Tuesday, May 26, 2015

हत्या -३

हत्या -३

"शिंदे, चला चटकन. बहुतेक आपण योग्य रस्त्यावर आहोत." रमेश पत्ता लिहिलेलं पान उचलून घेत म्हणाला.
"साहेब, ह्या हार्डडिस्कचं काही होऊ शकत नाही." तो पोरगेला तरूण एकदम म्हणाला.
"काय? का?" रमेश म्हणाला, पण एकदम त्याला वेळ जात असल्याची जाणीव झाली. "बरं सोड. निघ आता तू. आम्ही नंतर बोलावू तेव्हा सविस्तर सांग." असं म्हणत तो खोलीबाहेर पडला देखील. तो तरूण दोन सेकंद दरवाज्याकडे बघत राहिला. मग त्यानं समोरच्या हवालदाराकडे बघितलं. हवालदारानं खांदे उडवले. मग तरूणानंही खांदे उडवले आणि जागेवरून उठला.
-------------------------
रमेश आताशा खून झालेल्या इमारतीजवळ आला.
"साहेब, आपण इथे का आलोय?" शिंदे म्हणाले.
"पेशन्स शिंदे, आपण अजून कुठेही आलेलो नाही." आणि त्यानं जीप इमारतीवरून पुढे घेतली. दोन गल्ल्या सोडल्यावर तिसर्‍या गल्लीत एका इमारतीपाशी येऊन रमेशनं जीप थांबवली. सहसा शिंदे जीप चालवत, पण जेव्हा रमेश एक्सायटेड असे, तोच जीप चालवत असे.
रमेश धडाधड जिने चढून तिसर्‍या मजल्यावर पोचला आणि ३०१ नंबरच्या फ्लॅटकडे त्यानं पाहिलं. दरवाज्यावर मोठं कुलूप लटकलेलं होतं. शिंदे मागून धावत आले आणि त्यांना हताशपणे उभा रमेश दिसला.
"आपल्याला बहुतेक उशीर झाला." रमेश म्हणाला आणि दरवाज्याची पाहणी करू लागला. "दरवाजा तोडून आत शिरण्यात काही लॉजिक नाहीये. आपल्याकडे तेव्हढे सबळ पुरावे नाहीत. शेजारी पाजारी विचारा चावी आहे का कुणाकडे?" रमेश अर्धवट स्वतःशी आणि अर्धवट शिंदेंशी बोलत होता.
दरवाज्यासमोरच्या जमिनीवरून आणि कुलूपावरून घर वापरात असल्याचं स्पष्ट होतं. अगदी सकाळपर्यंत कुणीतरी घरात होतं हे रमेशनं पक्कं ताडलं होतं. पण त्याच्या डोक्यात आत्ता जे चालू होतं, त्याचा त्याला संदर्भ लागत नव्हता. रोहनचं कोडं विचित्रच होतं. त्याला कुठल्याही स्थितीत त्या घरात शिरणं भाग होतं.
शिंदेंनी शेजारच्या घराची बेल वाजवल्यावर शेजार्‍यांनी दार उघडलं.
"रोहन इथेच राहतो ना?" रमेश दरवाज्यात उभा राहूनच विचारत होता.
"हो हो..इथेच" शेजारी पोलिसांना दारात पाहून थोडा हबकला होता.
"आणि कुणी राहतं त्याच्यासोबत?"
"नाही साहेब, एकटाच राहतो."
"नक्की?"
"हो साहेब!"
"तो सकाळी पेपरसुद्धा टाकतो का?"
"होय साहेब! खूप मेहनती पोरगा आहे. पेपर टाकत टाकत त्यानं शिक्षण पूर्ण केलं आणि नोकरी लागल्यावरसुद्धा अजूनही सकाळी पेपर टाकायला जातो आणि मग कामावर जातो."
रमेशच्या डोक्यातली चक्र खूप वेगानं फिरू लागली होती. "त्या घरात दरवाजा न तोडता शिरण्याचा काही मार्ग?" रमेशनं शेजार्‍याकडे रोखून पाहत विचारलं.
रमेशनं अंतराचा अंदाज घेत, तिसर्‍या मजल्यावरच्या शेजारच्या गॅलरीतून रोहनच्या गॅलरीत उडी टाकली. क्षणभर शिंदेंचं हृदय बंदच पडलं होतं.
