Sunday, May 8, 2016

THRILL…..Once Again

वाचकांसाठी एक नम्र विनंती. ह्या कथेतील संदर्भ समजुन घेण्यासाठी तुम्हाला अगोदर माझी "Thrill" हि कथा वाचावी लागेल.
****************************************************************************************************
कधी कधी काही काही गोष्टी प्रारब्धातच लिहिलेल्या असतात. अगदी ठरवुनही टाळता येत नाहीत अश्या काही. अशीच एक गोष्ट माझीही आहे.
मला आजही आठवतय त्यादिवशी शुक्रवार होता. संध्याकाळी अंड्याचा फोन आ्लेला. अंड्या म्हणजे आनंद, माझा शाळेतला मित्र. शाळेत कुणाच्याही खिजगणीत नसलेला हा, आता सगळ्यांनी दखल घ्यावी असा मोठा बिझनेसमन म्हणुन नावारुपास आला होता. गेल्याच महिन्यात शाळेच्या रियुनिअनमधे हां भेटला होता. बिझनेस म्हणुन रुबाब वाढला असला तरी मित्र म्हणुन अगदी शाळेत होता तसाच होता. फ़ोनवरही उचलल्या उचलल्या आत्ताही त्याने शिव्यांनीच सुरुवात केली होती
"काय रे माट्या काय करतोयस?"
"काही नाही रे निवांत आहे" मी सोफ्यावर पसरलेल्या फ़ायली आवरत बोललो.
"अरे वाह!!!! मग बरंच झालं. अरे ऐक ना माझं एक काम होतं तुझ्याकडे......."
".................
..................
..................."
अंड्याने लगेचच पुढे सांगायला सुरुवात केली.
"अरे एव्हढचं ना? करू की मग. फक्त साल्या तुझ्याकडून मी माझी फी मात्र मजबूत वसूल करणार" मीही हसत हसत म्हणालो.
"ok ठीक आहे मग मी तुला उद्या दुपारी पिकअप करतो"
दुसऱ्या दिवशी दुपारी बरोबर 2.30 वाजता नॅशनल पार्कच्या बाहेर भेटायच ठरवून मी अंड्याचा फोन कट केला. अंड्याच काम तसं साधंच होतं त्याला एक रिसोर्ट बांधायच होतं. त्यासाठीच जागा पहायला तो मला बोलवत होता. मी व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर असल्याने जागेबद्दल आणि बांधकामासंबधी त्याला माझं मत हवं होतं. सदर जागा त्याला आमच्याच एका शाळेच्या मित्राने, विरेंद्रने उर्फ़ विरुने सुचवली होती. ह्या प्रोजेक्टसाठीचे फ़ायनेंशीअल अस्पेक्टस समजुन घेण्यासाठी आमचाच अजुन एक वर्गमित्र हेमंत आमच्यासोबत येणार होता, जो आता सारस्वत को. ऑप बेंकेचा मेनेजर होता.
खरतर माझ त्या दिवसाच शेड्यूल थोडं टाईटच होतं. मला लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी कंपनी कामासाठी बंगलुरला जायचय होत. सकाळचं फ़्लाईट होती. तरीही मी जायच ठरवलं. त्याच निमित्ताने शाळेतल्या मित्रांसोबत आऊटिंगही झालं असत. थोडा रिफ्रेश झालो असतो.
ठरल्याप्रमाणे शनिवारी दुपारी अंडयाने मला नॅशनल पार्कच्या समोरून पिक-अप केलं. वीरू आणि हेम्या अगोदरच गाडीत बसले होते. अंड्याची नवी कोरी ’फ़ोर्च्युनर’ एकदम झक्कास होती. बाहेरच्या रखरखत्या उन्हातुन गाडीच्या आत गारेगार वातावरणात मस्त वाटत होतं. गाडीत विरुची अखंड बडबड चालु होती. त्याने सांगितलेल्या किस्स्यांनी तर हसता हसता पुरेवाट झाली होती. मला अंड्याच कौतुक वाटत होत. त्याचा गाडीवरचा कंट्रोल खरच सुरेख होता. आमच्या ह्या गदारोळात पुर्णपणे सामील असुनही गाड़ी काही 100 च्या खाली नव्हती. बोलता बोलता अंड्याने त्याचा प्रोजेक्ट आम्हाला समजवायला सुरुवात केली. प्लान मस्त होता मुंबईच्या जवळ त्याला एक फ़ॆमिली रिसोर्ट बांधायच होतं. एकदम अद्यावत. जेणेकरुन एक दोन दिवसासाठी अलिबाग-लोणावळयाला पळणार्या मुंबईकरांना टार्गेट करता येईल. फ़ायन्सान, पार्टनर्स, सगळं सेट होतं. आता फ़क्त जागा निवडायची होती.
" सो......मग जागा कुठे पाहिलीयस." मी अंड्याला विचारलं.
उत्तरादाखल अंड्य़ाने विरुकडे पाहिलं. विरु थोडा पॊज घेउन म्हणाला....
"ऊत्तन"
विरुने जागेचं नाव सांगताच माझ्या डोळ्यासमोर तारे चमकले. अवतीभवतीच सगळं माझ्याभवती फ़िरतय की काय असा भास होउ लागला. उत्तनच नाव ऐकताच इतकी वर्ष मनात कुठेतरी दडवुन ठेवलेल्या त्या दळभद्री आठवणीं वारुळातुन मुंग्या जश्या बाहेर पडाव्यात तश्या बाहेर येउ लागल्या. मला काहिच सुचत नव्हतं. त्या घडल्या प्रसंगापासुन मी तिकडे कधीच फ़िरकलो नव्हतो आणि आज नेमका त्याच ठिकाणी परत जात होतो. माझ्या मनात फ़ार नकरात्मक विचार येत होते. मला इथुनच परत फ़िरावसं वाटत होतं. बारा वर्षापुर्वी त्या रात्री घडलेला तो प्रसंग प्रत्येक बारकाव्यानिशी मला आजही लक्षात होता. त्या रात्रीच्या त्या प्रसंगाने आम्हा सगळ्यांची आयुष्य बदलुन गेली होती. कित्येक रात्री मी बिना झोपेच्या घालवल्या होत्या. मी तर त्या प्रसंगानंतर बाईक चालवायचीदेखिल सोडली होती.
"काय रे काय झालं.......गेला अर्धा तास नुसता गप्प बसुन बाहेर बघतोयस. चल उठ आता. साईट आली"
हेमंतच्या ह्या वाक्यासरशी मी एकदम तंद्रीतुन बाहेर आलो. थोडावेळ मी नक्की कुठेय हेच कळत नव्हतं. गाडी थांबली होती. अंड्या आणि विरु गाडीतुन उतरण्याच्या तयारीत होते. मी घड्याळात पाहिलं तर चार वाजले होते. नाईलाजास्तव गाडीतुन उतरलो. आम्ही अंड्य़ाच्या प्लॊटच्या समोर उभे होतो.
विरेनने दाखवलेला हा प्लॊट चांगला होता. एका रिसोर्टसाठी लागणारं लोकेशन, अक्सेस ह्या सगळ्या दृष्टीने सोयीचा होता. अंड्या मला रिसोर्ट्च्या ले-आउट आणि बांधकामासंबधी त्याचे प्रश्न विचारत होता. पण माझं लक्षच नव्हतं. राहुन राहुन सा्रख्या मनात त्या जुन्या आठवणी घोंगावत होत्या. मी देत असलेली उत्तरं पाहुन अंड्याला ’ह्याला उगीच येथे घेउन आलो, एखाद्या प्रोफ़ेशन माणसाला आणला असता तर बरं झालं असतं’ अस वाटत होतं आणि ते त्याच्या चेहर्यावरुन स्पष्ट कळतं ही होत. अखेर माझा नाद सोडुन अंड्या हेमंतकडे वळला. हेमंतने त्याला ह्या जागेची कागदपत्र आणि काही बेसीक ड्रॊईंगस मिळाली तर त्याच काम होउ शकत असा विश्वास दिला. आता उगाच आपल्याकडुन उशीर नको म्हणुन विरेननेही त्याच्या मध्यस्थाला ती कागदपत्र लगोलग घेउन यायला सांगितली.
नाही नाही म्हणता, संध्याकाळी आम्हाला उशीर झालाच. जागेचे कागदपत्र आणि नकाशे आणुन देणारा माणुस, जो पाचाला यायचा तो सात वाजता आला. जसजसा अंधार पडू लागला तस माझ्या जीव घाबराघुबरा होउ लागला. मला तेथे एक क्षणही थांबावसं वाटत नव्हतं. अखेर सगळी कागदपत्र व्यवस्थीत पाहून अंड्या आणि हेमंतने समाधानाचा सुस्कारा सोडला. आम्ही परत गाडीत येउन बसलो. एव्हाना पाउणे आठ वाजले होते.
"आता काय करायचं ???" अंड्याने सीट बेल्ट लावता लावता विचारलं. मी काही बोलणार इतक्यात
"इथूनच जवळ साईदर्या नावाचा फट्टे धाबा आहे...तिथे बसूया......सॉल्लिड जागा आहे जेवण दारु ए-वन......" हे सांगताना विरुने ओठांवरुन जीभ फिरवली.
" अरे वाह ......सही है..........तसही हे जागेच डील आता फायनल होण्यातच जमा आहे. त्याचीच पार्टी आज करून टाकू" अंड्या खुशीत येत म्हणाला.
अंड्याच्या ह्या प्रपोजलवर सगळे तयार होते, फ़क्त मी सोडुन. मी माझा नकार दिला, त्यावर ते तिघेही माझ्यावर चढले. मी त्यांना माझं दुसर्या दिवशी बंगलुरला जायचं कारन सांगितलं. सकाळी फ़्लाईट असल्याचंही सांगितलं. पण ते काहीएक ऐकण्याच्या मनस्थीतीत नव्हते. त्यांच्यासमोर माझा विरोध सर्व बाजुने थिटा पडू लागला. अखेर मग मी ही त्यांच्यासोबत जायला तयार झालो. कारण ते तसेही माझ काही ऐकणार नव्हते आणि रात्री दहाला जरी इथुन निघालो तरी भाईंदर मार्गे बोरीवली जास्तीत जास्त 2 तासात घरी पोहचणार होतो म्हणुन मग मीही जास्त आढेवेढे न घेता आता निमुट्पणे माझा नकार होकारात बदलुन टाकला.
आम्ही आता साईदर्याला बसलो होतो. विरुने सांगितल्यानुसार ति जागा खरच उत्तम होती. आमच खाणं आणि दारुकाम दोन्ही तब्येतशीर चालु होतं. बऱ्याच दिवसानी भेटल्यामुळे टेबलावर चाखण्यासोबत शाळेतल्या जुन्या किस्स्यांचीही रेलचेल होती. हेम्याकडे तर असल्या किस्स्यांचा खजिनाच होता. साल्याच्या बऱ्याच गोष्टी लक्ष्यात होत्या आणि तो त्या अफ़लातुन रंगवुन सांगत होता. आमची हसता हसता पुरेवाट झाली होती. मी तर बऱ्याच दिवसाने इतका हसलो होतो.
"अरे तुम्हाला आता एक सॉल्लिड स्टोरी सांगतो....." अस म्हणुन हेम्याने अजुन एक किस्सा सांगायला सुरुवात केली.
"तुम्हाला आपला तो चिनू आठवतोय .....चेतन शिंदे..... दहावी ब मधला.....एकदा तो, परवडी, चप्पा आणि चौथा कोण होता बरं?......हा आठवलं..... अंकुर.....ते लोक इथे गोराइ-उत्तन रोडवर पूर्वी रात्रीचे बाईक चालवायला यायचे. एके रात्री म्हणे त्यांची अशी वाट लागली की, त्यारात्रीपासुन त्यांनी इथेच काय तर दिवसा चाराकोपमधेदेखिल फिरायच बंद केलं"
"का रे...एव्हढं काय झाल असं ??????" वीरूने एक्साईट होतं विचारलं
"अरे त्यांना म्हणे इथे कुणीतरी दिसलेल. बाई की काहीतरी... चिन्या तर चांगला आठवडाभर आजारी होता त्यानंतर." हेमंत दारुचा सीप मारता मारता म्हणाला.
"चल बे भंकस" आनंदने हेम्याला फ़ाट्यावर मारलं.
विरेंननेही अंड्याला साथ दिली. तसा हेमंतही त्यांना सामील होता. त्याचे आता ह्या घटनेवर विनोद चालु झाले. सगळे जोरजोरात हसत होते. फ़क्त मी सोडुन.
हेमंतच्या तोडुंन हां किस्सा ऐकून मला तर धक्काच बसला. मी विचार करू लागलो की हे सगळं ह्याला कसं कळालं?? कारण ही गोष्ट कुणालाही सांगायची नाही हे शपथेवार आम्ही ठरवलं होतं. मग तो वायदा कुणी मोडला होता???
"तूला कुठुन कळली ही गोष्ट??" मी हेमंतला विचारलं
"अरे रायझिंग क्लबमधे फुल्ल फेमस आहे ही स्टोरी" हेमंतने हसता हसता मला त्याच उत्तर दिलं
मला आता चप्पाचा फार राग आला होता. ह्याचा अर्थ त्या हरामखोरानेच ही गोष्ट फोडली होती. हेमंतचे विनोद अजुन चालूच होते. माझ डोक आता सरकलं होतं.
"हेम्या, प्लीज ही गोष्ट हसण्यावारी नेउ नकोस. तू तिथे असतास, तर आज त्या गोष्टीवर एव्हढा हसला नसतास" मी नाराजीने हेम्याला म्हणालो
"तुला कसं माहीती?" मला गंभीर झालेल पाहता हेमंतने विचारलं.
"कारण, त्या रात्री तिथे चौघे नाही तर पाचजण बाईक चालवायला गेले होते आणि.............. पाचवा मी होतो"
माझ्या ह्या वाक्यासरशी ते सगळेजण माझ्याकडे आश्चर्याने पहायला लागले. त्या तिघांकडे एक नजर टाकुन मी सांगायला लागलो.
आमचं ते गोराईला येणं.
ते सुसाट बाईक चालवणं.
मग एका वळणावर मला लागलेला चकवा.
पुढे मला दिसलेली ती बाई अन तिच्यासोबतची ती मुलगी.
त्यांना घाबरून मी गाडी पुढे पळवत असताना मला मागाहुन येऊन गाठणारे परवडी आणि अंकुर.
परत येताना रस्त्याच्या कडेला भेदरलेला चप्पा आणि चिनू.
चिनुला आलेली फ़िट.
बोटीत चप्पाने सांगितलेला त्याच्या आणि चिनुवर गुदरलेला तो भयानक प्रसंग.
