Sunday, May 8, 2016

भय

दिनकरराव भोसल्यांची एक सवय होती, त्यांना रात्री उशीरापर्यंत नीट झोप येत नसे व पहाटे डोळा लागतो न लागतो तोच, बबलीच्या म्हणजे त्यांची नात श्रेयाच्या हाकेने त्यांची झोपमोड होई. मधाळ आवाजात हाक मारत बबली म्हणे, “आजोबा गुड मॉर्निंग, मी शाळेत जाऊन येते हं !” एवढ्याशा, चार-सहा वर्षांच्या मुलांना सकाळी सात वाजता घर सोडावं लागतं याचं त्यांना वाईट वाटे. झोपेतून उठून दिनकरराव तीला बाय-बाय करित असत.
आजही बबलीच्या हाकेने जाग आली तीला “बाय-बाय बेटा” असे म्हणत दिनकरराव उठले. आपली चाळीच्या व्हरांड्यातली अंथरूणाची वळकटी केली आणि समोरुन येणा-या राहूलला विनंती करून ती वळकटी खिडकीच्या वरती लावलेल्या लाकडी फळीवर ठेऊन घेतली. पटापट सर्व विधी आटपून हॉस्पिटलला निघायची लगबग चालू होती. त्यांची ही लुडबूड दिपकला त्यांच्या एकूलत्या एक मुलाला खपली नाही. “हे काय चाललंय अण्णा अहो रात्रपाळी करून थकून आलोय, जरा आंघोळ करून चहा-नाश्ता करून झोपावं म्हणतोय तर तुमचं हे मधे-मधे “
“बाळा मला केममध्ये जायचंय रे ! आज रक्त तपासायचं आहे”.
“ अहो पण अर्धा तास उशीर झाला तर काय लगेच तुमचं हॉस्पिटल बंद होणार नाही. मला आज पून्हा सेकंडला जायचंय ! दोन चार तास झोप मिळेल तेवढीच”.
दिनकरराव दीनपणे बाहेर व्हरांड्यात आले. मोडक्या खुर्चीत बसून राहिले. साधारणत: पाऊण तासाने पाहिले तर दिपक झोपलेला दिसला. मग पुन्हा त्यांची लगबग चालू झाली. खरंतर त्यांना ठाऊक होते की विचारून काही उपयोग होणार नाही, तरी त्यांनी दिपकला बरोबर येण्याची विनंती केली. पण नाईट शिफ्ट करून आल्याचा बहाणा करून दिपकने नकार दिला. एवढ्यात कल्पना, त्यांची सूनही लेकीला शाळेत सोडून परतली होती. दिनकररावांनी तिलाही बरोबर येण्याविषयी विचारले. तशी तिनं फणका-यानं सुनावलं, “ तूमचं हे नेहमीचंच झालंय, म्हणून काय मी माझी सगळी कामं सोडून हॉस्पिटलला वेळ फुकट घालवू ?”
शेवटी दिनकरराव एकटेच निघाले, आता त्यांना पत्नीची वत्सलाची प्रकर्षानं आठवण होऊ लागली, ती होती तेव्हा माझ्या भटकण्याच्या सवयीवर नेहमी वैतागायची म्हणायची “असं एकट्यानं गाव भटकत जाऊ नका, जरा घरी शांत बसा, पेपर वाचा, टि.व्ही. बघा.”
“ पण वत्सले आज तूझ्याविना मला नाईलाजानं एकटं जावं लागतंय गं ! तू असतीस तर झेपत नसतानाही पाय ओढंत माझ्याबरोबर आली असतीस. एकट्याला हॉस्पिटलात जाऊ दिलं नसतंस.”
