Tuesday, May 26, 2015

गानू आजींची अंगाई : एक विलक्षण रंजक भयकथा

गानू आजींची अंगाई : एक विलक्षण रंजक भयकथा
मूळ कथा श्री ऋषीकेश गुप्ते यांची आहे..

त्या करकरीत तिन्हीसांजेला गानूआजींची अंगाई जशी मी ऐकली तशी ती दुसर्या कुणीही न ऐको,असं मला खुप वाटायचं;पण तसं घडायचं नव्हतं बहुदा.
जी भिती,जी काळीज गोठवणारी थंडगार भिती मी एवढी वर्षे मनाच्या जुनाट सांदीकोपर्यात गाडून टाकली होती,ती प्रचंड वेगाने सळसळत वर आली आहे. हजारो जहरी नागांनी एकावेळी दंश करावा असं काहीसं झालं आहे. सर्वांगाला कंप सुटतोय,हातपाय लुळावलेत आणि घशाला कोरड पडली आहे.
परवा मला गानू आजींची अंगाई आठवली.
गानू आजींची अंगाई !
भयंकर ! पण असं नको.आता लिहायचं असं ठरवलंच आहे तर सारं काही तपशीलवार ,मुद्देसूद आणि क्रमाक्रमाने लिहायला हवं.
मी अविनाश मधुकर ताम्हाणे.
सध्या वास्तव्य-हिंदु जिमखाना,दादर,मुंबई.
पण तेव्हा आम्ही सरपरणीत राहायचो.
सरपणी. वरच्या कोकणातलं एक शांत गाव. खेड्याकडून छोट्या नगराकडे झपाट्याने विकसीत होणारं. गर्द वृक्षाराईने नटलेल्या डोंगररांगांच्या अगदी कुशीत वसलेलं गाव. गावाला वळसा घालत भलं थोरलं पात्र असणारी नदी पुढे पुढे वाहात असे. गावात वस्तीही विपुल आणि संमिश्र. गाव सर्व जातीधर्माच्या लोकांना घेऊन सुखानं नांदणारं. पण गावावर सामाजीक,राजकीय वर्चस्व मात्र गानुंचेच होते. गानुंच्या नावाची वाडीही गावात होती.
गानु वाडी !
सरपणीत असताना आम्ही गानुवाडीत राहायचो.
मी,ताई,आई आणि बाबा. बाबा पाटबंधारे खात्यात इंजीनीयर होते. ते दिवसभर कामानिमित्ताने बाहेरच असायचे. रात्री कधीतरी उशीरा घरी परतायचे. तेव्हा आम्ही झोपी गेलेलो असायचो किंवा झोपेला आलेले असायचो.
त्यावेळी आजच्यासारखं नव्हतं. संध्याकाळी सातलाच सर्वांची जेवणं उरकायची. तोवर चिडिचुप अंधारही पसरलेला असायचा. आठ वाजेपर्यंत अर्ध्याहून अधिक गाव झोपेच्या आधिन झालेलं असायचं. रात्र झाली की दिवसा देखणं वाटणारं गाव कुरुप आणि भयावह वाटे.
सरपणीतला अंधार होताच तसा. काळाठिक्कर !
त्यातून गानूवाडी तर अंधाराचं साम्राज्यच. एखाद्या अनभिषक्त सम्राटाप्रमाणे गानूवाडीतला काळोख कायम पाय सोडून सुस्तावलेला असे.वाडीत काजू,फणस,आंबा,चिकू,पेरू,नारळ यांची दाट गर्दी. कधी आभाळ पाहायला जावं तर काही दिसतच नसे. सारं आकाश झाडांच्या पानांनी आणि फांद्यांनी झाकून गेलेलं. उजेडही कसा त्या पानांच्या गाळणीतून यावा तसा,हिरवट ,शेवाळी आणि थंड. काळोखाचं एक जुनाट अस्तर कायम ल्यालेला. पानांच्या चाळणीतून कित्येकदा गोलाकार,त्रिकोणी,चौकोनी अगदी हरेक आकाराचे उन्हाचे ठिपके जमिनीवर पडायचे. त्या पिवळट ठिपक्यांतून कुणी कधी चालत आलंच तर ओळखूच यायचं नाही. जमिनीवर पडलेले हे उन्हाचे रोगट ठिपके मी कधीकधी मोजू पहायचो;पण गणित कायमच चुकायचं.
गानूवाडीत गानूंचा भलाथोरला वाडा होता. रुंद आणि अजस्त्र. भक्ष्य गिळून सुस्त पसरलेल्या अजगरासारखा. दगड,माती,चुना आणि लाकडाचं जूनं बांधकाम. राकट आणि भक्कम. का कोण जाणे पण गानूवाडा मला कधीच आवडला नाही. तसं पाहता गानूवाडीत राहाणारी आम्ही सारी मूलं आत वाडयात जायचो,लपंडाव खेळायचो;पण एके प्रकारच्या अनिच्छेने. नानासाहेब गानूंचा थोरला मुलगा सुनंदन माझा वर्गमित्र असल्याने माझा वाड्यातला वावर इतर मुलांच्या तुलनेत थोडा जास्त होता. पण वाड्यात वावरताना मनात कायम भितीचे सावट असायचेच. कधीही गेलं तरी वाडा काळोख गिळून सुस्तावल्यासारखा वाटे. दिवे लावल्यावरही वाड्याच्या सांदीकोपर्यातून काळोखाच्या असंख्य भयंकारी जिभा लपलपत असत.
मुख्य दरवाज्यातून आत शिरलं की एक भली मोठी ओसरी लागायची. शेणानं सारवलेली. त्या हिरव्यागार सुकल्या शेणाचा वास मनाला सुखावत असे. ओसरीच्या दोन पायर्या वर चढून गेलं की पडवी. पडवीतल्या लोखंडी पलंगावर गानू आजोबा कायम माळ जपत बसलेले किंवा काहीतरी पोथी पुस्तक वाचत असलेले दिसायचे. पडवीच्या दारातून आत माजघर. चांगलंच प्रशस्त,चारी बाजूंनी वाटेल तेव्हढं फोफावलेलं. माजघराच्या डाव्या बाजूला मोठं देवघर आणि त्या देवघरात तेहेतीस कोटी देवांच्या प्रतिमा. निरनिराळ्या रंगाच्या,रुपांच्या,आकारांच्या प्रतिमा. देवघरात नेहेमीच अंधुक पिवळट प्रकाश मिणमिणत असे. दिव्याच्या ज्योतीसोबत हलणार्या, डचमळणार्या त्या उजेडात गानुंचे देवघर अंगावर शहारा आणी. कधी त्या हेलकावणार्या पिवळसर प्रकाशात मंद लालसर प्रकाश देणारा विजेचा दिवाही जळत असायचा. पिवळ्या आणि लाल रंगाच्या प्रकाशाचे ते फिकट मिश्रण देवघराला एक वेगळीच गुढ आणि भितीदायक पार्श्वभुमी पुरवी. त्या प्रकाशात देवघरातील देवांच्या प्रतिमा एखाद्या हिंस्त्र श्वापदासारख्या अंगावर धावून आल्यासारख्या वाटत. तांडवनृत्य करणारा शंकर, रक्ताळलेली जीभ बाहेर काढून सार्या जगाला गिळू पाहणारी काली आणि इतरही न जाणो कित्येक अज्ञात देवांच्या प्रतिमा. देव्हार्याच्या मध्ये भल्याथोरल्या चौरंगावर हळद कुंकवात माखलेल्या नानावीध देवांच्या मुर्त्या. कित्येकदा कुंकवाचे थर त्या फसव्या प्रकाशात रक्तासारखे भासत आणि देवांच्या मुर्त्या शेतातल्या बुजगावण्यासारख्या ओबडधोबड आणि भयंकर ! गानुंच्या त्या माजघरात एरवीही मला वावरताना थोडी भीतीच वाटायची. एकट्यानं तर मी तिथे फिरकतच नसे. नवरात्रात नऊही दिवस त्या माजघरात रात्रीच्या जेवणाच्या पंगती उठत. आप्त,नातलग अगदी सर्वांचा या नऊ दिवसांत तेथे राबता असे. आम्ही गानुंचे भाडेकरू,त्यातनं जरा जास्त जवळचे. त्या नऊ दिवसांत आमच्या घरी रात्रीचे जेवण बनलेले मला तरी आठवत नाही. आजही आठवते; जेवणाच्या पंगतीत मी देवघराजवळ बसायचे अगदी हटकून टाळायचो. पुढल्या आयुष्यात मी पराकोटीचा नास्तिक झालो;पण गानुंचे देवघर आठवले की हमखास अंगावर काटा येतो.
काय होतं एवढं घाबरण्यासारखं तिथं !
आज विचार करू लागलो तर कधीकधी नवल वाटतं.
पण मनातून कुठंतरी त्या भीतीचं कारण ठाऊक आहेच की मला.
गानू आज्जी !
देवघारालगतची त्यांची ती खोली !!
आणि त्यांची ती हिडीस, भेसूर अंगाई !!
एकदा का भूतकाळात गेलं की आठवणींच्या पारंब्या कशा दिशाहीन झुलतात. नको त्या आठवणींत मन रमून जातं आणि सांगायचं असतं ते मात्र राहून जातं.
पण तसं नाहिये.
मनाला ते सारं आठवायचंच नाहिये मुळी.
वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षी आलेले भयंकर अनुभव ते ! त्यात काय आठवायचं ?
त्या वयातल्या अनुभवांना कितपत पारदर्शी मानावं ? कल्पनेत रमण्याचं, स्वप्नरंजनाचं वय ते. त्या वयातील अनुभवांना व्यवहाराचे निकष लावणार तरी कसे ?
हे आणि असेच इतर प्रश्न स्वत:ला विचारत आजवर मी घडलेल्या घटनेमुळे मनाला त्या काळात बसलेले आणि आजही आठवताना अगदी स्पष्ट जाणवणारे हादरे किंचीत सौम्य करायचा प्रयत्न करीत आलो आहे. घडलं ते कधी घडलंच नाही अशी स्वत:च्याच मनाची समजूत काढत या व्यवहारनिष्ठ जगात विनातक्रार मान खाली मुडपून जगत आलो आहे. पण आता ते शक्य नाही.
असं नको. खरंतर सारं कसं निट, क्रमवार सांगायचं आहे. पण आठवणींचे रस्ते निसरडे असतात. त्यातनं अशा आठवणींचे रस्ते तर फसवेही असतात.
अशा आठवणी मनाला मुळी आठवायच्याच नसतात.
गानू आजींना मी प्रथम पाहिलं ते गानूवाड्यात रहायला आल्यानंतर तीन महिन्यांनी. त्यांच्याविषयी तोपर्यंत मला काहीही ठाऊक नव्हतं. सुनंदननेही त्यांच्याबद्दल मला काहीही सांगितलं नव्हतं. खरंतर लहान वयात एकेमेकांविषयी खूप माहिती मिळवण्याची, एकेमेकांना स्वत:बद्दल खूप महिती सांगण्याची एक अनावर ओढ आपल्यात असते. पण सुनंदन गानूने आपल्या आजीविषयी माझ्याकडे एक चकार शब्दही उच्चरला नव्हता. बहुदा आजीचं अस्तित्व त्याच्या दृष्टीनं खिजगणतीतही नसावं.
किंवा....
दिवाळीच्या सुटीतली ती दुपार होती.
आम्हाला गानूवाडीत रहायला येऊन तीनएक महिने झाले होते. माझी एव्हाना वाडीतल्या सर्व मुलांशी चांगलीच गट्टी जमलेली. दुपारचा तीन सव्वा तीनचा सुमार असेल, आमचा लपंडाव रंगात आलेला. वाडीत त्यावेळी आम्ही समवयीन दहा पंधरा मुले असू. खेळायला, लपायला, हुंदडायला वाडीत मुबलक जागा. दिवसा उजेडीही अंधारलेली बाग, आब्यांचे पार, गुरांचा गोठा, वाड्यालगतची बळद आणि हे सारं लपायला कमी पडलं तर अवाढव्य आणि अजस्त्र असा गानू वाडा.
