Tuesday, March 29, 2016

सत्य घटने वर आधारित कथा
!!!बाळंतीन ....!!
स्वातीला अगदी कॉलेज पासून भुतांच्या कथा वाचण्यात रस होता, कॉलेजात
शिकत असताना तर ती फेसबुकवर भूतांवर ब्लॉग पण लिहायची, गावाला गेली की एखाद्या वयोवृद्ध
व्यक्तीने काही अनुभवलेली गोष्ट सांगितली की स्वाती त्या कथेत थोडा मसाला टाकून
लगेच ती उतरवून काढायची. पुढे स्वातीचं लग्न झालं, पण तिने हा छंद काही सोडला नाही.
साल २००४ ला तिचं अविनाश सोबत लग्न झालं आणि ती संसारात रमली.
नवरा तहसील कचेरीत क्लार्क म्हणून कामाला होता, तो कामावर गेला की स्वाती आपला
संगणक चालू करून भूतांवर कथा लिहायला बसायची.
आता लग्न होऊन ३ वर्ष झाली आणि २००७ साली ती गरोदर राहिली. म्हणून
अविनाशने तिला ७ व्या महिन्यातच माहेरी पाठवून दिली. घरात वातावरण आनंदाचं, त्यात ७
व्या महिन्यात माहेरी आलेल्या स्वातीची खूप देखरेख चालली होती. तिची आई तर तिला
दिवसभर गोडधोड खायला घालत होती, वडील बाजारात तालुक्याच्या ठिकाणी गेले की
आवर्जून तिच्यासाठी केळी सफरचंद आणायचे. स्वातीचा नवरा तालुक्याच्या ठिकाणी
खरवलीला कामाला होता. स्वातीचं माहेर, उसर हे खरवली पासून साधारण १०-ते १२
किलोमीटर अंतरावर, गाव तसं खूप लहान, वस्ती असेल साधारण ५०-६० घरांची.
माहेरी येताना स्वातीने सोबत laptop पण आणला होता, भरपूर वेळ मोकळा
मिळायचा, या फावल्या वेळात ती सतत काही ना काही हाॅरर सस्पेन्स कथा लिहून काढायची.
एकदा तिच्या आईने तिला सहज विचारलं. . .
" काय ग स्वाते हे दिवस रात्र बसून काय लिहून काढत असतेस?"
स्वातीने तेच जुनं उतर दिलं. . . . " अगं आई, काही नाही सहज भुतांच्या कथा
लिहित असते "
हे उत्तर ऐकून तिच्या आईच्या संतापाचा पारा चढला आणि ती म्हणाली "ती औदसा अजून
तुझ्या डोक्यातून गेली नाय काय, लग्नाच्या आधी कॉलेजात असताना ठीक होतं सगळं, आता
गरोदर आहेस आणि हे काय दळभद्री लिहित असतेस, पोटात बाळ आहे तुझ्या देवा धर्माची
पुस्तकं वाचायची सोडून हे काय भलतंच "
स्वातीने आईचं बोल टाळून तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा उशिरा रात्रीपर्यंत कथा लिहायला बसली.