हे सगळं ऐकून त्या बोटीतल्या काकांनी आमची केलेली कान उघडणी.
सगळं सगळं सांगितलं.
तो प्रसंग त्यांना सांगताना तेव्हाही माझ्या अंगावर काटा उभा राहिला होता. तेव्हाही तो प्रसंग अगदी डोळ्यांसमोर घडत असल्यासारखा वाटत होता. अगदी जश्याच्या तसा.
मी सांगितलेला तो प्रसंग ऐकताना सगळे आता एकजात शांत होते. मगास पासून बडबडत असलेला हेमंतही आता माझ्याकडे गंभीरपणे पाहू लागला. एक दोन क्षण गेले असतील की आनंद अचानक जोरजोरात हसायला लागला. आनंदला हसताना पाहून आधी हेमंत आणि मागोमाग विरेंद्रही हसायला लागले. मला काही कळेचना की हे असे माझ्यावर का हसताहेत. माझ्या चेहऱ्यावरचे ते गोंधळलेले भाव पाहून तर त्यांना अजुनच चेव आला. हेमंत आणि विरेंद्र माझ्याकडे पाहून हसताना आता एकामेकांना टाळ्या देत होते. आनंदच्या डोळ्यांत तर हसून हसून पाणीच आलं होतं. त्यांच्या ह्या अश्या प्रतिक्रियेमुळे मी समजुन चुकलो होतो, की त्यांनी मला सपशेल मुर्खात काढलं होतं. मी हताशपणे माझ्या हातातला ग्लास संपवला आणि दुसरीकडे पाहू लागलो. मला असं शांत असलेलं पाहून आनंद आपल हसणं आवरत मला म्हणाला.
"सॉरी यार अमोल, रागावू नकोस पण तू सांगितलेला हा किस्सा बराच कॉमेडी होता. तुम्ही इथे बाईक चालवता काय, तुम्हाला ती बाई दिसते काय आणि मग तुम्ही सगळे घाबरून पळत सुटता काय. सगळीच भंकसबाजी नुसती"
"भंकसबाजी????" मी ज़रा घुश्श्यातच विचारलं
"नाहीतर काय, मला काही पटत नाहिए हे सगळं. त्यारात्री तुझ्या सांगण्याप्रमाणे तुम्ही सगळे एकतर आपापल्या बाइकस हेडलाईट ऑफ़ करून चालवत होतात. त्या वळणानंतर अंकुर आणि परवडीने आपल्या बाईक्स रोडच्या कडेला दडवल्या असणार आणि तुला पुढे पाठवलं असणार. रात्रीच्या अंधारात तुला ती गोष्ट नक्किच जाणवली नाही. म्हणुनच मग त्यांनी तुला मागाहून पुढे गाठला आणि तुला वाटलं की तुला चकवा लागलाय. आणि रहाता राहिली त्या बाई आणि त्या मुलीची गोष्ट, तर भित्याच्या पाठी ब्रम्हराक्षस म्हणतात तेच खरे. तुला त्या रात्री नक्कीच भास् झाला असणार. एकतर तू तिथे रात्रीचा एकटा होतास आणि त्यात प्रचंड घाबरलेला होतास. तेव्हा तुझ्या डोक्यात नको नको ते विचार चालु असणार. अश्या वेळेस आपल्याला जूने ऐकलेले, वाचलेले संदर्भ आठवतात आणि आपलं घाबरलेलं मन त्याच संदर्भाची आपल्याभवती एक आभासी प्रतिमा तयार करते व आपल्याला ते सगळं खरं वाटु लागतं. तसच काहीस तुझंही त्यावेळेस झालं असणार. म्हणुनच ती बाई तुला एकटा असताना दिसली, मागाहून परत येताना अंकुर आणि परवडीसोबत येताना तुला ती बाईच काय तर तो बस स्टॉपही दिसला नाही." आनंदने माझ्या त्या घटनेवर मांडलेल्या ह्या तार्कीक सिध्दांतावर सगळ्यांनी माना डोलावल्या.
"माझं एकवेळ ठीक आहे, पण मग चप्पा आणि चिनुच काय?" मी अजुनही माझी बाजू मांडत म्हणालो.
"त्यांच काय? त्या दोघांना मी पुरेपुर ओळखतो" आनंद हातातला ग्लास रिकामा करीत म्हणाला.
"मला पुर्ण खात्री आहे की ह्या सगळ्यामागे तो हरामखोर चप्पाच आहे. त्यानेच चिनुला त्या रात्री घाबरवलं असणार. चिनू तर ऑलरेडी एक नंबरचा फट्टू आहे. त्यांची तेव्हा तंतरली आणि त्यातच भीतीचा ओव्हरडोस झाल्याने त्याला फ़िट आली असणार. चिनुला असं पाहून तुम्ही सगळे आता त्याच्यावर चढणार ह्याचीच भिती वाटल्यामूळे चप्पाने तुम्हाला ती खोटी कहानी ऐकवलीय. बाकी काही नाही". आपण एक सॉल्लिड मिस्ट्री स्लोव्ह केल्याच्या अविर्भावात अंडयाने आपला पेग संपवला आणि सगळ्यांकडे पाहिलं. विरु आणि हेम्या कौतुकाने अंड्याकडे पहात होते.
"पण मग त्या बोटीवरल्या काकांनी सांगितलेल ते ?" मी अजुनही आपला मुद्दा मांडत होतो, पण त्यात आता काही पहिल्यासारखा जोर नव्हता.
"अरे यार.....अमोल काय तू पण लहान मुलांसारखा प्रश्न विचारतोयस. तुम्ही चारचौघात, लोकांसमोर असला काही विषय काढलात की त्यांना काय जातय शेंड्या लावायला. कोकणात तर असल्या गजाली भरपूर मिळतील. आता मला एक सांग. त्यारात्री तुम्ही पाचजण होतात....... बरोबर ना? मग ती बाई आणि ती मुलगी फ़क्त तुम्हा तिघांनाच कशी दिसली? आणि तीही वेगवेगळी?????" आनंदने वैतागत विचारलं.
आनंदच्या ह्या प्रश्नांला माझ्याकडे खरच काही उत्तर नव्हतं. माझ्या मनाला अंड्याचं हे लॉजीक पटतं नव्हतं पण ह्याचा अर्थ अंड्या काही चुकीच बोलत होता असही नव्हतं. कारण त्या सगळ्या घटनेला त्या पाचजणांपैकी फ़क्त आम्ही तिघेच साक्षीदार होतो. माझ्या अनुभवाला त्यावेळेस माझ्यासोबत ते दोघे नव्हते, तर त्यांच्यावर ओढावलेल्या प्रसंगादरम्यान मी तिथे हजर नव्हतो. त्यामुळे ह्या प्रकरणातली खऱ्याखोट्याची विश्वासार्हता हि सगळी ज्याच्या त्याच्या सांगण्यावर आणि ऐकण्यावर अवलंबुन होती.
"माझ ऐक, हे भुतबीत काही नसत. आपल्या मनाचे खेळ असतात सारे. आमच्या अंधश्रध्दा निर्मूलन संघटनेत अश्या कितीतरी गोष्टी आम्ही प्रुव्ह केल्यात." अंड्या मला समजावत म्हणाला.
सगळे शांत होते. मला अजुनही पटत नव्हतं. अंड्या सांगतो हे जरी खर मानलं तरी एकद्याला इतके भास कसे होउ शकतात अन खासकरुन ते ही एकाच जागेवर दोन वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या वेळेस. विचार करुन करुन माझं आता डोक दुखायला लागलं होतं. तेव्ह्ढ्यात.........
"मला माफ करा, पण हे साहेब जे सांगताहेत ते खरं आहे." अचानक माझ्या पाठिमागुन आलेल्या त्या आवाजाने आम्ही सगळेच चमकलो. आवाजाच्या दिशेने पाहिलं असता, तिथे त्या हॉटेलचा वेटर उभा होता. बहुतेक मगासपासुन तो आमचं हे बोलणं ऐकत असावा. आनंदने त्याला खुणेनेच जवळ बोलावलं.
"काय म्हणालास?" अंड्याने आवाजात जरब आणत विचारलं.
"नाही म्हटलं, मी तुमचं सगळं बोलणं ऐकलं. त्या रोडबद्दल आणि तिथे घडलेल्या घटनेबद्दल. तुम्ही कितीजरी नाही म्हटलं तरी हे साहेब जे सांगताहेत ते खरं आहे." तो माझ्याकडे बोट दाखवत म्हणाला.
"त्या रस्त्यावर सहसा रात्रीचं कुणी एकटं दुकटं फिरत नाही. आजवर त्या परिसरात बऱ्याच जणांना असेच काहीसे विचित्र अनुभव आलेले आहेत." तो वेटर कधी माझ्याकडे तर कधी अंडयाकडे पहात बोलत होता.
"कश्यावरुन बोलतोस तू हे? तू स्वत: अनुभवलं आहेस का ते? का ती बाई.... जी म्हणे तिथे दररात्री उभी असते, ती तुझी आयटम आहे? आणि तिने तुला हे सगळं सांगितलय" अंड्याने छ्द्मीपणे हसत त्याला विचारलं.
"नाय...... मी स्वत: नाही अनुभवलं. पण इकडची सगळी लोक तेच सांगतात. तुमच्या सारखे बरेचसे मी मी म्हणणारे तिथे गेल्यावर ढुंगणाला पाय लावून परत आले." त्या वेटरनेही आनंदने त्याच्यावर केलेल्या विनोदाला चपराक दिली होती.
"शट अप......मुर्ख कुठला..... असं कधी असतं का? सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत बाक़ी काही नाही." अंड्या आता सॉल्लीड भडकला होता.
"तुम्हाला एव्हढच जर का हे सगळं खोट वाटत असेल तर मग साहेब तुम्ही स्वत:च तिथे जाउन खात्री का नाही करून घेत?" वेटरही अंड्याला आता चेलेंज देत म्हणाला.
"अरे जातो की. मी कुणाच्या बापाला भीत नाही. आणि आता तर मला ह्या गोष्टीची शहनिशा करायचीच आहे." अंड्याही आता आवाज चढवत म्हणाला.
अंड्याचा आवाज ऐकून एव्हाना आजूबाजूचे लोक आता आमच्याकडे पाहू लागले होते. गोष्ट हाताबाहेर जाऊ नये म्हणुन मग मी आता मधे तोंड घातले.
"जाऊ दे ना यार...कशाला उगाच हायपर होतो.... सोड ना..." मी आनंदला समजावत म्हणालो.
"तू तर शांतच रहा...मगाशी तर तूच ही गोष्ट मला पटवुन देत होतास, मग आता काय झालं? आता काही नाही. आपण आत्ताच, ह्या क्षणाला तिथे जाणार आहोत. ही गोष्ट खरी असेल तर मग मलाही ती पहायचीय आणि नसेल तर निदान तुमच्या मानेवरच हे संशयाच भुत तरी उतरेल." शेवटच वाक्य अंड्याने त्या वेटरकडे पाहून उच्चारलं.
एव्हढं बोलुन अंड्या ताडकन टेबलावरुन उठला. त्या वेटरला बील किती झालं विचारुन, हजाराच्या पाच करकरीत नोटा टेबलावर टाकल्या. काय होतय हे समजायच्या आतच अंड्या त्याच्या गाडीजवळ पोहचला देखिल. बघता बघता एक हसरी संध्याकाळ एका तणावाच्या रात्रीत बदलली होती.
******************************************************************************
आम्ही चौघेही आनंदच्या गाडीजवळ पोहचलो. मी पुन्हा एकदा अंड्याला समजावायचा प्रयत्न केला पण अंड्या आता काहिएक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. विरुने मला गपचुप गाडीत बसायची खुण केली. आता हे काही ऐकत नाहीत ह्याचा अंदाज येताच मीही मग मुकाट गाडीत बसलो. अंड्याने तिरमिरीत गाडी चालु केली. त्यावेळेस गाडीच्या स्टार्टरचा झालेला जोरदार आवाज अंड्याच्या भडकलेल्या मनस्थितीचा अंदाज देत होता. गाडी हॉटेलच्या बाहेर आली. डाव्या बाजुला भाइंदर होतं पण आमची गाडी उजव्या बाजुचं वळण घेउन गोराई गावाच्या दिशेने धावू लागली होती.
गाडीने आता चांगलाच वेग पकडला होता. चारपाच मिनिटांतच रस्त्याच्या आजुबाजुची सगळी जाग संपली. अंड्या त्या अंधार्या रस्त्यावर त्याच्या उद्दाम हेडलाईटच्या जोरावर गाडी सुसाट पळवत होता.
गाडीत कुणीच कुणाशी बोलत नव्हत. एक साधासा विषय एव्हढ्या टोकाला जाईल अस अजिबात वाटलं नव्हतं. सगळेच शांत होते. मी बाहेर पाहू लागलो. बाहेर अंधार आमच्या सोबत पळत होता. ऎव्हढ्या वर्षानी इथे येत होतो तरी अजुन इथे काही फ़रक पडलाय अस वाटतं नव्हत. गोराई उत्तनचा हा रोड अजुनही तसाच होता.
एकटा..........सुनसान...........
मी माझ्या स्मरणशक्तीला जोर देऊ लागलो. पण ओळखीच्या कुठल्याच खुणा सापडत नव्हत्या. मी मनात विचार करत होतो की अंड्या जस म्हणतोय तेच खरं असू दे. मी मनाशी बाहेर बघायच नाही असं ठरवलं. तरी माझी नजर माझा इशारा फ़ाट्यावर मारून बाहेर त्या बस थांब्याचा वेध घेत होती. बराच वेळ झाला तरी आजुबाजुला काळोखाखेरीज दुसरं काहीच दिसत नव्हत. आता मलाही मगाशी अंड्याने ज्या गोष्टी सांगितलेल्या त्यात तत्थ्य वाटु लागलं होतं.
तेव्हढ्यात अचानक रस्त्याच्या उजव्या बाजुला मला तो दिसला. अगदी जश्याच्या तसा. रस्त्याच्या कडेला गडद अंधाराच्या साक्षीने त्या रोगट दिव्याच्या सोबतीने अजुनही आपलं गुढ अस्तित्व जपुन असलेला.
त्याला पहाताच मी नखशिखांत शहारलो. मी घाबरून तिकडे पहायचं नाही ठरवलेलं, पण आज माझ्या डोळ्यांनी माझी कुठलीच गोष्ट ऐकायची नाही अशीच ठरवली होती बहुतेक, मी नाही नाही म्हणत असतानाही माझी नजर सारखी त्या बस थांब्यावर जात होती आणि क्षणाक्षणाला त्याच अस्तित्व माझ्या मनपटलावर कायम होत होतं. गाडी जसजशी त्या बस थांब्याच्या जवळ पोहचत होती तसतसा त्याच तिथे असणं हे अजुन ठळक होत होतं. तो खरच तिथे होता. ह्याचाच अर्थ, त्या रात्री मला भास् झाला नव्हता ह्याची मला आता पुर्ण खात्री पटली. तो जसजसा माझ्या जवळ येत होता, तसा मी ही मग माझ्या इच्छेविरुध्द आता त्याच्याकडे निरखून पाहू लागलो.
