Thursday, May 28, 2015

आदिती पराड़कर यांचा हां लेख आहे ........
मुंबई ही स्वप्ननगरी म्हणून ओळखली जाते. कारण इथे अनेकांची स्वप्नं सत्यात उतरतात. मात्र नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे हिला एक काळी
किनारही आहे. म्हणजे ज्या प्रमाणे अनेकांची चांगली स्वप्नं सत्यात उतरतात त्याप्रमाणे कित्येकांची वाईट स्वप्नंदेखील खरी होतात, कित्येकदा
अफवादेखील पसरतात. या अफवांतूनच मुंबईतल्या काही भीतीदायक किंवा भयानक जागांचा जन्म झाला आहे. अशा जागा कोणत्या याची आपण ओळख
करून घेऊया.
मुंबईतल्या चर्चगेट किंवा फोर्टच्या परिसरात कित्येक
कार्यालयं आहेत. बहुतांश कार्यालयं ही ब्रिटिशकालीन इमारतीत
आहेत. त्यामुळे संध्याकाळी सातनंतर कार्यालयीन वेळ
संपल्यावर या परिसरात शुकशुकाटच असतो. त्यानंतर
ब्रिटिशकालीन इमारतींचं रूप भयानक दिसू लागतं. त्यापैकी
बॉम्बे हायकोर्टाच्या इमारतीत एक द्विभाषिक भुताचा वास्तव्य
असल्याचं मानलं जातं. रात्रीच्या वेळी म्हणे तिथे टाइपरायटर
वाजल्याचा आवाज येतो.
गेट वे समोरच्या पंचतारांकित ‘ताजमहाल’ हॉटेलच्या बाबतीत
अशी आख्यायिका सांगितली जाते की, हॉटेल बांधून झाल्यावर
त्या हॉटेलच्या वास्तुविशारदाने आत्महत्या केली होती. कारण
या हॉटेलचं प्रवेशद्वार चुकीच्या पद्धतीने बांधलं गेलं आहे.
त्यामुळे त्या वास्तुविशारदाचा आत्मा जुन्या ताजमहाल
हॉटेलमध्ये फिरताना पाहिल्याचा अनेकांचा दावा आहे. मात्र हे
भूत कोणालाच त्रास देत नसल्याचंही सांगितलं जातं. विशेष
म्हणजे, २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात याच हॉटेलमध्ये
कित्येक निरपराध लोक मरण पावले होते.
कुलाब्याला असलेल्या मुकेश मिलला अचानक आग लागल्यामुळे
तिचं खूप नुकसान झालं, तेव्हापासून ती बंदच आहे. तिथे हिंदी
चित्रपटातील भुताच्या सीनच्या चित्रीकरणाचं शूटिंग केलं जातं.
मात्र रात्री उशिरापर्यंत शूटिंगवाले इथे काम करू शकत नाहीत.
कारण स्त्री कलाकारांमध्ये आत्मा प्रवेश करतो आणि त्या
स्त्री कलाकार पुरुषांच्या आवाजात बोलू लागतात, असं
म्हणतात. गँगवॉरच्या काळात हा गुन्हेगारांचा अड्डा होता.
केम्प्स कॉर्नरच्या ग्रॅन्ड पारडी टॉवरच्या आठव्या
मजल्यावरील वासुदेव आणि तारा दलाल या वृद्ध दाम्पत्याने
मुलगा आणि सून यांच्या छळाला कंटाळून आठव्या मजल्यावरून
उडी टाकून आत्महत्या केली होती. त्यानंतर सात वर्षानी त्याच
खिडकीतून मुलगा बाळकृष्ण, त्याची पत्नी सोनल आणि त्यांची
कॉलेजमध्ये जाणारी तरुण मुलगी पूजा यांनी उडी टाकून
आत्महत्या केली होती. १९७६ मध्ये ही इमारत बांधली गेली
तेव्हापासून कित्येक मुलं, नोकर यांनी आत्महत्या केली आहे.
म्हणून या इमारतीत घर घ्यायला लोक घाबरतात.
माहीमची डिसुजा चाळदेखील यासाठी प्रसिद्ध आहे. तिथे एक
विहीर होती. त्या विहिरीचं पाणी लोक पिण्यासाठी आणि भांडी
धुण्यासाठी वापरत असत. एक महिला विहिरीवर पाणी भरत
असताना त्या विहिरीची भिंत ढासळली आणि ती महिला
विहिरीत पडून मरण पावली. तेव्हापासून रात्रीच्या वेळी ती
महिला तिच्या घराच्या आसपास किंवा आवारात दिसते, पण ती
कोणालाही त्रास देत नाही, अशी वदंता या परिसरात आहे.
माहीमच्या राम रक्षित इमारतीतील एक विहीर बंद करून ठेवली
आहे. वीस वर्षापूर्वी त्या इमारतीत एका ५० वर्षीय महिलेने
जीव दिला होता, तेव्हापासून दर अमावस्येला ती तिथे येते, असं
तिथले रहिवासी सांगतात. माहीम स्थानकाजवळची नासीरनजी
वाडी हीदेखील अशीच एकाझपाटलेली जागा. ही जागा नारसी
नावाच्या पारशाची होती. त्याचा जाळून खून करण्यात आला.
रात्रीच्या वेळी तिथे कोणी जात नाही. कारण काही लोकांच्या
मते, तो पारशी रात्रीच्या वेळी आपल्या जागेची पाहणी
करायला येतो. आतापर्यंत तिथे सात ते आठ लोक मरण पावले
आहेत.
मालाडच्या मार्वे मढ आयलंडच्या रस्त्यावर नवरीच्या वेशातील
एक महिला पौर्णिमेच्या रात्री लोकांकडून काहीतरी दुखण्याचा
बहाणा करून मदत मागते. जे मदत करायला तयार होतात,
त्यांच्या गाडीच्या बरोबर धावते आणि त्या गाडीचा अपघात
घडवते, असं ऐकायला मिळतं. साधारण पंचवीस वर्षापूर्वी
म्हणे, एका मुलीचा तिच्या लग्नाच्या दिवशी रात्रीच खून झाला
आणि तिचा मृतदेह तिथल्याच खारफुटीमध्ये टाकण्यात आला
होता.
जुहू येथील एसएनडीटी कॉलेजच्या शिक्षक वसाहतीत एक
शिक्षिका रात्री दोनच्या सुमारास मोठमोठय़ाने पाढे म्हणताना
ऐकू येतं. हा आवाज स्थानिक रहिवाशांनी ऐकला आहे. काही
मुलांनी याचा छडा लावायचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना
काहीच सापडलं नाही. ते गेल्यावर पुन्हा आवाज आला.
सांताक्रूझ पश्चिमेला एका इमारतीच्या दुस-या मजल्यावर एका
विवाहितेचा मृत्यू झाला. तेव्हापासून तिच्या घराबाहेर एक कुत्रा
रात्रंदिवस बसलेला असतो. तो भुंकत नाही, दिवसभर शांत
असतो. मात्र रात्रीच्या वेळी गळा काढून रडण्याचा किंवा त्या
महिलेचा रडण्याचा आवाज येतो. पण ती कोणालाही त्रास देत
नाही, अशी कथा सांगितली जाते.
बोरिवलीच्या आयसी कॉलनीत प्लॉट नं. १८ येथील बगिच्यात
कोणीही मुलं खेळायला जात नाहीत. ती जागा विकली गेली तेव्हा
तिथल्या माळ्याची नोकरी गेली. हा धक्का त्या माळ्याला सहन
झाला नाही. त्याने तिथे आत्महत्या केली. तो मुलांना खेळू देत
नाही. या काही ठरावीक प्रसिद्ध जागा. अशा जागा आपल्या
आसपास कित्येक असतात, ज्या सांगोवांगी समजतात. खरं
म्हणजे भूत ही संकल्पना म्हणजे आपल्या मनाचेच खेळ आहेत
असं म्हटलं जातं. त्यामुळे हे कितपत मानायचं किंवा नाही हे
शेवटी आपल्यावरच आहे.

No comments:

Post a Comment