Tuesday, March 29, 2016

·" चकवा "सचिनचं आत्ता लग्न होऊन ५ वर्ष झाली, छोटी पिंकी ...त्याची मुलगी त्याला म्हणाली, " ए बाबा आमच्या वर्गातला आशुतोष आणि त्याची Family त्याच्या आजीला घेऊन त्या अभयारण्यात सहलीला गेलेत, आपण पण जाऊया ना रवीवारी " अभयारण्य आणि सहल हे ऐकताच सचिनचं मन सुन्न झालं, एका क्षणासाठी तो निशब्द झाला आणि त्याला आठवली ती घटना जी कॉलेज मध्ये असताना घडली होती , साधारण १० वर्षांपूवीची ती घटना आत्ता २०१६ साली त्याच्या छातीत धडकी भरून गेली, त्याने स्वाती कडे बघितलं , तिच्या चेह्र्यावरचे भाव हि तसेच काहीसे भयभीत होते , कारण सचिन आणि स्वाती हे वर्गमित्र पुढे प्रेमात पडले आणि लग्नाच्या बेडीत अडकले.इथे मुद्दाम त्या अभयारण्याचं नाव मी टाकत नाही, पण ह्या घटनेनंतर पनवेलच्या त्या मुलांनी उभ्याआयष्यात अभयारण्यात सहलीला जाण्याचा विचारच मनातून काढून टाकला.सचिन ,समीर,स्वाती आणि गुरुवांजली हे चार मित्र पनेवलच्या पिल्लई कोलेजचे विद्यार्थी. चौघांना ट्रेकिंग आणि जंगलात जाऊन रात्री वस्ती करणं, वनात जाऊन जेवण करणं , खेड्यापाड्यात फिरणं ,डोंगर माथा बघणं ह्यात जास्त रस. समविचारी म्हणून ह्यांची मैत्री अधिकच घट्ट झाली.हिवाळ्याचेदिवस, फेब्रवारी महिना साल १९९८, कसल्यातरी सरकारी सुट्ट्या आल्या, सुट्ट्या पण अश्या आल्या कि सलग शुक्रवारपासून ते थेट सोमवारपर्यंत. ह्यावेळी सहलीला त्यांनी पनवेल नजीकचं अभयारण्य निवडलं, पण हि सहल आपण आपल्या कुटुंबियांसोबत करण्याची कल्पना स्वातीने सुचवली, प्रत्येकाच्या घरातील काही सदस्य तयार हि झाले, नजीकच अभयारण्य आहे म्हणून सगळे तयार हि झाले, शुक्रवारी सकाळी १० वाजता समीरच्या बिल्डींग खाली गाडी आली, "टाटा विंगर", समीर आणि त्याचे कुटुंबीय खाली येऊन गाडीत बसले, असं करता करता आत्ता त्या चौघांचेही कुटुंबीय गाडीत बसले, सगळे मिळून साधारण १२-१३ जण होते, गाडी पनवेलहून बाहेर पळस्पा फाटा पार करून मुंबई गोवा हायवेवर असलेल्या नजीकच्या अभयारण्यात पोहोचली. गाडीतून सगळ्यांनी आपापलं सामान बाहेर काढलं, तिकीट घरातून तिकिटं घेतली आणि गाडी वाल्याला सांगितलं"तू उद्या ये दुपारी २ वाजेपर्यंत, आम्ही इथेच असू "आत्ता सगळेजण चालत चालत गप्पा मारत जंगलाकडे निघाले, आजचा बेत म्हणजे जंगलात वस्तीचाच होता. तिकीट घरापासून साधारण २ किलोमीटर आतमध्ये जंगलात पोहोचल्यावर ते सगळे थांबले.थोडा वेळ विश्राम करून पुन्हा निघाले, वातावरण एकदम खेळीमेळीचं,सगळेजण एकमेकांचे मजा मस्करी करत होते , अभयारण्य म्हणजे एकदम दाट जंगल, पाखरांचे आवाज कानावर पडत होते , झाडाझुडपातून माकडं उड्या मारत होते, असानिसर्ग आणि तो पण पनवेल शहराच्या एवढ्या नजीक आहे, आणि आपण इथे कधी आलोच नाही ......