गॅलरीच्या खिडकीच्या गजांतून आत हात घालून त्यानं दरवाजा आतून उघडला आणि तो घरात शिरला.
थोड्या वेळाने काही पुस्तकं, दोन रुमालात गुंडाळलेले ग्लास आणि काही कागदपत्र एका पिशवीत भरून त्यानं शेजारच्या गॅलरीत शिंदेंकडे भिरकावली आणि मग पुन्हा एक उडी मारून तो परतला.
"शिंदे, आपल्याला हे घर उघडायसाठी सर्च वॉरंट मिळण्याची सोय ऑलमोस्ट झालीय." तो विचारमग्न मुद्रेनं म्हणाला. आणि मग शेजार्‍याकडे वळून म्हणाला. "तुमची खात्री आहे की रोहन एकटाच राहायचा?"
"होय, नक्कीच साहेब. नक्कीच तो एकटा राहायचा, लहानपणापासून तो इथेच राहतो, त्याचे आई-वडीलही इथेच गेले होते, मी त्यांनाही ओळखायचो. पण तुम्ही असं का विचारताय साहेब?"
"कारण घरात दोन माणसं वावरत असल्याचं जाणवत होतं. असो. शिंदे, चला, आज बहुतेक घरी जाणं मुष्किल होणार आहे." मग तो पुन्हा शेजार्‍याकडे वळून म्हणाला. "तुमची खूप मदत झाली. रोहन परतला किंवा काहीही ठावठिकाणा लागला, तरी लगेच ह्या नंबरवर फोन करा." असं म्हणत रमेशनं त्याचा मोबाईल नंबर लिहिलेला एक कागदाचा कपटा काढून शेजार्‍याच्या हातात दिला.
"साहेब, पण त्या रानडेंचं काय?" शिंदेंनी इमारतीतून बाहेर पडता पडता प्रश्न केला.
"सध्या रानडेंना आपण बाजूला ठेवू. आधी मला ह्या रोहनचा ठावठिकाणा लावायचाय." शिंदेंना प्रश्न पडला होता, की रोहनविरूद्ध असं काय मिळालंय रमेशला?
बोलत बोलत रमेश गाडीकडे जायच्याऐवजी मुख्य रस्त्याकडे चालत निघाला. शिंदे सावध झाले. रमेश 'उमाकांत पेपर एजन्सी' लिहिलेल्या दुकानाजवळ आला.
-------------------------
"डॉक्टर, तुम्हाला काय वाटतंय हे वाचून?" रमेश डॉक्टरांच्या चेहर्‍यावरच्या भावांचं निरीक्षण करत होता. डॉक्टर शांतपणे त्या फाटक्या, विटलेल्या वहीतली शिल्लक पानं वाचत होते.
दिवस - १
धूर. हा धूर घेरून राहिलाय मला. धुरानं अख्खा आसमंत भरून गेलाय की फक्त मलाच घेरून राहिलाय हा धूर? आणि खरंच धूर आहे? धुराच्या ह्या विळख्यात संवेदना खरंच बोथट होताहेत की बोथट झाल्याचा नुसताच भास? पावलं अचानक हलकी वाटायला लागलीत. मी हलका अगदी पिसासारखा होतोयसं वाटतंय. हे सत्य की स्वन? वास्तव की आभास? खरं की खोटं? हे सगळे विचार योग्य की अयोग्य आणि हा धूर?
इथे असं धुरानं वेढलेल्या बागेत फिरताना 'तो' कुठे असतो? का येत नाही तो इथे? मी निघतो, तेव्हा अगदी तोंडभरून हो म्हणतो, पण मग येतंच नाही. आता दोन वर्षं उलटली इथे येऊन, पण त्याच्या वागण्यात काहीच फरक नाही. जाऊ दे झालं. तिथे खोलीत तरी तो सोबत असतोच ना! आपला सांगाती, आपला सोबती. पण तो इथे येत नाही. आपणही कधी खोदून विचारत नाही. निघताना येतोस का? म्हणून विचारलं तर हो म्हणतो आणि 'तू पुढे हो' म्हणून सांगतो. पण येत कधीच नाही. मी एकटाच इथे ह्या धुराच्या साम्राज्यात. पण खोलीत कधी असा धूर दिसत नाही. पण तो आसपासच कुठेतरी असल्याची जाणीव सतत असते. पुन्हा ह्या धुराला एक चिरपरिचित असा गंध येतो. काय नातं आहे ह्या गंधाशी आपलं? हा गंध खोलीतही येत राहतो. खोलीत 'तो' सोबत असतो, तेव्हा हे चित्रविचित्र भासही होत नाहीत. नाही नाही! मी खोलीतच राहायला पाहिजे. 'तो' सोबत असला की हे बेकार भास होणार नाहीत. पावलं हलकी काय! डोकं जड काय!