मला आजही स्पष्ट आठवतं. नाकात बोलणार्या स्मिता प्रधानवर राज्य होतं. जवळपास सर्वच गडी तिने शोधून काढलेले. उरले होते माझ्यासह अजून एखाद दोन. मी शिताफीने लपायच्या जागा बदलत होतो. कधी बुटक्या पेरूच्या झाडावर, कधी बळदीतल्या अंधारात; तर कधी गोठ्यासमोरच्या माचावर. जागा बदलत लपता लपता मी गानूवाड्यात शिरलो.
मागल्या बाजूने.
गानूवाड्याच्या मागल्या बाजूला गानूंचं मोठं स्वयंपाकघर. स्वयंपाकघरातून एक बोळ थेट माजघराला जोडलेला. बोळ अंधारा. जरा जास्तच अंधारा. बोळाच्या डाव्या हाताला छोट्या छोट्या खोल्यांची रांगच. बहुतशा खोल्या बंदच असायच्या. गानुंची शेतीची अवजारं, बैलगाडीचे सुटे सामान व इतर प्रसंगानुरुप लागणार्या वस्तु त्या खोल्यांमधनं गच्च कोंडलेल्या असत. खोल्या मोठ्ठाली कुलुपं लावून बंद केलेल्या. बोळाच्या उजव्या बाजूला धान्याचं लांबलचक कोठार. बोळातनं कायम साठवलेल्या धान्याचा कोंडलेला वास दरवळत असे.
मी धावत स्वयंपाकघरातून थेट बोळातच शिरलो. गानूवाड्यात एवढ्या आतवर मी प्रथमच येत होतो. स्वयंपाकघरात आलेला अर्धवट उजेड विरळ होत होत त्या बोळाच्या मध्यभागी पार संपूनच गेलेला. बोळाच्या मध्ये येताच मी थांबलो. बोळ थेट गानुंच्या माजघरात उघडत होता. माजघराच्या दारात मला फिकट उजेडाची एक अशक्त चौकट दिसत होती. मी मागे वळून पाहिलं, स्वयंपाकघराची चौकटही त्याच आकाराची पण जरा जास्त पांढरट दिसणारी.
‘‘ आली रे आली. स्वयंपाकघराशी आली.’’ कुणीतरी बाहेरून किंचाळलं. मी घाईघाईने माजघराच्या दिशेने पुढे सरकलो.
‘‘ भिमा आऊट. मी तुला पाह्यलंय, उतर माचावरून.’’ बाहेरच्या बाजूने स्मिताचं नाकातल्या आवाजातलं ओरडणं कानावर आलं.
मी जागीच थांबलो. काय करावं, कुठे जावं, नेमकं कुठे लपावं मला काहीही कळत नव्हतं. आता मी माजघराच्या अगदी तोंडाशी आलो होतो. तिथून बाहेर पडून कपडे धुण्याच्या हौदापाशी जाण्याचा माझा विचार होता. मी स्मिता कुठं आहे याचा कानोसा घेत पुढे सरकलो. माजघराच्या दारातून मी बाहेर पडणार तोच,
‘‘ माजघरात शिरलीय रे....’’ कुणीतरी बाहेरून ओरडलं.
माझे पाय जागीच लुळावले.
काय करावं ?

मी मागे वळून स्वयंपाकघराच्या दिशेने पळायच्या विचारत होतो. त्या साठी मी मागे वळलोही;तेवढ्यात माझं लक्ष डाव्या हाताला गेलं. डाव्या हाताला असणार्या खोल्यांपैकी माझ्या अगदी जवळ असणार्या एका खोलीचं दार किंचीत उघडं होतं. ती त्या खोल्यांच्या रांगेतली शेवटची खोली होती. देवघराच्या मागल्या भिंतीलगतची खोली. मी फटीला डोळा लावत आत पाहिलं. आत तोच फिकट पिवळट लालसर उजेड म्लानपणे पसरला होता. त्या उजेडात आतलं धड दिसतही नव्हतं. सारे रंग, सारे आकार त्या लाल पिवळट उजेडात कसे हरवून गेले होते. पण खोली अडगळीची वाटत नव्हती, बर्यापैकी वापरात असल्याप्रमाणे स्वच्छ असावी एवढा अंदाज करता येण्यासारखा होता. मी दरवाजा लोटत आत शिरलो आणि हलक्याच हातांनी दरवाजा लोटून घेतला. खोली फारशी मोठी नव्हती;पण छोटीही नव्हती. अगदी खरं सांगायचं तर खोलीच्या आकाराचा निश्चीत अंदाज मला त्याक्षणी लागत नव्हता. खोली जुन्या कपाटांनी भरलेली होती. जिथे पहावं तिथे कपाटंच दिसत होती. मी त्या कपाटांत काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला;पण निटसं काही दिसतच नव्हतं. खरं सांगायचं तर त्या खोलीत एका ठिकाणी नजरच थांबत नव्हती. कुठल्या एका बिंदुकडे पहायला जावं तर निसरड्या वाटेवरून घसरल्याप्रमाणे दृष्टी पार विचलीत होऊन जात होती. डोळे तर सतत झोपेने पेंगुळावे तसे मिटले जात होते. पापण्या मणाचे ओझे ठेवल्याप्रमाणे गपागप मिटत होत्या.
मी तसाच एका कोपर्यात सरकलो.
पण खोलीला कोपरे तरी होते का ?
आपल्यावर कुणीतरी बारीक लक्ष ठेऊन आहे असा सारखा भास होत होता. मला ती खोली बिलकुल आवडली नाही. या खोलीतून बाहेर पडायला हवं, अगदी ताबडतोब, माझ्या बालमनाने जणू धोक्याचा इशारा दिला होता. मी धडपडत उभा राहिलो. एव्हाना मला चांगलाच घाम फुटला होता. क्षणभर मला दरवाजा नेमका कुठे आहे तेच कळेना. मी प्रयत्नपुर्वक चारही बाजूंना नजर फिरवली.
पुन्हा तेच.
त्या खोलीत नजर नेमक्या अशा ठिकाणी स्थिरावतच नव्हती. जणू त्या खोलीच्या भिंतीही निसरड्या झाल्या होत्या. एवढ्या निसरड्या की त्यावरून नजरही घसरावी. पेंगुळल्या डोळ्यांनी झेकांड्या खात मी कसाबसा दरवाजा शोधून काढला.
उघडला.
बाहेरचा अंधार माझ्या डोळ्यांना प्राणवायूसारखा वाटला. पापण्यांवरचे मणाचे ओझे क्षणार्धात हलके झाले. डोळ्यांवरची पेंग गेली. मन कसं छान, स्वच्छ होऊन गेलं.
मी दार पूर्ण उघडून पाय बाहेरच्या त्या बोळात ठेवणार तोच माजघराच्या बाजूने कुणाची तरी पावलं वाजली.
‘‘ मला ठाऊक आहे अविनाश तू बोळात लपलायस ते. ’’ स्मिताचा नाकातून ओरडण्याचा आवाज आला आणि मला माजघराच्या बाजूने बोळात उघडणार्या चौकटीत तिची आकृती दिसली.
मी पाऊल पुन्हा मागे घेतलं. दरवाजा हलकेच लोटला आणि किलकिल्या फटीतून बाहेरच्या बोळातल्या अंधाराकडे पहात बसलो. कुणीतरी दबक्या पायांनी माजघराकडून चालत येत होतं.
माझं ह्रद्य अधिकाधिक वेगानं धडधडू लागलं. पावलांचा आवाज जवळ जवळ येत होता. मी लपलो होतो त्या खोलीच्या दाराशी येऊन कुणीतरी थांबलं. मी झटक्यात दारातून मागे झालो आणि दारापासून किंचीत लांब होत पाहू लागलो. आता दारापासून लांब असल्यामुळे मला बाहेरचं निट दिसत नव्हतं. तरीही मला स्मिताचा हिरवा फ्रॉक ओळखता आलाच.
‘‘ अविनाश तू या खोलीत आहेस का?’’
स्मिता दारातूनच ओरडली आणि मी उत्तेजीत होऊन मागे सरकलो. ती खोलीत शिरली असती तर मी तिला सापडलोच असतो. माझ्या आणि तिच्यामधलं ते बंद दार सोडलं तर आमच्यात फक्त काही हातांचंच अंतर होतं. मी मागे वळून त्याच खोलीत लपायला कुठे काही जागा आहे का ते पाहू लागलो. भिंतीवरून घसरणार्या माझ्या नजरेला एका कोपर्यातली ती बाज दिसली. मी हलक्या पावलांनी त्या कोपर्यात वळलो आणि बाजेवर हलकेच पहुडलो. माझ्या शरीराला काहीतरी खरखरीत लागलं. हातांनी चाचपून पाहिलं तर ते एक जुनं घोंगडं असावसं वाटत होतं. मी ते घोंगडं डोक्यावरून ओढून घेतलं आणि दाराकडे पाठ करून तसाच त्या बाजेवर निजून राहिलो. बाज दाराच्या डाव्या बाजूला होती त्यामुळे स्मिता जरी आत शिरली असती तरी तिला ती बाज दिसण्याची शक्यता कमीच होती, शिवाय या खोलीतला तो रोगट मिळमळीत आणि निसरडा प्रकाश, एकुणात तिला मी सापडणं कठीणच होतं.
मी धडधडत्या ह्रद्यानं घोंगड्याच्या त्या खरखरीत अंधारात तसाच पडून राहिलो. माझे कान मात्र दाराकडे होते. दारात कुणीतरी होतं. अर्थात स्मिताच. मला तिचं अस्तित्व जाणवत होतं. पण ती आत मात्र येत नव्हती, बहुदा खोलीतल्या त्या लाल पिवळट प्रकाशाची तिला भीती वाटत असावी.
वेळ हळूहळू पुढे सरकत होता.
मी जीव मुठीत घेऊन घोंगडीत चुप्प पडून होतो.
इतक्यात कुईईई असा दार उघडल्याचा आवाज आला. कुणीतरी आत आलं. मी श्वास रोखून धरत डोळे घट्ट मिटत तसाच निजून राहिलो. खोलीत कुणाचा तरी वावर चालू होता. बहुदा स्मिता मला शोधत होती. मी छातीतून आलेली हसण्याची उबळ दाबत निपचीत पडून राहिलो.
घरघर अस आवाज माझ्या कानावर पडत होता. अगदी जवळून. इतक्यात बाजे शेजारी कुणाचीतरी पावलं वाजली. स्मिता मला शोधत बाजेजवळ आली होती. ती घोंगडं वर करून पाहिल का ?
मी तसाच डोळे मिटून घट्ट पडून राहिलो.
बाजेजवळ,अगदी खूप जवळ कुणीतरी होतं.
थांबून राहिलेलं.
घर्घर आवाज.
मी कधी एकदा घोंगडं वर होऊन पकडला जातो याची वाट पहात जीव मुठीत घेऊन पडून राहिलेला.
घरघर आवाज. खूप जवळून. माझ्या जवळ, अगदी खूप जवळ कुणीतरी होतं. आणि मग एका विवक्षीत क्षणी मला वाटून गेलं, माझ्या खूप खूप जवळ कुणीतरी आहे.
ती स्मिता नाही.
नक्कीच नाही.
आणि मग मी घोंगडीतच पडल्या पडल्या डोळे उघडले.
माझं धडधडणारं ह्रद्य जागीच थांबलं. दात जबड्यातल्या जबड्यात कडकडू लागले. हातापायातली शक्ती तर गेलीच होती. शरीरातलं सारं रक्तही थंड पडलं होतं. घोंगडीतल्या त्या काळ्या खरखरीत अंधारातही मला माझ्यापासून अगदी हातभर अंतरावर माझ्याच घोंगडीत माझ्याकडेच तोंड करून झोपलेली ती म्हातारी अगदी स्पष्ट दिसत होती.