दिनकररावांनी काठी घेतली, काठी म्हणजे काय ? तर जूना काढून टाकलेला पडद्याचा रॉड. त्याच्या वरच्या भागाला हाताला लागतो म्हणून सूतळीनं मुठ तयार केलेली, पण तरीही त्यातून रॉडचं वरचं टोक हाताला बोचत असे. तळ हाताला गोल खड्डा पडून हात लालबूंद होई, वेदनेने जीव जातोय की काय असे वाटे, पण दुसरा पर्याय नव्हता. कारण कित्येकदा मिन्नतवा-या करूनही दिपक काही साधी लाकडी काठी आणून देत नव्हता. हॉस्पिटलजवळच्या दुकानात तशी काठी ऐंशी रुपयांना मिळत होती, पण दिनकररावांकडे तेवढे पैसे नसत. प्रत्येक वेळी मुला-सुनेकडे हात पसरून ‘जे काही’ पदरात पडत असे, त्यावर काटकसरीने आपले खर्च भागवावे लागत असत. आताही तसंच होतं. कल्पनाने काल दिलेले पन्नास रुपये शिल्लक होते.
हेच दिनकरराव एका खाजगी कंपनीत टाईमकिपर असताना त्यांचा रुबाब पहाण्यासारखा असे. त्या नोकरीतही त्यांनी पै-पै जमवून वीस हजार रुपये पागडी भरून ही चाळीतली जागा घेतली होती. आणि रिटायर्ड होताना जवळ जवळ चार लाख रुपये जमवले होते. दोन वर्षांपूर्वी दिपक आणि कल्पनाने एकच घोषा लावला होता की, ही खोली लहान पडते, अडचण होते, प्रायव्हसी मिळत नाही. सतत ऐकवून ऐकवून आणि गोडीगुलाबीने दिनकररावांकडून त्यांच्या नावावर असलेली एफडी मोडून पाच लाख रुपये काढून घेतले आणि दिपकने सोसायटीतून लाखभर लोन काढून सहा लाखात विक्रोळीस एक नवा कोरा वन बीएचके फ्लॅट घेतला आणि मग रहायला जाण्यापेक्षा भाड्याने दिला तर जास्त फायदा होतो म्हणून तो भाड्याने दिला व दोघेही आजही त्याच चाळीतल्या खोलीत रहात होते. आता अचानक सर्व अडचणींचा विसर पडला होता.
“पूर्वी हे दोघे किती आदबीने आणि प्रेमाने वागायचे, आता माझ्याकडचे सगळे पैसे काढून घेऊन मला कफल्लक केला आणि आता हाडतूड करताहेत.” दिनकरराव मनातल्या मनांत चरफडत घराबाहेर पडले. हॉस्पिटलात साडे आठ वाजता बोलावलं होतं, एव्हाना नऊ वाजले होते. आता रक्त तपासणी होते की नाही कोणास ठाऊक. आता बससाठी थांबायची हिंमत नव्हती म्हणून त्यांनी टॅक्सीवाल्याला विचारले की, “केमला जायचे किती होतील? “ टॅक्सीवाल्याने अंदाज दिला की, तीस रुपयांपर्यंत होतील. मग मनाचा हिय्या करून दिनकरराव टॅक्सीत बसले. हॉस्पिटलला पोहोचले, तिथल्या गुळगुळीत फरशीवर त्यांच्या हातातला रॉड थांबत नव्हता. फरशीवर धातूचा रॉड सारखा पुढे पुढे घसरत होता आणि चालायला अजूनच त्रास होत होता. तोल सांभाळण्यासाठी घेतलेल्या काठीचा उपयोग होण्याऐवजी हॉस्पिटलमधील त्या गर्दीत ती काठी कोणाला लागू नये म्हणून सांभाळत चालण्याची कसरत करावी लागत होती.
ब्लड टेस्टच्या ओपीडीजवळ पोहोचले, समोर पहातात तर ही भली मोठी रांग. त्यांची तर दातखिळीच बसली, घाबरतच ते काऊंटरजवळ गेले काऊंटरवरच्या मुलाला विचारलं. “ साहेब, मला साडे आठला बोलावलं होतं. पण यायला उशीर झाला आहे, माझी ब्लड टेस्ट होईल का?” “हो होईल जा लाईनमध्ये बसा.” त्या मुलाने जराही दिनकररावांकडे न पहाता उत्तर दिलं. त्याच्या या वागण्याने दिनकररावांना वाईट वाटलं. पण ते काहीच न बोलता रांगेत जाऊन बसले. साधारणत: तासाभराने त्यांचा नंबर लागला, त्यांच्या मागे कुणीच नव्हते. त्यांची फाईल पाहून काऊंटरवरच्या मुलीने विचारलं, “बहात्तर वय आहे तुमचं?”