दिवस - ५
काल काकू म्हणाल्या त्याप्रमाणे हा खरंच माझ्याबरोबर येईल का इथे? मी आजही विचारलं त्याला येताना, तर तो नेहमीसारखाच 'येतो' म्हणाला. आता बराच वेळ होत आला. ही आजूबाजूची माणसंही परत जायला लागलीत हळूहळू. हा आजही येणार नाही की काय?
आयला! तो चक्क येतोय! इकडेच येतोय. आज दोन वर्षं उलटून गेलीयेत इकडे येऊन. पहिल्यांदाच त्याला इथे पाहतोय. मी तर स्वतःच इथे येणं सोडणार होतो. 'तो' बागेत नसतो, तेव्हा करमत नाही मला म्हणून. पण मग काकूंनी खूप आग्रह केला, म्हणून आलो आजपण. तर चक्क हा आला इथे. आत्ता त्याला पाहण्यासारखं आहे. खोलीत मारे मला शहाणपणा शिकवत असतो, आणि इथे कसा भिजलेल्या मांजरासारखा येतोय. इकडे तिकडे चोरासारखा पाहत का येतोय हा? कसा का असेना, येतोय हे महत्वाचं! आता कदाचित हा धूरही जाईल. स्वच्छ हवेत श्वास घेता येईल. एखादेवेळेस फुलांचा सुगंधही जाणवेल आपल्याला. तोच तो गंध कायम घेऊन विटलोय मी. अरे पण हा इतका हळूहळू का येतोय?
वेडाच आहे हा! मी हाका मारल्या तशी सगळी लोकं पाहायला लागली म्हणून हा घबरून चक्क आल्यापावली परत गेला. पण जाताना मात्र अगदी जोरात पळून गेला. कमालच झाली. आता सगळे शांत असताना मी ओरडून हाका मारल्यावर लोक पाहणारच ना! त्यात लाजण्यासारखं काय आहे? विचारूया आता जाऊन, एव्हढं काय अगदी!
दिवस - ४०
गेल्या दोन महिन्यांपासून हा माझ्याबरोबर इथे येतो खरा, पण तेव्हापासून त्याचं बोलणं कमी झालंय. बागेतही मी ह्याच्याशी बोलतो, तेव्हा आजूबाजूचे वळून बघतात म्हणून हा नुसताच कावराबावरा होऊन इकडे तिकडे पाहत राहतो. काहीतरी जुजबी बोलतो. आणि त्यामुळे खोलीतही जास्त बोलत नाही. रागावलाय का माझ्यावर तेही कळत नाही. खोलीत हे विचारावं तर विषय बदलतो. काहीतरी बिनसलंय खास. आत्ता इथे बागेत विचारूही शकत नाही त्याला. पुन्हा बावरून जायचा. पण एक मात्र खरं. धूर कमी व्हायला लागलाय. की तसा भास होतोय मला? की मुळात धूर हाच भास आहे?
-------------------------
डॉक्टर कुर्लेकरांनी 'मनःशांती उपचार केंद्र' लिहिलेली ती छोटीशी वही खाली ठेवली आणि नाकावर घसरलेल्या चष्म्याच्या वरून रमेशकडे पाहिलं. रमेशच्या चेहर्‍यावर मोठं प्रश्नचिन्ह साफ दिसत होतं.
"माझा प्राथमिक निष्कर्ष आहे - मल्टिपल.."
"पर्सनालिटी डिसॉर्डर?" रमेश एक्साईट होऊन म्हणाला.
डॉक्टरांनी फक्त हुंकार भरला आणि म्हणाले, "ही त्याला केंद्रात असताना लिहायला दिलेली डायरी वाटते. ह्याचा उपयोग करून बहुतेक, पुढील उपचारांची दिशा ठरवली जाते. पण ही वही रुग्णाला कुणी देणार नाही."
"कदाचित तो चोरून घेऊन आला असेल, तिथून येताना."