तिचं तोंड उघडं होतं,उघड्या तोंडातून श्वास घरघरत होता. ओठांच्या फटीतून लाळ गळत होती. गालफाडं बसलेली.
...आणि तिचे डोळे !
भयंकर !!
केवळ मी वयाने लहान होतो म्हणून माझं ह्रद्य जास्त कार्यक्षम असल्या कारणाने मला ह्रदयविकाराचा झटका आला नसेल का ?
वितभर अंतरावरून तिचे ते हिरवे डोळे रोखून ती माझ्याकडेच पहात होती. एकाएकी तिची गालफाडं ताणली गेली, घशातली घरघर वाढली. आणि तिचे डोळे लकाकू लागले. गालावर उमटण्यास असमर्थ असणारं हसू तिच्या डोळ्यांतून ओसंडत होतं. पण तिच्या डोळ्यांतून जे ओसंडत होतं त्याला हसू तरी म्हणता आलं असतं का ?
तो आनंद होता.
तिच्या डोळ्यातल्या त्या आनंदात क्रौर्य आणि खुनशीपणा होता; आणि त्या पलीकडलंही काहीतरी होतं.
त्या आनंदात एक आधाशीपणा होता.
अत्याधिक भीतीने थंड पडलेलं शरीर घेऊन मी बधीर पडून राहिलो. माझ्या आत काहीतरी वेगानं वितळत होतं. मला किंचाळायचं होतं;पण माझे ओठ जणू कुणी दाभणाने शिवून टाकले होते. मला तिथून उठायचं होतं;पण सारं शरीर दगडागत जड आणि प्राणहीन झालं होतं.
आता तिच्या घशातली घरघर अधिकच कर्कश झाली. तिचा चेहरा जरा जास्तच वाकडा झाला आणि तिचं सारं शरीर व्हायब्रेटरवर ठेवावं तसं थडथडू लागलं.
आणि मग मला कळलं, खरंतर त्या कळण्यानेच मला बळ दिलं. तिलाही हालचाल करता येत नव्हती. माझ्या नांदगावच्या आजोबांना अर्धांगवायुचा झटका आला होता, त्यांनाही हातपाय हलवता येत नसत तसेच त्यांच्या घशातूनही अशीच घरघर ऐकू येई. मी हे पाहिलं होतं.
म्हणजे तिलाही तोच अर्धांगवायुचा आजार होता तर ?
माझ्या बालमनाने आकडेमोड केली.
मी अंगातली सारी शक्ती एकवटत उठायचा प्रयत्न केला. त्या धडपडीत माझ्या हाताचा स्पर्श तिच्या शरीराला झाला.
बर्फ !
ती बर्फासारखी थंड होती;आणि का कुणास ठाऊक पण मला तिचा तो स्पर्श कुंभाराने कालवलेल्या मातीसारखा वाटला.
थंड आणि लिबलिबीत.
निर्जीव आणि चेतनाहिन.
एवढ्यात कुशीवर झोपल्या झोपल्याच ती कलली आणि पोटावर उपडी झाली. आता तिचा चेहरा माझ्यापासून वितभर अंतरावर होता.
माझी बोबडी वळली, तिच्या उष्ण श्वासांचे दुर्गंधीयुक्त हबकारे माझ्या तोंडावर पडत होते. मी गुदमरलो. सहनशक्तीचा कडेलोट झाला होता. पेंगुळलेल्या मेंदुच्या आज्ञेची वाट न पाहता माझ्या पायांनी बळ एकवटलं. सर्वशक्ती एकवटत मी उठलो आणि घोंगडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागलो.
पण शरीरातलं बळच संपलं होतं. सारं शरीर सावरीच्या कापसासारखं हलकं हलकं झालेलं. त्या हलकेपणावर मात करीत मी कसाबसा हेलपाटत, सरपटत बाजेवरून खाली उतरू लागलो.
खरं तर मला ओरडायचं होतं. जोरजोराने किंचाळायचं होतं. पण किंचाळायला मला जीभ तरी होती कुठं ? ती तर तोंडातल्या तोंडात लोळागोळा झाल्यागत पडलेली. कसंबसं ते अंगावरचं पांघरुण बाजुला सारत मी बाहेर आलो.
आत फक्त जमीनीवर पाय खाली ठेवण्याचा अवकाश.
एवढ्यात माझ्या मनगटावर तिच्या हाताची थंड पकड बसली.
थंड आणि घट्ट.
घट्ट आणि करकचलेली.
जणू मासांतून रुतून हाडांचा चुरा करू पाहणारी.
आता तिच्या घशातली घरघर वाढली. त्या घरघरीला एक लय प्राप्त झाली होती. जणू त्या घरघरीच्या आवाजात ती एखादं सुरेल गाणं म्हणत असावी.
तिच्यापासून सुटण्यासाठी मी धडपडू लागलो. जीवतोड प्रयत्न करू लागलो. पण एवढं झालं तरी माझ्या तोंडून एक शब्द फुटायला तयार नव्हता. माझी दातखीळ बसली नव्हती हे निश्चीत. कारण माझ्याच दातांचा कडकडणारा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता. पण अत्याधीक भीतीने जीभ, स्वरनलीका हे माझे अवयव जायबंदी करून टाकले होते. माझं संपुर्ण शरीर प्रचंड मोठा झटका लागल्यागत पूर्णशक्तीने तिच्याकडे ओढलं गेलं आणि माझ्या तोंडून एक जीवघेणी किंचाळी बाहेर पडली. पाहता पाहता ती पूर्ण खोली माझ्या किंचाळ्यांनी भरून गेली. भान हरपून मी किंचाळत होतो. तिच्या त्या घट्ट पकडीतून सुटण्यासाठी धडपडत होतो.
एवढ्यात बोळातून कुणाच्यातरी धावण्याचा आवाज माझ्या कानावर पडला. खोलीचा दरवाजा धाडकन उघडून कुणीतरी आत आलं. ते सुनंदन गानुचे बाबा होते. म्हणजे आमचे मालक. नाना गानु. त्यांच्या मागोमाग दोन तीन गडी माणसंही आली. पाठोपाठ सुनंदनचे आजोबा आले.कुणीतरी चटकन दिवा लावला. बंद असणार्या खिडक्या उघडल्या. तोपर्यंत सुनंदनच्या बाबांनी म्हणजेच नाना गानुंनी माझ्या हातावरची तिची ती घट्ट पकड महत्प्रयासाने सोडवण्यात यश मिळवलं होतं. पण आज एवढ्या वर्षांनंतर घडलेलं सारं आठवलं की वाटतं, ती पकड नानांनी सोडवलीच नव्हती. नानांच्या ताकदीचा तो परिणाम नव्हताच. तो परिणाम होता, बाहेरच्या बाजुची खिडकी उघडल्याचा. खिडकीतून बाहेरची उन्हं आणि शुद्ध ढणढणीत उजेड आत आला आणि आतलं सारं वातावरण बदललं. मला त्वेषाने जवळ ओढणारी ती म्हातारी एकाएकी थंडावली,लुळावली. तिची ती लयबाज घरघर जागीच थांबली.
त्या बंद खोलीतलं ते विषारी वातावरण, तो फिकुटलेला रोगट प्रकाश सारं काही क्षणार्धात निवळलं. माझी शुद्ध जवळपास हरपलीच होती. कुणीतरी मला उचलून बाहेरच्या ओसरीवर आणलं. त्यानंतर नानांनी सार्या घरावर आगपाखड सुरु केली.
‘‘ ते दार उघडं कुणी टाकलं ?’’ नाना मोठाल्या आवाजात किंचाळल्यासारखे विचारीत होते. घरातले सारे लोक, गडीमाणसं अगदी चुपचाप निमुटपणे मानाखाली घालून नानांच्या त्या प्रक्षोभाला तोंड देत होती.
बाहेरच्या ओसरीवर भीतीने थडथडणार्या मला आई वारा घालत होती.
‘‘ नशीब वेळीच ते पोरगं ओरडलं, आज जीवावर बेतलं असतं तर..?’’ नानांनी हे वाक्य ओरडून म्हटलं आणि ओसरीवर मला वारा घालणार्या आईने आवंढा गिळला. ती काहीच न कळल्यासारखी माझ्याकडे पहातच राहिली. मध्येच मला केंव्हातरी झोप लागली, जागा झालो तेव्हा मी आमच्या घरात होतो.
त्यानंतर आई मला गानुवाड्यात पाठवायला नाखुश असायची. अगदी कधी आत गेलोच तर बोळात जाऊ नकोस असं बजावून सांगायची. दुसर्या दिवशीच सुनंदन एकटा भेटल्यावर मी त्याला विचारलं,
‘‘ काय रे कोण होती ती म्हातारी ?’’
तर तो माझ्याकडे चमत्कारीक नजरेनं पहात राहिला. खोदून खोदून विचारल्यावर तुटकसं म्हणाला,
‘‘ माझी आज्जी.’’
‘‘ एवढी भयानक ? आणि मला का पकडलं तिनं ? तिला त्या खोलीत का कोंडलय ?’’ माझे प्रश्न काही थांबत नव्हते.
‘‘ ती चेटकीण आहे.’’ सुनंदन शांतपणे म्हणाला.
माझ्या अंगावर सर्रकन शहारा आला,त्यानंतर त्याच्या आज्जीचा विषय मी त्याच्याकडे कधीही काढला नाही.
सरपणीत आम्ही चार वर्ष होतो. चारही वर्षे आम्ही गानुवाडीतच राहिलो. गानुवाडीतल्या त्या झाडझाडोर्यात माझे दिवस मजेत चालले होते. फक्त त्या एका प्रसंगाचा अपवाद सोडला तर गानुवाडीतलं माझं वास्तव्य त्याआधी आणि त्यानंतरही अगदी आनंदात गेलं. सुनंदन माझा अगदी जीवलग मित्र बनत गेला. एकतर आम्ही एकाच वर्गात, रहायलाही अगदी समोरासमोर. आमच्या आवडी निवडीही बर्याच प्रमाणात सारख्याच. सुनंदनच्या अधिकच्या सान्निध्याने मला गानुंच्याही जास्त जवळ आणले. सुनंदनच्या आईला म्हणजेच गानु काकुंना माझ्याबद्दल ममत्व वाटायचेच;पण आता नानांनाही मी आवडू लागलो. आणि हे पाहून माझ्या बाबांना विशेष आनंद होऊ लागला. सरपणीतले गानु हे तालुकास्तरावरचे बडे प्रस्थ होते. बाबांच्या सरकारी कामांत बर्याचदा येणारे अडथळे नुसते गानुंचे नाव सांगितले की कमी होत. गानु आजोबा तर सुनंदन सोबत रोज संध्याकाळी माझाही अभ्यास घेत.
एवढं असलं तरी गानुवाड्यात जाताना, विशेषत: माजघरात मला नेहेमी बिचकायला होत असे. कारण माजघरातून बोळात जाणारी ती रिकामी चौकट कायम एखाद्या भुकेल्या अजगरागत आ वासून असायची. त्यातनं गानुंच ते देवघर ! तसं पाहता गानुंच्या त्या देवघराशी वा देवांशी माझं काही वैर नव्हतं.
पण त्या देवघरात साचून असणारा तो फिकट लालपिवळसर उजेड ! तो मला त्या खोलीतल्या उजेडाची आठवण करून द्यायचा. देवघर आणि त्या खोलीत एकच सामायीक भिंत होती. त्या सामायीक भिंतीचाच तर हा परिणाम नसेल ना ? कदाचीत त्या खोलीतल्या दुष्टाचा संसर्ग गानुंच्या देवघराला झाला असावा किंवा गानुंच्या देवघरातूनच काहीतरी झिरपत त्या खोलीत पोहोचत असावं. आणि...
मी त्यावर फार विचार करायचो नाही. माझं बालमन मला फार विचार करूही द्यायचं नाही.
साखरझोपेतल्या एखाद्या स्वप्नासारखे दिवस होते ते !