आणि एका क्षणाला माझे डोळे आता भीतीने पांढरे पडायचेच बाकी होती.
तो बस थांबा......आजही तिथे एकटा उभा नव्हता. तिथे त्याच्यासोबत एक बाई उभी होती. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. मी पुन्हा एकदा डोळ्यांची उघडझाप केली पण समोरच्या दृश्यात काही फरक पडला नाही. मी आता सॉल्लीड घाबरलो होतो.
मला खरच वाटत नव्हत. मी पाहिलं तर ती एकटक आमच्या गाडीकडेच पहात होती. आमची गाडी आता बरोबर तिच्यासमोरून पास झाली. मी ही तिच्याकडे वळुन पहिलं, ती आता मागे मागे जात होती. पण तिची ती नजर अजुनही आमच्या गाडीवरच खिळलेली होती.
तेव्हढ्यात कुणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी भीतीने जवळ जवळ किंचाळलोच. मी वळुन पाहिलं तर तो विरु होता. माझ्या जीवात जीव आला.
"काय रे, काय झालं असं ओरडायला???" मला अस घाबरलेल पाहून वीरूने मला विचारलं.
"अरे तुम्ही....तो बस स्टॉप.....ती बाई.....तुम्ही तिला पाहिलं नाही का?" मी अजुनही त्या धक्क्यातून सावरलो नव्हतो.
"काय झालं? नीट सांग".....अंड्याने रेअर मिरर मधून माझ्याकडे पहात मला विचारलं.
"अरे तुम्ही तो आता पास झालेला बस स्टॉप नाही पाहिलात का? आणि तिथे उभी असलेली ती बाई." मी थरथरत त्याला विचारलं.
त्यासरशी अंड्याने जोराचा ब्रेक मारला. त्या शांत वातावरणात गाडीचा तो आवाज केव्हढ्याने तरी घुमला. आम्ही समोर पाहिलं तर गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशाव्यतिरिक्त दुसरं काहीच नव्हतं. अंड्याने घुश्श्यात माझ्याकडे वळुन पाहिलं.
"तुझ्या ना आता एक कानाखाली वाजवेन अमोल....... काय फालातुगिरी लावलियस मघासपासुन. मी एव्हढा वेळ ड्राईव्ह करतोय पण मला कसा नाय दिसला तो....तू पाहिलास का रे वीरू????" अंड्याने विरुला विचारल तस मी विरुकडे पाहिलं. तर वीरू माझ्याकडे काळजीने पहात होता. त्याने माझ्या डोक्याला हात लावून पहिला आणि लगेच माझ डोक स्वत:च्या छातीशी कवटाळुन नाटकी स्वरात म्हणाला.
"अल्ले माझ्या शोन्या अस नाई वागायच ले...... बाहेरून बुआ येईल आणि तुला घेउन जाईल समजलं"
विरेनच्या ह्या कृतीनंतर गाडीत एकच हसण्याचा आवाज घुमला. मला खरच विश्वास बसत नव्हता की तो बस स्टॉप माझ्याशिवाय ह्या गाडीत दुसर्या कुणीच पाहिला नव्हता का? ते अजुनही माझ्याकडे पाहुन हसतच होते. मी बावचळुन त्या सगळ्यांकडे पाहिलं. तेव्हा मला एक गोष्ट जाणवली की, अंड्या आणि विरु वेड्यासारखे हसत असताना, पुढे बसलेला हेम्या मात्र गप्प होता. त्याच्या त्या घाबरलेल्या चेहरयाकडे पाहून मी समजलो की मगाशी त्या बाईला ह्या गादीतुन फ़क्त मी एकट्यानेच पाहिलं नव्हतं.
हसता हसता अंड्या गाडीच्या बाहेर उतरला.
"कुठे चाललायस?" मी न रहावुन त्याला विचारलं.
"साल्या तुझ्या ह्या हॉरर स्टोरी मुळे माझी घाबरून हालत खराब झाली आहे." असं बोलून अंड्याने आपली करंगळी वर केली आणि अजुन जोरात हसायला लागला.
त्यासोबत हसता हसता विरेनही बाहेर पडु लागला सोबत मलाही ओढु लागला.
"तू पण चल.....नाहीतर आमची गाडी खराब करशील" ह्यासरशी ते दोघेही अजुन जोरजोरात हसत होते. मला माझीच खुप चीड येत होती. साली कुठुन अवदसा आठवली आणि ह्यांच्यासोबत इथे आलो.
एकएक करुन सगळे गाडीच्या बाहेर आले. विरेनने बाहेर येताच एक जोराचा आळस दिला. अंड्याने एक सिगरेट शिलगावली. एक जोरदार कश मारत ती विरुच्या हातात दिली. विरुनेही आकाशाकडे पहात एक जोरदार कश मारला आणि म्हणाला.
"काय साला चांदण पडलय बघ. असं वाटत की ह्या शांत वातावरणात हे चांदण पहात इथेच एक बाज टाकुन पडून रहाव."
"वाह विरु क्या बात कही है, तू साला खरा कवी माणुस. नाहीतर काही लोक नुसतं कागदावरच चांगल लिहितात आणि प्रत्यक्षात मात्र अश्या चांदण्या रात्री बसस्टॉप आणि बाई बघत रहातात" आनंदने हां शालजोडीतला अहेर खास माझ्यासाठी दिला होता हे न कळण्याइतका मी काही मुर्ख नव्हतो. अंड्याच्या ह्या विनोदावर विरु जोरात फसफसला. अंड्या आणि विरु जोरजोरात हसत होते. त्या निर्जन रस्त्यावर आता फ़क्त त्या दोघांच्याच हसण्याचा आवाज घुमत होता.
अचानक मला जाणवलं की ही तीच जागा आहे जिथे गेल्यावेळेस परत येताना आम्हाला चप्पा आणि चिनू भेटले होते. मनातल्या शंकेचं खात्रीत रुपांतर होताच. भितीची एक थंड लहेर माझ्या शरीरातून आरपार झाली. मी दचकून इकडे तिकडे पाहिलं. त्या रात्रीच्या किर्र्र काळोखात आम्ही तिथे एकटेच होतो.
आणि तितक्यातच........
आमच्या अगदी पाठीमागुन कुणीतरी जोरात किंचाळत रस्त्याच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे पळालं.
आम्ही पटकन मागे वळालो. मागे त्या अंधार्या एकाकी रस्त्याशिवाय दुसरं कुणीच नव्हतं. अचानक घडलेल्या त्या विचित्र गोष्टीने सगळेच दचकले होते. अंड्या आणि विरु दोघेही झाल्या प्रकाराने शांत झाले होते. असेच एकदोन क्षण गेले असतील की, पुन्हा कुणीतरी आमच्या मागुन पुन्हा किंचाळत धावत गेले. त्या निर्जन रात्रीतली ती बेसुर किंचाळी अंगावर काटा उठवुन गेली. आम्ही गरकन मागे वळालो पण पुन्हा तेच. त्या रस्त्यावर...नाही खरतर त्या पुर्ण परिसरात आमच्याशिवाय दुसरं कुणीही नव्हतं. हा सगळा काय प्रकार चाललाय हे कुणालाच काही कळत नव्हतं.
"काय होतं ते?" विरुने दबक्या आवाजात हळुच विचारलं. आज संध्याकाळपासून पहिल्यांदाच विरेनच्या आवाजात मला भिती जाणवली होती.
हां काय प्रकार काय असु शकतो ह्याचा मला एव्हाना अंदाज आला होता, अखेर ज्याची भिती होती तेच घडत होतं, मी म्हटलं अंड्याला की मला हे काही ठीक नाही वाटत आहे. आपण निघुया इथून. पण आनंद ह्यावर काहीच बोलला नाही. त्याची शोधक नजर आसपासच्या सगळ्या गोष्टीवरून सारखी भिरभिरत होती. मगाशी घडलेला तो प्रकार नक्की काय असावा याचा तो आपल्या परीने अंदाज बांधत होता बहुतेक. काही क्षण असेच शांततेत गेले, अंड्या काही उत्तर देत नाही हे पाहून मी पुन्हा त्याला इथून निघण्याबद्दल सुचवलं पण अंड्या माझ्या बोलण्याकडे सपशेल दुर्लक्ष करीत अजुनही आजुबाजुलाच पहात होता.
"अमोल बोलतोय ते बरोबर आहे. मलाही असचं वाटतय की आपण इथून आता निघुयात" विरु अंड्याच्या हाताला ओढत ज़रा मोठ्यानेच म्हणाला.
अंड्यालाही हे पटलं नसलं तरी विरु समोर तो काही बोलु शकला नाही. सगळेजण पटकन गाडीत येउन बसले. विरेन आता पुढे अंड्याच्या बाजुला बसला. आनंद गाडी सुरु करतच होता की.......
"हेमंत कुठय??????"
माझ्या ह्या प्रश्नासरशी ते दोघेही एकामेकांच्या तोंडाकडे पाहू लागलो. हेम्या आमच्यासोबत गाडीत नाहीय हे जाणवताच, ज्या वेगाने आम्ही गाडीत बसलो होतो त्याच वेगाने आम्ही पटकन गाडीबाहेर आलो आणि बाहेरच दृश्य पहातच आम्ही जागीच थबकलो........
आम्ही पाहिलं की, हेमंत शांतपणे एकटक रोडच्या साईडला असलेल्या झुडुपात काहीतरी बघत होता. वाऱ्यावरती गवताची पाती कशी डोलतात तसाच काहिसा हेमंत जागच्या जागी हलत होता. आम्हाला काही कळेच ना. विरुने हेम्याला हाक मारली पण हेमंतने काही प्रतिसाद दिला नाही. हां असा काय करतोय हे जाणुन घेण्यासाठी आम्ही त्याच्या दिशेने हळुहळु चालु लागलो. आम्ही आता हेम्याच्या बरोबर मागे होतो. हेमंत अजुनही तसाच होता त्या झुडुपांकडे एकटक पहात. आनंदने अलगद मागुन त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि हळुहळु त्याला आपल्या दिशेने फिरवला. आम्ही पाहिलं की, हेमंतचा चेहरा निर्विकार होता आणि त्याने डोळे मिटलेले होते. आम्हाला काहीच कळत नव्हतं. काहीवेळ शांततेत गेला असेल की अचानक, हेमंतने झटकन आपले डोळे उघडले. तेव्हा त्याला पाहून आमच्यासकट अंड्याही घाबरून दोन पावलं मागे झाला. मी तर ओरडणारच होतो कारण हेमंतने डोळे उघडले खरे पण त्याच्या डोळ्याच्या बाहुल्याच गायब होत्या. आम्ही ह्या धक्क्यातून सावरतोय न सावरतोय की, तोच हेम्या अचानक एका अगम्य भाषेत काहीतरी बडबडायला लागला. अंड्यने घाबरून आमच्याकडे पाहिलं अन त्याच क्षणाला हेमंत दात विचकुन हसला आणि एक आरोळी ठोकुन पा्ठीमागच्या त्या झुडुपात उडी मारुन गायब झाला.
आम्ही तिघेहीजण बधीरपणे त्या हलणार्या झुडुपाकडे पहात होतो.
आता त्या सुनसान रस्त्यावर आम्ही तिघे उरलो होतो. काही क्षणांपूर्वी घडलेल्या त्या विचित्र गोष्टीवर अजुनही आमचा विश्वास बसत नव्हता. पण तिथे उरलेल्या फ़क्त आमच्या तिघांच्याच अस्तित्वामुळे मगाशी घडलेली ती घटना खरी होती हे खर मानन्या वाचुन आता आमच्याकडे काही पर्याय नव्हता.
"हेमंत कुठे गेला????"
मी न रहावुन त्या दोघांना विचारले. माझ्या ह्या प्रश्नासरशी विरु आणि अंड्या तंद्रीतुन बाहेर आले. आणि सरबरल्यासारखे एकामेंकाच्या तोंडाकडे पाहू लागले. थोडा वेळ कुणीच कुणाशी बोलले नाही. मग अचानक काहितरी विचार करुन आनंद त्या झुडुपांच्या दिशेने निघाला.
"कुठे चाललायस???" मी न रहावुन त्याला विचारलं.
"हेम्याला शोधायला" एव्हढ बोलून तो त्या झुडुपांत शिरलादेखिल. मागोमाग माझ्याकडे एक नजर टाकुन विरुही आत घुसला. मला हया सगळ्यात गडबड वाटत होती पण आता माझा नाईलाज होता. ह्या ठिकाणी एकट मागे थांबण्यापेक्षा त्यांच्यासोबत पुढे जाणं परवडल असतं. देवाचं नाव घेउन मी देखील घाईघाईत विरुच्या मागोमाग आत शिरलो.
आत एकदम शांत होतं. बाहेरून ती झुडुपं लहान वाटत असली तरी आत बर्यापैकी झाडी होती. आम्ही अंदाजाने पुढे चालु लागलो. थोडा वेळ चालल्यावर ती झाडी संपली. त्या झाडीच्या बाहेर एक पठारासदृश भाग दिसत होता. विरु मघाशी बोलल्याप्रमाणे खरच आज फ़ार छान चांदणं पडल होतं. त्या निळ्या काळोखात जिथवर नजर जाईल तिथवर सपाट जमिन पसरली होती. त्यात एक काळ्या मातीचा रस्ता दुरवर कुठेतरी जात होता. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजुस चांगलं कमरेएव्हढ्या उंचीच गवत होत. ह्या चांदण रात्रीत त्या गवाताने आपला मुळचा रंग सोडल्यामुळे तिथे दुरपर्यंत कुणीतरी करड्या रंगाची चादर पसरली आहे असच काहिसं वाटत होतं. त्या निळ्या काळोखात आजुबाजुला नजरेला दिसत असुनसुध्दा मला मात्र फार भीति वाटत होती. आजुबाजुला पसरलेला हा काळोख नक्कीच कुणासाठी तरी दबा धरुन बसला असल्यासारखा वाटत होता........घात लावल्यासारखा.......