सगळ्यांच्यातोंडातून हे एकच वाक्य निघत होतं.बघता बघता साधारण ३ तास चालल्या नंतर आत्ता त्यांना एक मनमोहक जागा सापडली. एका बाजूला डोंगर, घनदाट झाडांची गर्दी, थोड्या अंतरावर संथ वाहणारी नदी आणि शांत आरण्य.बघता बघता संध्याकाळचे ४ वाजले, त्या सगळ्यांनी आपआपले तंबू उभारायला सुरवात केली, आणि बघता बघतातासाभरात तंबू उभे हि झाले.सचिन ,समीर,स्वाती आणि गुरुवांजली पुढे आले आणि ह्या चौघांनी आत्ता पुढचा बेत सर्वांसमोर मांडला.सगळेजण सतरंज्या टाकून गोलाकार बसले, गप्पा रंगल्या. सूर्य डोंगरा आड गेला आणि संध्याकाळी ६ वाजताच अरण्यात काळोख व्हायला सुरवात झाली, काही उमेदवारांनी इकडून तिकडून लाकडं जमवायला सुरवातकेली, आणि मधोमध त्यांनी जाळ पेटवला, ३-४ जण जेवणाच्या तयारीला लागले, सोबत आणलेल्या कोंबड्या कापल्या, एकीकडे ह्या चौघांचे नातेवाईक सतरंजीवर बसून मस्त गप्पा मारत होते, तर दुसरीकडे एक टीम जेवणाच्या गडबडीत, काहीजण चूल पेटवायला लाकडं गोळा करण्यात मग्न होते, आत्ता अंधार पार दाटलेला, पक्षांचे आवाज बंद होऊन रातकिड्यांचे आवाज कानावर पडत होते, आजूबाजूच्या झुडपातून मधूनच सरपटणारे निशाचर पालापाचोळयाचे आवाज करत होते. दिवसा रोमांच निर्माण करणारं ते निसर्गरम्य अभयारण्य रात्रीच्या अंधारात मात्र आत्ता भयावह आणि आपलं आक्राळ विक्राळ रूप दाखवायला लागलं.मोठमोठ्या वृक्षांच्या त्या महाकाय सावल्या वातावरणात अजून भय निर्माण करत होत्या . त्या १२-१३ जणांपैकी काहीजण ह्या वातावरणाचा विलासित आनंद लुटत होते, तर काहीजण मनातून घाबरून जायला लागले होते.दगडं लावून चुले पेटवायला सुरवात झाली, त्यांनी एकूण ३ चुले पेटवले, एकावर मोठं टोप ठेवून त्यावरभात ठेवला, दुसरीकडे टोपात चिकनचा मसाला भाजायला घेतला आणि तिसरा चुला आत्ता पेटायला सुरवात झालीच होती.तिथून साधारण १० फुटांवर बाकी मंडळींची मैफिल रंगली होती. इतक्यात एक आवाज आला....." मी येऊ का"एका बाईचा आवाज सगळ्यांच्या कानावर पडला. सगळेच जण एका सेकंदात गप्प झाले , आजूबाजूला बघितलं कोणीच नव्हतं. तिकडे १० फुटांवर जे लोकं जेवणाच्या गडबडीत होते त्यांना पण हा आवाज त्यांच्याजवळऐकायला आला, ते पण थांबले. पण तिकडे कोणीच नव्हतं. आवाज तर एखाद्या वयोवृद्ध बाईचा होता, पण ह्यांच्या गटात तसं वयोवृद्ध कोणीच आलं नव्हतं. काहींनी एकमेकांना प्रश्न केला ..." कोण ओ , कोणी आवाज दिला "" काही समजलं नाही बुवा, आम्हाला पण इकडे आवाज आला"पुढे साधारण ५-१० मिनिटं हा आवाज पुन्हा आला नाही, दुर्लक्ष करून प्रत्येकजण पुन्हा आपल्या मूड मध्ये रमले.