स्वातीच्या वडिलांच्या घराच्या मागच्या मैदानातच होळीचं मैदान होतं, त्या पलीकडे नदी आणि नदीच्या पलीकडे ५ गावांचं स्मशान. स्वाती खिडकी उघडी ठेवून थंडे वारा घेत लेख लिहित होती, अधून मधून पुढचं सुचावं म्हणून ती खिडकीतून बाहेर बघून विचार
करायची, पुन्हा लिहायची. त्या रात्री साधारण १२ - १२:३० झाले असतील. खेडे गावात लोकं
लवकर जेवणं आटोपून झोपून जातात, म्हणून गावात कसलाही आवाज ऐकू येत नव्हता, बाहेर
रातकीड्यांचा आवाज, आणि होळीच्या मैदानात भटकी कुत्री दिसत होती. स्वातीला सस्पेन्स असं काहीतरी दिसलं वाटलं की तिला रोमांच यायचा. लेख लिहिता लिहिता साधारण १- १:३० च्या सुमारास त्या होळीच्या मैदानात कुत्री रडायला लागली. सगळेच्या सगळे कुत्रे एकदाच रडायला लागले. त्यांच्या आवाजाने तिच्या आईची झोपमोड झाली. पलीकडच्या खोलीतून ती काहीतरी बडबड करायला लागली आणि पुन्हा झोपली. कुत्र्यांचा आवाज त्या मैदानात खुपवेळ येत होता म्हणून स्वातीने घराचा मागचा दरवाजा उघडला आणि ती दरवाजात उभी राहून निरखून बघत होती, जवळच थोड्या अंतरावर तिला कुत्र्यांचा कळप वर तोंड करून रडताना दिसला. मैदानात चंद्राचा प्रकाश पडलेला. तिने एक खडा उचलला आणि त्या कुत्र्यांना फेकून मारला. दगड फेकून मारताच त्या कुत्र्याचं रडणं थांबलं. स्वाती पुन्हा घरात आली, दरवाजा बंद करणार इतक्यात तिला दरवाजातून आत कोणीतरी चालत आल्याचा भास झाला. ती मनातून थोडी घाबरली, तीने पुन्हा बाहेर डोकावून बघितलं, वळून मागे घरात बघितलं पण
काहीच दिसलं नाही. दरवाजा बंद करून ती पुन्हा खाटेवर येऊन बसली, laptop मांडीवर
ठेवला आणि पुन्हा आपला लेख लिहायला बसली. लेख लिहिताना तिची नजर laptop कडे
होती पण बाजूला उघड्या खडकीत कोणीतरी उभं असल्याचा तिला भास झाला, नजरेने
बाजूला काहीतरी हालचाली होत आहेत असं वाटायला लागलं, पण खिडकीकडे बघण्याची तिची हिंमत होईना. आता तो कुत्यांचा कळप तिच्या खिडकीपाशी येऊन रडायला लागला. एकदाच रडायला सुरवात केलेल्या त्या कुत्र्यांच्या आवाजाने तिच्या आईची झोपमोड झाली आणि ती उठून स्वातीच्या खोलीत आली, आई खोलीत येताच त्या खिडकीची झाप खाड करून जोराने आपटली गेली. . . . एवढा जोरात आपटलेल्या त्या झापेच्या आवाजाने स्वाती दचकली आणि हातातला laptop गादीवर टाकून ती झटकन उभी राहिली.
तिच्या आईला खिडकीत कोणीतरी दिसलं होतं. . . ती स्वातीला म्हणाली. . "स्वाती खिडकीत कोण होतं गं? "
स्वाती म्हणाली " कोणीच नाही "
तिची आई पुन्हा म्हणाली. . . " नाही नाही स्वाती कोणीतरी होतं खिडकीत,
आणि ती कुत्री पण रडत होती, पोरी वाईट लक्षण आहे, तू चल इथून चल आमच्या सोबत आपण बाजूच्या खोलीत जाऊन झोपू "
स्वातीपण मनातून थोडी घाबरली होती, तिने laptop बंद केला आणि ती तिच्या आई सोबत बाजूच्या खोलीत झोपायला गेली.
तारीख होती १८ जुलै २००७,
स्वातीचं बाळंत होण्याची चिन्ह दिसू लागली, हळू हळू तिच्या पोटात कुरकुर
व्हायला लागली, लगेच तिच्या वडिलांनी गावातीलच रिक्षा बोलावली आणि ते तिला गावातल्याच सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टर शिंदेंनी तिला तपासली आणि वेळ दिली संध्याकाळी साधारण ७-८ च्या दरम्यान डिलीवरी होईल. तिच्या वडिलांनी अविनाशला फोन करून कळवलं, अविनाश कामावर होता, म्हणाला संध्याकाळी कामावरून थेट गावात येतो.
