताच त्याची जराशी धावपळ झाली . कदाचित तिची भेट त्याला अपेक्षित नसावी . मग समोरासमोर बसल्यावर तिला दिसलं की , त्याचा चेहरा किंचित फिकट , ओढल्यासारखा दिसत आहे .
' तुम्ही ऑफिसात आलाच नाहीत म्हणून - '
' प्रकृती बिघडलीय एवढयात - ' बोलता बोलता तो उठला . ' थांब हं - येतोच . '
तो बाथरूममध्ये गेला . सिंकमध्ये नळ सोडला होता . तरीही ओकण्याचा आवाज तिच्यापर्यंत पोहोचला . शरद टॉवेलने तोंड टिपत बाहेर आला . तो बसला खरा , पण त्याच्या जीवाला स्वस्थता नव्हती . त्याची उभारी , त्याचा आत्मविश्वास कोठच्या कोठे गेला होता .
आजाराचा विषय अनूने पुन्हा काढला नाही .
पाच - सात मिनिटांनी तिने त्याचा निरोप घेतला .
खुर्चीत हताशपणे बसलेली त्याची आकृती पुनः पुन्हा तिच्या डोळ्यांसमोर येत होती मनात कीव येत होती , पण ती अस्थानी होती . केवळ कोंडीत सापडला होता म्हणून तो हवालदील दिसत होता . त्याची खरी जात सर्पाचीच होती . काही उपायाने तिला ती भारणी मागे घेता आली असती तर ( तिला त्याची शंकाच होती ! ) तो मोकळा होईल…. पण त्याच्या स्वभावात काहीच बदल होणार नाही…. मैत्रिणीने पत्रात वर्णन केलेली विमलची , त्याच्या पत्नीची आकृती तिच्यासमोर आली…
बाहुलीत आता दिवसादिवसागणिक बदल होत होता .
.
.
शरद आठवडयातून तीन-चार दिवस गैरहजर राहात होता . त्याला दीर्घ मुदतीच्या रजेवर जावं लागणारसं दिसत होतं . अपेक्षेप्रमाणे त्याच्या रजेचा अर्ज आलाच. तो नागपूरला जाणार होता त्या सकाळी अनू त्याच्या लॉजवर गेली .
पूर्वी त्याचे कपडे अगदी अंगासरसे , मॉड असत . आता अंगात एक सैलसर गुरुशर्ट होता . ते शर्ट आता कदाचित जास्त घट्ट होत असतील . चेहऱ्यावर एक रसरसता तजेला होता . कितवा महिना ? चौथा ? पाचवा ?
' तुम्ही रजेवर जाताहात म्हणून समजलं - '
' प्रकृतीच ढासळलीय - '
' पण डॉक्टरांना दाखवलं असेल ना ? '
' पाच - सहांना तरी दाखवलं . नुसतं पैसे घेतात शेकड्यांनी . एकालाही काही समजेल तर शपथ ! काहीही झालं तरी म्हणतात ! सगळ्या टेस्ट झाल्या…. अगदी नॉर्मल आहे म्हणतात ! '
तो बाबा काय म्हणाला होता ? इतर कोणाला दिसणार नाही . इतर कोणाला समजणारच नाही आणि शेवटच्या क्षणी तो एकटाच असणार… मानवाच्या हातातल्या , समजातल्या या गोष्टीच नाहीत .
त्याला सांगण्याची वेळ आली होती .
' मला माहीत आहे तुम्हाला काय झालं आहे ते . '
' तुला ? तुला काय समजतंय त्यातलं ? ' त्याच्या आवाजात तुच्छता होती .