आत्ता भात तयार झाला, टोप खाली उतरवलं गेलं, सोबतीला चिकन हि तयार झालं, थर्मोकोलची ताटं सगळ्यांसमोर वाढली, जेवणं वाढायची सुरवात झाली आणि अचानक कसला तरी आवाज झाला, सगळ्यांनी चुल्याकडे बघितलं, चुल्याची राख आणि जळत्या निखाऱ्यांचा ठिणग्या हवेत उडत होत्या, पेटती फाटी इकडे तिकडे उडाली." हे अचानक काय झालं, म्हणून त्यांच्यातले दोघेजण पुढे गेले, त्यांना वाटलं झाडाची एखादी फांदी विस्तवावर पडली असावी, त्यांनी पुढे जाऊन बघितलं पण तिथे तसं काही दिसलं नाही.चुल्याची दगडं इकडे तिकडे गेलेली, पेटती फाटी ३-४ फुटांवर अश्या प्रकारे उडाली होती, कि जसं काय कोणीतरी लाथ मारून चुला उडवला असावा.नक्की काय झालं कोणालाच समजेना, सगळेच जण मनातून दचकलेले, काहींनी थोड्याच वेळात विषयाची मुद्दामटाळाटाळ करत सगळ्यांचं लक्ष जेवणाकडे वळवलं.आत्ता पुन्हा सगळे हसत मस्करी करत जेवायला लागले, गुरुवांजली ने विचारलं " कोणाला काही लागलं तरसांगा हो, लाजू नका "" हो हो नक्की सांगू , तू अजिबात काळजी करू नको " जोशी वहिनी बोलल्या, जोशी वहिनी म्हणजे स्वातीच्या भावाची बायको.जोशी वहिनिंचं बोलणं पूर्ण होताच वरून झाडावरून आवाज आला" मी येऊ का "आत्ता आलेला आवाज म्हणजे एक विचित्रच आवाज होता, एवढ्या मोठ्याने आलेला हा आवज ऐकून सगळेजण झटकनताटावरून उठले आणि झाडाखालून बाजूला पळाले. त्यांच्यातल्या महिला तर मोठ्याने ओरडायला लागल्या, मुलं घाबरून रडायला लागली, तरुण मंडळी आणि मोठी माणसं पण मनातून कचरले. सगळेजण एका घोळक्यात एकाबाजूला एकमेकांना धरून उभे होते.एक जण मोठ्याने ओरडला ..." ए कोण आहे, कोण आहेस कोण तू "झाडावरून एक मिश्कील हसण्याचा विचित्र आवाज आला, सिनेमा मालिकात दाखवतात एकदम तसाच ... आणि एक आवाज आला " राखणदार हाय इथली "अचानक गिरीजा गुरव - सचिनची बहिण, घशातून घोगरा आवाज काढायला लागली, हात पाय ताठ केले डोळे फिरवले आणि केसं मोकळे सोडून गरागरा मान फिरवायला लागली , घोगऱ्या आवाजात बोलायला लागली" वेशीवर रक्त सांडवलव, आत्ता मला मान द्या, मान द्या माझा मान "गिरिजाला झपाटलं हे बघून आत्ता सगळेजण अधिकच घाबरले. सगळेजण तिच्यापासून लांब पळाले. ति तशीच त्याच जागेवर हातपाय ताठ करून मान आकाशाकडे करून उभी होती, तिच्यावर मारलेल्या टोर्चच्या प्रकाशात ती स्पष्ट दिसत होती.काय करावं कोणालाच कळेना, त्यांच्यातल्या बायकांनी तर आपल्या लहानमुलांना पदरात कवटाळून डोळे बंद करून घेतले,पुरुष मंडळी एकमेकांकडे बघून काय करावं ह्याचा विचारकरत होते. दाट अंधार, पायाखालचा रस्ता धड दिसेना, आणि बायका मुलांना घेऊन कसं काय इथून निघायचं ह्याच चिंतेत ते सगळे होते.