आता संध्याकाळ झाली ८ वाजले आणि स्वातीच्या पोटात दुखणं चालू झालं, डॉक्टर आले, आणि
नर्सने तिला OT मध्ये नेलं. हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला नदी होती, स्वातीला आत OT मध्ये
घेऊन गेले, तिच्या ओरडण्याचा आवाज यायला लागला आणि बाहेर खिडकीच्या मागे कुत्र्यांचा कळप जमून मोठ्याने रडायला लागला. कुत्र्यांचा रडण्याचा आवाज बाहेर बसलेल्या लोकांना स्पष्ट ऐकू येत होता, तिची आई तोंडातल्या तोंडात त्या कुत्र्यांना शिव्या द्यायला लागली. . . . . .
"ही मेली कुत्री काल पासून रडत आहेत, जा हो बघा जरा, दगड घाला आणि हाकला त्यांना "
स्वातीचे वडील उठून बाहेर गेले आणि कुत्र्यांना दगड मारणार, इतक्यात ते
थांबले, त्यांनी बघितलं की OT च्या खिडकी बाहेरून कोणीतरी बाई आत त्या खोलीत चोरून डोकावत होती. अंधुक चंद्राच्या उजेडात त्यांना ती स्पष्ट दिसत नव्हती पण लांब केस आणि अंगावरची साडी त्यांना स्पष्ट दिसत होती. ते मोठ्याने ओरडले. . . " ए. . कोण आहे. . . ए "
त्यांनी आवाज दिला आणि ती आकृती तिथून क्षणात नाहीशी झाली, दगड न मारताच तो कुत्र्यांचा कळप भुंकत भुंकत नदीच्या कडेने पळत सुटला. . . . .
स्वातीच्या वडिलांना हा प्रकार काहीसा विचित्र वाटला. . . . पण त्यांच्या डोक्यात टेन्शन होतं स्वातीच्या बाळंतपणाचं. ते आत आले आणि बाकडावर बसले.
बाहेर आपल्याला काय दिसलं हे स्वातीच्या आईला सांगणार इतक्यात नर्स बाहेर आली आणि म्हणाली " मुलगा झाला आहे " थोड्यावेळाने तुम्ही आत जाऊ शकता.
स्वातीच्या आई वडीलांचा चेहरा आनंदाने फुलला, कारण मुलीची पहिलीच डिलीवरी होती, इतक्यात जावई बापू आले, येताना सोबत मिठाई घेऊनच आले होते. आनंदाने उत्साहित झालेल्या अविनाशने संपूर्ण हाॅस्पीटल मध्ये असलेल्या स्टाफला मिठाई वाटली. . . . थोड्या वेळाने त्यांना आत जाण्याची परवानगी मिळाली आणि त्यांनी बाळाला पाहिलं,
बाळ
गोंडस होतं, सुदृढ होतं.
बघता बघता रात्रीचे ११ वाजले, स्वातीची आई म्हणाली
"मी थांबते हिच्या जवळ तुम्ही दोघे जा घरी, सकाळी या तुम्ही"
आणि ते दोघे तिथून निघून गेले. स्वाती आणि बाळ खाटेवर होते, बाजूचा बेेड
रिकामा होता, स्वातीच्या आईने तिथेच चादर टाकली आणि ती आडवी पडली. रात्र वाढत
गेली. . . . . . आणि ती रात्र काळरात्र बनायला लागली. आपलं भयाणक रूप धारण करायला लागली.
रात्री हाॅस्पीटल मध्ये फक्त २ नर्स होत्या, आज नेमकं तिथे अजून कोणी रुग्ण ही नव्हते. आता
त्या हाॅस्पीटल मध्ये फक्त स्वाती तिची आई आणि त्या २ नर्स.
बघता बघता २ वाजले, स्वातीच्या आईला कसला तरी आवाज आला म्हणून
तिने डोळे उघडले, तिला त्या हाॅस्पीटलच्या खोलीत कोणीतरी फिरत असल्याचा भास झाला,
तिने तसंच खाटेवर पडून आपली नजर त्या खोलीत फिरवली, बल्बच्या उजेडात तिला सावली
फिरताना दिसत होती पण आकृती दिसत नव्हती. तिला भीतीने घाम सुटला, तिने हळूच
स्वातीला हात लावला. . . पण स्वाती गाढ झोपेत होती, आता मात्र पायाचा घसपटण्याचा
आवाज स्पष्ट ऐकू यायला लागला. खाटेवर बाळ आहे या विचाराने मनातली भीती झटकून तिची आई ताड करून उठून खाटेवर बसली. एक माणसाच्या आकृतीची सावली खोलीतून बाहेर जाताना दिसली पण आकृती काही दिसली नाही . . . . तीने स्वातीला हाक मारली. . . . आणि २ हाताने हलवून तिला उठवलं. .
" स्वाती. . ए स्वाती. . . . आगं उठं, बाय, इथे कोणीतरी आलं होतं खोलीत"
स्वाती झोपेतच होती, डोळे न उघडता ती म्हणाली. . . " अगं नर्स असेल, आली
असेल राउंड मारायला, झोप तू "
तिच्या आईला पण वाटलं आली असेल एखादी नर्स. . . म्हणून ती पुन्हा खाटेवर आडवी पडली. किमान १५-२० मिनिटं ती तशीच डोळे उघडे ठेवून पडून राहिली आणि कधी तिचा डोळा लागला समजलं नाही. थोड्या वेळाने पुन्हा तिला जाग आली. पुन्हा तोच पायाचा घसपटण्याचा आवाज आणि खोलीत फिरणारी सावली दिसायला लागली. आता मात्र तिची
आई उठून उभी राहिली. . . तिने बघितलं ती सावली आता स्वातीच्या बाळाजवळ होती, बाळ
स्वातीच्या पुढ्यात होतं आणि स्वातीने त्याला आपल्या पदरात घेतलं होतं. सावली स्वातीच्या खाटेजवळ तशीच उभी होती.
स्वातीची आई घाबरली आणि मोठ्याने किंचाळली, स्वाती झटकन उठली आणि म्हणाली
" काय झालं आई "
इतक्यात ती सावली समोरच्या खिडकीजवळ जाऊन उभी राहिली आणि
अचानक गायब झाली. बाहेरून २ नर्स धावत आल्या. . . .
" ओ काय झालं, इतक्या मोठ्याने
कोण ओरडलं? काय झालं "
स्वातीच्या आईला घाम सुटलेला पाय थरथर कापत होते, " इथे सावली उभी
होती, बाळाच्या जवळ उभी होती. . . . . . . . . . "
बाळाच्या जवळ सावली उभी होती हे ऐकताच स्वातीने बाजूला खाटेवर
बघितलं, खाटेवर बाळ नव्हतं.
ती मोठ्याने ओरडली. . . " आई, बाळ कुठे आहे? "
बाळ खाटेवर नाही हे बघताच त्या नर्सने खाटेखाली बघितलं, पण बाळ तिथे सुद्धा नव्हतं.
आता मात्र आरडाओरड सुरू झाली, स्वातीची आई मोठ्याने ओरडली. . . . "
भुताटकी झाली, हो भुताटकी झाली इथं, मी बघितली डोळ्याने, सावली फिरत होती या खोलीत "
तिची आई आणि त्या २ नर्स धावत हॉस्पीटल मधून बाहेर निघाल्या आणि जवळच असलेल्या घराचा दरवाजा वाजवून त्यांना उठवलं, झाला प्रकार सांगितला, आणि
बघता बघता गावात बोंबाबोंब झाली. अख्खा उसर हाॅस्पीटलच्या बाहेर जमा झाला, अविनाश आणि स्वातीचे वडील पण धावत आले. बाळ गायब झालं हे ऐकताच गावातले १०-१२ लोकं हातात टाॅर्च घेऊन हाॅस्पीटलच्या मागच्या बाजूला धावत गेले, धावाधाव चालू झाली. इकडे
Ankita Shede Jawalkar
Ankita
अविनाश आणि स्वातीचे वडील स्वातीच्या खोलीत गेले, स्वाती केस मोकळे सोडून मान खाली घालून खाटेवर बसलेली.