"शक्य आहे. आणि ती त्यानं नीट ठेवल्याचं दिसत नाहीये. अर्ध्याहून अधिक पानं गायब आहेत."
"घरात दिसली तरी नाहीत, एक्स्टेन्सिव्ह सर्च करावी लागेल."
"म्हणजे हा खुनी असू शकतो."
"एक मिनिट, पण आधी तो हिंसक आहे का? किंवा त्याचा आजार कितपत आहे, हे आपल्याला त्याच्या डॉक्टरांशी बोलूनच कळेल." डॉक्टर वहीवर टिचकी मारत म्हणाले, "किंवा तो अजून आजारी आहे का?" डॉक्टरांनी पुन्हा चष्म्यावरून त्याच्याकडे रोखून पाहिलं.
"तो अजून आजारी आहे हे नक्की. कारण तो पेपर एजन्सीमध्ये 'जीतू' ह्या नावाने ओळखला जातो आणि नंतर कामावर जाताना ओळखता येणार नाही इतपत त्याच्या व्यक्तिमत्वात बदल होतो."
"पण हा डिसगाईज कशावरून नसेल?"
"कारण त्याच्या घरात दोन माणसं वावरत असल्यासारख्या गोष्टी आहेत. दारूचे दोन दोन ग्लास, आंघोळीचे दोन टॉवेल. दोन टूथब्रश, दोन साबण. आणि हातांचे ठसे मात्र एकाच माणसाचे!"
"ह्म्म." डॉक्टर विचारात पडले. "आपण मनःशांती उपचार केंद्रात जायला हवं."
-------------------------
रमेश थकूनभागून पोलिस स्टेशनात परत आला तेव्हा संध्याकाळचे आठ वाजत आले होते.
"साहेब, काही कळलं पुढे?" शिंदे म्हणाले.
"एव्हढंच की हा रोहन फार वर्षांपूर्वीपासून मनोरुग्ण आहे." रमेश खुर्चीत विसावत म्हणाला. "तो बरा झाला अशी उपचार केंद्राची खात्री पटली म्हणून त्याला ८ वर्षांपूर्वी सोडून देण्यात आलं. हा जीतू-रोहनचा खेळ पार तेव्हापासून चालूच आहे."
"म्हणजे त्यानं खून केलेला असू शकतो?"
"शक्य आहे. कारण त्यानं केलेल्या भरमसाठ कॉल्सवरून तो क्षमाला चांगला ओळखत असावा. त्यामुळे लॉक न तोडता बेल वाजवून तो आत जाऊ शकतो."
"कदाचित त्याचं अफेयरही असू शकतं तिच्याशी." शिंदेंचं हे वाक्य का कुणास ठाऊन रमेशला खटकलं. "आणि कदाचित तिनं त्यालाही डम्प करायची भाषा केली असेल, त्यामुळे हिंसक होऊन त्यानं तिचा खून केलेला असावा."
रमेशला आता पुन्हा तीच मळमळ जाणवू लागली. कदाचित दिवसाच्या थकव्याचा परिणाम असावा, असं समजून रमेशनं दुर्लक्ष केलं.
"पण गंमत ही आहे शिंदे, की जरी रोहननं खून केला असला, तरी ते जीतूला कळणार नाही आणि जीतूनं केला असला, तर ते रोहनला कळणार नाही!"
शिंदे पूर्ण गोंधळले होते.
"पण साहेब, तुम्ही त्या रानडेंना का मोकळं सोडलंयत?"
"ह्म्म्म. तुम्ही म्हणता तर उद्या चलू तिथे, पण मला वाटत नाही तिथे फारसं काही हाती लागेल."
"पण साहेब, मला एक कळत नाही, तुम्ही नेहमी शेजार्‍यांची कसून चौकशी करता, मग ह्यावेळी असं का?"
"शिंदे, रानडे खुनाच्या दिवशी रात्री शहराबाहेर होते, ह्याची भक्कम ऍलिबी आहे त्यांच्याजवळ. त्यांच्या नातेवाईकांकडे मी तिथल्या इन्स्पेक्टरला पाठवून मी खातरजमा करून घेतलीय आधीच. त्यामुळे त्या मजल्यावर कुणीच उरत नाही. आणि क्षमाच्या तोंडावर हात दाबून धरल्याचे वळ आहेत, त्यामुळे बहुतेक तिचा आवाज कुणी ऐकला नसल्याची शक्यता मान्य करून इमारतीतल्या बाकी रहिवाशांंवर विश्वास ठेवणं भाग आहे सध्या!"
