हत्या -२
बाईक काढताना त्याला अचानक आठवण झाली आणि त्यानं शिंदेंना मोबाईलवर फोन करून मयताचे बँक रेकॉर्ड्सही गोळा करायला सांगितले. रमेश बाईकवरून निघाला खरा, पण वाटेतच त्याला नेहमीचा त्रास सुरू झाला. असह्य मळमळ होऊ लागली. त्यानं गाडी कशीबशी रस्त्याच्या कडेला घेतली आणि गटारावर झुकून उलटी करू लागला. पण हीदेखील नेहमीसारखीच कोरडी मळमळ होती. दोन मिनिटांच्या निष्फळ प्रयत्नांनंतर तो थकून गाडीला पाठ टेकून रस्त्यावरच बसला. थोडीशी सावली होती. त्याचा युनिफॉर्म बघून दोन गाडीवाले पाणी घेऊन पोचले त्याच्यापर्यंत. त्यानं घटाघट पाणी प्यायलं. त्यांचे धन्यवाद करून परत बाईकवर बसला, एव्हढ्यात त्याचा सेलफोन वाजला.
"बोला शिंदे!"
"साहेब, आज बँक हॉलीडे आहे!"
"छ्या! म्हणजे ऑफिसही बंद असेल. बरं शिंदे, एक काम करा मी घरी जातोय, तुम्ही सगळे पुरावे व्यवस्थित लावून ठेवा. आता उद्या बघू."
"पण साहेब, त्या मयत तरूणीचे आई-वडिल आलेत स्टेशनात."
"ओह्ह! बरं ठीक आहे, मी स्टेशनात येतो. थांबवून ठेवा."
-------------------------
रमेश छताकडे बघत गादीवर पडला होता. त्याच्या डोळ्यांसमोर मयत तरूणी क्षमाचे आई-वडिल येत होते. आजवर तो कित्येक मयतांच्या नातेवाईकांना भेटला होता. पण ह्यावेळेस तो स्वतःच गुंतल्यागत झालं होतं. त्यानं मृतदेह पाहिला त्याक्षणीच त्याला ती मळमळ जाणवू लागली होती. पण तेव्हा फोटोग्राफर्स फॉरेन्सिकवाले ह्या सगळ्यांच्या गराड्यात त्यानं कसाबसा स्वतःवर ताबा ठेवला होता. गेल्या ७-८ महिन्यांपासून हा त्रास त्याला होत होता. ८ महिन्यांपूर्वी त्यानं स्वतःच्या डोळ्यांनी आपल्या धाकट्या बहिणीचा झुडुपांमध्ये फेकलेला मृतदेह पाहिला होता. ती केस त्याच्या कक्षेत नव्हती, त्यामुळे तो त्या केसशी थेट संबंधित नव्हता. पण तो संबंधित नसल्यामुळे त्याला कमी त्रास झाला होता की जास्त त्रास झाला होता, हे तो स्वतःदेखील सांगू शकला नसता. केसचा तपास कुठेच जाऊ शकला नाही. वेगळ्या शहरात एकट्या राहणार्या त्याच्या बहिणीचं मरणोत्तर चारित्र्यहनन मात्र बरंच झालं होतं. त्यानं स्वतःचे संपर्क वापरून बर्याच प्रमाणात होऊ शकणारं नुकसान थोपवलं, पण तिची अब्रू वाचवण्याच्या नादात तपास मात्र खुंटला होता. त्याच्यासकट सगळ्यांनीच सत्य मान्य केलं होतं आणि केसची फाईल बंद झाल्यात जमा होती. पण तरीदेखील कुठेतरी त्याच्या मनात खोलवर बहिणीच्या निर्दोष असण्याची खात्री आणि तिचा नाहक बळी गेल्याची जखम ठुसठुसत होती. त्याचाच त्रास त्याला प्रत्येक मृतदेह पाहून होत होता. हे त्याचे स्वतःचे निष्कर्ष नव्हते, तर पोलिस मनोविकारतज्ज्ञ डॉ. कुर्लेकरांनी त्याच्याशी दीर्घ चर्चा करून काढलेले होते. डॉ. कुर्लेकरांनी वैयक्तिक पातळीवर ही मदत त्याला केली होती. कागदोपत्री कुठेच त्याचा हा मनोविकार नव्हता. डॉ. कुर्लेकरांनी त्याला काही औषधं दिली होती आणि छोटी सुट्टी घ्यायला सांगितली होती. पण रमेशच्या मते, पोलिसी तपास हाच त्याच्या प्रत्येक समस्येवरचा उपचार होता.