अविनाश तिच्या जवळ गेला तिचं सांत्वन करत म्हणाला " काही होणार नाही, मिळेल आपलं बाळ. . . . . "
हे ऐकताच खाटेवर बसलेल्या स्वातीने मान वर केली, आणि दात विचकत हसायला लागली. . . . . .
घोगर्या आवाजात बोलायला लागली. . . . " मिळालं मला माझं बाळ "
पुन्हा पुन्हा एकच वाक्य बोलत होती. . . . . . . " मिळालं मला माझं बाळ "
आणि एका विलक्षण आवाजात हसायला लागली. . . . स्वातीचं हे रूप बघून गावातल्या म्हातार्या बायका एका क्षणात समजून गेल्या की हिला झपाटलंय. हाॅस्पीटलच्या मागच्या बाजूला गेलेल्या लोकांना नदीच्या बाजूला झुडपाजवळ कुत्र्यांचा कळप दिसला, त्यांनी त्या कुत्र्यांना दगड मारून हाकललं आणि टॉर्च मारत त्या जागेवर पोहोचले. तिथे झुडपात त्यांना ते बाळ दिसलं, ताबडतोब एकाने अंगावरचा टाॅवेल काढला आणि बाळाला त्यात
उचललं, बाळाचा काहीच आवाज येत नव्हता. . . लगेच त्यांनी हाॅस्पीटलच्या दिशेने धाव घेतली. . . . . . .
माणसं धावत आत आली, बाळाला खाटेवर झोपवलं आणि नर्स ना बोलवलं. . . .
. नर्स धावत पळत आल्या त्यांनी बाळाला तपासलं, पण उशीर झाला होता. स्वातीच्या बाळाचे प्राण गेले होते. इकडे स्वाती खाटेवर गुडघ्यात मान घालून दात विचकत खिदळत होती. . . . . . ..
लोकं त्या खोलीच्या बाहेर उभे राहून बघत होते पण आत जायची कोणाचीच हिंमत होईना.
हळूहळू सरकत सरकत काही लोकं आत शिरले. . . . . . स्वाती खाटेवर उभी राहिली. . . . तिने हात पाय एकदम ताठ सरळ केले. . . . केसं झटकून मागे टाकली आणि डोळे पांढरे करून घोगर्या आवाजात पुन्हा बोलायला लागली. . . . . .
" माझं बाळ मिळालं मला. . . . .हा हा हा हा हा हा हा हा"
काय करावं कोणालाच सुचेना, गावात कोणी मांत्रिकही नव्हता जो त्यांची मदत करू शकेल. आता साधारण ५ वाजायला आले होते. . . .
लोकं वाट बघत होते सुर्यप्रकाश होण्याची. हळू हळू आकाशात प्रकाश व्हायला लागला आणि गावातल्या ६-७ लोकांनी पकडून स्वातीला रस्सीने बांधली. . . . आणि आता तिला गावातल्या जागृत गावदेवीच्या मंदिरात घेऊन निघाले, सगळा गाव मागून चालत होता, आणि त्यांच्या बाजूने थोड्या अंतरावरून २-३ कुत्री भुंकत होती.
निरोप मिळताच तालुक्याच्या ठिकाणाहून ७ वाजता शिंदे डाॅक्टर पण आले,
त्यांनी बाळाला तपासलं आणि सांगितलं “नाही, बाळ गेलं.”