"पण साहेब, तुम्हाला ठाऊक आहे का? क्षमा राहत होती तो फ्लॅटदेखील रानडेंचाच आहे. क्षमा भाडेकरू होती!"
"काय सांगताय काय शिंदे?" रमेश चपापला. "हा तपशील माझ्या नजरेतून कसा काय सुटला?"
"छोटासा तपशील होता साहेब. तुम्ही गेल्यावर मी मोकळाच होतो, म्हणून क्षमाच्या कपाटातून मिळालेली सगळी कागदपत्रं वाचत होतो, तेव्हा माझ्या लक्षात आलं."
"ग्रेट जॉब शिंदे!" रमेश कौतुकानं म्हणाल्यावर शिंदेंनाही आनंद झाला. "बरं पण आता उशीर झालेला आहे. तुमची ड्यूटीही संपलीय. आता तुम्ही घरी जाऊन आराम करा. उद्या पुन्हा दगदग आहेच!" रमेश टेबल सारखं करत म्हणाला.
"पण साहेब तुम्ही?"
"हा बहुतेक पोस्टमॉर्टेमचा आणि इतर फॉरेन्सिक्सचा रिपोर्ट आलाय. तो स्टडी करतो जरा आणि काही वॉरंट्स मिळवण्यासाठी थोडी फॉर्मॅलिटी करावी लागेल तीही पूर्ण करतो. तुम्ही व्हा पुढे!"
"अरे हो साहेब, ते सांगायचंच राहिलं, रिपोर्ट्स आल्याचं! आणि उद्या बहुतेक त्या क्षमाची फॅमिली बॉडी कलेक्ट करेल त्याचे कागद मी तयार केलेत, तुम्हाला सह्या तेव्हढ्या करायला लागतील. आणि हो, ते पत्रकार लोक आले होते. खून उघडकीस आल्या दिवसापासून तुम्हाला शोधताहेत. मी ब्रीफिंग दिलंय नेहमीचंच." शिंदे डोळे मिचकावत म्हणाले. "पण अजून आठवडाभर तरी जोशातच असतील ते लोक. नंतर काही नवीन सनसनाटी बातमी आली, तर आपलं नशीब!"
"थँक्स शिंदे. तुम्ही माझं बरंच काम हलकं केलंत. उद्या भेटू." तो हसून म्हणाला.
शिंदे गेल्यावर तो पोस्टमॉर्टेम रिपोर्ट, ते बॉडी कलेक्ट करण्याचे कागद, क्षमाच्या पॉसिबल अफेयर्सचा आणि खुनाचा संबंध, ह्या सगळ्या गोष्टींमुळे रमेशचं डोकं भणभणायला लागलं. ती मळमळ पुन्हा सुरू झाली. त्यातच दिवसभराचा आलेला प्रचंड थकवा. त्यानं डॉ. कुर्लेकरांनी दिलेल्या गोळ्या घेतल्या आणि डोळ्यावर पाण्याचा सपकारा मारण्यासाठी उठला. अजून बराच वेळ त्याला काम करायचं होतं.
-------------------------
शिंदे पोलिस स्टेशनात आले तेव्हा रमेश टेबलावरच डोकं टेकून झोपला होता.
"साहेब.." शिंदेंनी त्याच्या हातावर थोपटलं.
रमेश चटकन उठला आणि बाथरूमकडे गेला.
आज रमेश जीप चालवत नव्हता.
"पोस्टमॉर्टेममधून काही फारसं हाती लागलेलं नाही शिंदे. खून तीन वारांमुळे झाल्याचंच म्हटलंय. रात्रीच्या १० च्या जवळपास. मर्डर वेपन एक मोठा मांस कापायचा चाकू असावा असं म्हटलंय. आणि मला वाटत होतं तेच, खुनी तिच्याहून उंच असावा. जास्त झटापट झालेली नाही, हे तर आपल्यालाही दिसलं होतंच. आणि तोंडावर हात दाबून ठेवल्याचंही कन्फर्म केलंय, ज्यामुळे तिच्या स्वरयंत्रावरही ताण पडल्याचं लिहिलंय. घरामध्ये अनेक जणांच्या हातांचे ठसे मिळालेत. पण.." रमेशच्या आवाजात थोडा उत्साह आला.