गोड, गुलाबी आणि फुलपाखरी पंखांसारखे.
पण शेवटी तो दिवस उजाडलाच.
चैत्र पौर्णिमेचा तो दिवस !
बरेच दिवस शांत पडून असणारा एखादा नाग फणा काढून अंगावर यावा तशी ती फुत्कारणारी संध्याकाळ आली,जी त्यानंतरच्या माझ्या उभ्या आयुष्यातल्या अनेक शांत, सुंदर संध्यासमयांची नासाडी करून गेली.
चैत्र पौर्णिमेची संध्याकाळ ! हनुमान जयंतीचा दिवस !!
सरपणीत हनुमान जयंती मोठ्या दिमाखात साजरी व्हायची. शेजारच्या डोंगरावर हनुमानाचे एक जागृत स्थान होते. तिथे छोटी जत्रा तर भरतच असे;पण सोबतीला हनुमानाची पालखीही निघायची. पालखीला अख्खा गाव लोटायचा. चैत्र पोर्णिमेच्या संध्याकाळी उभं सरपणी ओस पडायचं. गावात चिटपाखरूच काय ते. बाकी माणसांचा समुह सारा डोंगरावरील हनुमानाच्या पालखीला लोटलेला. पालखीला गानुंचा मान मोठा. नाना आणि गानु आजोबांनी खांदा लावल्याखेरीज पालखी निघतच नसे. पण यातही एक गोष्ट मला नेहेमीच कोड्यात टाकायची. मी तब्बल सहा सात वर्षे सरपणीत घालवली होती, सरपणीतल्या तेवढ्याच चैत्र पोर्णिमा मी पाहिल्या होत्या;पण एवढ्या दिवसांत मी कधीही गानुकाकुंना पालखीला गेल्याचं पाहिलं नव्हतं. सारा गाव ज्या पालखीला लोटायचा त्या पालखीला गानुकाकु मात्र कधीही जायच्या नाहीत. गावतल्या इतर सार्या बायका नटून थटून पालखीला ओवाळायला पुढे पुढे असत, अगदी गावात नवी असलेली माझी आईसुद्धा. पण गानुकाकुंना पालखीचं वावडंच होतं जणू.
ते वर्ष माझं सरपणीतलं शेवटचं वर्ष ठरलं.
आज एवढ्या वर्षांनंतर सर्व घटनाक्रम आठवला की वाटतं, ती एक संध्याकाळ केवढी मोठी उलथापालथ घडवून गेली.
आम्ही सरपणी सोडलं. गानुंचा तर जवळपास निर्वंशच झाला.
आठवतानाही छातीत कसं थंड हिव भरून येतं !
दुपारीच मला आईने सांगितलं की, मला पालखीला जाता येणार नाही कारण तालुक्याच्या गावाहून बाबांच्या ऑफीसमधनं एक माणूस येणार होता. त्याच्यासोबत बांबांच्या घरी असणार्या काही फायली पाठवायच्या होत्या. बाबा कामासाठी मुंबईला गेले होते. या मारुतीचं दर्शन घेतल्यास सौभाग्याचं मरण येतं अशी तेव्हा गावात समजूत होती, त्यामुळे झाडून सार्या बायापोरी पालखीला हजर असत. माझी आई देवभोळी त्यामुळे आईला आणि सोबत ताईलाही पालखीला जायचंच होतं. मी थोडासा रडवेला सूर लावला;पण बदल्यात आईने मला नवी गोष्टीची पुस्तकं विकत घेऊन देण्याची लालूच दाखवली आणि माझा रुसवा कुठल्या कुठे पळाला. पालखीला गेलं न गेल्यानं मला फार फरक पडणार नव्हताच कारण सुनंदनही कांजण्या आल्यानं अंथरुणाला खिळलेला. काल पासून तर त्याची अवस्था जरा जास्तच वाईट होती. त्याला तापही चढलेला. सुनंदनशिवाय कोणतीही मजा मला त्या काळात फिकीफिकी वाटत असे.
चार साडेचारच्या सुमारास आई आणि ताई वाडीतल्या इतर सर्वांसोबत डोंगरावरच्या हनुमानाच्या पालखीला निघून गेल्या. थोड्यावेळानं नाना गानु आणि गानु आजोबाही दोनचार गडीमाणसं सोबतीला घेऊन निघाले. आता गानुकाकु आणि भिवामामाचा अपवाद वगळता वाडीत कुणीही वडीलधारं असं उरलं नव्हतं. माझा आणि सुनंदनचा अपवाद वगळता वाडीत लहान मुलही कुणी उरलं नव्हतं. छोटा माधव होता; पण तो अगदीच छोटा होता. जेमतेम दीड वर्षांचा.
सगळे निघून गेल्यावर वाडी कशी अधिकच मोकळी ढाकळी वाटू लागली.वाडीतला झाडझाडोरा जरा जास्त मोकळेपणानं श्वास घेऊ लागला. मी क्षणभर वाड्यात डोकावून आलो. सुनंदनची तब्येत जास्तच बिघडली होती, त्यामुळे काकुही चिंताग्रस्त होत्या. त्यांनी मी का गेलो नाही म्हणून माझी जुजबी चौकशी केली;पण आज त्यांच्या विचारण्यात प्राण नव्हता. सुनंदनच्या आजारीपणाच्या काळजी व्यतीरीक्त अजून काहीतरी त्यांना संचित करत होतं, असं स्पष्ट दिसून येत होतं. त्या थोड्याथोड्या वेळानं परसात जाऊन सूर्य पश्चिमेकडे किती कललाय हे पाहून येत होत्या. मी बाहेर आलो आणि सभोवतालच्या त्या थंड काळोख्या हिरवाईत धुंद होऊन गेलो. आज माझ्यावर लक्ष ठेवणारं कुणीही नव्हतं. मी माचावर चढला,तिथून खाली ठेवलेल्या पेंढ्यांच्या गुंड्यावर उड्या मारल्या. नंतर हौदाजवळ जाऊन रहाटानं पाणी काढलं. गोठ्यातल्या गाईंच्या शेपट्या ओढल्या. त्या धुदावणार्या एकटेपणाचा मी मनोसक्त आनंद लुटत असतानाच भिवामामा आला,
‘‘ ताहींनी तुहास्नी बोहलहवलहय’’ असं त्याच्या ठाकरी भाषेत म्हणाला.
भिवामामा गानुंचा जुना चाकर. त्याच्या आधी त्याचा बाप गानुंच्या चाकरीत होता.
मला थोडं नवल वाटलं. काकुंनी मला का बोलावलं असावं? मी लागलीच वाड्यात गेलो. तर काकु ओसरीवरच बसलेल्या. त्यांचा चेहरा अक्षरश: काळाठिक्कर पडलेला. काळजीनं, भीतीनं त्या रडवेल्या झालेल्या. ओसरीवरच्या गानु आजोबांच्या पलंगावरच सुनंदन झोपलेला. त्याचं शरीर;जेवढं उघडं होतं तेवढं सारं लालबुंद झालेल्या टचटचीत कांजीण्यांनी भरलेलं. लाळेचा एक ओघळ त्याच्या ओठांपासून पार मानेपर्यंत पसरला होता. त्याच्या तापलेल्या श्वासांच्या आवाजावरनंच त्याच्या बिकट अवस्थेची कल्पना येत होती.
माझं ते वय काळजी करण्याचं खासच नव्हतं. पण त्या दिवशीची सुनंदनची अवस्था पाहून मलाही भीती वाटली.
‘‘ नंदुची तब्येत खुपच बिघडलीये. घरात कुणीच नाहीये. सगळे पालखील गेल्येत. त्याला ताबडतोब डॉक्टरांकडे न्यायला हवं.’’ काकु थरथरत्या आवाजात मला म्हणाल्या. पण त्या हे मला का सांगताहेत हे मात्र माझ्या अजूनही ध्यानात येत नव्हतं. मी आपला शुंभासारखा मान हलवीत त्यांचं बोलणं एकत राहिलो.
‘‘ देवा ! नेमकी आजच ही वेळ यावी. पोर्णिमेला. तिही आजच्या.’’ काकु स्वत:शीच काहितरी बडबडत होत्या. मला त्यातलं बरचसं कळत नव्हतं.
‘‘ अवि. मी भिवाला घेऊन बैलगाडीनं दवाखान्यात जाते आहे. तू थोड्यावेळ माधवकडे लक्ष देशील? तिन्हीसांजेच्या आत परतेन मी.’’
गानुवाडी तशी सरपणीच्या एका टोकाला. सरपणीच्या वेशीवरच म्हणा ना. सरपणीत दवाखाना एकच,तोही सरकारी दवाखाना. गावाबाहेरच्या महामार्गावर. गानुवाडीपासून जवळपास सहा सात मैल लांब. आणि विरुद्ध टोकाला.
काकु अक्षरश: रडकुंडीला आल्या होत्या. मला काय उत्तर द्यावं हे कळेचना. माधवला सांभाळणं काही अवघड काम नव्हतं,तसा तो माझ्यासोबत बर्याचदा तासंतास एकटा खेळत असे. मी निमुट मान डोलावली.
‘‘ गाडी लाव भिवा.’’ काकु भिवामामाला म्हणाल्या; पण भिवामामा तिथेच घुटमळला.
‘‘ काय झालं ?’’ भिवामामा काहीही न बोलता काकुंकडे पहातच राहिला.
‘‘ कळतंय मला भिवा;पण इलाज नाही. जायलाच हवं. शिवाय आपण परतुच की तिन्हीसांजेच्या आत. एवढी वर्षे गेली, आपण काळजी घेतलीच ना ? कुठे काय झालं? यंदाही नाही होणार. काढ तू गाडी लवकर.’’ भिवाकाका निघून गेल्यावरही काकु असंच काहीसं मला न कळणारं बडबडत राहिल्या. मी माजघरात डोकावून एक नजर छोट्या माधवकडे टाकली. तो झोपाळ्यात शांतपणे झोपला होता.
काकुनं घाईघाईने आवरलं. तोवर भिवामामाने बैलगाडी बांधली होती. मागे छान मऊसूत बिछाना अंथरला होता. मला एरवी भिवामामासोबत बैलगाडीतनं रपेट मारायला फार आवडे. सुनंदन सोबत मी अनेकदा त्या गाडीतून फिरलो होतो. पण आजची गोष्ट वेगळी होती. भिवाकाकाने हलक्या हातांनी सुनंदनला उचललं,खांद्यावर टाकलं आणि बैलगाडीत नेऊन ठेवलं. ‘‘ अवि, बाळा आत ये जरा.’’ माजघरातून काकुंची हाक ऐकू आली. मी आत गेलो. माजघरातल्या मोठ्या बाकड्यावर काकु बसल्या होत्या. त्यांनी खुणेनंच मला त्यांच्या शेजारी बसायला सांगितलं. मी काही न कळता बसलो. त्यानंतर बराच वेळ त्या काहीही न बोलता गप्पच होत्या. थोड्यावेळाने अचानक त्यांनी भिवामामाला हाक मारली,
‘‘ भिवा ..’’
भिवामामा माजघराच्या आत न येता दारातूनच डोकावला.
‘‘ नैवेद्य लाव.’’
भिवामामा नुसती मान डोलावत निघून गेला.
भिवामामा गेला आणि काकु माझ्याकडे वळल्या. त्यांना मला काहीतरी सांगायचं होतं;पण ते कसं सांगावं हेच जणू त्यांना कळत नव्हतं.
‘‘ अवि.’’ एकदाचा त्यांच्या तोंडून शब्द फुटला.
मी ऐकू लागलो.
‘‘ मी गेल्या पावली परतणार आहे, काळजीचं काही कारण नाही. माधव झोपलाय, तो अगदीच लहान आहे म्हणून मी त्याला माझ्या सोबत नेत नाही. त्यातनं कांजीण्या हा संसर्गाचा आजार. त्याला नंदुच्या जास्त जवळ नेलं तर कदाचीत त्यालाही कांजीण्या येतील. म्हणूनच खरंतर मी त्याला इथे ठेवून जाते आहे. तू हुशार मुलगा आहेस, हो ना?’’