पण समोर उभं असलेलं संकट बघून त्यांच्यातल्या ३ जणांनी तिथून पळ काढलाच, ते त्या आरण्यातून भूत भूत किंचाळत ओरडत पळत सुटले आणि आलेल्या वाटेच्या दिशेने निघून गेले.आत्ता त्यांच्या शिल्लक राहिले हे ९ जण, त्यात ३ महिला आणि लहान मुलं. गिरीजा त्यांच्या समोर हात पाय ताठ करून डोकं आकाशाच्या दिशेने मान वर करून तशीच उभी होती. आत्ता सगळेच जण भीतीने गप्प बसलेले, किर्र शांतता आणि आकाशातून उडणाऱ्या टिटवीचा आवाज. त्या भयाण शांततेने कानावर दडे बसल्या सारखं सुन्न वाटायलालागलं होतं.इतक्यात पाठीमागून नदीत कसला तरी आवाज ऐकायला आला, हळू हळू आवाज नजीक येतोय जाणवायला लागलं, मासेमारी साठी नदीत कोणाचीतरी मोटर बोट फिरत असावी, ह्यांच्यातल्या सचिन आणि समीर ने क्षणाचा हिविलंब न करता मोठ मोठ्याने आवाज द्यायला सुरवात केली ..." वाचवा वाचवा , कोणीतरी वाचवा , ओ ओ वाचवा " पण ह्यांचां आवाज ऐकताच त्या मोटरबोटीने वेग वाढवला आणि ५-१० मिनिटात तो आवाज लांब निघून गेला.आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी ह्या अरण्यात असे ओरडण्याचे आवाज ह्या आधी कधीच ऐकले नव्हते, ह्या अरण्यात आजपर्यंत रात्री वसतीला कोणीच राहिलं नसावं. आणि आराण्यातल्या भूत कथा काही गावातल्या लोकांना नवीन नव्हत्या.ह्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून बहुदा ती बोट ह्यामुळेच निघून गेली असावी.थोड्याच वेळात पुन्हा गिरीजा घशातून घरघर करत आवाज करायला लागली, आवाज दिला" मान द्या " आणि तिचं शरीर थरथर हलायला लागलं ते तसच हलत राहिलं.त्यांच्यातल्या मोहिते काकांनी जवळच असलेलं जेवणाचं ताट तिच्या दिशेने फेकलं. तिने मान खाली वाकवली, पायाजवळ पडलेलं ताट तिने बघितलं, मोहिते काकांनी आणखी एक ताट तिच्या दिशेने भिरकावलं. आत्ता सगळ्यांचं लक्ष गीरीजाकडे लागलं, पुढे काय .....?गिरीजा जमिनीवर बसली, दोन पायाच्या मध्ये ताटं ओढली आणि बकाबका चिकन खायला लागली. दोन्ही ताटातलं चिकन खाऊन झाल्यावर ती उठली आणि मागच्या दिशेने अरण्यात धावत सुटली ....तिच्या मागे मोहिते काका आणि सचिन धावले , " गिरीजा गिरीजा थांब गिरीजा "पण ती भरधाव वेगाने त्या झुडपातून पळत कुठे नाहीशी झाली काही दिसलंच नाही. त्या घनदाट जंगलात आणखी पुढे धावत जायला ते दोघेही घाबरले. इकडे बायका मोठ मोठ्याने पुन्हा रडायला लागल्या. लहान मुलांनी पण कल्ला करून रडायला सुरवात केली, इतक्यात मोहिते काका मोठ्याने ओरडले .." गप बसा , गप्प बसा सगळ्यांनी "आणि एका क्षणात सगळे एकदम गप्प झाले. काय करावं सुचेना, ह्या सगळ्या गोंधळात साधारण एक दीड तास निघून गेला, रात्रीचे ११ वाजले. काय करावं सुचेना.