"पण काय साहेब?"
आणि मी रात्रीमध्येच एका मित्राला फोन करून उठवून रोहनचे ठसे मॅच करून बघायला सांगितले आणि रोहनच्या हाताचे ठसेही तिच्या घरामध्ये असल्याचं कन्फर्म झालंय. आता फक्त मर्डर वेपन मिळालं ना शिंदे, तर बराच ताण हलका होईल आपला."
"आणि रानडे?"
"त्याच्याही हातांचे ठसे आहेत घरात. पण रानडे क्षमापेक्षा उंच नाहीत शिंदे."
"पण वार करताना जर क्षमा गुडघ्यांवर बसलेली असेल तर?"
रमेश विचारात पडून म्हणाला. "मर्डर वेपन हीच गुरूकिल्ली आहे शिंदे!" तोवर दोघे खून झालेल्या इमारतीपर्यंत पोचले.
"एक मिनिट शिंदे! आपण आधी बँकेत जाऊया. आणि मग रानडेंकडे येऊया."
दोन तासांनंतर रानडेंच्या घरातून बाहेर पडताना शिंदेंचा चेहरा थोडा पडला होता.
"काय झालं शिंदे?" रमेश शिंदेंच्या चिंताग्रस्त चेहर्‍याकडे पाहत म्हणाला.
"माझा अंदाज़ चुकला बहुतेक. रानडे निर्दोष दिसताहेत." शिंदे खजील होत म्हणाले. "बँक कर्मचार्‍याचं स्टेटमेंट आणि रानडेंचं स्टेटमेंट एग्झॅक्ट मॅच होतंय. क्षमाच्या खात्यात पैसे नसल्यानं रानडेंनी चेक दिला असेल आणि पुढच्या भाड्यातून पैसे वळतेही झालेत. रानडे क्षमाला मुलीसमान मानत होते असं जे ते सांगताहेत, ते एकंदर खरं दिसतंय साहेब!"
रमेश अजूनही विचारात होता. "इथेच तुम्ही चुकता शिंदे. एकतर पराकोटीचा अविश्वास नाहीतर पटकन विश्वास!" तो शांतपणे जीपच्या पॅसेंजर सीटवर बसत म्हणाला. "बँक कर्मचारी विकतही घेतला जाऊ शकतो. स्टेटमेंट पाठही केलं जाऊ शकतं."
शिंदे गोंधळून गेले होते. रमेशच्या चेहर्‍याकडे बघत अदमास घेण्याचा फोल प्रयत्न करत होते.
"आता असं करा. आपण त्या फेक सिमकार्डच्या फोन कंपनीच्या ऑफिसात जाऊ. गेल्या चार पाच केसेसमुळे तिथे माझा एक चांगला मित्र झालाय. आणि हो, त्या हार्डडिस्कवाल्याबद्दल तर मी विसरूनच गेलो होतो. रस्त्यात त्याच्या दुकानावर घ्या गाडी. आणि पाटीलना फोन करून क्षमाच्या फ्लॅटची आणि इमारतीच्या ड्रेनेजची कसून झडती घ्यायला सांगा, हे घ्या" म्हणून त्यानं आपला मोबाईल त्यांच्या पुढे केला.
"साहेब, मोबाईलची बॅटरी डाऊन आहे!"
"ओह्ह! काल रात्री चार्जिंग राहिलंय. त्या हार्डडिस्कवाल्याच्या दुकानावर घ्या गाडी."
रमेशनं मोबाईल चार्जरला लावला आणि लगेच सुरू केला.
"काय म्हणत होतास काल हार्डडिस्कचं काही होणार नाही म्हणून?" रमेशचं लक्ष अजूनही मोबाईलकडेच होतं.
"साहेब, ती हार्डडिस्क नवीकोरी आहे. त्यात जो डेटा आहे, तो नुकताच कॉपी केलेला आहे, त्याव्यतिरिक्त त्यात कधीच काहीच डेटा नव्हता, त्यामुळे रिकव्हर कसा करणार?"
"ओह्ह...म्हणजे लॅपटॉपची हार्ड डिस्क बदलली गेलीय?"
"होय साहेब!"
"मी कंपनीत विचारून बघतो. पण समजा बाहेरून कुणी बदलली असेल, तर नवी हार्डडिस्क कुठून घेतलीय ते कळेल का सिरियल नंबरवरून?" मोबाईल सुरू झाला होता, एक अनरेड मेसेज होता.