आम्ही आता त्या मातीच्या रस्त्यावरून पुढे जात होतो. मी आता अंड्या आणि विरेनच्या मधे चालत होतो. दोन्ही बाजुला पठार पसरल होतं. आम्ही दबकत दबकत चालत होतो. आजुबाजुला काहीतरी विचित्र घडत होतं हे मात्र नक्कि होतं. सगळीकडुन शांतता नुसती अंगावर येत होती. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. चालताना होणारा चपलांचा आवाज तेव्हढाच काय तो आमच्या सोबतीला होता. त्या परिसरात आम्हा तिघांशिवाय कुणीही नव्हतं तरी मला फार भिती वाटतं होती आणि त्याला कारण ही तसच होतं. त्या परिसरातुन आम्ही चालत असताना जेव्हा सगळिकडुन शांतता अंगावर येत होती तेव्हा मधुनच कधी आमच्या उजवीकडून तर कधी डावीकडून कुण्याच्या तरी खुसखुसण्याचा आवाज यायचा. अगदी आंधळी कोशींबीर खेळताना येतो ना तसा.
हेमंतला गायब होउन आता बराच वेळ झाला होता. हेमंतच्या अश्या गायब होण्याने आता सगळ्यांचीच तंतरली होती. आम्ही चालत चालत नाही म्हणता मुख्य रस्त्यापासून बरेच आत आलो होतो. जसजसे पुढे जात होतो, तसतशी समुद्राची गाज स्पष्ट ऐकू येत होती. चालता चालता अंड्या मधेच थांबुन हेमंत कुठे दिसतो का ह्याचा अंदाज घेउ लागला. इतका वेळ होउनही हेम्या सापडत नसल्याच टेंशन आता अंड्याच्या चेहरयावर स्पष्ट दिसत होत. मी रामनामाचा जप करत होतो.
"शट अप अमोल" माझ्या तोंडुन चाललेला देवाचा धावा ऐकून अंड्या माझ्यावर सॉल्लिड उखडला.
" माझ्यावर कशाला वैतागतोस? तरी मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत होतो की इथे नको येउया म्हणुन. झालं समाधान. मोठा अंधश्रद्धा दूर करायला चाललेला." एव्हढ डोळ्यासमोर घडुनही आनंदने माझ्यावर केलेली आगपाखड मला सहन झाली नाही.
"तू तर गप्पच रहा........एकतर तो साला हेमंत कुठे पळालाय त्याला शोधायच सोडुन हे नको ते धंदे काय करतोयस. मला तर वाटतय की मला गंडवण्यासाठी हां तुमचाच काहीतरी प्लान आहे." अंड्या वैतागत म्हणाला.
"ज़रा तिकडे बघता का?............" विरेनने एका दिशेला अंगुलीनिर्देश करून दबक्या आवाजात सांगितल.
विरेनच्या आवाजातली भिती आम्हाला बरच काही सांगुन गेली. विरेन दाखवत असेलेल्या ठिकाणी आम्ही पाहिलं असता. आमच्या पायाखालची जमीनच सरकली.
आम्ही पाहिलं की, समोर काही अंतरावर असलेल्या एका झाडावर काहितरी लटकत होता. त्या झाडाच्या फ़ांदीवर एका झोपाळ्यासारखं हेलकावे घेत होतं. हा नक्की काय प्रकार आहे, हे जाणुन घेण्यासाठी मी त्या दिशेने निरखुन पाहू लागलो. पण माझ्या डोळ्यांना सगळीकडे पसरलेल्या त्या जांभळ्या सावल्यांखेरीज दुसरं काहीच दिसत नव्हतं. तेव्हढ्यात अंड्या अविश्वासाने स्वत:शीच काहितरी पुटपुटला आणि त्या झाडाच्या दिशेने धावत निघाला. मी थांब म्हणेपर्यंत विरेनही त्याच्यामागे पळाला. आता मी ही त्यांच्या मागे त्या करड्या गवतातुन त्या झाडाच्या दिशेने पळत होतो..
थोड्याच वेळात आम्ही आता त्या झाडापाशी पोहचलो. तेथे जे नजरेस पडलं ते पहाता आम्हाला आमच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. दुरुन त्या झाडावर जे काही लटकताना दिसत होत, ते दुसरं तिसरं काही नसुन आमचा हेमंत होता. हेमंत त्या झाडाच्या एका फ़ांदिवर उलटा लटकुन हेलकावे घेत होता. त्याचे डोळे बंद होते.
आमच्या जीवात जीव आला की, अखेर एव्हढ्या वेळानंतर एकदाचा हेमंत सापडला होता. पण एक गोष्ट आमच्या डोक्याच्या बाहेर होती की, तो इथे अश्या अवस्थेत का होता. ह्याच उत्तर तर अंड्याच्या लॊजिककडेही नव्हतं. आम्ही डोळे विस्फ़ारुन हेमंतच्या त्या विचित्र अवस्थेकडे पहात होतो. हेमंत अजुनही त्या फ़ांदिवर उलटा लटकुन हेलकावे घेत होता. अखेर मी हेमंतला हाक मारली.
" हे मं त......."
माझा आवाज ऐकताच दुसर्याच क्षणाला हेमंतने डोळे खाडकन उघडले.
जणु काही तो त्याच नाव पुकारण्याचीच वाट पहात होता. एक क्षण त्याच्या डोळ्यात आमची ओळखच दिसत नव्हती पण पुढच्याच क्षणाला आम्हाला पाहून हेमंत ओक्साबोक्सी रडायला लागला.
"प्लीज मला इथून घेउन चला....मला सोडवा इथून" हेम्या रडवेल्या आवाजात आम्हाला विनवु लागला.
हेमंतला अश्या परिस्थीतित पाहून खरतर आम्ही थोड गडबडलो होतो. आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे पाहिलं. मला तिथून तसच पळुन जावसं वाटतं होतं. इथे आतापर्यंत जो काही प्रकार चालला होता तो अजिबात चांगला नव्हता. त्यात पुन्हा समोर ज्या पध्दतीत हेम्या आम्हाला सापडला होता त्यावरुन तरी माझी जवळजवळ खात्रीच पटली होती की आता इथे आणखी काही वेळ थांबण्यात खरच धोका होता. मी काही बोलणार इतक्यात अंड्या हेमंतला त्या झाडावरुन उतरवायला पुढे सरसावला.
अंड्या हेम्याजवळ पोहचलाच होता की, अचानक मला एक गोष्ट खटकली. हेमंतच्या चेहर्यावरच्या आतापर्यंतच्या आगतिकतेची जागा आता एका गुढ हसण्याने घेतली होती. मी अंड्याला थांबवण्यासाठी हाक मारली, माझ्या हाकेसरशी अंड्या मागे वळला. त्याचबरोबर अंड्याच्या मागे हाताच्या अंतरावर लटकत असलेल्या हेम्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्याच्या चेहरयावर मगासच्या हसण्याच्या जागी आता खुनशी भाव होते. आमच्या डोळ्याची पापणी लवते ना लवते, तोच हेम्याने अंड्याला वरच्या वर हवेत उचलला. हेमंतच्या ह्या पवित्राने आम्ही तर जागच्या जागीच सरपटलो.
अंडयासारखा माणसाला अश्या विचित्र लटकलेल्या अवस्थेत हेम्याने इतक सहज उचलेलं पाहून माझी तर आता खात्रीच पटली की हां समोर आहे तो आपला हेम्या नाही. हेमंत अंड्याला त्या झाडात घेउन गेला होता. वर झाडाच्या त्या काळोख्या घेरात प्रचंड झटापट चालु होती. आम्ही अंड्याला खालून हाका मारत होतो. पण उत्तरादाखल वरून फ़क्त एक अजब गुरगुरण्याचा आवाज येत होता आणि जोडीला फ़क्त झटापटीचा आवाज. आम्हाला हे काय चाललय काहीच कळत नव्हतं. आणि अचानक अंड्याची एक अस्फुट किंचाळी ऐकायला आली आणि सगळं शांत झालं.
आणि
मगासपासुनच ते गुरगुरणं, ती पानांची सळसळ, सगळं सगळं थांबलं होतं.
मी घाबरुन विरेनकडे पाहिलं. विरेन अजुनही त्या झाडाकडे वरती पहात होता. मी पुढच्याच क्षणाला विरेनचा हात धरला आणि त्याला बळेबळे ओढतच रस्त्याच्या दिशेने धावायला सुरुवात केली.
******************************************************************************
आम्ही दोघे आता सुसाट मुख्य रस्त्याच्या दिशेने पळत होतो. आम्ही थोडेच अंतरच पळालो असु की, वीरू दमला. अगोदर ढोसलेली दारू आणि त्यात जोरात धावल्यामुळे त्याचा श्वास फुलला होता. त्याला थोडा दम घ्यायला देउन मी पुन्हा त्याला पळायला सांगतच होतो की, आमच्यामागुन आम्हाला आमच्या नावाचा पुकारा ऐकू आला. आम्ही मागे वळुन पाहिलं, तर तो आनंद होता. त्याचे कपडे फ़ाटले होते. त्याच्या अंगावर असंख्य घासल्याच्या किंवा कुणीतरी ओरबाडल्याच्या खुणा दिसत होत्या. तो लडखडत आमच्या मागुन येत होता. त्याचं सगळं अंग सोलवटलं होतं. तो विव्हळत होता. आम्ही थांबलेल पाहुन त्याने आमच्या दिशेने एक पाउल उचललं आणि धाडकन जमीनीवर कोसळला. विरेन मागे फिरला. तो अंड्याकडे जाउ लागला तसा मी लगेच विरेनचा हात धरला आणि मानेनेच त्याला नकार दिला. माझा इशारा समजुन विरेन जागीच थांबला. आम्हाला अस थांबलेलं पाहताच आनंद अजुन जोरात ओरडु लागला. आम्हाला त्याला सोबत परत घेउन जाण्यासाठी विनवत होता. त्याचा तो आक्रोश बघवत नव्हता. अखेर तो आमचा मित्र होता. खरच तो तिथुन वाचुन आला असेल तर त्याला असं इथे अश्या अवस्थेत एकट सोडुन जाणं चुकिचं होतं. पण न जाणो ह्यात काही गडबड असेल तर. कारण मघासच्या हेमंतच्या अनुभवावरुन माझा आसपासच्या सगळ्या दृश्य गोष्टीवरचा विश्वास उडाला होता. इकडे आनंदचा आक्रोश टिपेला पोहचला होता. खरच अंड्याकडे जावं की न जावं ह्यात मनाची फ़ार त्रेधा उडत होती. अखेर मनाचा हिय्या करुन मी अंड्याच्या दिशेने पाउल उचलतच होतो की,
इतक्या विनवण्याकरुनही आम्ही बधत नाही हे पाहुन अंड्या चवताळला. तो लगेच उठून आपल्या पायावर उभा राहिला. त्याची नजर आता एका जंगली श्वापदासारखी दिसत होती. जणु आपल्या भक्ष्याचा घास घ्यायला टपलेली. माझा अंड्याच्या बाबतीतला पहिला अंदाजच बरोबर ठरला होता. हेमंत सोबत आम्ही आनंदलाही गमावुन बसलो होतो. त्याचा तो अवतार पाहून मी विरेनला पळायचा इशारा केला. आम्ही दोघांनी लगेचच पुन्हा मुख्य रस्त्याच्या दिशेने जीवाच्या आकांताने पळायला सुरुवात केली. मी मधेच मागे वळुन पाहिलं तर अंड्या अजुन तिथेच उभा होता. आमच्याकडे एकटक पहात. मग तो आकाशाकडे पाहून जोरजोरात हसायला लागला. त्याला अस हसताना पाहुन मी माझ्या पळण्याचा वेग अजुन वाढवला. आम्हाला त्याच्यापासुन लवकरात लवकर शक्य तितकं दुर जायच होतं.
आम्ही नुसते पळतच होतो. अंड्या आता मागे पडला होता. मी पळताना मधेच मागे वळुन पहात होतो पण अंड्याचा कुठेच सुगावा लागत नव्हता. आपल्या मागावर आता कुणीही नाही हे पहाता हळुहळु आमचा धावण्याचा वेग कमी होउ लागला. मी आणि विरेन आता पुन्हा त्या गवतातल्या मातीच्या रस्त्यावरून पळत होतो. बास......हां रस्ता संपला की लगेचच मुख्य रस्ता लागणार होता. बराच वेळ जोरात पळाल्यामुळे आता माझाही श्वास फुलला होता. छाती भात्यासारखी वरखाली होत होती. थोडावेळ थांबावसं वाटत होतं, पण इथे एका क्षणाची विश्रांतीही जिवावर बेतण्यासारखी होती. आणि तसही माझ्या अंदाजाप्रमाणे इथून मुख्य रस्ता जवळ होता. नशीब चांगलं असेल तर आम्हाला नक्कीच मदत मिळणार होती.
तेव्हढ्यात धाड़ करून आवाज झाला. मी त्या दिशेंने पाहिलं तर पाठिमागे विरेन धावता धावता खाली पडला होता. त्याची हालत फार खराब झालेली. त्याला सॉल्लिड दम लागला होता. मी त्याच्याकडे परत आलो.
"सॉरी अमोल, मी नाही आता पळु शकत. मी खुप दमलोय रे......." विरेन धापा टाकत बोलला.
"अस नको करू वीरू, अजुन फ़क्त थोडा वेळ. एकदा का आपण मेन रोडला लागलो की आपल्याला नक्की काहीतरी मदत मिळेल." मी विरेनची समजूत काढत म्हणालो.
विरेन मान हलवुन नकार देत होता. मी परोपरीने विरेनला समजावत होतो. एक एक मिनिट म्हहत्त्वाचा होता. अखेर विरेनला माझं बोलणं पटलं. तो कसाबसा उठला. एक दिर्घ श्वास छातीत भरुन आम्ही पुन्हा पळायला सुरुवात करणार, तोच आमच्या उजव्या बाजुच्या गवताच्या झाडीतुन खसखस ऐकू आली. मी दचकून त्या बाजुला पाहिलं तर कुणी नव्हतं. पण बिन वार्याची ती हलणारी गवताची पाती, तिथे नक्कीच कुणीतरी दबा धरून बसलेले असल्याची साक्ष देत होती. मी नखशिखांत शहारलो. मी घाबरून बाजुला उभा असलेल्या विरुकडे पाहिलं तर तो गायब झाला होता. मी घाबरून इकडे तिकडे पाहिलं तर मला विरेन माझ्या डाव्याबाजुला असलेल्या गवताच्या झाडीच्या खाली पडलेला दिसला. कुणीतरी त्याला तिथे त्या झाडीच्या आत फ़रफ़टत घेउन जात होत. मी त्याला पकडायला धावत त्या दिशेने गेलो पण मी तिथे पोहचेच तोवर वीरू त्या झाडीत गायब झाला होता. वर हलणारी गवताची पाती तो माझ्यापासुन दूर जात असल्याची खात्री देत होते.