' मला नाही तर कोणाला समजणार ? शरद , माझी नागपूरची एक मैत्रीण विमलला भेटून आली - तिने मला पत्रात सगळं काही कळवलंय - '
' ती अर्धवट विमल ! ती नाही नाही ते बरळणारच ! '
' नाही . तिने सांगितलं ते खरं आहे . कारण मला स्वतःला तुमचा अनुभव आला आहे . आणि हा तुमचा आजार ही माझीच करणी आहे . आता जरा शांत बसा…. आणि मी काय सांगते ते नीट ऐका - '
' तुम्हाला काय वाटलं तुमच्यावर भाळून मी तुमच्या रतिशय्येवर आले ? मी तुम्हाला इतकी भोळसट वाटले की अपमानित , एकाकीपणे , स्वतःशी कुढत काढलेली वीस वर्षं मी तुमच्या एका दृष्टीक्षेपाखाली पार विसरून जाईन ? स्वतःच्या प्रौढीत , दिमाखात , गर्वात माणूस इतरांना किती तुच्छ लेखत
असतो ! आपल्या पापांचा कधी काळी जाब द्यावा लागेल हे त्याच्या ध्यानीमनीही नसतं ! कसे काढले असतील मी ते दिवस ? रात्री रात्री रडून , जागून काढल्या ! कितीदा तरी जीव द्यायचा मोह झाला… पण तेवढंही धैर्य नव्हतं माझ्यात ! माझ्या अल्लड भोळेपणाचा तुम्ही फायदा घेतलात पण तेही मी तुम्हाला माफ केलं असतं - कारण चूक माझी होती . पण नंतरची तुमची वागणूक ! ती कोणत्याही परिस्थितीत क्षम्य नव्हती ! भयानक अवस्थेत मला एकटं सोडून तुम्ही निघून गेलात…. त्याची मी तुम्हाला कधीही माफी केलेली नाही… आणि आता दैववशात वीस वर्षानंतर आपली भेट झाली…. तुमच्यात काहीही बदल झालेला नाही ! वेलीवरचं फुल खुडून , हुंगून , कुस्करून पायदळी टाकण्याची तुमची तीच वृत्ती कायम आहे…. नाही - मी तुम्हाला कधीही क्षमा केलेली नाही… आणि म्हणून…. '
अनूने त्याला सर्व काही सांगितलं . त्याचा विश्वास बसत नव्हता .
' छ्या ! सगळ्या थापा ! ' तिने त्याला ते विधी आणि उपचार आणि मंत्र वर्णन करून सांगितले .
' पण हे चेटूक आहे ! भानामती आहे ! जादूटोणा आहे . '
' तुम्ही त्याला काहीही नाव द्या . '
' पण माझा असल्या थोतांडावर अजिबात विश्वास नाही ! ज्याचा विश्वास नाही त्याच्यावर याची काहीही मात्रा चालायची नाही ! '
' तुमच्या विश्वासाची जरुरीच नाही ! माझा आहे ! खुशाल स्वतःच्या भ्रमात राहा ! समोर लक्षणं दिसताहेत त्याच्याकडे खुशाल दुर्लक्ष करा ! सकाळचं मळमळणं , ओकाऱ्या , हातापायातले वांब , चेहऱ्यावरची टवटवी - कोणतीही पहिलटकरीण तुम्हाला याचा अर्थ सांगेल , पण काही दिवस थांबा . ते पोटातल्या पोटात फिरायला लागलं , लाथा मारायला लागलं की मग तुमचा विश्वास बसेल . '
' तुला वेड लागलं असलं पाहिजे ! '
' मला नाही - पण तुम्हाला मात्र खचितच लागणार आहे ! '
' नालायक ! रांड ! चल चालती हो ! '
' जाणारच आहे - पण एक गोष्ट सांगायची बाकी आहे - '
' काय सांगायचं ते सांग आणि चालती हो ! '
' त्या बाहुलीचं सांगत होते ना - त्यात मी जरा बदल केला आहे . तुम्हाला तुमच्या पौरुषाचा अभिमान आहे ना - ते ठेवलंय - पण - पण… त्या गर्भाला बाहेर
यायची वाट ठेवलेली नाही… मी एका पुस्तकात वाचलं… त्याला बर्थ कॅनाल म्हणतात… तो तिथे नाही - '
अनूने त्याचा निरोप घेतला तेव्हा शरद नुसता विस्फारलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहात होता . त्याला तिच्या शब्दांचा खरा अर्थ समजला की नाही याची तिला शंकाच वाटत होती . अर्थात अर्थ समजूनही काही उपयोग नव्हता . त्याला कोणाचीच मदत होण्यासारखी नव्हती .