"तसं अवघड आहे कारण इन्स्टॉल करायला ऍडमिन राईट्स लागतील, पण एखादा कॉम्प्युटर एक्सपर्ट किंवा हॅकर करू शकेल साहेब. आणि हार्डडिस्कचे मेजर सप्लायर्स माझ्या ओळखीचे आहेत तसे, पण त्यांच्याकडून कुणी विकत घेऊन कुणाला विकली हे कळणं अवघड आहे!"
रमेशला मिस्ड कॉल्सचा मेसेज होता, त्याने त्या नंबरवर कॉल लावला. पलिकडचा आवाज ऐकल्याबरोबर रमेश उठून उभा राहिला. दोन मिनिटांनी त्यानं फोन ठेवला.
"शिंदे, मी घोळ घातला. रोहन ऊर्फ जीतू सकाळी घरी येऊन गेला. आणि माझा मोबाईल बंद होता." रमेश वैतागून म्हणाला. "चला लवकर, आज सर्च वॉरंटही आहे, झडती घेऊ घराची!"
रमेश आणि शिंदेंना रोहनच्या घरून काहीही मिळालं नाही. पण बहुतेक फक्त रोहनच गायब झाला होता. जीतू अजूनही रात्री घरी येऊन पहाटे गायब होत होता. तो पहाटे 'उमाकांत पेपर एजन्सी' वरून पेपरही घेऊन गेला. पण मग मात्र गायब झाला होता. आता रात्रीची वाट बघण्याखेरीज मार्ग नव्हता. दोन कॉन्स्टेबल्सना सिव्हिल ड्रेसमध्ये त्याच इमारतीत थांबण्यास सांगून रमेश क्षमाच्या आई-वडिलांनी दिलेल्या पत्त्यावर निघाला. आज क्षमाचे अंत्यसंस्कार होते. रमेशला का कुणास ठाऊक तिथे जावंसं वाटत होतं.
-------------------------
"शिंदे! क्षमाच्या आई-वडिलांकडून त्यांचा शहरातला पत्ता तुम्ही लिहून घेतला होतात?" रमेश स्मशानातून बाहेर पडताना म्हणाला.
"हो!"
"ते तिच्या सख्ख्या भावाकडे थांबलेत असं म्हणाले होते?"
"हो!"
"मग शिंदे, हे मला सांगणार कोण?" रमेश वैतागला होता.
"मला काही वावगं वाटलं नाही!"
"तुम्ही शेजार्‍यांच्या मागे लागता शिंदे पण सख्ख्या भावाकडून कितीतरी महत्वाचे क्ल्यू लागू शकतात एव्हढं साधं तुम्हाला कळू नये?"
"पण साहेब, तो हल्लीहल्लीच शहरात आलाय. लहान आहे तो. कॉम्प्युटरचा कसलासा कोर्स करतोय म्हणत होते!"
"आणि तो सख्ख्या थोरल्या बहिणीबरोबर राहत नव्हता!" रमेश शिंदेंकडे रोखून पाहत म्हणाला. शिंदे ओशाळले. "उद्या सकाळीच त्याला स्टेशनात बोलावून घ्यायची जवाबदारी तुमची!" शिंदेंनी मान डोलावली. "चला आता मोबाईल कंपनीच्या ऑफिसात!"
जीपमध्ये बसता बसता रमेशनं क्षमाच्या बॉसला फोन लावला आणि हार्डडिस्क बदलाबद्दल विचारू लागला.
"म्हणजे हे सिमकार्ड ज्या दुकानातून घेतलं गेलंय, त्या दुकानापासून खूपच दूरच्या एरियामध्ये जास्तीत जास्त वापरलं गेलंय तर!" रमेश त्याचा मित्र कविनकडे पाहत विचारत होता.
"होय. हे सहसा स्वस्तिक कंपाऊंडच्या भागात वापरलं गेलंय." कविन म्हणाला.
"जो हायफाय पब्ज आणि डिस्कोथेक्सचा तसंच काही कॉर्पोरेट ऑफिसेसचा भाग आहे!" रमेश म्हणाला. "आणि क्षमाच्या घराच्या बराच जवळ."
कविननं मान डोलावली. "आणि हे डिस्कंटिन्यू होऊन महिनाही झालेला नाही."