त्याक्षणीदेखील रमेशच्या डोळ्यांसमोर बहिणीचा छिन्नविच्छिन्न मृतदेह तरळत होता. आणि मयत क्षमाच्या आई-वडिलांची भेट आणि त्यांचे हतबल अश्रू. बहिणीच्या मृत्यूनंतर ८ महिन्यांनी पहिल्यांदाच एका तरूणीची केस समोर आली होती आणि रमेशला तो एका विचित्र गुंत्यात अडकत चालल्याची जाणीव झाली. त्याचं लक्ष घड्याळाकडे गेलं. रात्रीचे दोन वाजत होते. काल रात्री न झोपूनदेखील त्याला आजही झोप येत नव्हती. तो उठला आणि डॉ. कुर्लेकरांची औषधं घेऊन बाहेर पडला.
तो थेट खून झालेल्या इमारतीकडे आला. एक हवालदार मुख्य दाराशी पेंगत होता. त्या इमारतीला वॉचमन नव्हता. पण अगदी समोरच गेट असलेल्या इमारतीला मात्र वॉचमन होता आणि तो त्याच्या केबिनमध्ये अर्धवट डुलक्या काढत होता. रमेशनं वॉचमनच्या हातावर चापटी मारली. तो गडबडून जागा झाला आणि रमेशकडे डोळे वटारून बघू लागला. रमेशनं खिशातून आयकार्ड काढून दाखवल्यावर त्याची दातखीळ बसली. रमेश त्याच्या छोट्या केबिनमध्ये शिरला आणि छोट्याशा कठड्यावर बसला.
"घाबरू नकोस! साधी चौकशी करायचीय. किती वर्षं आहेस इथे कामाला?"
"द-दोन वर्षं साहेब!"
"नेहमी रात्रपाळीलाच?"
"हो!"
"बरं समोरच्या इमारतीत येणार्या जाणार्यांकडे कितपत लक्ष असतं?"
"जवळपास सगळ्या राहणार्यांना ओळखतो साहेब. पण खास असं काही असेल तरच लक्ष जातं. नाहीतर एव्हढं नाही!"
"मग चार दिवसांपूर्वी सोमवारी रात्री काही खास घडलं होतं का?"
"सोमवारी झाला होता मर्डर?"
"पोलिस तू आहेस की मी?" रमेशनं दरडावून विचारलं.
"सॉरी साहेब. तसं काही खास नाही."
"मेंदूवर जोर टाक."
"तसं काही नाही साहेब, नेहमीप्रमाणेच मॅडमबरोबर एक तरूण आला होता साहेब."
"नेहमीप्रमाणे?"
"हो साहेब. महिन्यातून एक-दोनदा तरी मॅडमबरोबर त्यांचा बॉयफ्रेंड असायचा."
"तू ओळखतोस?"
"साहेब, गेली एक वर्षं मॅडम आहेत इथे त्यात मी तीन वेगवेगळे लोक पाहिलेत."
"मग हा तिसरा होता का?"
"नीट दिसलं नाही साहेब खरंच. इथे एका साहेबांना गाडी बाहेर काढायची होती, त्यामुळे मी फारसं लक्ष नाही दिलं. पण असेल तोच?"
"असेल?"
"म्हणजे नक्की नाही साहेब!"
अजून जुजबी चौकशी करून रमेश तिथून उठून बाहेर आला. रात्रीचे साडेतीन वाजत होते. बाईकवर बसून तो एक फेरफटका मारून थेट ६ वाजता परत आला. हवालदाराला उठवून चावी घेतली आणि वर पोचला. फ्लॅटच्या दाराला पुन्हा एकदा चाचपून बघू लागला. त्याला कालच्या विचित्र वासाची आठवण झाली आणि पुन्हा मळमळेल की काय अशी भीती वाटू लागली. तो स्वतःवर ताबा ठेवायचा निष्फळ प्रयत्न करू लागला.
"काही कळलं का साहेब?"
रमेश एकदम आलेल्या प्रश्नानं दचकला. तिकडे बघून म्हणाला, "ओह्ह रानडे, तुम्ही!"
रानडेंनी स्मित केलं. रानडेंचे घारे डोळे रमेशला का कुणास ठाऊक बेरकी वाटत होते.
"तुम्हाला मोठी काळजी लागून राहिलीय!"
"आता शेजारी खून म्हटल्यावर काळजी वाटणारच ना साहेब!"
"हो, पण तुम्हाला धक्का कमी आणि कोरडी काळजी जास्त वाटतेयसं जाणवतंय." रमेश थंडपणे रानडेंच्या डोळ्यांत बघत म्हणाला.
"काहीतरी काय साहेब? तुम्ही माझ्यावरच उलटताय का?"
"अहो पोलिस पडलो आम्ही. संशय घेणं आमचं काम आहे. हा डायलॉग सिनेमांमध्ये पण ऐकला असेल तुम्ही! बरं सोडा, तुम्ही आपल्या कामाला लागा."
एव्हढ्यात पावलांचा आवाज आला आणि रमेशनं तिकडे पाहिलं. पेपरवाला पेपरांची चळत घेऊन उतरत होता.
"काय रे! ह्या फ्लॅटमध्ये कोण पेपर टाकतं?"
"अं..."
"हाच टाकतो साहेब!" रानडे त्यांच्या दारातूनच बोलले.
"रानडेसाहेब. मदतीसाठी आभार! पण तुम्ही तुमच्या कामाला गेलात तर बरं होईल. मला माझं काम करू द्या." रमेशच्या आवाजात जरब आली. मग तो पेपरवाल्याकडे वळून म्हणाला.
"काय रे? उत्तर द्यायला काय झालं?"
"जी..इ-इ-थे मीच ट-टाकतो."
"नेहमीचा तोतरा आहेस, की आत्ता पाचावर धारण बसलीय?"
"पोलिसांना बघून घा-ब-र-णारच ना साहेब!"
"एक सांग, इथे खून झाल्या दिवसापासून पेपर का नाही टाकलास? तुला खून झाल्याचं कळलं होतं की काय?" रमेश पेपरवाल्याला आपादमस्तक न्याहाळत म्हणाला.
"न-न-नाही साहेब. ते बाईसाहेब नव्हत्या घरात असं वाटलं मला!"
"कसं काय वाटलं रे? स्वप्न पडलं का?"
"नाही साहेब, ते एक तारीख होती, तर मी बेल वाजवली बिलासाठी, तर दार उघडलं नाही कुणी, म्हणून मग नाही टाकला पेपर! रोज बेल वाजवत होतो मग."
"बाईंना व्यवस्थित ओळखत असशील."
"नाही, तसं जास्त नाही साहेब, धड पाहिलं पण नाहीये कधी."
"पाहिलं पण नाहीये? मग दर महिन्याला बिलं काय तुझं भूत घेतं का बे?"
"ते स-स-स-साहेब दर महिन्याला मालक बिलं घेतो, मी ह्यावेळेस प-प-पहिल्यांदाच." रमेश त्याच्या डोळ्यांत रोखून पाहत होता. भीती स्पष्ट दिसत होती. पण ती भीती निष्पाप होती, की गुन्हा पकडला गेल्याची त्याचा थांग त्याला लागत नव्हता. बोलण्यात ताळमेळ नव्हता. पण अतीव भीतीमध्येदेखील असंबद्ध वर्णनं होतात, हे त्याचा अनुभव त्याला सांगत होता.
"बरं, चार-पाच दिवसांमध्ये इथे काही विचित्र घडल्याचं किंवा कुठली विचित्र गोष्ट किंवा संशयास्पद माणूस वगैरे दिसला का?"
"न-न-नाही साहेब...तसं क-क-काही नाही."
"तुझा मालक कोण?"
"साहेब इथनं सरळ मुख्य रस्त्याला लागलं की उमाकांत पेपर एजन्सी आहे, तेच."