मला सोल्लीड शॉक बसला होता. माझा मित्र माझ्या डोळ्यांदेखत गायब झाला होता. आता त्या परिसरात मी अगदी एकटा होतो. मी रडकुंडीला आलेलो. सगळीकडे भयाण शांतता होती. मला माझ्याच श्वासाचा आवाज ऐकू येत होता. काय करावं काहीच सुचत नव्हतं. मी अक्षरश: बधीर झालो होतो. काही तासात होत्याच नव्हतं झालं होतं. हे सगळं खरच घडतय की हे एखाद वाईट स्वप्न आहे. मला आता हे सहन होत नव्हतं. मी मटकन खाली जमिनीवर गुढघ्यावर बसलो.
तेव्हढ्यात अचानक ती निर्जन शांतता चिरत आसमंतात विरेंनची किंचाळी घुमली.
"अमोल तू पळुन जा.................."
पुन्हा एकदा आजुबाजुच्या गवतात सळसळ सुरु झाली. भितीची एक सणक माझ्या मणक्यातुन पार डोक्यात गेली. मी इशारा समजुन जोरात मेन रोडच्या दिशेने जीवाच्या आकांताने धावायला सुरुवात केली. पाठीमागे गवाताची सळसळ अजुन सुरूच होती.
******************************************************************************
मी आता त्या सुनसान परिसरात एकटाच पळत होतो. वाटेत लागलेली झाडी पार करताना चांगलाच सोलवटलो. समोरच तो गोराई उत्तनचा रोड दिसत होता. माझा जीवात जीव आला. पण तिथे पोहचून तरी काय होणार होतं देवजाणे. वेळेवर मदत मिळाली नाही, तर माझं ही काही खरं नव्हतं हे माहिती असुनही मी अक्षरश: वेड्यासारखा त्या रस्त्याच्या दिशेने पळत होतो. सुदैवाने समोरच अंड्याची गाड़ी उभी दिसली. मी धावतच तिथे गेलो. ड्राईव्हर सीटचा दरवाजा उघडला. माझं नशीब खरच माझ्या सोबत होतं, सुदैवाने चावी गाडीलाच होती. मी धापा टाकत गाडीत पडलो. मी करकचून स्टार्टर मारला. आणि नशीब गाडी पहिल्याच झटक्यात सुरु झाली.
क्लच दाबला,
गेअर टाकला,
अक्सिलेटर दिला..........
आणि पुढच्याच क्षणाला गाडी रोरावत तिथून निघाली..........
मी आता सुसाट गाडी पळवत होतो. गाडीने स्पीड पकडल्यावर, मी सुटकेचा एक निश्वास सोडला. मी त्या अभद्र जागेपासुन लांब जात होतो अन तेही सहीसलामत. पण तरीही मला रडायला येत होतं. कारण जे काही घडल होतं, त्याला फ़क्त मी एकमेव साक्षीदार होतो. हेम्या, अंड्या आणि विरु हे तिघेही आता ह्या जगात नव्हते. त्यांच्या घरच्यांना मी काय सांगणार होतो. कोण विश्वास ठेवणार होत माझ्यावर. पण मला आता त्याची फ़िकीर नव्हती. मला फ़क्त आता ह्या इथून सुटायच होतं...बास..... मला माझा जीव वाचवायचा होता. पण तरीही डोळ्यासमोरून हेम्याच अखेरच ते आमच्याकडे पाहून गुढ हसणं, अंड्याने आम्हाला दिलेली ती खुनशी नजर, आणि गवताच्या झाडीत गायब होताना विरेनच्या चेहरयावर पाहिलेली ती आगतीकता हे सगळं मी कसं विसरु शकणार होतो. मी न राहून गाडी चालवता चालवता जोरात ओरडलो. मी मोठमोठ्याने रडत, ओरडत गाडी चालवत होतो. माझा भावनावेग ओसरल्यावर मी थोडा शांत झालो. मी एका हाताच्या शर्टाच्या बाहीने माझे डोळे पुसले आणि गाडी चालवण्यावर लक्ष केंद्रीत करु लागलो. थोडाच वेळ गेला असेल, मला जाणवलं की ह्या गाडीत माझ्या शिवाय अजुनही कुणीतरी आहे.....
मी पटकन रेअर मिररमधे पाहिलं आणि सरपटलोच. मी गाडी कचकन ब्रेक मारून जागच्या जागी थांबवली आणि थरथरत मागे पाहिलं
पाठीमागे विरेन बसला होता. माझी आणि त्याची नजरानजर झाली. तो एकटक निर्विकारपणे माझ्याकडे पहात होता. त्याच्या डोळ्यातली माझी ओळख पुर्णपणे नाहीशी झाली होती.
मला लगेचच माझी चुक कळली. सुरुवातीला हेम्या कुठे गेला पहायला जेव्हा आम्ही गाडीतून बाहेर पडलो, तेव्हा त्या गडबडीत खाली रस्त्यावर पडलेली गाडीची चावी मीच उचलून अंड्याच्या हातात दिली होती. जी त्याने माझ्यासमोर स्वत:च्या खिश्यात ठेवली होती आणि जेव्हा मी धावत गाडीपाशी पोहचलो तेव्हा चावी गाडीलाच होती. ह्याच्याच अर्थ असा होता की हां एक सापळा होता.......माझ्यासाठी लावलेला आणि त्यात ’अमोल अविनाश परब" आता पुर्णपणे अडकला होता.
मी घाबरून त्या विरुकडे पाहिलं तर त्याची नजर अजुनही माझ्यावरच रोखलेली होती. त्याने हळुच माझ्यावरची नजर न हटवता एका दिशेला बोट दाखवलं.
मी त्या बोटाच्या दिशेने पाहिलं ......
तर तो......तोच बस थांबा होता..........पण रिकामी..........
मी गोधळुंन त्यांच्याकडे पाहिलं. त्याची नजर एकटक माझ्याकडे होती. त्याच्या चेहर्यावर आता गुढ हास्य पसरलं होतं. मी रडत रडत त्याच्याकडे पाहून हात जोडले. त्याला मला सोडण्यासाठी मी विनवु लागलो. अक्षरश: त्याच्याकडे माझ्या जीवाची भीक मागु लागलो. पण माझी हि केविलवाणी आर्जवे पाहुन त्याच्या चेहर्यावरच हास्य अजुन गडद होत होतं. अचानक तो हसायचा थांबला. त्याची माझ्यावरची हिरवी नजर अजुन तिव्र करत त्याने घश्यातल्या घश्यात एक गुरगुरण्याचा आवाज काढला आणि पुढच्या क्षणाला त्या गाडीतल्या बंद काचांमधे माझी अस्फुट किंचाळी विरून गेली.
आता सगळं एकजात शांत झालं होतं..............अगदी सुनसान..........
******************************************************************************
दैनिक युवामंच
दिं 14 जानेवारी 2016
मुंबई: गोराई उत्तान रोडवर एकाच परिसरात चार मृतदेह सापडले. चौघांच्याही मृत्युचे निदान हृद्यविकारचा तिव्र धक्का असे करण्यात आले आहे.
******************************************************************************
निळा काळोख ह्या आसमंतात आता पुन्हा दाटायला लागलाय.
ह्या जांभळ्या सावल्या पुन्हा कुणाचातरी घास घेण्यास तयार झाल्या आहेत.
आणि हां सुनसान रस्ता आजही इथे कूणाचीतरी वाट पहातोय.......पण आता सगळे सुटले्त
ती बाई,
हेमंत,
अंड्या,
सरतेशेवटी विरेनही
फ़क्त मी मागे राहिलोय........
एक एकटा एकटाच........
कुणाची तरी वाट पहात, ह्या बस थांब्याच्या खाली.....
कुणीतरी माझी, ह्या फ़ेर्यातुन सोडवणुक करेल ह्या आशेवर..... पण कुणी दूसरा कुणी हयात अडकल्याशिवाय माझी ह्यातून सुटका नाही हे पुरेपुर उमगलय मला आता.
तर मग येताय ना...............?
ह्या गोराई उत्तन रोडवर नाईट ड्राईव्ह साठी.....मला ह्यातुन सोडवण्यासाठी.....
मी तुमची वाट बघतोय.....................
समाप्त
A Story by
Amol Parab

थ्रील....!!!!!

कधी कधी काही काही आठवणी आपला कधीच पिच्छा सोडत नाहीत. अगदी सावलीसारख्या आपल्याशी जोडल्या गेल्या असतात. अशीच एक आठवण माझ्याही आठवणीत आहे. जी आजही मला रात्रीची झोपू देत नाही. आजही ती रात्र माझ्यासमोर अगदी जशीच्या तशी उभी आहे. आजही तो झाला प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो.
माझ नाव अमोल परब. गोष्ट तशी साधारण दहा बारा वर्षापूर्वीची. मी नुकताच बी.ई. पास आऊट झालो होतो. ते ही फर्स्ट क्लास विथ डिक्टिंशन. भरीसभर म्हणून मुंबई युनिर्व्हसिटीमधुन तिसराही आलो होतो. घरच्यांच्या आणि खासकरून बाबांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. ते फार खुश झाले होते. येता जाता प्रत्येकासमोर माझे कौतुक करत होते. अगदी काय करू आणि काय नको असे झाले होते त्यांना. तशी मला फ़र्स्ट क्लासची गेरेंटी होती पण युनिर्व्हसिटी मधून तीसरा बिसरा येईन याची कल्पना मलाही नव्हती. मी मिळवलेल्या ह्या यशाबद्दल बाबा मला बाईक घेण्याच्या तयारीत होते. पण मला ती माझ्या पैश्याने घ्यायची होती. जवानीचा अव्यवहारी जोश दुसर काय. पण कुणाच ऐकतील ते बाबा कुठले? त्यांनी सरळ माझ्या मित्रांना गाठलं. अंकुर गायकवाड आणि अमोल परवडी हे माझे शाळेपासुनचे मित्र त्यांना माझ्या सगळ्या आवडीनिवडी माहिती होत्या. अंकुरने नुकतीच सहा महिन्यांपुर्वी नवीन बजाज डिस्कव्हर घेतली होती आणि परवडी तर दहावीला असल्यापासुनच त्याच्या वडिलांची हीरोहोंडा चालवायचा. बाबांनी अगदी योग्य माणसं निवडून लगोलग पुढच्याच आठवड्यात मला माझी आवडती बजाज पल्सर गिफ़्ट देऊन टाकली. आता मीही माझा पुर्वीचा तोरा सोडून मोठ्या खुशीने बाईक एन्जॉय करू लागलो. हळुहळु मला माझ्या बाईकचा आणि बाईकला माझा अंदाज येऊ लागला. वर दररोजच्या प्रेक्टिसमुळे रस्त्यावरचा कोन्फ़िडंसही बर्यापैकी वाढला होता. अश्याच एका वीकेंडला मी परवडीकडे गेलेलो असताना तिथे अंकुरही बसला होता. बराच वेळ आम्ही गप्पा मारत होतो की अचानक अंकुरने परवडीला विचारलं
"आज नक्की ना?"
"अरे आज शनिवार आहे ना... मग जाउया की नक्की पण बाकीचे तयार आहेत काय?" परवडीने विचारले.
" हो रे ...... चप्पा आणि चिनू दोघेही तयार आहेत. फ़क्त ह्यावेळेस चप्पा बोलला की बाईक त्याला चालवायचीय निदान येताना तरी"
"ठीक आहे मी माझी बाईक देईन त्याला चालवायला " परवडी अगदी सावकाराच्या अर्विभावात म्हणाला.
मला कसलाच संदर्भ लागत नव्हता मी हळूच विचारले.
" काय रे कुठे चालला आहात एकटे एकटे ?"
" एकटे कुठे चांगले चौघेजण आहोत की...." सवयीप्रमाणे अंकुरने पीजे मारला.
" तेच विचारतोय कुठे चालला आहात चौघेजण???" मी त्याच्याकडे दुर्लक्ष्य करत विचारलं.
" अरे कुठे नाही रे, हल्ली आम्ही दर एक-दोन महिन्यानी गोराईला पलिकडे उत्तन रोड्वर बाईक चालवायला जातो......रात्रीचे. सॊल्लीड मज्जा येते मोकळ्या रस्त्यावर सुसाट बाईक चालवायला." परवडीने माझ्या शंकेचे निरसन केले
" हम्म....इट्स साउंड्स थ्रीलींग..... ए मग मी पण येउ काय रे.......?" मी उत्सुकतेने विचारलं.
" अरे ये की, पण तुला तुझी बाईक आणायला लागेल कारण आम्हा दोघांच्याही बाईक्स फ़ुल्ल आहेत" अंकुर बोलला.
अनायसे बाबा कालच आठवड्याभरासाठी गावी गेले होते. आज रात्री मित्रांसोबत बाहेर जेवायला जातोय हे कारण सांगुन घरुन रात्रीची बाईक चालवायची परमिशन अगदी सहज काढता येण्यासारखी होती. मनातल्या मनात सगळ्या गोष्टी व्यवस्थित जुळत आहेत कि नाही ह्याची खातरजमा करुन मी माझ कन्फ़र्मेशन देउन टाकले.
" रात्री बरोबर आठ वाजता जेट्टीवरवर भेट. जास्त उशीर करु नकोस. रात्री साडे बाराची शेवटची बोट असते पलिकडुन.’ परवडीने ताकिद दिली.
बोरिवलीच्या पश्चिमेला समुद्राच्याकिनारी गोराई गाव वसलेलं आहे. तसा तो भाग फ़क्त बोरिवलीपासुन लवकर पोहचता येत म्हणुन फ़क्त बोरिवलीत गणला जातो. अस म्हणायला मुख्य कारण म्हणजे बोरिवली शहर परिसर आणि गोराई गाव ह्यामध्ये पसरलेली गोराई खाडी. गोराईची ही खाडी काही जास्त रुंद नाही. अजुनही इथे पुर्वीपासुन रहदारीचे साधन असलेल्या डिझेल बोटीच चालतात. ह्या बोटीमधुन माणसेच काय तर दुचाकी वहानेही आरामात एका किनार्यावरुन दुसर्या किनार्यावर नेता येतात. खर तस गोराई गाव भायंदरशी भुप्रदेशाने जोडलेल आहे पण भायंदरवरुन गोराई गावात जायच म्हणजे चांगलाच वळसा पडतो. भायंदरवरुन एक रस्ता सरळ गोराई गावात येतो तिथुन तो पुढे मनोरीला जाउन संपतो. ह्याच रस्त्यावर मध्येच गोराईसारखे एक गाव लागते तेच हे "उत्तन". ह्या रोडला त्यामुळेच काही लोक उत्तनचा रस्ता असे ही बोलतात. हा एक फ़ार मोठ्या पल्ल्याचा रस्ता आहे. दिवसादेखिल तिथे भायंदर ते गोराई ही एस.टी सोडली तर वहानांची वर्दळ तुरळकच असते. मग रात्रीची तर गोष्टच सोडा. अश्या ह्या सामसुम रस्त्यावर नाईट बाईकिंगच्या "थ्रील" चा अनुभव घेण्यासाठी मी उत्सुक होतो. कधी एकदा आठ वाजताहेत असे मला झाले होते.