म्हटलं तर प्रश्न साधाच होता. पण दिनकररावांचा सकाळपासून धरलेला संयम सुटला आणि त्यांच्या डोळ्यात पाणी तराळले. त्या मुलीने दुसरा प्रश्न विचारला, “ तुमच्या बरोबर कुणी नाही?”
दिनकरराव गप्पच राहीले, पण त्या मुलीला बहुधा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असावीत. तीने फाईलवर काही नोंदी केल्या आणि ती फाईल शेजारी बसलेल्या त्या मुलाकडे दिली, त्या मुलाने काही चिठ्ठ्या तयार करून दिनकररावांना दिल्या व आतमध्ये जाण्याचा बोटानेच इशारा केला तेव्हा त्या मुलीने त्याला सांगितले, “अरे ते एकटेच आलेत, त्यांना टेक्नीशियनकडे सोड.”
तेव्हा तो मुलगा काऊंटरच्या बाहेर आला, काही न बोलता दिनकररावांच्या दंडाला पकडून लॅबमध्ये घेऊन गेला, आणि थेट टेक्नीशियनच्या समोर नेऊन बसवलं. आतमध्ये रांग असूनही दिनकररावांना अग्रक्रम मिळाला होता, या लहानशा घटनेने ते काहीसे सुखावले. त्यांच्या रक्ताचा नमुना घेऊन झाल्यावर टेक्नीशियनने त्यांना सांगितले की, “दुपारी बारा वाजता जेऊन दीड वाजता परत यायचं.”
“कशाला रिपोर्टर्स घ्यायला?” दिनकररावांनी विचारले.
“नाही पुन्हा रक्त घ्यायचं आहे.” टेक्नीशीयनने सांगितले त्यावर दिनकरराव पुन्हा काही विचारणार येवढ्यात त्या मुलाने त्यांना दंडाला धरून बळेबळेच उठवले आणि म्हणाला “मी सांगतो काय ते; चला बाहेर चला.” त्याने बाहेर आणून बसवले आणि म्हणाला “कसं आहे आजोबा, जेवणापूर्वी आणि जेवणानंतर रक्तातल्या साखरेचं प्रमाण तपासले जाते. आता जेवणापूर्वीचं तुमचं रक्त घेतलं, जेवणानंतर दोन तासाने जेवणानंतरचं रक्त घेणार म्हणून बारा वाजता जेवायचं, दोन वाजता रक्त द्यायचं.” एवढं बोलून तो मुलगा निघून गेला. दिनकररावांना प्रश्न पडला आता काय करायचं? घरी जावं तर पोहोचायलाच बारा वाजतील बरं घरी पोहोचल्यावर बारालाच काय दोन वाजेपर्यंत जेवण मिळण्याची शक्यता फारच कमी. बरं इथेच काही खावं तर किमान वीस-पंचवीस रुपये लागणार, मग घरी जायला बसचं तिकीट कसं काढावं? मग ते भित-भित पुन्हा काऊंटरजवळ गेले, ती मुलगी जरा बरं बोलत होती म्हणून तीच्याकडे चौकशी करूया असे वाटून ते तीच्यासमोर आले.
“मॅडम, मी घाटकोपरला रहातो, एवढ्या कमी वेळात घरी जाऊन जेऊन परत येणं जमणार नाही मी इथेच काहीतरी खाऊन घेतलं तर चालेल?”
“हो चालेल पण घरच्यासारखं वरण-बात, पोळी-भाजी असं संपूर्ण जेवण घ्या नुसतं वडा सांबार वगैरे खाऊ नका.”