इकडे स्वातीला लोकं मंदिराच्या दिशेने घेऊन चालले होते आणि ती घोगर्या आवाजात जोर काढून लोकांना धक्के मारत होती. . . . . खिदळत होती, चालता चालता वाटेत ३-४ फुट उंच उंच उड्या मारत होती. . . चवताळलेल्या स्वातीला आवरता आवरता गावातल्या लोकांच्या नाकी ९ आले. बघता बघता मंदिर जवळ आलं आणि मंदिर जवळ येताच अचानक स्वाती बेशुद्ध होऊन खाली पडली. . . . . बाजूने भुंकणारी कुत्री भुंकत भुंकत नदीच्या दिशेने पळून गेली. . . . . . . .
गावातल्या म्हातार्या बायकांनी आवाज दिला. . . " गावदेवी पावली, पावली ग
माझी माय पावली, पोरीची सुटका झाली "
बया गेली पळून. . . . . . . पोरगी मोकळी झाली. . . . . . .
लोकांनी स्वातीला उचलून मंदिरात नेली, देवीचा अंगारा तिच्या माथ्यावर लावला आणि तिला थेट हाॅस्पीटल मध्ये घेऊन आले.
डॉक्टरांनी तिला तपासून एक इंजेक्शन दिलं. थोड्याच वेळात स्वाती शुद्धीवर आली आणि आपल्या बाळाची आठवण काढायला लागली.
आपलं बाळ गेलं या दुःखाने अविनाश आणि स्वाती मनातून पार खचून गेले, तर
इकडे स्वातीची आई, तिच्या वडिलांना सांगत होती, ते जे काही होतं ते काल पासून पोरीच्या मागावर होतं. काल रात्री मी खिडकीत पण बघितलं होतं काहीतरी होतं तिथे.
जे काही आजूबाजूला आमानवीय फिरत होतं त्याची चाहूल स्वातीला पण ओळखता आली नाही आणि शेवटी तिच्या बाळाचा जीव गेला.
हाॅस्पीटलच्या नर्सच्या माहिती नुसार १ वर्षापूर्वी इथे एक दिवस बाईकवर एक बाई आणि एक माणूस आला होता, बाई गरोदर होती, तिला प्रसूती कळा यायला सुरवात
झाली म्हणून ते लोकं इथे आले, पण बाईकच्या गचक्यांनी तिचं Complication वाढलं आणि
इथे बाई आणि तिचं मुल दोघेही expire झाले. शिंदे डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण त्या
लोकांनी इथे यायलाच उशीर केला होता. तो माणूस मुंबईचा होता, इथे कोकणात फिरायला
आलेला, नंतर त्यांचे नातेवाईक आले आणि ते लोकं त्यांना इथून घेऊन गेले. . . . . .
बहुतेक तीच बाई इथे भूत झाली असणार. . . . . . .
ही घटना गावातल्या लोकांना
पण माहिती होती, पण त्यानंतर वर्षभरात तिथे हाॅस्पीटल मध्ये कोणाचीच प्रसूती झाली
नव्हती. म्हणुन इथे भुताटकी आहे याची कोणालाच काहीच माहिती नव्हती.
अधून मधून होळीच्या मैदानात कुत्री रडायची पण त्याकडे लोकांनी कधी एवढं
लक्ष, दिलं नव्हतं.
त्या दिवसापासुन त्या हाॅस्पीटल मध्ये एकाही गरोदर बाईला कोणी घेऊन जात
नाही, एवढंच काय गावातली गरोदर बाई रात्रीच नाही दिवसा पण होळीच्या मैदानाकडे जात
नाही.
Ankita Shede Jawalkar
***समाप्त*** ###

3 comments:

  1. This story is shared and liked by many here https://www.facebook.com/groups/780382902170489/permalink/841873366021442/

    ReplyDelete
  2. Ankita shede jawalkar ही आपली कथा नाहीये, बरोबर ना..

    ReplyDelete
  3. ओरिजनल कथा ज्यांची आहे त्यांचे ना द्या

    ReplyDelete