"तुझं नाव काय आणि राहायला कुठे आहेस?"
-------------------------
"रोहन, तपास जोरात सुरू आहे खुनाचा!" जीतू दारूचा ग्लास तोंडाला लावत म्हणाला.
".." रोहन अस्वस्थपणे हातातल्या ग्लासाशी नुसता खेळत होता.
"अरे रोहन, लक्ष आहे का तुझं मी काय बोलतोय त्याकडे?"
"होय रे." रोहननं त्रासून म्हटलं. "मी काय करू मग?"
"माझं ऐकशील तर गायब हो इथून थोडे दिवस."
"अरे पण मी कशाला गायब होऊ? मी काय केलंय? तुला माहितीय मी काही नाही केलंय ते!"
"मला काही माहित नाहीये. मी तिथे पोचलो तोवर सगळं झालेलं होतं. तू खून केला नसशील ही मला खात्री आहे, पण कुणी केलाय ते मला कसं कळेल. मला फक्त एव्हढंच कळतंय, की तुला कुणी ना कुणी तिथे जाताना बघितलं असेल, त्यामुळे संशय तुझ्यावर यायच्या आधी गायब हो इथून."
"अरे पण जाऊ कुठे?"
"कुठेही जा, पण जा!"
रोहननं एका घोटात ग्लास रिकामा केला आणि आतल्या खोलीत जाऊन बॅग भरू लागला.
-------------------------
रमेश क्षमाच्या ऑफिसात पोचला आणि तिच्या बॉसला भेटला. मग ते दोघे क्षमाच्या डेस्ककडे आले. रमेश डेस्कची पाहणी करू लागला. तो सिव्हिल ड्रेसमध्ये होता तरी आजूबाजूच्यांना अंदाज आलाच होता.
"लॅपटॉप घरी घेऊन जायची सुविधा नाहीये का?" रमेश तिचा लॅपटॉप निरखत म्हणाला.
"आहे ना. कुणीही घेऊन जाऊ शकतं लॅपटॉप घरी." तिचा बॉस म्हणाला.
मग ती घरी का घेऊन गेली नसेल, असा मनाशी विचार करतच त्यानं लॅपटॉप चालू केला. लॉगिन स्क्रीन आला.
"नेटवर्क पासवर्ड आहे, ऍडमिनिस्ट्रेटरला ठाऊक असेल नाही का?" रमेशनं बॉसकडे पाहिलं.
"हो, हो मी लगेच मागवतो." त्यानं इंटरकॉमवरून फोन लावला.
रमेश हळूच बॉसच्या कानात म्हणाला. "ते दोघे कुठेयत?"
"एक कँटीनमध्ये आहे आणि दुसरा जागेवर!" बॉस हळूच म्हणाला.
"ठीक, आय वुड कॅच अ कॉफी!" रमेश लॅपटॉप उचलून कँटीनचा रस्ता विचारून तिथे निघाला.
-------------------------
रमेश कँटीनच्या टेबलावरच अस्वस्थ होऊ लागला. तिथे तो क्षमाच्या दीड वर्षांपूर्वीच्या बॉयफ्रेंडशी बोलत होता. क्षमाच्या चारित्र्याविषयी तो जे काही त्याच्या तोंडून ऐकत होता, त्यानं त्याच्या स्मृती विचित्र हेलकावे खाऊ लागल्या होत्या. हे सगळं त्यानं पूर्वीही ऐकलं होतं. त्याच्या डोक्यातला गुंता वाढत चालल्यासारखी ती संवेदना होती. अस्वस्थपणा, मळमळ वाढू लागली आणि तो उठून उभा राहिला.
"इट्स ओके. मला पुन्हा गरज वाटली, तर मी तुम्हाला बोलावेन." एव्हढं कसंबसं बोलून रमेश बॉसच्या केबिनकडे निघाला.
कँटीनला जाण्यापूर्वी त्यानं शिंदेंना फोन करून लॅपटॉप कलेक्ट करण्यासाठी कुणालातरी पाठवायला सांगितलं होतं. हवालदार पाटील बॉसच्या केबिनमध्येच त्याला भेटले. त्यानं लॅपटॉप त्यांना दिला आणि त्यांना निरोप देऊन तो बॉसकडे वळला.