"तुम्ही लोक प्रॉफिटसाठी हे नीट व्हेरिफाय न करता कार्ड देता आणि आमचे वांधे होतात." रमेश उठत म्हणाला.
कविननं फक्त एक ओशाळवाणं स्मित केलं.
-------------------------
रात्री ८ वाजता शिंदेंना घरी सोडून रमेश पोलिस स्टेशनात पोचला, तेव्हा रमेशसाठी एक सरप्राईज वाट पाहत होतं.
"मी आरती. क्षमाची मैत्रीण!" थोडीशी दबकूनच इकडे तिकडे बघत ती तरूणी म्हणाली. "मला तुम्हाला काही सांगायचं होतं."
रमेशचे डोळे चमकले. "पण तुम्ही त्या दिवशी.."
"मी सुट्टीवर होते. आज परत आले, तर सगळं कळलं."
"ह्म्म.. बोला बोला, तुम्हाला जे काही माहिती आहे, ते सगळं सांगा."
"सर, क्षमाचं दोन वर्षांपूर्वीपासून एका ४०-४५ वर्षांच्या प्रौढ श्रीमंत माणसाशी अफेयर होतं."
"काय?" रमेशला पुन्हा एकदा शॉक बसला. केस गुंततच चालली होती.
"होय सर! ती पूर्णपणे त्याच्यात गुंतली होती. पण तो विवाहित होता. ही लग्नासाठी मागे लागत होती. पण तो टाळाटाळ करत होता. मग एके दिवशी कंटाळून त्यानं हिला टाळायला सुरूवात केली. पण हिचा इगो दुखावला गेला. मग हिनं त्याच तिरीमिरीत दोन-तीन अफेयर्स केली. पण तिचं मन मात्र 'त्या'च्यातच गुंतलेलं होतं. ती तरीही अधूनमधून त्याच्या मागे लागायची. त्यानंही हिला पुरतं टाकलं नव्हतं. ती मला विश्वासात घेऊन बरंच सांगायची."
"त्याचं नाव पुरुषोत्तम रानडे तर नव्हतं ना?" रमेशनं धीर करून प्रश्न विचारला.
"मला नाव ठाऊक नाही साहेब. ती फक्त घटना सांगायची. तिचे नॉर्मल बॉयफ्रेंड्स मात्र मला सगळे ठाऊक होते. सध्याच तिनं आमच्याच ऑफिसातल्या रोहनला गाठलं होतं."
केस प्रचंड गुंतली होती. त्यातच ह्या सगळ्या वर्णनांमुळे त्याची मळमळ पुन्हा उफाळून आली.
"बरं ते लोकं कुठे भेटायचे काही कल्पना?"
"नाही सर. ते फोनवर सुद्धा काही विचित्र कोडवर्ड्समध्ये बोलायचे."
"तुम्ही माझी खूप मोठी मदत केलीत. ह्यापुढेही काहीही आठवलं तर लगेच मला कळवा." असं म्हणून रमेशनं अजून एक कागदाचा कपटा घेऊन त्यावर मोबाईल नंबर लिहून तिला दिला आणि मनातल्या मनात मोबाईल चार्जर जवळच बाळगण्याची खूणगाठ बांधली.
-------------------------
रमेशला प्रचंड त्रास होत होता. आरती गेल्यानंतर मळमळ प्रचंड वाढली होती. त्यानं डॉ. कुर्लेकरांच्या गोळ्यादेखील घेतल्या, पण काहीच फरक पडत नव्हता. आरतीच्या स्टेटमेंटमुळेच कदाचित त्याची अवस्था इतकी बिकट झाली होती. रात्रीचे दहा वाजत होते, ड्यूटीवरचे हवालदार बदलले होते, आणि रमेश आपल्या विचित्र शारीरिक आणि मानसिक अवस्थेत अडकून पडला होता.
अचानक त्याचा फोन वाजू लागला.
"साहेब!" हवालदार मुसळेंचा फोन होता. "जीतू हाताला लागलाय. अगदी अलगद चालत जाळ्यात आला."
'तो अलगदच येणार, खून तर रोहनने केलाय ना!' रमेश फोन ठेवता ठेवता स्वतःशीच म्हणाला. आणि त्यानं डॉ. कुर्लेकरांना फोन लावला.
क्रमशः

No comments:

Post a Comment