*************************************************************************************************************************
मी ठरलेल्या वेळेवर गोराई जेट्टीवर पोहचलो. ठरल्या वेळेवर पोहचणार्यापैकी मी एकटाच होतो. पलिकडे गोराईला जाणारी बोट आत्ताच जेट्टीवरुन सुटली होती.मगासपासूनचा गोंगाट आता थोडा निवळला होता. थोड्याच वेळात बाकीचे सगळे आले. अंकुरच्या बाईकवर मागे चिनू तर परवडीच्या मागे चप्पा बसला होता. आजच्या ट्रिपला मलापण आलेला पाहून ते दोघे म्हणजेच चप्पा आणि चिनू दोघेही खुश झाले. सुरुवातीचे नमस्कार चमत्कार झाल्यावर माझ्या नवीन बाईकचे कौतुक सुरु असतानाच मगासचची बोट फिरून परत जेट्टीला लागली. प्रथम लोकांना चढायला देऊन मागाहून आम्ही चढलो. बोटीवरल्या एका माणसाने आमच्या बाईक्स बोटीवर चढवून दिल्या. तसा पल्ला जास्त लांबचा नव्हता मोजुन पंधरा ते वीस मिनिटांचा प्रवास. पण तो ही माझ्या जीवावर आला होता. माझी पलिकडे गोराई गावात बाईक घेउन जायची ही पहिलीच वेळ होती. पाण्यावरुन संथ पणे जातानाही बोटीच्या हेलकाव्यामुळे मला बोटित बाईक धरून उभं रहाताना फार कसरत करावी लागत होती. शेवटी एकदाचा तो प्रवास संपला. बोट आता गोराई गावाच्या जेट्टीला लागली होती. मगासच्याच क्रमाने सुरुवातीला बोटितली प्रवासी उतरले मग आम्ही आणि सगळ्यात शेवटी आमच्या बाईक्स. बोटितल्या मगासच्या अनुभवामुळे आमच्या बाइक्स बोटीत चढवणार्या आणि उतरवणार्या त्या काकांबद्दल मला एकदम आदर वाटु लागला. माझी बाईक सगळ्यात शेवटी खाली उतरवून ते जात असताना मी स्वत:हुन त्यांच्या हातावर दहाची एक नोट ठेवली. ते थोडासे गडबडले. बहुदा अशी बक्षिसी मिळायची त्यांचीही ही पहिलीच वेळ होती.
"साल्यांना फ़ुकटच्या सवयी लावू नकोस रे .."
त्या इसमाची पाठ वळल्या वळल्या अंकुरने माझ्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली. मी परवडीकड़े पाहिल तर त्याच्याही नजरेत मला अंकुरच्या वैतागाचे समर्थन दिसले. उत्तरादाखल मी फ़क्त मान डोलावली. एव्हाना आमच्या अगोदर उतरलेली माणसे बाहेर उभ्या असलेल्या रिक्षामधुन आपापल्या मुक्कामावर कधीच मार्गस्थ झाली होती. आम्हाला इथवर घेउन आलेली बोटही आता इकडले दोन तीन प्रवासी घेउन पुन्हा बोरीवलीच्या दिशेने निघाली. आता जेट्टीवर आम्ही पाचजण आणि आमच्या तीन बाईक्स एव्हढेच उरलो होतो. पाठीमागे बोरिवलीची जेट्टी स्पष्ट दिसत होती. मुंबई शहर आणि गोराई गाव ह्यातला फरक मला समोरासमोर दिसत होता. समोरच्या किनार्यावर रोषनाईचा सूर्य तळपत असताना इथल्या किनार्यावरचा उरला सुरला उजेडही जाता जाता ती बोट आपल्यासोबत घेउन गेली होती.
"हम्म्म.... चला निघुया......." परवडीने बाईक सुरु करताना म्हटले.
लगोलग सगळ्याच्या बाईक सुरु झाल्या. मगासच्याच जोड्या होत्या तश्याच कायम होत्या म्हणजे अंकुरच्या मागे चिनू आणि परवडीच्या मागे चप्पा. माझ्या बाईक चालवण्याच्या स्किलवर अजुन तेव्हढा कुणाचा कोन्फ़िडंस नव्हता हे मला माहिती होते म्हणुन मीही त्यांच्यापैकी कुणाला माझ्या गाडीवर बसा म्हणून आमंत्रण दिलं नाही. जेट्टीच्या तोंडाशी असलेल्या गेट ओलांडुन गोराई ते भायंदरपर्यंतच्या प्रवासात इतकी वर्ष आजतागायत एकट्याचीच मोनोपॉली असणार्या त्या गोराईच्या रस्त्यावर आम्ही आमच्या बाईक्स पळवु लागलो. हा रस्ता तिकडचा एकमेव हमरस्ता असूनदेखिल एकाच वेळी फ़क्त दोन कार पास होतील एव्हढ्याच रुंदीचा होता. रस्त्यावर एकाबाजुला एका विशिष्ट अंतरा अंतरावर आणि खासकरून वळणावर काही ट्युबलाईटस लावल्या होत्या. तेव्हढाच काय तो प्रकाश होता त्या रस्त्यावर. आमच्या बाईक्स वेगात पळत होत्या. सुरुवातीला परवडीची बाईक, मध्ये माझी आणि शेवटी अंकुरची अशी सिक्वेन्स होती. मोकळ्या रस्त्यावर पहिल्यांदाच अशी बाईक चालवायला मिळत असल्याने माझी अवस्था वारा प्यायलेल्या वासरागत झाली होती. स्वत:ला इतरासमोर प्रुव्ह करण्याच्या नादात मी एक्सिलेटर दिला आणि उजव्याबाजुने परवडीला ओव्हरटेक केल. आता मी पुढे, मागे परवडी आणी शेवटी अंकुर असा क्रम झाला. मी साईड मिररमध्ये पहात मी नेहमीच पुढे कसा राहिन ह्याची काळजी घेत होतो. थोड्या वेळाच्या ड्राईव्हनंतर समोर एका वळणावर काही दिवे लुकलुकताना दिसले. गावाची हद्द सुरु झाली होती बहुतेक. गावात शिरल्या शिरल्याच पहिल्या काही मिनिटातच एक तिठा लागला. तिठ्याच्या मधोमध डाव्या बाजुला मनोरी आणि उजव्या बाजुला उत्तन असा मार्ग दाखवणारा बोर्ड होता. मला पुढचा रस्ता माहिती नव्हता. मी बाईक स्लो केली. त्या बोर्डाच्या बाजुलाच एक चहावाला होता. तो तिथ होता म्हणून ह्या गावात ह्यावेळेस कुणीतरी जाग आहे अस म्हणायला वाव होता.
"उजवीकडे........"
परवडीे गाडी न थांबवताच पुकारा करत पुढे निघुन गेला. मागोमाग अंकुर गेला. जाता जाता चिनु मला चिडवून गेला. आता मगासच्याच क्रमवारीत मी शेवटला होतो. उजवीकडे वळल्यानंतर चारपाच घरांनंतर एक ही घर नव्हत मला नवल वाटलं कि एव्हढ्या चार पाच घरांच्या आवारातच गावाची हद्द कशी संपली. गावाची हद्द संपल्यासंपल्या रस्त्या शेजारच्या ट्युबलाईट्सनीही स्वत:चा आमच्या सोबतचा प्रवास आता आवरता घेतला होता. रस्त्यावर आता आमच्या हेडलाईट्सचाच काय तो एकमेव प्रकाश होता, बाकी जिथे नजर जाईल तिथे नुसता काळोखच काळोख. एव्हाना गाव मागे पडल होत. रस्त्याच्या दोन्ही बाजुला दुरदुर पर्यंत मानववस्तीचा कुठलाच पुरवा दिसत नव्हता. रस्तानेही आपल सरळसोट व्यक्तिमत्व सोडुन दिल होत. प्रत्येक अर्ध्याएक किलोमीटर नंतर अवघड वळण तरी येत होती नाहीतर चढण तरी. मागे बसलेला चिनु आणि चप्पाला आता कंठ फ़ुटला होता. त्याची अखंड बडबड चालु होती. आजुबाजुचे रातकिड्यांची किरकिर, सोबत आमच्या बाईक्सची घुरघुर आणि त्यात चप्पा व चिनुची बडबड. अंकुर आणि परवडीही त्यांना अधुन मधुन प्रतिसाद देत होते. ह्या पुर्ण प्रवासात मी एकटाच असा होतो की ज्याच सगळं लक्ष्य हे फ़क्त आणि फ़क्त रस्त्यावर होत. पण रात्री बाईक चालवायची मजा काही औरच होती. सभोवतालचा काळोख मी मी म्हणत अगदी अंगावर येत होता आमच्या तिन्ही गाड्याचे हेडलाईट्स त्याच्या मुजोरीपुढे थिटे पडत होते.
आणि अचानक..............
पुढच्या दोघांनी मला काही कळायच्या आत आपापल्या गाड्यांचे हेडलाईट्स ऒफ़ करुन टाकले आता फ़क्त माझ्याच बाईकच्या हेडलाईट्सचा प्रकाश होता. चप्पाने ओरडुन सांगितले
" अमोल.........हेडलाईट्स ऒफ़ कर.........."
" काय्य्य्य्य्य्य...................." मी गोधळलेलो. हे अस कायतरी माझ्यासाठी एकदम नविनच होतं
" अरे येडया......हेडलाईटस ऒफ़ कर........." चप्पा वैतागुन डाफ़रला.......
मी लाईट्स ऒफ़ केले. इतका वेळ दबा धरुन बसलेल्या आजुबाजुच्या त्या काळोखाने लाईट बंद केल्या केल्या माझ्यावर झडप घातली. मला दोन सेकंदासाठी समोरच काही दिसतच नव्हतं. डोळ्यांच्या समोर एक हिरवा प्रकाश साचुन राहिला होता. परवडी आणि अंकुर मात्र अगदी सराईतपणे बाईक चालवत होते. हळुहळु माझी नजरही आता ह्या अंधुक प्रकाशाला सरावली होती. आता रस्त्यावर अंकुर आणि परवडीच्या टेल लाईटसचा अंधुकसा प्रकाश माझ्यासमोर पळत होता. त्याच्याच जोरावर मीही माझी बाईक पळवत होतो. लाईटस बंद केल्याने मला एक गोष्ट समझली होती की वाटत होता तितका आजुबाजुचा काळोख गडद नव्हता. मी वर पाहिल तर चंद्र पुर्ण भरात होता. छान चांदण पडलं होत. त्यांचा प्रकाश खुप नसला तरी मनातुन काळोखाची भिती काढण्या इतपत नक्किच होता. चंद्राच्या त्या निळ्या प्रकाशात आजुबाजुच्या सगळ्या गोष्टी निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या शेड्स दाखवत होत्या. समोरचा रस्ता एका नदिसारखा वाटत होता आजुबाजुच्या झाडे, समोर दिसणारी टेकडी हे सगळे काळसर निळ्या केनव्हासवर गडद जांभळ्या रंगाने रंगवल्यासारखे दिसत होते. ह्या निळसर अंधारात समोरच्या टेल लाईटच्या अंदाजाने बाईक चालावायला आता मलाही फ़ार थ्रिलिंग वाटत होतं. समोरुन छातीला भिडणारा गार वारा डोक्यात अजुन उन्माद वाढवत होता. अचानक आजुबाजुच्या शांत वातावरणात परवडीने गाडीला दिलेला एक्सिलेटर घुमला. अंकुरने मिळालेल्या ह्या इशारतीवर स्वत:च्या बाईकाचा नेक्स्ट गिअर टाकला. पुढच्याच क्षणाला त्या दोनही टेल लाईटस वेगाने माझ्यापासुन दूर जाउ लागल्या. मला कळेपर्यंत ते बरेच दूर गेले होते. माझ्याकडेही आता वेग वाढवण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. आता आमच्या बाईक्स मगासच्यापेक्ष्या बर्याच वेगात पळत होत्या. मला त्यांच्यासोबत स्पीड राखताना दमछाक होत होती. परवडी आणि अंकुर कमालीच्या वेगाने आपापल्या बाईक्स पळवत होते. मला समजुन चुकले की मी बाईक चालवण्याच्या बाबतीत त्याच्यापेक्षा कितीतरी लेव्हल मागे होतो. मघाशी मी त्याना ओव्हरटेक केल्याच्या आगाऊपणाची त्यांनी सव्याज परतफ़ेड केली होती. पुढच्याच एका वळणावर त्या दोन्ही टेल लाईट्स उजवीकडे झपकन वळल्या. मला रस्त्याचा नीट अंदाज येत नव्हता, मी उगाच रिस्क नको म्हणुन बाईक थोडी हळु केली आणि सावधपणे ते वळण निगोशियट केले. वळण पुर्ण केल्याकेल्या थोड सावरल्यावर समोर नजर टाकली तर माझी चांगलीच फ़ाफ़लली. मला माझ्या समोर आतापर्यंतच्या माझ्या गाईड लाईन्स असलेल्या त्या टेल लाईटसच दिसत नव्हत्या. मी अतिशय काळजीपुर्वक पाहिल पण माझी शंका खरी ठरत होती. अंकुर आणि परवडी मला मागे एकटा सोडुन फ़ार पुढे निघुन गेले होते. ह्या अंधारात अश्या निर्जन जागेवर रात्रीच्या अश्या वेळेस मी अगदी एकटा आहे ही कल्पना डोक्यात येताच भितीची एक लहर अंगातुन वहात गेली. मी गाडीचे हेडलाईट्स ऒन केले आणि होर्न वाजवू लागलो. त्या निशब्द परिसरात माझ्या बाईकच्या होर्नचा आवाज केव्हढ्यानं तरी वाजत होता. पण त्या आवाजाने मला आधार मिळण्याऐवजी तो आवाज मला माझा एकटेपणा अजुन जाणवून देत होता. मी आता गाडी जोरात चालवून त्यांना गाठायचा प्रयत्न करु लागलो.