“ चहा बिस्किटं खाल्ली तर चालतील?” दिनकररावांनी हिशेब लावला, पंधरा रुपये खर्च झाले तरी चालेल.
“का?”
“मी बाहेरचं काही खात नाही” त्यांनी खोटंच सांगितलं.
“पैसे आहेत का तुमच्याकडे” मुलीने विचारलेल्या थेट प्रश्नाने ते गांगरलेच. पण सावरत म्हणाले “हो..हो आहेत थोडेसे.”
“घरी कोणकोण असतं तुमच्या?”
“मुलगा आणि सून आहेत पण ते दोघे आपापल्या कामात फार बीझी असतात.”
त्या मुलीने शेजारच्या मुलास हाक मारली “आकाश” त्यानंतर त्या काऊंटरवरील मुला-मुलींत नजरानजर झाली. तो मुलगा म्हणाला “आजोबा बसा थोडा वेळ मग पाहूया काय करायचं ते” तो मुलगा लॅबमध्ये गेला, त्याच्या पाठोपाठ ती मुलगीही गेली. बराच वेळ झाला मग तो मुलगा बाहेर आला आणि दिनकररावांना दंडाला घरून उठवत म्हणाला “चला आजोबा”
“कुठे?”
“जेवायला”
“नको, नको मी जाईन मला फक्तं हॉटेल कुठे आहे ते सांगा”
“तुमच्याकडे पैसे आहेत ना? माझ्याकडे नाहीत, तूम्ही मला जेवायला घालणार आहात”
“पण माझ्याकडे थोडेच पैसे आहेत.”
“हरकत नाही तो कँटीनवाला माझा मीत्र आहे त्याला नंतर पैसे देतो म्हणून सांगू”
दोघे कँटीनमध्ये गेले, दोघांसाठी लंच मागवलं, आणि मग निघताना आकाशनेच दोघांचे पेसे दिले. दिनकररावांच्या मनांत आलंच, “या मुलाचं काही कळतंच नाही, आतापर्यंत हा मुलगा एकदाही सरळ बोलला नव्हता, आणि वागण्यात इतका दिलदार? या मुलाच्या वागण्यात आणि बोलण्यात इतकी भिन्नता? “
आकाशने त्यांना पून्हा लॅबच्या बाहेर आणून बसवलं साधारणत: दोनच्या सुमारास आकाश पून्हा बाहेर आला. दिनकररावांशी एकही शब्द न बोलता दंडाला पकडून घेऊन गेला, रक्त काढून झाल्यावर पून्हा बाहेर आणून बसवलं. आता जाऊ की बसू असं विचारायची हिंमतही दिनकरराव दाखवू शकले नाहीत. तो मुलगा चांगला वागला तरी त्याच्याशी बोलायची भितीच वाटत होती. पंधरा मिनिटांनी तो मुलगा पुन्हा आला त्याने पुन्हा त्यांना दंडाला धरून उठवले, आणि बाहेरच्या दिशेने चालू लागला दिनकरराव निमूटपणे त्याच्या मागोमाग गेले. त्या मुलाने समोर उभ्या असलेल्या टॅक्सीत त्यांना बसवले, आणि त्यांच्या खिशात पन्नासची नोट बळेबळेच कोंबली. आणि तो निघूनही गेला. टॅक्सी घरासमोर थांबली तेव्हा नेमकं कल्पनाने पाहिलं. मग काय त्या दिवशी रात्री झोपायच्या वेळेपर्यंत दिनकररावांच्या टॅक्सीने फिरण्याच्या सवयीवर टोचून बोलणं चालू राहिलं. इतकं की त्यांना जीव नकोसा झाला होता. आज दिवसभरात किती अतर्क्य अनुभव येत राहिले. घरातल्या लोकांनी ज्याला अडगळ समजले होते त्याच म्हाता-याशी ज्यांचा यत्किंचतही संबंध नाही अशा लोकांनी किती ‘सहृदय’ आणि ‘आश्वासक’ वागणूक दिली होती.