मी किंचीत लाजत मान डोलावली. तेवढ्यात भिवामामा आला. त्यानं एका मोठ्या ताटात काहीतरी आणलं होतं. काहीतरी मातकट रंगाचं.
ते ताट काकुंच्या हातात देऊन तो पुन्हा बाहेर पडला. काकुंनी ते ताट हातातच धरून ठेवलं. मला आता ते ताट स्पष्ट दिसत होतं. त्या चक्क कालवलेली चिखलमाती होती. मी काकुंकडे पाहिलं, तर त्या माझ्याकडेच पाहात होत्या. मला निरखून अगदी जोखून पाहात होत्या. माझं लक्ष त्यांच्याकडे जाताच त्यांनी एक सुस्कारा सोडला.
‘‘ तुला कळतय ना अवि, माझं जाणं किती गरजेचं आहे ते. नंदुची तब्येत अचानक बिघडली आहे. मला जायलाच हवं, हो ना? ’’ काकु जणू स्वत:चीच समजूत घालत होत्या.
‘‘ तू इथेच थांब. माधवकडे लक्ष ठेव. मी येईनच तासा दीडतासात.’’ काकू पुन्हा एकदा बोलायच्या थांबल्या. त्यांना खरंतर वेगळंच काहीतरी बोलायचं होतं;पण त्या भलतंच काहीतरी बोलत होत्या. त्यातनं माझं लक्ष त्यांच्या बोलण्याकडे कमी त्या ताटात कालवलेल्या चिखलमातीकडेच जास्त जात होतं.
‘‘ काही वाट्टेल ते झालं तरी बोळाकडे फिरकू नकोस.’’ काकु रोखल्या नजरेनं शांतपणे म्हणाल्या आणि माझ्या काळजाला असंख्य इंगळ्या एका क्षणी डसल्या.
बोळ.
अंधार.
ती खोली.
तो उजेड.
आणि ती...
सरसरसर करीत माझ्या तळपायातून भीतीची तीच थंड जाणीव शरीरभर पसरली. मला तो प्रसंग आठवला. न जाणो केव्हा घडलेला ? ती घटना घडून एव्हाना चार सहा वर्ष ऊलटून गेलेली. त्या दिवसानंतर मी कधी सुनंदनच्या आज्जीला पाहिलंही नव्हतं. ना सणासुदीला, ना लगीन सराईला. जणू ती अस्तित्वातच नव्हती. पण ती आठवण अजून मनात ताजी होती. मघापासूनचा माझा धीरोदत्तपण क्षणार्धात गळून पडला. माझा भीतीने वाकडा झालेला चेहरा काकुंना बहुदा दिसला असावा.
‘‘ घाबरु नको. घाबरण्यासारखं काही नाही.’’ त्याही बळ एकवटत मला समजावत म्हणाल्या.‘‘ मी सांगते ते लक्ष देऊन ऐक. घाबरण्याची खरंच काही गरज नाही. मी लागलीच परतणार आहे. तुला फार तर दोन तास एकट्याने काढायचेत. कंटाळा आला तर माधव उठल्यावर त्याला घेऊन बाहेर पड. कंटाळा आला तर नव्हे,तो उठल्यावर त्याला घेऊन बाहेर पडच. दुसरी गोष्ट..हा नेवेद्य ’’ काकु त्या ताटाकडे माझं लक्ष वेधत म्हणू लागल्या,‘‘ हा नेवेद्य मी बोळातल्या त्या खोलीपाशी ठेवते आहे. एरवी खोलीला कुलुप असतं;पण आज लावत येत नाही. आहेत काही कारणं. ती जाणून घेण्याएवढा तू मोठा नाहीस आणि तेवढा वेळही आपल्याकडे नाही.’’
माझं ह्रद्य एव्हाना चांगलंच जोरात धडधडू लागलं होतं. कपाळावर घाम जमलेला. ‘‘ त्या खोलीतून, बोळातून एखाद वेळेस काही आवाज येतील. ते अर्थात आजीचे असतील. तू ओळखतोस तिला. एकदा पाह्यलयस तू तिला, हो ना? ’’
मान हलवताना मला प्रचंड प्रयास घ्यावे लागले.
‘‘ आजी ओरडेल,हाक मारेल. आपण लक्ष द्यायचं नाही. हे असं घडेलच असं नाही. पण आजचा दिवस पाहता घडण्याच्या शक्यता जास्त आहेत. ती कदाचीत एखादं गाणं म्हणेल, आपण घाबरायचं नाही. तू हुषार मुलगा आहेस. पुढच्या वर्षी आठवीत जाशील. आणि एक लक्षात ठेव. हे तू तुझ्या मित्रासाठी, सुनंदनसाठी करतो आहेस, बरोबर ?’’
खोल ह्रद्यातून उसळी मारून आलेली भीती दाबत मी निमुट मान डोलावली.
‘‘ सर्वात महत्वाचं. जर परिस्थिती हाताबाहेर जाते आहे असं वाटलं, तर...’’ काकु थांबल्या त्यांना बहुदा शब्दाची जुळवाजुळव करायची होती किंवा हे सारं माझ्यासारख्या लहान मुलाला कसं सांगावं हा प्रश्न त्यांना पडला असावा. शेवटी एक मोठा निश्वास टाकत त्या म्हणाल्या,
‘‘ सर्वात महत्वाचं म्हणजे, जर परिस्थिती हाताबाहेर जाते आहे असं वाटलं, तर...तर जोरात किंचाळत म्हणायचं, चिखलभात खा. परत जा. माती मायेची शपथ आहे तुला. कळलं ? काय म्हणायचं, चिखलभात खा. परत जा. मातीमायेची शपथ आहे तुला. म्हण पाहू माझ्यासोबत.’’
मी थरथरत्या स्वरात काकुंच्या आवाजात माझा अशक्त आवाज मिसळत म्हटलं,
‘‘ चिखलभात खा. परत जा.
मातीमायेची शपथ आहे तुला.’’
एवढं बोलून झाल्यावर काकु भिवामामाला हाक मारीत उठल्या आणि बाहेर जाऊन बैलगाडीत बसल्या. मीही त्यांच्या मागोमाग गेलो. जाताजाता काकुंनी शेवटचं एकदा माझ्याकडे पाहिलं.त्यांच्या डोळ्यात माझ्याविषयी काळजी होती, भीती होती.
‘‘ जाऊ ना बाळा.’’ काकुंनी विचारलं.
‘‘ जा. काळजी करु नका काकु. मी ठेवतो लक्ष.’’ मी उसनं आव आणत म्हणालो. पण तेवढ्यानंही त्यांचा चेहेरा खुलला. एवढ्यात भिवाकाकाने बैल हाकले. गानु काकु,त्यांच्या मांडीवर झोपलेला सुनंदन आणि भिवाकाका वाडीतून बाहेर पडत दृष्टीआड झाले, तेव्हा माझ्या सर्वांगावर भीती कोसळली होती.
बैलगाडी दिसेनासी झाली. थोड्यावेळाने गाडीने उडवलेला धुरळाही खाली बसला. आणि मी खर्या अर्थाने वाडीत एकटा उरलो. मी सभोवताली नजर फिरवली.
आज वाडी किती वेगळी दिसत होती !
एरवी आपल्या झुळुकांनी अंगावर सुखद शहारा आणणारी झाडे आता एकदम अनोळखीच वाटत होती. एकटी एकटी आणि घुम्म. जिथे नजर जाईल तिथे झाडंच झाडं. झाडांनी उजेडही अडवलेला. तसा पश्चिमेकडे अजूनही सूर्य होता. अगदी पूर्ण तांबूस सोलीव गोळ्याएवढा मोठा;पण त्याचं तेज झपाट्याने क्षय पावत होतं.
बाहेर फार वेळ न घालवता मी आत गेलो. आत थेट माजघरात. तिथे देव्हार्यातले देव जणू माझीच वाट पहात बसल्यागत त्या भेसूर प्रकाशात भयाण चमकत होते. तेव्हा मी काही फार लहान नव्हतो. असेन तेरा चौदा वर्षांचा. ते वय म्हणजे धड लहानही वा मोठंही असण्याचं नव्हतं. ती घटना घडून चार वर्षे उलटली होती. एव्हाना माझी देव्हार्याविषयीची भीतीही थोडी कमी झालेली. पण त्यादिवशी त्या एकांतात गानुंच्या देव्हार्यातल्या देवांनी माझ्या अंगाचा थरकाप उडवला.
मी देव्हार्याकडे पाहणं शक्य तेवढं टाळत होतो. माजघरात बसायचा कंटाळा आला की, मध्येच येऊन बाहेर पडवीतल्या आजोबांच्या लोखंडी पलंगावर येऊन बसायचो. या ना त्या कारणे वेळ मारून नेण्याचे शक्य ते सारे प्रयत्न मी करत होतो.
दहा मिनीटे गेली.
पंधरा गेली.
वीस, तीस. चांगला तासभर गेला.
माझ्या ह्रद्याची धडधड आता स्थिरावली होती. कंटाळा आला आणि मी पुन्हा उठून माजघरात गेलो. बोळाच्या चौकटीच्या अगदी विरुद्ध बाजुला समोर आणखी एक दरवाजा होता. परसात उघडणारा. तो दरवाजा उघडून मी बाग न्याहाळत बसलो. उन्हाचे ठिपके तर माझ्या डोळ्यांसमोर सावळसर होत नाहीसे झाले. झाडांच्या सावल्या लांब होत होत पार माजघरात शिरल्या आणि नंतर दिसेनाशा झाल्या. गानुंच्या बागेत संधीप्रकाश जरा जास्तच काळसर वाटतो. काळोखाचा सख्खा भाऊच म्हणा ना. संधीप्रकाश फार काळ रेंगाळलाच नाही. आल्या आल्याच गुल झाला. म्हणता म्हणता बाग काळीठिक्कर पडली. आता नजरेस पडत होते ते झाडांचे नुसते आकार. अंधाराने गिळलेले. अंधार पुरेसा पडतो न पडतो तोच आकाशातून लठ्ठ वाटोळा चंद्र झरझर वर आला आणि एके ठिकाणी स्थिरावला. चंद्राच्या प्रकाशानं गानुंच्या परसात अनेक नक्षी चितारल्या. परसातल्या पाचोळ्यावर निळसर चंदेरी रंगाचे ठिपके पडले. बाहेर आता मंद वारे वाहु लागलेले. वार्याच्या झुळुका अंगावर सुखद थंडावा आणत होत्या.
किती वेळ गेला होता याचा मला अंदाजच राहिला नव्हता. काकु एव्हाना परतायला हव्या होत्या. शेवटी बाहेर पाहण्याचा कंटाळा आल्यावर परसात उघडणारं माजघराचं दार बंद, त्याला अडसर अडकवून मी मागे वळलो.
मागे वळलो आणि पुतळा झाल्यागत जागीच थांबलो.
बोळाच्या तोंडाशी गानुआजी होत्या. चार पायांवर एखादं कुत्रं चालावं तशा रांगत रांगत पुढे सरकणार्या गानु आजी !
हो.
गानुआजीच. त्यांचा तो चेहरा मी कधीही विसरलो नसतो.
माझ्या शरीरावरचा केस नं केस ताठ झाला. तिच अतिपरिचीत भीतीची थंड जाणीव पूर्ण त्वेषाने शरीरभर पसरली. पाय लटपटू लागले.
त्या इथवर कशा पोहोचल्या मला कळलंही नव्हतं.
आणि मग त्यांच्या घशातली ती घरघर मला ऐकू येऊ लागली. जातं दळावी तशी. घरघर..घरघर...
त्या तशाच चार पायांवर रांगत पुढे आल्या.
त्यांचे ते लकाकणारे डोळे रोखून त्या माझ्याकडेच बघत होत्या. चार पायांवर रांगता रांगता त्या बोळाच्या चौकटीतून बाहेर पडून माजघरात शिरू पहात होत्या. क्षणभर त्यांनी माझ्यावर रोखलेली नजर झोपाळ्यात झोपलेल्या माधवकडे वळवली. त्यांच्या त्या नजरेत आता वेगळीच लकाकी आली होती. त्या नजरेत एक अधाशीपण होतं, आशाळभूतपणा होता. मग मध्येच रांगता रांगता थांबत त्या उकीडव्या बसल्या आणि म्हणाल्या,
‘‘ झालं का चंद्रदर्शन ? सुटली का तंद्री महाराजांची ? ’’
म्हणजे त्यांना बोलताही येत होतं तर !
किती मधाळ आवाज होता तो !
मधाळ आणि लाडीक. पण त्या आवाजात काहीतरी अभद्र होतं, जे माझी बोबडी वळवून गेलं. मी कसा तरी त्याच तिरमिरीत पुढे झालो आणि झोपाळ्यातून माधवला उचलून माझ्या कडेवर घेतलं. मी माधवला घेतलेलं पाहताच आज्जी किंचाळल्या. अगदी तारस्वरात मोठ्याने किंचाळल्या. मी भिऊन मागे सरलो. त्यांच्या त्या किंचाळण्याने जागा झालेला माधव मोठमोठ्याने रडू लागला.
‘‘ दे पाहू त्याला माझ्याकडे. ’’ त्यांनी करड्या आवाजात फर्मान सोडलं. क्षणभर अगदी क्षणभर त्यांचं ऐकत मी माधवला त्यांच्या हातात सोपवण्यासाठी पुढेही झालो. त्यांच्या आज्ञेत एक न मोडता येणारा हुकुम होता. पण दोन पावलं पुढे झालेला मी अचानक थांबलो. काय वाट्टेल ते झालं तरी माधवला त्यांच्या ताब्यात द्यायचं नाही, माझ्या मनात कसा कुणास ठाऊक एक विचार उमटला. पुढे उचललेली पावलं मी मागे घेतली. आणि आज्जी फिस्कारल्या. एखाद्या मांजरीसारख्या. माझ्याकडे पाहता पाहता त्यांनी जिभ बाहेर काढली. हातभर लांब जिभ.
विडा खाऊन जर्द लाल झाल्याप्रमाणे दिसणारी भडक तांबडी जिभ. चार पावलांवर रांगत त्या अजून थोड्या पुढे आल्या. त्यांचा तो एकूण अविर्भाव, अवतार पाहून रडणारा माधव एकाएकी हसू लागला.
करकरीत तिन्हीसांजेला पूर्ण एकट्या गानुवाडीतल्या त्या भयाण माजघरात ते हसू माझ्या अंगावर जळता निखरा ठेऊन गेलं.
या आधी मी काय माधवला हसताना ऐकलं नव्हतं ? निश्चितच ऐकलं होतं. पण त्यादिवशी ते हसू गानुंच्या माजघरातल्या त्या आघोरी वातावरणाला एक अभद्र पार्श्वसंगीत पुरवून गेलं. माधवला हसताना पाहून आज्जी अधिकच चेवल्या. मग मध्येच गुडघ्यांवर उभ्या रहात त्या डावी उजवीकडे झुलत जोराने टाळ्या पिटू लागल्या. त्यांना तसं झुलताना पाहून छोटा माधव अधिकच जोरात हसू लागला.
मी रडकुंडीला येऊन लटपटत्या पायांनी तसाच मागे मागे जात राहिलो. शेवटी पाठ भिंतीला चिकटली तेव्हा नाईलाजाने थांबावच लागलं.
‘‘ दे त्याला माझ्याकडे. दे पाहू.’’ आज्जींनी पुन्हा एकदा करड्या आवाजात फर्मान सोडलं. मी मानेनेच नाही नाही म्हणत होतो.
एव्हाना माजघरात चांगलाच अंधार झाला होता. मी मघा बाग न्याहाळण्याच्या नादात दिवे लावायला विसरलो होतो. विजेचा बोर्ड समोरच होता. पण पायांत तेवढं त्राण नव्हतं. शिवाय तिथे पोहोचण्यासाठी मला आज्जींना ओलांडावं लागणार होतं.
चार पावलांवर रांगत रांगत आज्जी आता माजघराच्या मध्यावर पोहोचल्या. त्यांनी अजून चार सहा पावलं पुढे टाकायचा अवकाश, मी त्यांच्या अगदी कवेत येणार होतो. मी आजूबाजूला पाहू लागलो. तेथून निसटायला काही वाव आहे का याच अंदाज घेऊ लागलो. पण जवळपास काहीच नव्हतं, ना दार ना एखादी रिकामी चौकट. ज्यातून आज्जींच्या जवळून न जाता मला निसटता येईल असं तिथे काहीच नव्हतं. ओसरीकडे जाणार्या दारातून बाहेर पडायचं तर आज्जींनी एका झेपेत माझ्यावर पकड मिळवली असती. बोळाच्या रिकाम्या चौकटीत शिरण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. तसं करणं म्हणजे स्वत:च अजगराच्या मुखात शिरण्यासारखं होतं. नाही म्हणायला परसात उघडणारं दार होतं;पण त्या दारापासून आता मी बराच लांब सरकलोे होतो. पण जोरात धूम ठोकली तर आज्जींच्या आधी मी तिथे पोहोचलो असतो.
पण नक्की पोहोचलो असतो का ?
माझ्या मनातले विचार जणू ओळखूनच की काय पण आज्जी हसायला लागल्या.
फिदीफिदी.
‘‘फॅथफॅथफॅथफॅथ’’ त्यांच्या ओठांची आणि जिभेची विचीत्र हालचाल होऊन तोंडातून बाहेर पडणारं ते हसूअधिकच भयाण वाटत होतं. हसता हसता त्यांच्या तोंडातून थुंकी उडत होती. त्या अजून पुढे सरकल्या.
परसात उघडणारं दार हाच माझ्या सुटकेचा एकमेव मार्ग होता. मी हळूहळू भिंतीला चिकटत माझ्या उजव्या हाताला असणार्या त्या दाराकडे सरकू लागलो. आज्जी आता पुन्हा एकदा दोन गुडघ्यांवर स्वत:च सारं शरीर तोलत उभ्या होत्या आणि दोन्ही हात कंबरेवर ठेऊन जागच्या जागीच घुमत होत्या.
गोलाकार.
डावी उजवीकडे.
मध्येच घुत्कारत होत्या.
आज्जी स्वत:च्याच तंद्रीत गेल्या आणि तो क्षण मी साधला. अंगातलं सारं बळ एकवटत मी दाराकडे पळालो. दारापाशी पोहोचलो आणि एका हातात माधवला धरीत दुसर्या हाताने दार ओढू लागलो.
दार ढिम्म हालेना.
दाराला मघाशी मीच मोठ्ठा अडसर लावलेला.
मी लटपटत्या नजरेनं आज्जींकडे पाहिलं.
त्या त्याच अवस्थेत घुमत होत्या. कंबरेवर हात ठेवून. डावी उजवीकडे, गोलाकार. डोळे मिटून घुमता घुमता त्यांच्या तोंडातून सापाच्या फुत्कारासारखे आवाज बाहेर पडत होते.
सुटकेची हिच एक संधी होती. मी एका हाताने हलकेच अडसर काढण्याचा प्रयत्न केला. पण तो चांगलाच जड होता. ढिम्म सरकेना.
मी एक चोरटा कटाक्ष आज्जींकडे टाकला. त्यांचं घुमणं जरा जास्तच रंगात आलेलं.
मी हलक्या हातांनी माधवला खाली जमीनीवर ठेवलं आणि अडसर काढायला दाराकडे वळलो. किती सुक्ष्म अवधी होता तो !
पळ दोन पळांचा.

पण त्या अवधीतही आज्जींनी डावा साधला. मी माधवला खाली ठेवून दाराकडे वळताच त्या पुन्हा एकदा कर्कश किंचाळल्या. कानात कुणीतरी तप्त वाफाळणारं तेल ओतल्यासारखं वाटलं मला. सरसर करीत एखादा नाग पुढे यावा तशा त्या चार पावलांवर वळवळत विजेच्या वेगाने पुढे आल्या. त्यांना पुढे येताना पाहून मी भीतीने दूर सरकलो. अगदी पार पडवीत उघडणार्या माजघराच्या मुख्य दाराशी पोहोचलो. ...आणि मग मला माधव दिसला. छोटा माधव. परसातल्या दाराशी बसून एकटाच खिदळणारा माधव आणि त्याच्या शेजारी गुडघ्यांवर उभ्या असणार्या गानु आज्जी. मी त्याला तिथेच टाकून आलो होतो !
मघापासून एकवटलेला माझा सारा धीर त्या क्षणी खचला. आणि मग भयातिरेकाने मी मुळुमुळु रडू लागलो.
‘‘ रडू बाई रडू
एकटाच रडू
रडणारा खातो
धम्मक लाडू ’’
आज्जी टाळ्या पिटत लहान मुलासारख्या खदाखदा हसत म्हणाल्या. त्यांचं अनुकरण करीत माधवही टाळ्या पिटू लागला.
मी मटकन खाली बसलो. आज्जींनी माधवच्या पोटाभोवती विळखा टाकत त्याला एका हातानं उचललं आणि माकडीणी आपल्या पिल्लांना धरतात तसं पोटाशी धरत त्या तिन पावलांवर रांगत रांगत देव्हार्याच्या दिशेने सरकू लागल्या.
मी पुन्हा घाबरून दारातून आतल्या दिशेला सरकलो.
देव्हार्यापाशी येऊन पोहोचताच आज्जींनी हातात धरलेल्या माधवला खाली ठेवलं आणि त्या तिथेच फतकल मारून बसल्या. त्यांच्या डोळ्यात आता एक अनोखीच चमक आली होती. त्यांच्या डोळ्यात वात्सल्य नव्हतं, प्रेमही नव्हतं.
त्यांच्या डोळ्यात एक आसुसलेपण होतं. धूर्त आणि क्रूर आधाशीपणा होता. त्या डोळ्यांत भूक होती. अनेक वर्षांपासून खदखदणारी.
‘‘ सोडा त्याला.’’ मी कसंबसं आज्जींना उद्देशून म्हणालो.
माझाच आवाज मला त्यावेळी किती वेगळा वाटला !
हवा गेलेल्या फुग्यासारखा सैल,मलूल आणि शक्तिहीन.
‘‘ सोडू त्याला ? ये. ये इकडे घेऊन जा.’’ आज्जी मला वेडावत म्हणाल्या.
त्यानंतर त्यांनी माधवला खेचून घेत त्यांच्या मांडीवर बसवलं. मघापासून खिदळणारा माधव एकाएकी रडू लागला.
‘‘ तुला खाऊ ऽऽऽ ’’ आज्जी त्यांचे किडके दात दाखवत रेकल्या आणि माधवच्या रडण्याचा सूर टिपेला पोहोचला.
‘‘ उगी उगी बालाऽ मी आह्ये ना. का ललतो.’’ त्यांच्या त्या मुळच्या किरट्या, चिरक्या आवाजात ते बोबडे बोल अधिकच भेसूर आणि दुष्ट वाटत होते.
‘‘ आज्जी सोडा त्याला.’’ मी पुन्हा एकदा म्हणालो, यावेळी जरा जास्त मोठ्या स्वरात.
आज्जींनी एकदम मान वर करीत माझ्याकडे पाहिलं. नागाने अचानक फणा काढून पहावं तसं.
त्यांच्या नजरेत निखारा फुलला होता. त्याच धगधगत्या नजरेनं मला पहात त्या गुरगुरल्या. मांजरीसारख्या फिस्कारल्या.
केवळ देेह मानवी होता म्हणून अन्यथा त्यांची एकही हालचाल मानवी वाटत नव्हती.
‘‘ आज्जीला भूक लागलीये. भूक. किती दिवसांपासून उपाशी आहे आज्जी. आज खाणार. अगदी मनोसक्त खाणार.’’ असं म्हणत त्या खिऽखिऽ करत हसल्या. त्यांनी छोट्या माधवला वर उचलत तोंडाशी घेतलं आणि त्यांच्या त्या लांबलचक तांबड्या जिभेनं त्याला चाटायला सुरुवात केली.
माझ्या पोटातून उलटीचा उमाळा आला. माधव आता हंबरडा फोडून किंचाळत रडत होता.
‘‘ रडू नको. रडणारी बाळं नाही खात आज्जी. शांत हो पाहू.’’ असं म्हणत त्यांनी माधवला मांडीवर ठेवलं आणि त्या गाऊ लागल्या.
एवढी वर्षे झाली.
उन्हाळे गेले, पावसाळे गेले. नवे दिवस नवे अनुभव देऊन गेले. जाताना जुन्या आठवणी आपोआप खुडत गेल्या. नव्या आठवणींचे नवे पापुद्रे पुन्हा पुन्हा नव्याने चढत गेले. पण त्या संध्याकाळी गानुवाड्यात ऐकलेली गानु आज्जींची अंगाई कातडीवरल्या गोंदणासारखी मनाला कायम चिकटून राहिली.
कसं वर्णन करणार त्या अंगाईचं ?
शब्द थिटे पडतील वर्णनं करताना. खरंच शब्द कित्येकदा किती तोकडे पडतात घटनेतला नेमकेपणा दाखवताना !
आज्जी गाऊ लागल्या आणि बाहेर अंधारही थबकला.
‘‘ जो जो रे झोपलं
बाळ माझं पिकलं
पिकल्या बाळाला
किती खाऊ ?
जो जो रे अंगाईऽऽऽ
बाळा तुझी झोप
कावळ्याने नेली लाल लाल ओठ
मला हवे.
जो जो रे अंगाईऽऽऽ
बाळाची आई
गेली दूर गावा
बाळाची आज्जी
त्याला खाई
जो जो रे अंगाईऽऽऽ’’
त्यांच्या त्या भेसूर स्वराला आसमंताने साथ द्यायला सुरुवात केली होती. त्यांच्या किरट्या, कर्कश आवाजाने सभोवताल भारला गेला. बाहेर पानं सळसळू लागली. गोठ्यातल्या गाईंनी जिवाच्या आकांताने हंबरायला सुरुवात केली.
त्यांच्या आवाजात एके प्रकारचा शब्दभ्रम होता. तो स्वर भूल पाडत होता. आजुबाजुच्या निर्जीवाला, अचैतन्याला अवाहन करीत होता. माजघरात काहीतरी जिवंत होऊ लागलं.
आजवर मृत असणारं, किंवा कधीच जिवंत नसणारं असं काहीतरी आज्जींच्या त्या सूरात सूर मिसळून गाऊ लागलं.
‘‘बाळाचे ओठ
जसे जास्वंदी देठ
चाऊन खाया
मजा येई
जो जो रे अंगाईऽऽऽ’’
माजघराच्या भिंती, भिंतीवरल्या मातीची फेफडं, माजघराची दारं अगदी सारं काही जिवंत झाल्यासारखं वाटत होतं.
किती अभद्र आकार होते ते !
भिंती सोलीव कातडी सारख्या लाल तांबूस दिसू लागल्या. कातडीचा एक एक पापुद्रा सोलून काढावा तसे भिंतीचे पापुद्रे ओघळून पडत होते. दरवाजांचा तर रंगच बदलला होता. काळपट लाल रंगाची ती दारं न जाणो कोणत्या जमान्यातील भासत होती. आजींच्या त्या भेसूर सुरांना जसजशी इतर आवाजांची साथ मिळत गेली तसतशा त्या अधिकच बेभान होत गाऊ लागल्या.
‘‘सांडलं रगत
बघतो भगत
रगताची चटक
त्याला लागी
जो जो रे अंगाईऽऽऽ ’’
माझ्या भोवताली सारं माजघर गरगर फिरत होतं. डोळ्यांना जणू भ्रमरोग झाला होता. कुठे पहावं ? काय ऐकावं तेच कळेनासं झालेलं. उठून उभं राहण्याचा प्रयत्न केला तर झेकांड्या जात होत्या. काय होतं ते ?
ते भास होते का ?
ते भास असतील तर एवढ्या जिवंतपणे जाणवण्याएवढं घडलं तरी काय होतं ?
आता आजुबाजुने वेगवेगळे आवाज ऐकू येत होते. सरपटण्याचे.
कण्हण्याचे, कुथण्याचे.
भेसूर आवाजात रडण्याचे.
जे जे आवाज सुसंस्कृत मानवी कानांना अस्पृश्य वाटतील ते सारे आवाज आजींच्या स्वरात स्वर मिसळून त्यांची ती हिडीस अंगाई गात होते.
माधव धाय मोकलून रडत होता, बाहेर गाई जिवाच्या आकातांने किंचाळल्यागत हंबरत होत्या. आणि मी....
मी भेलकांडत होतो, खाली पडत होतो, पुन्हा उठून तोल जाऊन पडत होतो.
नेमकं काय घडत होतं तेच माझ्या जाणीवांना नोंदून ठेवता येत नव्हतं.
नेमकं कधी किती वेळानंतर ते घडलं आठवत नाही. पण भेलकंडल्या अवस्थेत कधीतरी माझ्या पायाला काहीतरी लागलं. एखादं भांडं उलथल्यासारखा आवाज आला. माझं लक्ष गेलं नाही;पण माझ्या नजरेस ते पडलं. अगदी योगायोगाने म्हटलं तरी चालेल.
ते ताट होतं.
मघाशी काकुनं ज्यात चिखलमाती कालवली होती ते ताट.
पण काकु तर ते ताट त्या खोलीच्या दाराशी ठेवणार होत्या. नेवेद्य होता म्हणे तो कसला तरी. मग ताट इथे कसं ? विसरल्या बहुदा ठेवायला.
माझं मन झरझर विचार करू लागलं.
विचार निसटत होते. त्यात सुसुत्रता नव्हती. खेचून ओढावं तसं कुणीतरी मला विचार करण्यापासून अप्रवृत्त करत होतं.
काकु काहीतरी म्हणाल्या होत्या.
परिस्थिती अगदीच हाताबाहेर जाऊ लागली तर....
निसटलं.
कसली परिस्थिती ?
कुणाचे हात ?
कशा बाहेर ?
विचारांना दिशाच नव्हती.
पाण्यावर उमटणारे तरंग क्षणात विरून जावे तसे विचार मनात पडल्या पडल्या विरून जात होते. सारी इंद्रीयं शिथील पडली होती. जागे होते ते फक्त कान. कान मोठ्या औत्सुक्याने गानु आजींची ती अंगाई ऐकत होते.
भेसूर, हिडीस आणि अभद्र अंगाई.
आज्जी आता स्वत:च्या तोंडानी गात नव्हत्या, तरीही अंगाई चालूच होती. कोण गात होतं आता अंगाई ? त्याच सुरात आणि तालात ?
आज्जींनी माधवला वर उचलून घेतलं आणि मोठ्ठा आ करीत त्याच्या मानेजवळ तोंड नेलं.
तो क्षण जिकरीच होता.
अगदी शेवटच्या क्षणी माझ्या आतून प्रतिकाराचं बीज सरसरत वर आलं.
काकु काय म्हणाल्या होत्या ?
आठवलं.
मी उठून उभा राहात त्वेषाने किंचाळलो,
‘‘ थांब आज्जी.’’
आज्जी दचकून थांबल्या. त्याक्षणी अगदी क्षणभर, आज्जींच्या त्या अघोरी अंगाईने जागवलेलं ते अभद्र हिडीस नाट्यही थांबलं.
आज्जींनी रोखून माझ्याकडे पाहिलं.
‘‘ काय रे कुत्तरड्या ?’’ त्यांच्या नजरेतला तो निखारा माझं अंगप्रत्यांग जाळत गेला.
काकु काय म्हणाल्या होत्या ?
बुळबुळीत, चिकट, निसरडं मन. त्यात काही उमटेचना. मेंदुही झिंगलेला.
...आणि आज्जी गुरगुरल्या. एखाद्या हिंस्त्र प्राण्यासारख्या. मोठ्ठाला आ वासत त्यांनी माधवच्या मानेचा लचका धरला.
काकु काहीतरी म्हणाल्या होत्या.
घसरणारे, मनातून निसटणारे सारे विचार या एका वाक्यापाशी येऊन थांबत होते.
आठवलं.
‘‘ आज्जी थांब वरणभात खा. परत जा.’’
मी तारस्वरात किंचाळलो.
आज्जी दचकल्या. यावेळी जरा जास्तच. माधवच्या मानेचा धरलेला लचका सोडत त्यांनी मान वर करून माझ्याकडे पाहिलं.
त्यांचे हिरवे डोळे मांजरासारखे लकाकत होते.
पण मी चुकीचे शब्द उच्चारले होते.
वरणभात खा नाही.
काय खा ?
‘‘ गुर्रर्रेर्रेर्रेऽऽ’’ आज्जी हाताचे दोन्ही पंजे माझ्याकडे रोखत गुरगुरल्या.
‘‘ म्हणजे तुलाकाहीतरी महितीये ? पण आत्ता आठवत नाही. हो ना ऽ ? आणि आता आठवणारही नाही.’’ असं गुरगुरल्या आवाजात म्हणत आज्जींनी मान वर केली आणि त्या त्याच फिस्कारल्या स्वरात काहीतरी पुटपुटल्या.
फर्फरफरफरफर..
बोळातून काहीतरी सरपटत येत होतं.
काहीतरी लांब, रुंद आणि अजस्त्र. गिळगिळीत.
वेळ थोडा होता.
‘‘ दुध भात खा. परत जा.’’ मी पुन्हा ओरडलो.
पण माझे शब्द चुकले होते हे मला कळत का नव्हतं ?
सरपटण्याचा आवाज जवळ येत होता.
आज्जी पुन्हा काहीतरी मान वर करीत पुटपुटल्या. जणू मंत्र म्हणून त्या कुणाला तरी त्यांच्या मदतीला बोलावत होत्या .
फरफरफरफरफर.
आवाज अजूनच जवळ आला.
माझा धीर आत खचत चालला होता.
काय म्हणाल्या होत्या काकु ?
बोळाच्या तोंडाशी काहीतरी हाललं.
आणि माझ्या मनातही.
काकुंचे बोल मला स्पष्ट आठवले.
‘‘ चिखलभात खा, परत जा.
मातीमायेची शपथ आहे तुला.’’
मी किंचाळलो.
‘‘ चिखलभात खा, परत जा.
मातीमायेची शपथ आहे तुला.’’
पुन्हा एकदा किंचाळलो.
ब्रेक लागल्यावर एखादी गाडी जशी करकचून थांबावी, तसं आजुबाजुचं ते अभद्र नाट्य ताबडतोब थांबलं.
आज्जी भयचकीत नजरेनं माझ्याकड पाहू लागल्या.
वटारल्या डोळ्यांनी काहीच न कळल्याप्रमाणे. त्यांच्या त्या लकाकणार्या हिरव्या डोळ्यांत एक कोडं होतं,गोंधळलेपण होतं आणि भिती होती.
मी उभा राहिलो. ताठ उभा राहिलो. आणि एक बोट आज्जींकडे रोखून नाचवत पुन्हा किंचाळलो,
‘‘ चिखलभात खा, परत जा.
मातीमायेची शपथ आहे तुला.’’
माझ्या अंगात जणू काहीतरी संचारलं होतं, मी बेभान होत पुन्हा पुन्हा किंचाळत होतो, नाचत होतो,ओरडत होतो,
‘‘ चिखलभात खा, परत जा.
मातीमायेची शपथ आहे तुला.’’
उन्हात ठेवलेला बर्फ भरभर वितळावा तसं सभोवताली काहीतरी वितळत होतं. मघापासून वातावरणावर अंधाराचा, भयाचा, अभद्राचा जो जाडसर लेप चढला होता तो भरभर विरघळत होता.