जवळपास पाच दहा मिनिटे सलग चालवूनसुध्दा त्याचा काही हासभास लागला नाही. मला वाटत होते त्याहीपेक्षा ते लोक फार पुढे निघून गेले होते. मला तर विश्वासच बसत नव्हता की अस कस काय होउ शकत? त्या वळणा अगोदर माझ्या नजरेसमोर असणारी ही माणसे काही क्षणात अशी एकाएकी गायब कशी काय होउ शकतात? मला तर काही सुचतच नव्हत. तेव्हढ्यात इतका वेळ न सुचलेली गोष्ट माझ्या लक्ष्यात आली. मी त्यांना फोन लावायचा ठरवला. गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. तशी खर तर एव्हढी खबरदारी घ्यायची काही गरज नव्हती. कारण त्या अख्ख्या रस्त्यावर माझ्या आणि माझ्या बाईकच्या व्यतिरिक्त दुसर कुणीही नव्हत पण तरीही मी नवशिक्या ड्राईव्हर असल्याने ट्राफ़िकचे सगळे नियम पाळण्याची मला तेव्हा सवय होती. घरून निघतानाच मोबाईल बैटरी शेवटच्या घटका मोजत होती आणि आता पाहिलं तर तिने केव्हाच दम सोडला होता. माझा त्यांना गाठायचा हा प्रयत्नही फोल ठरला होता. आता मात्र ही खरच माझ्यासाठी चिंतेची बाब होती. साला मी ह्यांच्यासोबत इथे यायलाच नको हव होते. हे साले अस काहीतरी करणार आहेत हे मला अगोदर माहिती असते तर मी अजिबात आलो नसतो. पण आता हा विचार करण्याची वेळ निघुन गेली होती. मी आठवायचा प्रयत्न करू लागलो की रस्त्यात मधे कुठे एखादा फाटा तर लागला नव्हता ना? मी रस्ता तर चुकलो नव्हतो ना? लगोलग मेंदुने तर्कशुध्द उत्तर दिल की अजिबात नाही कारण जेट्टीपासुन इथवर येईपर्यंत गावातल्या त्या तिठ्याखेरिज दूसरा कुठलाच रस्ता दिसला नव्हता किंवा तशी काही खूणही आढळली नव्हती.आणि दूसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते दळभद्री वळण येण्याअगोदर पासून एक गोष्ट मला जाणवली होती की रस्त्याच्या दुतर्फा दगडांच्या ज्या कुंपणवजा भिंती घातलेल्या होत्या, त्या अजुनही मला सोबत करत होत्या. सध्याच्या ह्या परिस्थितीत आता माझ्याकडे फ़क्त दोनच पर्याय होते. एक तर तडक मागे फिरायचं किंवा इथून पुढे त्यांच्या मागावर जायचं. मी पुढे जायचं ठरवलं त्याला दोन कारणं होती. एकतर माझा मोबईल बंद होता आणि दुसर म्हणजे मला वाटत होत की मी त्यांच्या सोबत नाही हे आता त्यांच्याही लक्ष्यात आले असणार. माझा फोन बंद आहे हे कळल्यावर ते मला शोधायला मागे फिरले असतील तर वाटेतच आमची गाठ पडेल. मी बाईक स्टार्ट केली आणि पुढे निघालो. मला अजुनही अस वाटत होत की हे लोक साले माझी मस्करी करत असणार बहुतेक. देव करो आणि तसेच व्होवो मनातल्या मनात देवाला हाक मारली. बाईक चालवून थोडावेळच गेला असेल की मला एक आशेचा किरण दिसला. मला समोर रस्त्याच्या डाव्याबाजुला उजेडासारखं काहीतरी दिसत होत. एक बल्ब जळत होता. एस.टी महामंडळाच्या विनंती थांब्यासारखं काहीतरी होत. मी गाडी थोडी स्लो केली. तो थांबा जस जसा जवळ येउ लागला तस मला दिसल की त्या थांब्यावर दोन व्यक्ति उभ्या आहेत. तिथे एक 30-35 ची बाई आणि एक 5-7 वर्षाची मुलगी उभी होती. चला कुणीतरी माझ्याशिवाय इथे आहे ही भावनाच मनावरचा बराचसा ताण हलका करुन गेली. पण मागोमाग मेंदुने सावधानीचा इशारा दिला. की एव्हढ्या रात्री ह्या दोघी अश्या निर्जन रस्त्यावर अश्या अवेळी कुठल्या बसची वाट बघताहेत? काही लफ़डं तर नाही ना? मी वेळेचा अंदाज बांधला तर आता कमीत कमी 10:30 तरी वाजायला हवे होते. चल काहीतरीच काय अश्या गोष्टी रात्रीच्या बाराच्यानंतर बाहेर पडतात अस कुणीतरी सांगितलेले आठवले आणि आता तर बाराला अजुन वेळ होता. त्यांच्याकडुन काही मदत मिळते का? किंवा माझे मित्र इथून पुढे जाताना त्यांनी पाहिलय का? ह्याची चौकशी करण्यासाठी मी गाडीचा वेग अजुन मंदावला आणि गाडी रस्त्याच्या अगदी डाव्या बाजुला आणली. माझी गाडी जस जशी त्याच्या जवळ जाऊ लागली तशी मला एक गोष्ट जाणवलीं की त्या दोघी माझ्याकडे टक लावून बघत होत्या. मलाही त्या आता स्पष्ट दिसत होत्या. दोघिहीजणी तिकडच्याच कुठल्यातरी रहाणार्या वाटत होत्या. त्या बाईने साधी सहावारी साडी नेसली होती पण ती साडी थोड़ी अस्त्यावस्त किंवा घाईघाईत नेसल्यासारखी वाटत होती. तिच्या केसांचा बुचडा बहुतेक सुटल्यासारखा वाटत होता. एका हातात प्लस्टिकची पिशवी आणि दुसऱ्या हाताने तीने त्या मुलीचा हाथ पकडला होता.ती मुलगी तिच्या डाव्याबाजुला उभी होती. थोडक्यात सांगायच तर ती बाई थोडी \विचित्रच वाटत होती. त्या मुलीने एक ड्रेस की काहीतरी घातला होता. दोघी एकदम शांत उभ्या होत्या एकटक माझ्याकडे पहात जणुकाही इतका वेळ ज्याच्यासाठी थांबल्या आहेत तो मीच आहे. थांब्यावर अडकवलेला बल्ब नेमका त्या दोघींच्या डोक्यावर होता. दिव्याखाली अंधार ह्या म्हणीनुसार त्या दोघींचे ही चेहरे मला नीटसे दिसत नव्हते. मी त्यांच्यासमोर गाड़ी थांबवणार एव्हढ्यात मला त्या दोघींची एक गोष्ट नजरेला खुपली. त्या छोट्या मुलीने जो ड्रेस घातला होता तो शाळेचा होता. पाठीमागे दफ्तर होते. वेण्या व्यवस्थित पाठीमागे बांधलेल्या होत्या, गळ्यात वोटर बोटल होती. मुलगी एकतर शाळेत जायच्या तयारीत होती किंवा नुकतीच शाळेतुन सुटली होती अश्या पेहरावात होती. थोडक्यात ती मुलगी अगदी अप टु डेट होती पण तिच्यासोबतच्या बाईच्या अगदी परस्पर विरोधी. आता मी त्यांच्या बरोबर समोर आल्याने मला त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत होते. दोघीचेही चेहरे पांढरे फ़ट्ट्क होते. त्यांच्या चेहऱ्यावर कुठले म्हणजे कुठलेच भाव नव्हते. बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या दोघीच्या परस्पर विरोधी असताना त्या दोघींमध्ये एक गोष्ट मात्र सेम होती ती म्हणजे त्या दोघींच्याही कपाळावर डोळ्यांच्या वरच्या भागावर एक मोठी खोक पडल्यासारखी वाटत होती. कुठल्यातरी मोठ्या अपघाताची निशाणीसारखी. त्यांचे डोळे अजुनही माझ्यावरच रोखलेले होते. हा सगळा प्रकार नेमका काय असू शकतो हे मला समजायला अजुन कुठल्याही पुराव्याची गरज नव्हती. मी त्यांच्यासमोर जेमतेम थांबायला आलेली गाड़ी पुन्हा जोरात सुरु केली आणि सुसाट सुटलो. न राहून मी पुढे जाऊन पुन्हा एकदा मागे वळुन पाहिले तर त्या दोघी अगदी तश्याच उभ्या होत्या अगदी शांत माझ्यावर नजर रोखुन. माझी तर आता चांगलीच तंतरलेली. मी जेव्हढ्या जोरात चालवू शकत होतो तितक्या जोरात बाईक पळवत होतो. माझी अवस्था इकडे आड़ आणि तिकडे विहीर अशी झाली होती. पुढे कुठे जायचयं हे माहीती नव्हतं आणि पाठीमागे त्या दोघी उभ्या होत्या. कुठली अवदसा सुचली आणि आज हे असलं थ्रील अनुभवायला आलो. मोठा बाईकर समझतो स्वत:ला. मी स्वत:च स्वत:ला शिव्याची लाखोली वहात होतो. सद्यपरिस्थीत मला ह्याशिवाय दुसर काही सुचतही नव्हते. मला खुप रडायला येत होत. डोळ्यांसमोर सारख्या त्या दोघीच येत होत्या. तेव्हढ्यात कुणीतरी मागुन माझ नाव घेतल्यासारखे वाटले. पहिल्यांदा मला वाटलं की मला भास झाला असावा.
"अमोल......."
पण आत्ताचा हां आवाज अगदी स्पष्ट आला होता. हो... कुणीतरी मागुन माझ्याच नावाचा पुकारा करत होते. मी थांबुन मागे वळुन पहाणारच होतो पण पुन्हा मला त्या दोघीची आठवण झाली. त्या माझ्या मागावर येउन मला बोलावत तर नसतील... ह्या विचारासरशी भितीची एक सणक मणक्यांतुन पार डोक्यात गेली. नाही...अजिबात मागे वळुन पहायचे नाही मी घाबरून अजुन जोरात बाईक पळवु लागलो. आता तो आवाज परत आला नाही. माझी खात्री पटली की म्हणजे त्या दोघीच मला बोलवत होत्या तर. याचाच अर्थ की त्या अजुनही माझ्या मागावर होत्या.
हे राम ......देवा प्लीज सोडव मला ह्या सगळ्यातुन. मी मनातल्या मनात कुलादैवतेला साकडं घातलं. मी बाईक चालवता चालवता एका हाताने माझे डोळे पुसत होतो.
"अमोल....."
अचानक माझ्या उजव्या बाजूने अगदी जवळुन हाक ऐकू आली. मी दचकून बाजुला पाहिल तर....
ते परवडी आणि अंकुर होते. परवडी बाईक चालवत होता आणि अंकुर मागे बसला होता. मला तर माझ्या डोंळ्यावर विश्वासच बसत नव्हता. मी अविश्वासाने त्याच्याकडे पहात होतो.
"अरे... बघतोस काय चुतिया.... गाडी थांबव पहिली......"
परवडीच्या आवाजाने मी भानावर आलो. मनातून त्या दोघांचा संशय येत होता. पण आता गाडी थांबवण्याखेरिज माझ्याकडे दूसरा काही पर्याय नव्हता. तस ही आता त्या दोघांनी आता मला गाठलच होत. मी गाडी साईडला घेतली. परवडीची बाईक माझ्यासमोर येउन थांबली. दोघेही उतरून माझ्याकडे आले. दोघेही जाम भडकलेले होते.
"कुठे चालला होता रे तू?? आणि होतास कुठे इतका वेळ??"
अरेच्चा साले, इतका वेळचा माझा हा प्रश्न हे लोक मलाच विचारत होते.
"साल्या.....बराच वेळ तुझी काही चाहुल लागली नाही म्हणून आम्ही मागे वळुन बघितलं तर तू गायब झालेला. आम्हाला वाटल तू आमच्या मागेच आहेस. आम्ही बाईक्स स्लो केल्या तरी तु काही आला नाहीस. गाड्या साईडला घेउन बराच वेळ तुझी वाट पाहिली तरी काही उपयोग झाला नाही. सरतेशेवटी तुझा फोन ट्राय केला तर तो पण स्विच्ड ऑफ़. आम्हाला तुझी काळजी वाटायला लागली. मग आम्ही ठरवल की दोघांनी पुढे जाऊन शोधायचं आणि दोघांनी मागे जाउन. ज्याला तू पहिला सापडशील त्याने दुसर्याला फ़ोन करून कळवायच. आता बोल ना कुठे होतास तू इतका वेळ??" परवडी मला विचारत होता. त्याच्या बोलण्यातुन त्याची माझ्याविषयीची काळजी स्पष्ट कळत होती. मी काहीच बोललो नाही. आता त्याची हालत बघता त्यांना मगासचा घडलेला प्रकार कितपत समजेल हा मोठा प्रश्न होता आणि तसही जे काही घडलं होत ते सांगायची ही वेळही नव्हती अन जागाही. अंकुरने लगोलग चप्पाला फोन लावला आणि मी भेटल्याच सांगुन टाकल.
"तुम्ही कुठे आहात......OK.........नको आता पुढे नका येऊ......तुम्ही आहात तिथेच उभे रहा आम्ही येईपर्यंत" एव्हढ बोलून त्याने फ़ोन कट केला.
" पहिल मला सांग तू आमच्या पुढे कसा काय आला? आणि तू साल्या जेव्हा आम्ही पाठून हाका मारत होतो तेव्हा थांबला का नाहीस? ऐन वक्ताला गाडीचा हॉर्न बंद पडला आणि त्यात तू ही तुझी बाईक मायकल शुमाकर सारखी पळवतोय" मला त्याही परिस्थीतीत अंकुरचं जनरल नॉलेज पाहून हसू आले. मला हसताना पाहून अंकुर अजुन भडकला. तो काही पुढे बोलणार तेव्हढ्यात
"चल बे ......ह्याला नंतर बघू अगोदर जेट्टीवर पोहचायाला लागेल. साडेबाराची लास्ट बोट असते. ती चुकली तर वाट लागेल. चल अमोल लवकर आणि मघाशी जशी चालवलीस तशीच जोरात बाईक चालव आणि हो आता आमच्या पुढे रहा आणि राईट मिरर मध्ये आम्हाला ठेव..." परवडीने मला इन्स्ट्रक्शन्स देऊन बाईक स्टार्ट केली. मी म्हटल " प्लीज माझी बाइक कुणी चालवेल का?" त्या दोघांनी एकामेकांकडे वैतागुन बघितलं. अंकुरने माझ्याकडून बाईकचा ताबा घेतला. मी गुपचुप त्याच्या मागे बसलो. आता त्या दोनही बाईक्स वाऱ्याच्या वेगाने जेट्टीच्या दिशेने पळत होत्या. अंकुरच्या मागे बसून परत जाताना मला जाणवलं की मी ह्या सगळ्या घडामोडीत बराच पुढे आलो होतो. परतीच्या मार्गावर तो मगासचा विनंती थांबा कुठे दिसतो का ते मी पहात होतो. पण बराच वेळ होऊनदेखिल तो काही दिसत नव्हता. मगाशी त्या थांब्यावरुन पुढे जाताना लागलेल्या वेळेनुसार परतीच्या वाटेवर एव्हाना खरंतर तो यायला हवा होता.
जाऊ दे..... मरू दे....साला तो विषयपण नको आणि ती आठवणपण. मी थकून अंकुरच्या खांद्यावर डोक टेकलं.
**************************************************************************************************************************
अचानक मला बाईकचा स्पीड कमी होत असल्याचा जाणवला.अंकुरच्या खांद्यावरुन समोर पाहिल तर रस्त्याच्या कडेला एक बाईक साईड लाईट ऑन करून उभी होती. आणि त्याच्या शेजारी दोन व्यक्ति एकामेकांना अगदी बिलगुन उभ्या होत्या. लांबुन बघताना एखाद कपल अंधाराचा फ़ायदा घेउन काहीतरी चाळे करतय अस वाटत होत. दोन्ही गाड्याचे हेडलाईट्स एकदम त्यांच्यावर पडले आणि समोरचे दृश्य पाहून आम्ही गडबडुन गेलो. समोर चिनूला बहुतेक फ़िट आल्यासारखी वाटत होती. त्याने डोळे फिरवले होते. दात कचकच वाजवत तोअंगाला एकसारखे झटके देत होता. त्याला त्या परिस्थितीत आवरताना चप्पाची हालत खराब होत होती. आम्ही धावत त्यांच्याकडे पोहचलो आणि विचारलं काय झालं?
आधी इथनं चला मग सगळं सांगतो" रडवेल्या आवाजात चप्पा म्हणाला.
परवडीच्या बाईकवर मध्ये चिनुला बसवून चप्पा त्याच्या मागे बसला. आता माझी आणि अंकुरची बाईक रिकामी होती. आता परत जाताना सगळ्यांत पुढे परवडी, मागे मी आणि सगळ्यांत शेवटी अंकुर असा सिक्वेंस होता. जवळपास वीस पंचवीस मिनिटात आम्हाला आमच्या समोर जेट्टीचा गेट दिसू लागला आणि सोबत बोटिचा निघण्याअगोदर ह्या दिवसाताला शेवटचा होर्नही ऐकू आला. त्या बरोबर अंकुरने बाईकचा हॉर्न वाजवायला सुरुवात केली. मला अंकुरच्या ह्या प्रसंगावधानाचं कौतुक वाटलं. बोट आमच्यासाठी जेट्टिवर थांबली होती. आम्ही बोटिजवळ पोहचलो. मगासचे काका मला पाहून तत्परतेने पुढे आले आणि माझी बाईक उचलून आत ठेवली. आता ह्या शेवटच्या फेरीला प्रवासी म्हणुन आम्ही पाचजणच होतो. बाकी बोटिचा ड्राईव्हर आणि ते काका असे दोघेच जण होते. चिनू आता बर्यापैकी सावरला होता. पण त्याची थरथरी काही अजुन कमी झाली नव्हती. सगळे एकदम शांत होते. कुणी कुणाशी काही एक बोलत नव्हते.
"काय झाले रे चिनुला????" अंकुरने शांततेचा भंग करत चप्पाला विचारले.
"अहं....." चप्पा कसल्यातरी तंद्रीतुन बाहेर आल्यासारखा बोलला. चप्पाने एकवेळ आम्हा तिघांकडे पाहिल आणि सगळ्यांत शेवटी चिनूकडे पाहून सांगायला सुरुवात केली.
" आयला काय झालं, कसं झालं तुम्हाला काय सांगु? कळतच नाहीय मला. अंकुर तुझा फोन आला तोवर आम्ही अमोलला गावापर्यंत शोधून आलो होतो. पण अमोल काही सापडला नाही. तिठ्यावरच्या चहावाल्याकडे इथून एखादी ब्लेक पल्सर पास झाली काय याची चौकशी केली. त्याने सांगितले मघाशी तुम्हा तिघांच्या गाड्या गेल्या तेव्हढ्याच त्यानंतर इथून कुठलीच गाडी गेली नाही. आम्हाला आता अमोलची सॉलिड काळजी वाटायला लागली. मला काही सुचत नव्हतं. चिनू म्हणाला आपण परत मागे जाऊ आणि पुन्हा एकदा रस्त्यावर अमोलला शोधू. मला चिनुच म्हणण पटलं. आम्ही परत निघालो. डोक्यात नको नको ते विचार येत होते. अमोल असा कसा काय गायब झाला काहीच कळत नव्हतं . आम्ही रस्त्याच्या कडेला निरखून पहात होतो. पण काही उपयोग होत झाला नाही. एव्हाना आम्ही अमोल जिथून शेवटचा दिसला होता त्याच्याही पुढे निघून आलो होतो. तेव्हाच तुझा मला फोन आला की अमोल सापडला म्हणुन आणि तू सांगितलस की आहात तिथे थाबुंन रहा म्हणुन. अमोल सापडला हे ऐकून माझा जीव भांड्यात पडला. मी लागोलग ही गोष्ट चिनुला सांगितली. तोही खुश झाला. आम्ही आता तुम्ही सांगितल्या प्रमाणे गाडी फिरवून उभे राहिलो. गाडी बंद केली. सिंगल स्टेण्ड्ला गाडी उभी केली आणि साईड लाईट ऑन करून आम्ही एका आडोश्याला जाउन हलके होउन आलो. आजुबाजुचा परिसर अगदी निवांत होता. बाईक बंद केल्यावर तर आजुबाजुच्या शांततेत अजुन भर पडली होती. चंद्राच्या प्रकाशात आजुबाजुचा परिसर अगदीच स्पष्ट नाही पण बर्यापैकी व्हिजिबल होता. मी सहज वर पाहिले तर आज पोर्णिमा असल्यासारखे वाटले. मी आणि चिनू एकामेकांशी गप्पा मारत तुमची वाट पाहू लागलो. तेव्हा माझ लक्ष्य चिनुच्या मागे जाणवलेल्या हालचाली कड़े गेले. तिथे अंधारात रस्त्याच्या कडेला दोन आकृत्या उभ्या होत्या. त्यातली एक आकृती एका बाईची आणि दूसरी आकृती लहान मुलीची होती. मी गडबडुन पुन्हा पाहिले तर तिथे कुणीच नव्हते मला वाटलं की मला भास् झाला बहुतेक. मी पुन्हा गप्पा मारायला सुरुवात केली. पुढच्याच क्षणाला चिनुच्या ड़ोक्यामागे काहीतरी फ़डफ़डताना दिसलं. मी निरखून पाहिल तर एक 30-35 ची बाई चिनुच्या मागे एका हाताच्या अंतरावर उभी होती. तिच्यासोबत एक मुलगी पण होती. शाळेचा ड्रेस घालून. दोघी एकदम विचित्र दिसत होत्या. मला अचानक शांत झालेला पाहून चिनू नेही मागे वळुन पाहिले. त्या दोघींना पहाताच घाबरून चिनू दोन पावलं मागे सरकला आणि मला येउन धड़कला. त्या दोघी मात्र आहेत त्या जागेवर अगदी शांत आणि निश्चल उभ्या होत्या. चंद्राच्या प्रकाशात त्याचा चेहरा आता स्पष्ट दिसत होता. दोघिंचेही चेहरे एकदम निर्जीव होते. त्यांच्या कपाळावर कसलीतरी मोठी खोक पडलेली दिसत होती. त्यांनी त्यांचे डोळे आमच्यावर रोखलेले होते. आमची तर वाचाच बंद पडली होती. घश्याला कोरड पडल्यासारखे वाटतं होते. जोरदार ओरडावेसे वाटत होते पण भीतीने तोंडातुन शब्दच फुटत नव्हता. इतक्यात त्या छोट्या मुलीने एकाएकी जोरदार किंचाळ्या फोडायला सुरुवात केली. त्या निशब्द वातावरणात तिच्या त्या किंचाळ्यांचा आवाज केवढ्यानं तरी घुमत होता. आम्हाला तर आमचे कानच बसल्यासारखे वाटले. अचानक तिच्या किंचाळ्याचा आवाज थांबला. आम्ही त्यांच्याकडे पाहिले तर त्या तश्याच शांत आणि निर्विकार उभ्या होत्या आमच्याकडे टक लावून पहात. आता ती बाई अचानक जोरजोरात हसायला लागली. त्यावेळेला तीचे ते अस बेसुर हसणे अंगावर काटा आणतं होत. आमची तर भीतीने बोबडीच वळली होती. अचानक ती बाई हसता हसता रडायला लागली. स्वत:चा उर दोन्ही हातांनी बडवायला लागली. तिचे दोन्ही हाथ मोकळे पाहून, आमचं लक्ष्य मघापासून तिचा हाथ धरून उभ्या असलेल्या तिच्या त्या मुलीकडे गेले तर ती जागेवर नव्हती मी इकडे तिकडे पाहिले तर ती उलटी होऊन पाठिची कमान करून दोन्ही हात तिने जमिनीला लावले होते पण सगळ्यात विचित्र म्हणजे ह्या असल्या पोझिशन मध्ये तिचा चेहरा उलटा असायला हवा होता. पण नाही तो सरळच होता. ती आता खेकड्यासारखी चालून आमच्याभोवती घिरट्या घालत होती. आमच्या भोवती घिरट्या घालताना ती मुलगी अगम्य भाषेत काहीतरी बडबडत होती. मध्येच आमच्याकडे पाहात दात विचाकावुन फिसकारत होती. तिच्या डोळ्यांच्या बाहुल्याच गायब झाल्या होत्या. इकडे ती बाई स्वत:चा उर बडवता बडवता आता जोरदार घुमायला लागली होती. तिच्या केसांनी तिचा चेहरा आता पुर्ण झाकला होता. तीच रडणं अगदी असह्य होत होते. आम्ही अगदी रडकुंडिला आलो होतो. अचानक चिनू थरथरायला लागला मला काही कळायच्या अगोदर चिनू एकदम हातपाय झाडायला लागला ते पाहून त्या दोघी अजुन जोरजोरात हसायला लागल्या. मी घाबरून जोरात ओरडलो " चिनू………"
माझा आवाज मला स्वत:लाच केव्हढ्याने तरी ऐकू आला. आजुबाजुला पाहिलं तर सगळं एकाएकी एकदम शांत झालं होतं. मी आजुबाजुला नजर टाकली. घाबरून त्या दोघी कुठे लपल्या आहेत का? ते पाहू लागलो. पण आता त्या रस्त्यावर मी आणि चिनू शिवाय दुसरे कुणीच नव्हते. तेव्हढ्यात दुरून दोन लाईटस आमच्या दिशेने येताना दिसल्या. जवळ आल्यावर कळल की त्या तुमच्या बाईक्स होत्या. तुम्ही आलात आणि विचारायला लागलात की काय झालं म्हणून. आता हे सगळं मी तुम्हाला तिथ कसं सांगणार....."
एव्हढं बोलून चप्पा रडायला लागला. मी चप्पाला जवळ घेतलं. अंकुर आणि परवडीच्या चेहर्यावर भिती स्पष्ट दिसत होती. चप्पानेही तत्कालीन परिस्थीतीत तेव्हा काहीही न सांगण्याचा माझाच पर्याय निवडला होता. पण चप्पाने त्या दोघींचा विषय काढताच मला त्या दोघींचे चेहरे पुन्हा डोळ्यांसमोर दिसू लागले. आजच्या रात्रीच हे थ्रील आम्हा सगळ्यांना भलतचं भोवलं होत.
" कुठं गेला होता रे तुमी सगली इतक्या रातच्याला......" त्या बाईक उतरवणार्या काकांनी मला विचारलं. मी उत्तर दिल नाही. बहुदा त्यांनी आमच बोलण ऐकल होत.
" नका सांगु.....पण तुमच्या बोलण्यावरुन मला समदं कळलय की तुमी कुठं जाउनश्यान आला ते. पुन्यांदा असा शानपना करू नका. तुमच्या आई बापाची पुण्याई म्हणुनश्यान सस्तात वाचलात. अरे निदान दिस बगुन तरी निघायच. अरे...आज पोर्णिमा हाय ना रे. काय बर वाईट झाल असत तर कोण जिम्मेदार होत....." आम्हाला आमची चुक कळत होती. समोर चिनू अजुनही थरथरत होता. काकांनी चिनुकडे पाहिलं आणि म्हणाले" आदि ह्या पोराला पाणि पाजा आणि ह्याला घरात नेण्या अगुदर ह्याच्यावरून तीन येळा नारल ओवालुन काढा. आणि तो नारल कुठल्यातरी तिठ्यावर नेउन फोडून टाका. आणि हो.... नारल फोडून माघारी येताना काय बी झाल तरी मागं वळुन पाहायच नाही..... समझलात काय?" आम्ही माना डोलावल्या. बोट बोरिवलीच्या जेट्टीला लागली. आम्ही खाली उतरलो. काकांनी आमच्या बाईक्स उतरवून दिल्या. मी काकांना पुन्हा दहाची नोट पुढे केली तर काकांनी माझा नोट धरलेला हात हातात घेतला आणि म्हणाले
" नको राजा मला पैका नको फकस्त तुमी लोक सवताला जपा. असल जिवावरच धाडस पुन्यांदा कंदि करू नका. माझ लई नुसकान झाल हाय ह्या असल्या तुमच्या खेळापाई .....अरे तुमच्या एव्हढाच होता रे तो............" एव्हढ बोलून काकांनी शर्टाच्या बाहिने आपले डोळे पुसले आणि बोटीत चढले.
परवडीने माझ्या खांद्यावर हात ठेवून निघायचा इशारा केला. बाहेर येईपर्यंत कुणी कुणाशी बोलत नव्हते. चिनूला घरी सोडायची आणि काकांनी सांगितलेले सोपस्कार पुर्ण करायची जबाबदारी परवडीने घेतली. चप्पा अंकुर सोबत निघाला. मी घरी पोहचेपर्यंत एक वाजला होता. आईने दरवाजा उघडला. आईने मला काही विचारण्या अगोदरच मी तिला मिठी मारली. आईने काय झाल विचारल्यावर मग सांगतो अस निसटत उत्तर देऊन गुपचुप वर आपल्या खोलीत गेलो.
आज ह्या गोष्टीला वर्ष लोटली. सगळेजण आज देवाकृपेने सुखरूप आहेत. त्या रात्रीच्या त्या अनुभवानंतर रात्रीचे ते थ्रील कायमस्वरूपी बंद झाली. आता आमच्यापैकी कुणीही त्या रात्रीविषयी चुकार शब्दही काढत नाही. पण मला ठावूक आहे की ती रात्र दररात्री माझ्याच काय तर आम्हा सगळ्यांच्या आठवणीत जागी असते.
- अमोल परब