बॉसच्या समोर एक दुसरा तरूण बसला होता. हवालदार वगैरे बघून तो थोडा बावरला होता. बॉसने ओळख करून दिल्यावर तर तो एकदमच घाबरल्यागत झाला. रमेशनं डोळ्यानंच खूण केल्यावर बॉस बाहेर गेला.
"टेन्शन घेऊ नका. रूटिन चौकशी आहे!" रमेश खुर्चीत बसत म्हणाला. तो तरूण काही कम्फर्टेबल झाल्यासारखं वाटलं नाही.
"तुम्ही कधी डम्प केलंत क्षमाला?" रमेशनं पूर्वानुभवावरून प्रश्न केला.
"मी आणि डम्प! क्षमानं मला डम्प केलं साहेब!"
रमेशला आश्चर्य वाटलं. "सहसा मुलं डम्प झाल्याचं मान्य करत नाहीत!"
"आता खरी गोष्ट मान्य करण्यात काय आहे साहेब! ती खूप टॅलेन्टेड मुलगी होती. खूप हुशार. एकदम फ्युचरिस्टिक! आणि मी असा साधा. आमचं जमलंच कसं हा प्रश्न पडायचा कधीकधी. तिची स्वप्न मोठी होती साहेब! तिला मोठं करियर करायचं होतं, खूप श्रीमंत व्हायचं होतं. त्यासाठी ती नातीदेखील सॅक्रिफाईज करायला तयार होती."
"नातीदेखील म्हणजे?"
"म्हणजे साहेब, कुटुंबापासून तर दूर ती राहतच होती. आणि इथेदेखील तिला बॉयफ्रेंडची जरब पसंत पडायची नाही. मग ती डम्प करायची बॉयफ्रेंड."
"तुमचं पण तसंच का?"
"नाही. माझी स्वप्न वगैरे सगळंच सामान्य होतं, हे माझ्याही लक्षात आलं होतं. पण मी काही करायच्या आतच तिनं निर्णय दिला." तो आता बर्यापैकी रिलॅक्स झाल्याचं जाणवत होतं. त्याच्या डोळ्यांत रमेशला सत्य दिसत होतं.
"बरं ठीक. जाऊ शकता तुम्ही! गरज पडली, तर परत बोलवेन मी!" रमेशनं सामान्य आवाजातच स्मितहास्य करत म्हटलं.
तो उठून जात असताना, त्याच्या बोटातली साखरपुड्याची अंगठी रमेशच्या नजरेस पडली आणि रमेश स्वतःशीच हसला.
बॉस केबिनमध्ये आला आणि रमेशसमोरच उभा राहिला.
"तुमच्या ऑफिसात गेल्या आठवड्याभरात कुणी किती सुट्ट्या घेतल्यात त्याचा पूर्ण रेकॉर्ड मागितला होता मी, तो कुठाय?" रमेशनं बॉसला विचारलं.
"हा घ्या साहेब." बॉसनं एक मोठी फाईल पुढे केली.
रमेशनं फाईलच्या जाडीकडे एक दृष्टिक्षेप टाकला. "मी ही बरोबर घेऊन जाऊ शकतो?"
"साहेब, ते ऑफिशियल रेकॉर्ड्स आहेत. हवंतर मी कॉपी काढून देऊ?"
"नको, मी असं करतो, मी घेऊन जातो आणि कॉपी काढून घेऊन लगेच पाठवून देतो."
बॉसनं फक्त मान डोलावली.
रमेश फाईल घेऊन बाहेर पडला आणि थेट क्षमाच्या डेस्कजवळ गेला. तिथलीच एक खुर्ची ओढून बसला. आजूबाजूचे सगळे त्याच्याकडे पाहू लागले.
"मला तुम्हा सगळ्यांशी क्षमाबद्दल काही साधी विचारपूस करायचीय."
-------------------------
"शिंदे, तो फॉरमॅटेड हार्डडिस्क रिकव्हरीवाला बोलावला होता, तो आला का?"
"हो साहेब." शिंदे कोपर्यात बसलेल्या एका पोरगेल्याशा युवकाकडे बोट दाखवत म्हणाले.
रमेशनं लॅपटॉपमध्ये पासवर्ड टाकून लॉगिन केलं आणि तो त्या मुलापुढे केला. "ह्या हार्डडिस्कमध्ये जितकापण डिलीटेड डेटा आहे तो पूर्ण रिकव्हर करून दे." मग तो शिंदेंकडे वळून म्हणाला. "शिंदे, बँकेचे रेकॉर्ड्स मागवले होते मी आणि ती फाईल पोचती केली का मी आणलेली, त्याची कॉपी कुठाय?"
"साहेब टेबलावरच आहे सर्व. फाईल पोचती केली." आता रमेशला चहा लागणार हे ओळखून शिंदे चहा सांगायला गेले. कॉम्प्युटरवाला मुलगा एका कोपर्यात काम करत होता. रमेशनं त्या भल्यामोठ्या कॉपीच्या पहिल्या काही पानांवर नजर फिरवली. सुट्टीवर असलेल्या कर्मचार्यांची काही नावं होती. शिंदे चहा सांगून परतले.
"शिंदे, बँक रेकॉर्ड्सवरून काही क्ल्यू लागतोय का? आणि फॉरेन्सिकवाले?" रमेश बँक रेकॉर्ड्स चाळत म्हणाला. रमेशला पोलिस स्टेशनात शिरल्यापासून खूप बरं वाटत होतं. दोन दिवसांपासून जाणवणारा अस्वस्थपणा कमी झाला होता. त्याला एकदम उत्साह आल्यागत झालं होतं.
"फॉरेन्सिकवाले उद्यापर्यंत डिटेल्स देतील. पण वेळ तर त्यांनी कालच सांगितली होती खुनाची."
"ते मलाही ठाऊक आहे शिंदे!"
"आणि बँक रेकॉर्ड्स?" आणि एकदम रमेशची नजर बँक रेकॉर्ड्सवर थबकली. त्यानं पुन्हा ते नाव वाचलं, "पुरूषोत्तम रानडे."
"तो शेजारी? त्याचं नाव इथे?" शिंदेपण गोंधळले.
"तिच्या एका इन्शुरन्स प्रिमीयमचा चेक रानडेंनी दिलाय. चांगली मोठी रक्कम आहे." रमेशच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं.
"रानडे आणि क्षमा..." रमेशनं फाईल अजून एकदा चाळली. "शिंंदे, फोन रेकॉर्ड्सचं काय झालं?"
"साहेब, टेलिफोन लिस्टमध्ये तिला सर्वांत जास्त वेळा वारंवार येणारा एक नंबर आता अस्तित्वात नाहीये, फेक नावाने घेतलेलं सिमकार्ड होतं ते."
"हम्म! डेड एन्ड! पण हरकत नाही, रानडेंचा दरवाजा तर उघडलाय."
"पण साहेब, हल्लीच एका नव्या नंबरवरून कॉल्स येऊ लागले होते."
"आयडेंटिफाईड नंबर आहे?"
"होय. कुणीतरी रोहन म्हणून आहे. रोहन क्षीरसागर."
"रोहन क्षीरसागर? कुठेतरी वाचलंय मी." आणि एकदम रमेशच्या डोक्यात प्रकाश पडला. त्यानं ऑफिसच्या सुट्ट्यांची फाईल उघडली. आणि तिसर्या पानावर त्याला ते नाव दिसलं. 'रोहन क्षीरसागर.' त्याच बाडामध्ये शेवटी सगळ्यांची पूर्ण माहिती होती. रमेशनं त्याच्या माहितीचं पान उघडलं. आणि रोहनचा टाय घातलेला प्रसन्न फोटो पाहिला. फोन नंबर बघितला आणि शिंदेंकडच्या रेकॉर्ड्सबरोबर मॅच केला. आणि एकदम टिचकी वाजवली.
"अजून एक दरवाजा!" असं तो म्हणेस्तोवर त्याला एकदम वीजेचा धक्का बसल्यागत झालं. त्यानं रोहनच्या फोटोकडे निरखून पाहिलं. पुन्हा पुन्हा निरखून पाहिलं. "होय. तोच!" रमेश मनाशीच म्हणाला.
क्रमशः
No comments:
Post a Comment