मघाचे ते क्रूर फसवे रंग, आवाज सारं काही वेगाने निवत होतं.
मध्येच आज्जी हेल काढून रडायला लागल्या. स्मशानघाटावर ओरडणार्या कुत्र्यासारख्या.
त्या रडण्यात वेदना होती, दु:खं होतं आणि हो, पराभवही होता.
आजीही प्रचंड वेगाने खचत चालल्या होत्या. मघाचा त्यांचा तो आवेश आता पार लुळावला होता. त्यातून माझं बेभान ओरडणं चालूच होतं,
‘‘ चिखलभात खा, परत जा.
मातीमायेची शपथ आहे तुला.’’
त्या निर्जन तिन्हीसांजेला गानुवाडा किती वेगवेगळ्या आवाजांनी भारला गेला होता.
माझं बेभान किंचाळणं, माधवचा आक्रोश, गाईंचा हंबर, आज्जींचं हेल काढून रडणं आणि आज्जींच्या त्या रडण्यात बेमालूम लपलेलं न जाणो आणि कुणाचं विव्हळणं.
मध्येच केव्हातरी बाहेर गलबला ऐकू आला.
आधी काकुंचा, मग भिवामामाचा आवाज आला. त्यानंतर नाना, गानु आजोबा एका मागोमाग सगळेच घरात घुसले.
त्या रात्री आणखी काय घडलं मला काहीच आठवत नाही.
त्या रात्रीचंच असं नाही त्या दिवसानंतर सरपणीत, गानुवाड्यात काय घडलं मला निटसं आठवत नाही. म्हणजे मी आठवण्याचा प्रयत्न करीत नाही. त्या रात्रीनंतरचं काही मेंदुतून निसटून मनात डोकावू पाहिलं तरी मी आठवणींच्या बुरजाचे दरवाजे अगदी कडेकोट बंद करून घेतो.
पण हे झालं आजवरचं.
आज मला ते सारं आठवावंच लागणार आणि लिहावंच लागणार. पण हे सारं मी अगदी त्रयस्थासारखं आठवणार आणि लिहिणार. कारण पुढे जे काही घडलं ते आठवण्यासारखं नाहीच मुळी.
त्या रात्री गानु आज्जी गेल्या. सकाळी त्यांचा अंत्यसंस्कार आटपतो न आटपतो तोच दुपारी कांजण्यांच्या तापात होरपळलेल्या सुनंदननेही मान टाकली. त्या संध्याकाळी अवघ्या गानुवाड्यानं आक्रोश केला.
पण असं नको.
गानुवाड्यावर त्या पंधरा दिवसांत मृत्युने जो घाला घातला त्यात मला गुंतायचं नाही. शक्य तेवढं तटस्थ राहून मला हे सारं लिहायला हवं.
सुनंदनच्या मृत्युने कोसळलेल्या काकु आणि नानांना सावरायला वेळ मिळतो न मिळतो तोच सुनंदनच्या दाहाव्याला आजोबाही गेले. अगदी झोपेतच गेले. आजोबांना सरणावर चढवून परतताना नाग चावून त्याच दिवशी नानाही गेले.
अवघ्या दहा दिवसांत चार मृत्यु.
वाडी मुकी झाली आणि वाडा दिनवाणा, बापुडवाणा होऊन गेला. दुधावरल्या साईसारख्या तकतकीत दिसणार्या काकु, वाळलेल्या पापडासारख्या निस्तेज आणि रंगहीन दिसू लागल्या. त्या शापीत, कोंडल्या वातावरणात जीव घुसमटू लागला. आणि मग एके दिवशी आम्ही सरपणी सोडली कायमची.
सरपणी सोडताना एकदाच आम्ही सगळे; म्हणजे मी आई, बाबा आणि ताई काकुंचा निरोप घ्यायला वाड्यात शिरलो.
काकु माजघरात बसलेल्या. खिन्न,उदास, रंग उडालेल्या एखाद्या जुनाट भिंतीसारख्या. मी भेदरल्यागत त्यांची नजर चुकवत इकडे तिकडे पहात राहिलो. आईच्या कुशीत शिरून रडताना काकु अगदी निराधार आणि असहाय्य वाटत होत्या. शेवटी एकदाचा काकुंचा निरोप घेऊन आम्ही बाहेर पडलो. भिवामामा आम्हाला बसथांब्यापर्यंत नेणार होता. सारे गाडीत बसले. मीही बसणार तोच आतून काकुंचा रया गेलेला आवाज आला,
‘‘ अविऽ जरा येतोस का आत.’’
आईबाबांनी मला खुणेनंच आत जायला सुचवलं, मी गोंधळल्या मनाने आत गेलो. रडून रडून सुजलेल्या डोळ्यांनी काकु भिंतीला टेकूनच बसल्या होत्या. माधव झोपाळ्यात झोपलेला. मला पाहता त्या एकाएकी धाय मोकलून रडू लागल्या.
‘‘ मी तुला एकट्याला इथे सोडून जायलाच नको होतं रेऽ ’’ बोलता बोलता मध्येच थांबल्या. आणि मग आजुबाजुला पहात कानोसा घेत करड्या आवाजात म्हणाल्या,
‘‘ कुत्तरड्या. मी अशी संपणार नाही. मी येईन. सगळ्यांना गिळीन. तुमच्या तान्हुल्यांचं रक्त पिईन. बघत रहा.’’
मी थंड पडलो.
तो आवाज काकुंचा नव्हता. तो गानु आज्जींचा होता. माझ्या समोर बसलेल्या स्त्रीचा चेहरा काकुंचा होता; पण त्या चेहर्यावरचे भाव गानु आज्जींचे होते. हिडीस आणि हिंस्त्र.
एवढ्यात भिवाकाका आत आला. काकुंनी सरड्याप्रमाणे रंग बदलत चेहर्यावर दिनवाणे भाव आणले. मी लटपटत्या पायांनी माजघराबाहेर पडलो;पण माजघराबाहेर पडताना माझं लक्ष गानुंच्या देव्हार्याकडे गेलं होतं. गानुंचे देव माझ्याकडे पहात क्रुर आणि खुनशी हसत होते.
त्या दुपारी आम्ही सरपणी सोडलं ते कायमचं. नंतर कुणी सरपणीची, गानुवाड्याची फार आठवणही काढली नाही. पुढे आम्ही मुंबईत आलो. मी मुंबईतच शिकलो. चांगल्या नोकरीला लागलो. यथावकाश लग्न, मुलं, मुलांची लग्न, त्यांना मुलं. आयुष्य कसं फास्ट फॉरवर्ड केल्याप्रमाणे वेगात सरलं.
सरपणीच्या, गानुवाड्याच्या आठवणी मी मनाच्या सांदीकोपर्यात कुलुपबंद करून टाकल्या होत्या. पण परवा दुपारी त्या एकाएकी बाहेर आल्या. शांत निजलेल्या जहरी नागाने त्वेषानं फणा काढाव्या तशा.
आता सारं लिहून झालं आहे. लिहिलेलं हे बाड मी माझ्या टेबलावर ठेऊन देणार आहे. ते अर्थात कुणालातरी सापडेलच. आणि कुणीतरी ते वाचेलच.
.......तर परवा दुपारी काय घडलं ?
मुलगा कामावर गेलेला, सौ आणि सुनबाई घररहाटीच्या कामासाठी बाहेर पडलेल्या. घरात मी आणि माझी पाळण्यात झोपलेली वर्षाची छोटी नात आदिती. दुपारचं जेवण अजून व्हायचं होतं. पोटात भुकेची आग पसरायला सुरुवात झालेली. रिटायर्ड माणूस. वेळ कसा घालवायचा हाच प्रश्न. अचानक आदिती उठून रडायला लागली. मी पाळण्यातनं तिला उचलून खेळवू लागलो. तिच्याशी बोबडे बोल बोलू लागलो. तिच्याशी खेळण्यात अगदी मग्न झालो होतो मी. एवढ्यात....
आता हे कसं लिहू ?
माझ्या आतून काहीतरी उसळून वर आलं. वेगानं. काहीतरी कडवट,काहीतरी घाण. मग ते विचार आले. रक्ताचे, मासांचे. मग नजरेसमोर रक्तामासाचे लगदे दिसू लागले. लहान बाळांच्या रक्तामासाचे लगदे. मी आदितीला तोंडाशी घेत चाटलं.
खरं सांगतो, त्यात वासनेचा लवलेशही नव्हता. होती ती भूक. रक्ताची, मासाची. मला रक्त आणि मांस हवं होतं. कुणा लहानग्याचं. माझ्या आदितीचं.
माझे दात करकरू लागले. ओठ आणि जिभ स्फुरण पावू लागली. तोंडात लाळ जमली. माझ्या हातात वर्षाभराची गोरीपान आदिती घमघमत होती. आणि मग मला गावसं वाटू लागलं. आयुष्यात राष्ट्रगीताचा अपवाद वगळता कधी चार शब्दही न गुणगुणारा मी. माझ्या आतून त्यावेळी गाण्याची उबळ येत होती.
‘‘ जो जो रे झोपलं
बाळ माझं पिकलं
पिकल्या बाळाला
कसं खाऊ ?
जो जो रे अंगाईऽऽऽ
बाळा तुझी झोप
कावळ्याने नेली लाल लाल ओठ
मला हवे
जो जो रे अंगाईऽऽऽ
बाळाचे ओठ
जसे जास्वंदी देठ
चाऊन खाया
मजा येई
जो जो रे अंगाईऽऽऽ’’
.....आणि मी भेसूर सुरात गाऊ लागलो. माझं स्वत:वरचं नियंत्रणच गेलं होतं. मध्येच भूक अनावर होत मी आदितीला वर उचललं आणि आ वासत तोंडाशी नेलं. मला तिच्या मानेचा लचका तोडायचा होता.इतक्यात....
‘‘ बाबा काय हे. आदिती का रडतेय.’’ दारातून चप्पल काढण्याच्या आवाजासोबत सुनबाईंचा आवाज कानावर पडला.
मी भानावर आलो.
माझ्यात जागा झालेला तो हिंस्त्र आघोर सरसरत खाली उतरला. लोळागोळा होत मनाच्या तळाशी नाहिसा झाला.
कुणाला काही कळायचा प्रश्नच नव्हता;पण मी मात्र त्यानंतर कुणाशी बोललोच नाही. रात्र तळमळत गेली. सारं काही आठवलं. अगदी सारं सारं.
गानु काकुंचे ते शेवटचे बोलही,
‘‘ कुत्तरड्या. मी अशी नाही संपणार. मी येईन. सगळ्यांना गिळीन. तुमच्या तान्हुल्यांचं रक्त पिईन. बघत रहा.’’
म्हणजे मी...
मला नाही विचार करायचा.
काय घडलं, काय घडतंय मला यावर बिलकुल विचार करायचा नाही . माझ्या हातून माझ्या आदितीला काहीही होता कामा नये एवढी काळजी मात्र मी घेणार आहे.
सगळं लिहून झालेलं आहे.
आता मी आमच्या गॅलरीत आलोय. या दहाव्या मजल्यावरून खालची माणसं कशी मुंग्यांसारखी दिसतात.
आत्महत्या करताना देवाचं नाव घेतात का ?
मी आजवर कधी घेतलं नाही.
मरतानाही घेणार नाही.
हा मी खाली पडतोय वेगानं.
खाली पडतानाही मनात एकच विचार आहे.
मी खाली का पडतोय....
पण आता माझं मन पूर्ण ताळ्यावर आहे.
मी खाली पडतोय.... कारण त्या करकरीत तिन्हीसांजेला गानुआज्जींची अंगाई जशी मी ऐकली तशी इतर कुणीच ऐकायला नको. .....अगदी माझ्या तोंडून सुद्धा !
‘अंधारवारी’ या प्रस्तुत लेखकाच्या गुढकथासंग्रहातून...
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन, पुणे

No comments:

Post a Comment