पुढच्या तीन-साडेतीन महिन्यांत अनूचं वजन दहा पौंडांनी घटलं . चेहरा सुरकुतला . कोठेही लक्ष एकाग्र करणंच अशक्य झालं . बाहुली असलेली काचपेटी टेबलावर ठेवून ती तासच्या तास त्या बाहुलीकडे पाहात राही .
बाहुलीच्या पोटाचा नगारा झाला होता . एकदा चमचमणारे डोळे आता निस्तेज झाले होते .
आता तिच्या मनातला सर्व संशय फिटला होता . हा अघोरी अतूट बंध स्थापन झाला होता . शरदच्या शरीरातलं स्थित्यंतर समोर प्रतिबिंबित होत होतं . दिवसा ती मनावर कसातरी ताबा ठेवू शकत होती… पण रात्रीच्या दुःस्वप्नांना कसा आवर घालणार ?
आता त्याचा विश्वास बसला असेल… आता त्याची मनःस्थिती काय असेल ? घटनांचा शेवट त्याच्या ध्यानात आला असेल का ?
दिवस उलटत चालले तशी तिची झोप उडत चालली . शरीरावरचं मांस झडत चाललं होतं . ती जराजर्जर दिसायला लागली… कधी कधी तिला वाटे , आपणही त्या शापापासून अलिप्त नाही आहोत….
शेवटी तिने ती काचपेटी कॉटशेजारच्याच एका टेबलावर ठेवली .
त्या रात्री तिला विलक्षण अस्वस्थता जाणवत होती . काहीतरी भयानक , काहीतरी अति अशुभ घडणार आहे असं सावट मनावर येत होतं .
पण तिला आधी कल्पना यायला हवी होती .
मध्यरात्रीचा क्षण हाच त्याचा क्षण होता .
तेव्हाच ते झालं .
ती त्या बाहुलीकडे पाहात होती .
लहान ओबडधोबड ओठ एकाएकी वासले… त्या काळ्या विवरातून एक अति क्षीण , अति तार स्वरातली एक किंकाळी आली . पोटात आतून एक फुगवटा आला , तो फुटला .
खळखळ आवाज करीत पेटीची काच तडकली , फुटली .
एखादी गारेगार वावटळ खोलीत भिरभिर फिरली . खिडकीचं दार दाणदिशी बाहेर उघडलं गेलं .
ती वावटळ जाताना जणू अनूची शुद्ध घेऊन गेली होती . विस्फारल्या डोळ्यांनी तोंडावर हात ठेवून समोर पाहणारी अनू बेशुद्ध होऊन तशीच्या तशी मागे गादीवर कोसळली .
समाप्त
तुमच्या ब्लॉगवर नारायण धारप यांच्या कथा प्रसिद्ध केल्या आहेत. त्या कथांच्या प्रसिद्धीचे सर्वाधिकार 'साकेत' प्रकाशनाने विकत घेतले आहेत. तुमचे याप्रकारे कथा ब्लॉगवर टाकणे कायद्याने गुन्हा तर ठरतोच. मात्र ते लेखकाच्या अधिकारावर गदा आणणारी गोष्ट आहे. तुम्हास विनंती, की तुम्ही येत्या दोन दिवसांत त्या कथा ब्लॉगवरून वगळाव्यात. अन्यथा मला नाईलाजास्तव 'साकेत' प्रकाशनास हा प्रकार कळवावा लागेल. तुम्ही विचार कराल अशी आशा.
ReplyDeleteतुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहेन.
तुम्ही कळवा साकेत प्रकाशनला .
Deleteमी नारायण धारप यांचा निस्सीम चाहता आहे
ReplyDelete😊🤦
ReplyDelete