ते लोकं एकमेकांशी संवाद साधून काय करावं हे हळू आवाजत बोलत होते, इतक्यात त्यांना डबक्यातून कोणीतरी पाणी काढतोय असा आवाज कानावर आला, कळशी पाण्यात बुडवल्यावर जसा ..बुड बुड आवाज येतो तसा.त्यांचतले दोघे तिघेजण टोर्च मारत आवाजच्या दिशेने पुढे गेले, थोडं अंतर पुढे गेल्यावर त्यांनी आवाजाच्या दिशेने टोर्च मारली, पाठमोरी बसलेली एक म्हातारी दिसली, कातळाच्या डवऱ्यातून पाणी काढून समोर झुडपात फेकत बसलेली. म्हातारी एखादी आदिवासी असावी, काया एकदम सुकलेली पांढरे फटक आणि अंगावर फाटकं लुगडं.मोहिते बोलले " कोण आहेस "म्हातारीने आवाज दिला " राखणदार "हे ऐकताच त्यांची बोबडी वळली, राखणदार म्हणजे हिच भुताटकी ....त्यांच्यातल्या समीर आणि सचिन ने मोहिते काकांचे दोन्ही हात घट्ट पकडले.पण काका थोडे धीट होते, त्यांनी पुन्हा आवाज दिला..." तुझा मान तुला दिला गिरीजा कुठं आहे "" म्हातारी मोठ्याने हसली आणि तिथून उठून इतक्या वेगाने निघून गेली कि हे लोकं तिच्यावर टोर्च मारतच होते कि ती नाहीशी झाली. डवऱ्याच्या बाजूला झुडपात गिरीजा कातळावर आडवी पडलेली आणि हि म्हातारी तिच्या अंगावर पाणी ओतत बसलेली.म्हातारी तिथून नाहीशी होताच हे तिघे गिरीजा जवळ गेले, तिच्या तोंडाला चिकनचा रस्सा लागलेला आणिअंग पाण्याने भिजलेलं. ह्यांनी तिला उचलली आणि पटापट मागे वळून चालायला लागले....समोर दूरवर त्यांना गाडीच्या प्रकाशासारखं काहीतरी दिसलं, म्हणून पावलं पटापट टाकत ते तिथे पोहोचले, गिरिजाला जमिनीवर ठेवलं. समोर पोलिसांची गाडी उभी होती. ह्यांच्यातले जे तिघेजण तिथून पळून गेलेले , त्यांनी हायवेवरून पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना तिथे आणलं होतं.पोलिसांना समोर बघताच त्यांच्या जीवात जीव आला. थोड्याच वेळात पोलिसांनी सगळ्यांना तिथून बाहेर काढलं आणि जबाबासाठी पोलीस ठाण्यात नेलं, गिरिजाला सरकारी हॉस्पिटल मध्ये एडमिट केलं.घडला प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितला.ठाण्यात उभा असलेला हवालदार त्यांना बोलला, " आहो नको ते उद्योग करायला जाता कशाला जंगलात , तुम्हाला माहिती आहे काय, ह्या अभयारण्यात जनावरांनी कित्येक आदिवासींना खाल्लं आहे,ह्या अभयारण्यात असे भुताटकीचे खूप प्रकार घडतात, नशीब चांगलं होतं ती पोर वाचली"दुसऱ्या दिवशी पहाटे ते सगळे पुन्हा आपापल्या घरी परतले, आणि अश्या पद्धतीच्या सहली उभ्या आयुष्यात पुन्हा कधीच काढायचा नाही हा निर्धार केला.

Ganesh R Retwade

1 comment:

  1. जीवाचा थरकाप उडवणारा अनुभव

    ReplyDelete