सकाळ झाली तरी कल्पनाचे टोमणे थांबले नव्हते. दिनकररावांना आता असह्य झालं होतं. ते बबलीच्या हाकेने उठले सर्वांची लगबल थांबल्यावर ते तयार झाले, शांतपणे घराबाहेर पडले. सावकाशपणे चालत ते स्टेशनपर्यंत आले. रांगेत उभे राहून त्यांनी एक प्लॅटफॉर्म तिकिट घेतले आणि प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर एका बाकड्यावर बसले. आज ते आपल्या जीवनाचा अंत करणार होते. पण अजूनही धीर होत नव्हता, बराच वेळ वत्सलेशी मनांतल्या मनांत हितगूज झल्यावर धीर एकवटवून ते उठले, काठी तशीच बाकड्याजवळ राहीली होती, सावकाश चालत ते प्लॅटफॉर्मच्या कडेला आले, समोरून येणारी गाडीही दिसू लागली होती, बस!!! आता काही क्षणांतच गाडी जवळ येईल आणि आपण उडी मारायची ....झालं.... सुटका.... एवढ्यात एक माणूस ओरडला “ओऽऽऽ आजोबा मरायचंय काय? मागे व्हा !” त्याच्या त्या आवाजासरशी दिनकरराव मागे हटले आणि तोल जाऊन पाठीवर पडले. लोकांनी त्यांना उठवून पुन्हा बाकड्यावर बसवले. प्रत्येकजण आस्थेने चौकशी करत होता. “कुठे जायचंय?” “बरं वाटंत नाही का?” पण त्यांना मुर्च्छा आली होती.
काही वेळावे ते भानावर आले. हळू-हळू त्यांच्या भवतालची गर्दी पांगली. दिनकरराव विचारात पडले “नक्की काय घडलं? मी जिवंत आहे की?....त्यांनी काठीसाठी हात सरसावला पण काठी त्यांच्या हाताला लागली नाही एवढ्यात एका चिमूरडीने त्यांची काठी त्याच्या हातात सरकवली. तीला त्यांनी पाहीले ती लोकलमध्ये भिक मागणारी असावी. त्यांनी थँक्यू म्हणत काठी घेतली तशी ती मुलगीही ठँकू म्हणत दूर पळू लागली... क्षणबर ती बबलीच असल्यासारखे वाटून गेले. ते तसेच बसून होते आणि काल सकाळपासूनचा दिनक्रम आटवून आठवून विचार करत राहिले. किती वेळ ते तीथे बसून होते त्यांनाही कळले नाही. “मला जे हवंय ते मिळत नाही, असं का? मला जसं दिसतं तसं ते नसत, असं का? मला जे वाटतं त्यापेक्षा ते वेगळं असत, असं का? .... नाही ही केवळ नाण्याची एकच बाजू आहे. मी ज्याची अपेक्षा ठेवत नाही, तेही मला कधी कधी मिळून जातं. जसं ओळख नसताना हॉस्पिटलात अग्रक्रम, बसच्या प्रवासाचे वांदे असताना टॅक्सीने घरापर्यंत प्रवास. यापुढे आयुष्यात कधीही शक्य नसलेले दुपारी बारालाच मिळालेले जेवण. नाही माझीच काहीतरी गफलत होतेय, हे जग वाईट नाही. माणसं वाईट नाहीत, कदाचित त्यांची प्रत्येकाची काही मजबूरी असेल. मग माझं काय चुकतंय? .... परत आपण या क्षणापासून मागे जाऊया..... मी आता इथे बसलोय.... मला लोकांनी इथे बसवलं आणि आस्थेने चौकशी केली ओळख नसताना... त्याआधी मी मरायचा प्रयत्न केला मग मेलो का नाही? ..... येस!”
त्यांचा चेहरा उजळला, त्यांना साक्षात्कार झाला होता, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकच होतं.... “भिती..... हो नक्कीच, भितीच माझा शत्रू आहे. मघाशी मला मुर्च्छा आली त्यावेळची परीस्थिती कशी होती... शून्य केवळ एक शून्य होते.... किती सुखावह स्थिती होती, मला कसलीच चिंता नव्हती त्या क्षणी, मी त्या क्षणी मी नव्हतोच, माझे असे काही नव्हते, मला काहीच नको होते, किती सोपं आहे हे सगळं, आणि मी प्रत्येक वेळी माझ्यातल्या ‘मी’ ला मध्ये आणून जगत आलो. म्हणूनच सोबत भितीही आली. परिस्थितीला घाबरून मी पळ काढायचं ठरवलं. मग जगण्याला घाबरून मी मरायचं ठरवलं. मरणाच्या दारातही विदाऊट तिकिट पकडलं जाण्याला घाबरलो, आणि मरण्याचा प्रयत्न करताना अपरिचिताने दिलेल्या आवाजाला मी घाबरलो आणि मग मरणालाही घाबरलो.”
ते स्टेशनमधून बाहेर आले. इच्छा झाली तेव्हा एक मस्त वडापाव खाल्ला. शांतपणे दुकानांच्या आडोशाला असलेल्या सावलीतून घरी निघाले. वाटेत एका दुकानात एक काठी दिसली, सुंदर नक्षिकाम केलेली, झोकदार मुठ लावलेली, पहाताचक्षणी मनाला आवडली. दिनकरराव सहज दुकानात शिरले काठीची किंमत विचारली एकशे तीस रुपये होती. काही क्षण ते विचारात पडले बराचवेळ काठी उलट सुलट करून निरखून पाहिली. मग काहीतरी मनाशी ठरवून त्यांनी खिशातील चाळीस रुपये काढले. दुकानदाराच्या समोर ठेवत म्हणाले, “ हे चाळीस रुपये ठेव आणि ही काठी बाजूला काढून ठेव उरलेले पैसे घेऊन येईन तेव्हा ही काठी घेऊन जाईन.” त्यांच्या शब्दात निश्चय होता.
“अहो मग पैसे आणाल तेव्हा घेऊन जा ना एवढी काय घाई आहे?” दुकानदार म्हणाला
“ नाही मला हीच काठी आवडली आहे आणि मी हीच काठी घेणार आहे.”
“ आजोबा ही काठी तूमचीच झाली केव्हाही या आणि घेऊन जा”
“नाही माझ्याकडे एकदम एकशे तीस रुपये जमणार नाहीत, मिळतील तसे दहा-बारा दिवसांत देईन. पण मधल्या काळात दुस-या कोणी ही काठी घेऊ नये म्हणून मी बुक करतोय.” दिनकररावांचे बोलणे ऐकून दुकानदार विचारात पडला, एवढ्यात त्याला त्यांच्या हातातला रॉड दिसला. ते पाहून त्याला काय वाटले नकळे तो पुढे आला, त्याने चाळीस रुपये घेतले आणि म्हणाला “आजोबा काठी तूम्ही घेऊन जा बाकी पैसे केव्हपण दिले तरी चालतील जय मातादी.” असे म्हणू तो दुस-या गि-हाईकाकडे वळलासुद्धा.
दिनकररावांना आत्ता या क्षणाला खूप आनंद झाला होता, खरंतर म्हाता-याची काठी ही काही चैनीची वस्तू नव्हे पण ती मिळणं इतकं कठीण होऊन बसलं होतं आणि आता चुटकीसरशी प्रश्न सुटला होता. ते आनंदातच घरी निघाले. वाटेत कुठेही ती काठी जमीनीला न टेकवता घरी आणली. आणि मुद्दाम ती सर्वांना दिसेल अशी ठेऊन दिली. मग शांतपणे एक जूनी डायरी काढली. आणि ती काठी पाहून कल्पना कशी रागावेल, काय काय टोमणे मारेल ते सगळं लिहून काढू लागले. आता त्यांना नविन खेळ मिळाला होता. त्यांनी लिहिल्याप्रमाणे कोणत्या प्रसंगी आपल्याला कोणता टोमणा मारला जाईल ते जुळले की मग त्यावर दिनकरराव टीक करणार होते.

5 comments: