Tuesday, May 26, 2015

हत्या -४ (अंतिम)

हत्या -४ (अंतिम)
"म्हणजे तू तिथे पोचलास तेव्हा रोहन इमारतीच्या खाली उभा होता?" रमेशनं त्याच्याकडे रोखून पाहत विचारलं.
"नाही, तो जिन्यातच उभा होता." जीतू.
"पण तुला कसं कळलं की रोहन तिथे आहे?" रमेश.
"अं..."
"बरं पण तू होतास कुठे जेव्हा रोहननं तुला बोलावलं?" रमेश.
"अं..."
"पण रोहननं तुला तिथे का बोलावलं?" डॉ. कुर्लेकर.
"रोहनला जेव्हापण भीती वाटते तेव्हा तो मलाच बोलावतो. माझ्याशिवाय त्याचं काही खरं नाही!" जीतू आत्मविश्वासानं बोलत असताना रमेश आश्चर्यानं त्याच्या डोळ्यांमध्ये पाहत होता.
"पण तेव्हा रोहनला भीती का वाटली?" डॉ. कुर्लेकर.
"त्यानं मर्डर बघितला म्हणून!"
"मर्डर बघितला, म्हणजे होताना?" रमेश.
"माहित नाही मला. पण तो म्हणतो की तो आत शिरला तेव्हा थेट प्रेतच दिसलं त्याला." जीतू विचारात पडला. "बिचारा, मी त्याला नेहमी तुझ्या आयुष्यात मुलगी नाही म्हणून चिडवायचो."
रमेशचा हे सगळं प्रत्यक्षात होतंय ह्यावर विश्वासच बसत नव्हता. त्यानं डॉ. कुर्लेकरांकडे पाहिलं. त्यांना रमेशच्या भावना कळत होत्या. त्यांनी डोळ्यांनीच शांत राहायचा इशारा केला.
"पण मग नक्की काय झालं होतं?" डॉ. कुर्लेकर.
"ते मलाही माहित नाही. तो सांगतो की तिनं त्याला रात्री बोलावलं होतं, त्यानुसार तो १०.१५ ला तिथं गेला आणि त्याला थेट प्रेतच दिसलं. मग तो घाबरला आणि त्यानं मला बोलावलं!"
"तुला कसं बोलावलं?" डॉ. कुर्लेकर.
"अं..."
रमेश आणि डॉ. कुर्लेकरांनी एकमेकांकडे पाहिलं.
"आता आपण ह्याला हिप्नोटाईज करून रोहनला बोलावू." डॉ. कुर्लेकर हळूच रमेशच्या कानात कुजबुजले. रमेशसाठी ही रात्र प्रचंड विचित्र ठरत होती.
"मला संध्याकाळी ८ वाजता तिचा फोन आला की रात्री १०.१५-१०.३० पर्यंत तिच्या घरी भेटून मग कुठल्याशा पार्टीला जायचं. त्यानुसार मी रात्री १०.१५ ला तिथे पोचलो." रोहनच्या आवाजात कंप होता. आपण पोलिसांच्या ताब्यात कसे आलो, हे त्याला न उलगडलेलं कोडं असलं तरी त्यानं ते सत्य मान्य केलं होतं.
तिच्या मोबाईलवरून रात्री ८ ला गेलेला एक कॉल रमेशच्या लक्षात होता.
"मी पोचलो, तेव्हा जवळपास सगळे झोपलेले होते बिल्डिंगमधले. आणि शेजारच्या घराला कुलूप होतं तिच्या. त्यामुळे मी तिच्या घराची बेल ८-१० वेळा वाजवूनही शेजारच्या घरातदेखील हालचाल नव्हती. मग मी तिच्या मोबाईलवर फोन लावला. तर घरातून रिंग ऐकू येऊ लागली."
रात्री १०.३० चा हा कॉलदेखील रमेशच्या लक्षात होता. रोहनच्या वक्तव्यांची संगती योग्य लागत होती.
"तर मी दरवाजा हाताना वाजवायला म्हणून बोटं लावली आणि दार उघडंच होतं. मी घाबरूनच आत शिरलो आणि आतमध्ये तिचं प्रेत पाहून थिजूनच गेलो. धावतच बाहेर आलो आणि दरवाजा लावून टाकला. आणि जिना उतरेस्तोवर जीतू आलाच. मग आम्ही दोघे कुणी बघत नाही ना हे पाहत पळून गेलो." रोहन सांगत होता आणि रमेश मनातल्या मनात तुकडे जुळवण्याचा प्रयत्न करत होता.
डॉ. कुर्लेकर आणि रमेश इंटरोगेशन रूममधून बाहेर पडले तेव्हा सकाळचे सात वाजत होते. तब्बल ७ तास ते जीतू आणि रोहनला बोलतं करायचा प्रयत्न करत होते.
--------------------
"शिंदे आपल्याला सगळंच्या सगळं कोडं परत घेऊन बसावं लागणार आहे." क्षमाचा भाऊ भेटून गेल्यानंतर रमेश म्हणाला. रमेशला रात्रभर झोप न झाल्याने प्रचंड थकवा आला होता, पण त्यातच क्षमाच्या भावाचा कोरडेपणा आणि तुटकपणा बघून त्याला स्वतःच्या बहिणीच्या खूनप्रकरणाची प्रकर्षानं आठवण होऊ लागली होती आणि त्यामुळे पुन्हा एकदा मळमळीचा ऍटॅक येण्याची चिन्ह होती. 'मला खूप सार्‍या आरामाची बहुदा गरज आहे' असं तो स्वतःशीच म्हणाला. पण पुढच्याच क्षणी त्यानं तो विचार झटकून टाकला.
रमेशनं क्षमाच्या घरून आणलेली सगळी कागदपत्र चाळून पाहायला सुरूवात केली. ते खोटं सिमकार्ड, त्याचा क्षमाच्या घराजवळचाच वापर आणि प्रौढ, श्रीमंत, विवाहित माणूस हे सगळं रानडेंकडे इशारा करत होतं. पण रानडेंची भक्कम ऍलिबी रमेशला वॉरंट मिळवून देऊ शकत नव्हती. त्याला डेस्परेटली मर्डर वेपन हवं होतं.
"कुठे असू शकेल मर्डर वेपन?" रमेश स्वतःशीच विचार करत होता. "इमारतीचं ड्रेनेजही पूर्ण पालथं घातलंय आणि फ्लॅटची तर तीन वेगवेगळ्या माणसांनी झडती घेतलीय." त्यानं क्षमाचा खून उघडकीला आल्या आल्या काढलेले पहिले फोटोज काढले आणि टेबलावर एकाशेजारी एक ठेवले. तो त्यादिवशीचा घटनाक्रम आठवू लागला.
बर्‍यापैकी उच्चभ्रूंची असूनही वॉचमन नसलेली बिल्डिंग हा त्याला खटकलेला पहिलाच मुद्दा होता. पण ती एकंदर मोठ्या सुरक्षित कॉलनीचा भाग असल्यानं वॉचमन नसूनही खपून जातं होतं. आजूबाजूला लगटूनच इमारती आणि त्यांचे वॉचमन त्यामुळे त्या इमारतीत येणार्‍या जाणार्‍या कुणाहीवर बर्‍याच नजरा असण्याची शक्यता होतीच. कुणी नाही तरी समोरच्या इमारतीचा वॉचमन. त्यानुसार त्यानं खुन्याला ओझरतं का होईना पाहिलंच होतं! पण कुणीही हुशार गुन्हेगार वेपन घेऊन बाहेरून आत येण्याची शक्यता कमीच. आणि एव्हढ्या बर्‍यापैकी लोकसंख्या असलेल्या भागातून मर्डर वेपन घेऊन बाहेर जाण्याचीही शक्यता शून्यच.
"शिंदे, ह्या फोटोंमध्येच आपल्याला काहीतरी सापडणार बघा. नीट बघा बरं!"
रमेश प्रत्येक फोटो निरखून पाहत होता.
"शिंदे, हे बघा..." रमेश एकदम म्हणाला. "हे बॉडीच्या शेजारचे रक्ताचे थेंब!"
"त्याचं काय साहेब, वार तीनदा केल्यावर जे रक्त उडालं असेल, त्यातलेच आहेत ते!"
"नाही शिंदे." रमेश एकदम उठून उभा राहिला. "हे बघा...क्षमाची बॉडी अशी पडलेली मिळालीय. आता आपण असं मानून चालू, की क्षमा जशी पडली, त्यानंतर बॉडी हलवली गेली नाही. तर वार होताना ती आणि खुनी कसे उभे असतील?"
मग रमेशनं एग्झॅक्टली तीच स्थिती निर्माण केली, खुनी तो आणि शिंदे क्षमाच्या जागी.
"आता बघा, फॉरेन्सिकप्रमाणे वार असे झाले!" त्यानं ती क्रिया केली. "तर रक्त कुठे उडेल?"
शिंदे विचारात पडले. "मग हे थेंब?"
"ती मेल्याचं निश्चित झाल्यावर त्यानं जेव्हा चाकू काढला, तेव्हा लागलेले ओघळ आहेत हे!" रमेशनं निष्कर्ष काढला.
"पण मग ते इथेच का थांबताहेत?" आणि लगेचच शिंद्यांना रिअलाईज झालं. "म्हणजे त्यानं चाकू कशाततरी.."
"एग्झॅक्टली!" रमेशचा चेहरा थोडा उजळला. "त्यानं चाकू कशाततरी ठेवला. खिशात किंवा पिशवी किंवा बॅगेत!"
"पण मग ते रक्ताळलेलं पायपुसणं?"
"ते डिसगाईज असणार शिंदे.आपल्याला वाटावं की चाकू घराबाहेर गेलेला नाही आणि आपण तो शोधण्यात मूर्खासारखा वेळ घालवावा ह्यासाठी केलेलं!"
"पण म्हणजे नक्की काय?"
"नक्की एव्हढंच की चाकू घराबाहेर गेलाय आणि शक्यतो कॉलनीबाहेरही. तेव्हा आता आपण मर्डर वेपनच्या आशेवर बसण्यात अर्थ नाही. खुनी आपल्याला मर्डर वेपनशिवायच शोधायचाय!"
"फोटोंवरून नवीन रस्ता उघडायच्या ऐवजी बंदच झाला म्हणायचा!" शिंदे हताशपणे म्हणाले.
"बरंच झालं ना शिंदे. आपण आपली ऊर्जा चुकीच्या ठिकाणी वापरणं बंद करू आता!"
रमेश हे बोलत असतानाच त्याला क्षमाच्या कागदपत्रांमध्ये एका मोठ्या कॉन्सर्टच्या पासची काऊंटरफॉइल दिसली. तो व्हीआयपी पास होता. एका प्रख्यात शास्त्रीय गायकाच्या कार्यक्रमाचा.
"शिंदे, हे असले कार्यक्रम सहसा इन्व्हिटेशनल असतात!" रमेश तो पास शिंदेंसमोर नाचवत म्हणाला. शिंदेंच्या लक्षात आलं आणि त्यांनी एक स्मित केलं.
"ही घ्या साहेब, इन्व्हिटेशन्सची लिस्ट! पण ह्यातल्या कुणीतरी आपला पास दुसर्‍याला दिला असला तरीसुद्धा आम्हाला कळणार नाही." कार्यक्रमाच्या ऑर्गनायझिंग कमिटीचा मेंबर सांगत होता. रमेशनं चटचट लिस्ट नजरेखालून घातली, पण त्याला हवं असलेलं एकही नाव दिसलं नाही. अजून एक रस्ता बंद होत होता. आणि अचानक त्याची नजर टेबलावर पडलेल्या एका छोट्या स्मरणचिन्हाकडे गेली.
"हे स्मरणचिन्ह?"
"ह्याच कॉन्सर्टमध्ये सगळ्या व्हीआयपी अटेंडीजना दिलं होतं!"
"साहेब, असंच क्षमाच्या घरीही सापडलंय आपल्याला!"
"पण मी असंच स्मरणचिन्ह अजूनही कुठेतरी पाहिलंय!" रमेश स्मरणशक्तीवर ताण देत होता आणि अचानक त्याला साक्षात्कार झाला.
"शिंदे!" तो उत्साहानं म्हणाला. "तुमच्या बँकेत ओळखी आहेत ना!" शिंदेंनी मान डोलावली. त्याबरोबर रमेशनं खिशातून एक कागदाचा कपटा काढला आणि त्यावर एक नाव लिहून तो शिंदेंच्या हातात दिला. "मला ह्या माणसाची गेल्या दोन वर्षांतली सगळी क्रेडिट आणि डेबिट कार्ड स्टेटमेंट्स हवी आहेत. बिना परवानगी आणि बिना त्याला माहित होता!" रमेश डोळे मिचकावत म्हणाला. "दोन तासांच्या आत!"
रमेश त्या माणसाच्या नजरेला नजर देत खुर्चीत बसला.
"बोला साहेब काय म्हणता?" तो माणूस रमेशला म्हणाला.
"मी काय म्हणू आता तुम्हीच म्हणायचंय जे काय ते!" रमेश त्याचा गोरा चेहरा निरखत म्हणाला.
"मी समजलो नाही!"
"स्मरणचिन्ह, कॉन्सर्ट, क्षमा, फेक सिमकार्ड, अफेयर काही समजतंय आता?"
"व्हॉट द हेल!" तो जोरात ओरडला.
"ओरडल्यानं गुन्हा लपणार नाहीये."
"मी काहीच केलेलं नाही. तुम्ही काहीच सिद्ध करू शकत नाही." तो अस्वस्थ झाला होता, त्याच्या कपाळावर घाम जमू लागला.
"तुमचं क्रेडिट कार्ड, त्यानं केलेलं हॉटेल बुकिंग, तिथे क्षमासोबत खोट्या नावानं केलेलं वास्तव्य! अजूनही काही सिद्ध करायचं असेल, तर फेक सिमकार्ड जास्तीत जास्त वापरलं गेलेल्याच भागात असलेलं तुमचं घरही मला लांबचे पुरावे म्हणून वापरता येईल, झाडाझडतीसाठी!" रमेशच्या आवाजात जरब आली होती.
"होय, माझं क्षमासोबत अफेयर होतं." तो आपले घारे डोळे रमेशवर रोखून म्हणाला.
"आणि मी गावभर तुम्हाला शोधून आलो." रमेशनं आपला मोबाईल शांतपणे त्याच्या समोरच्या टेबलावर ठेवला त्यावरचं एक बटण दाबलं आणि खुर्चीत मागे रेलला. "पण तुम्हाला फेक सिमकार्ड वापरायची काय गरज होती?"
"मग काय सरळ माझ्याच सिमवरून फोन करू? मी विवाहित आहे, मला पोरंबाळं आहेत!"
"मग हा विचार अफेयर करण्यापूर्वी करायचा ना!"
"तिलाही मोठं व्हायचं होतं, फटाफट!"
"हा निष्कर्ष तुम्ही स्वतःच काढला असाल. ती मात्र तुमच्यात गुंतली होती चांगलीच!" रमेशला नेहमीसारखंच अस्वस्थ वाटू लागलं. संताप येऊ लागला.
"आता ह्यात निष्कर्ष काढण्यासारखं काय आहे. माझ्या मदतीनंच तर ती फटाफट प्रगती करू शकली असती."
रमेशनं हे बोलणार्‍या तिच्या बॉसच्या डोळ्यांत रोखून पाहिलं. "आता बडबड बंद करा आणि तिचा खून का आणि कसा केलात ते सांगा?"
"मी खून केलेला नाही! आणि तुझ्याकडेही काहीही पुरावे नाहीत माझ्याविरूद्ध, ते फेक सिमकार्डही तू सिद्ध करू शकणार नाहीस!"
"साहेब, तुम्ही प्रत्येक हॉटेलच्या रिसेप्शनवर असलेल्या सीसीटीव्हीबद्दल विसरताय! खोट्या नावानं वास्तव्य केल्याबद्दल मी केस टाकू शकतो तुमच्यावर!"
"अरे जा जाऊन टाक. असल्या फालतू केस सुरू व्हायच्या आधीच मी बेल मिळवेन. मी खून केलेलाच नाही तर तू माझं काय उखडणार?" बॉसचा गोरा चेहरा रागानं लालबुंद झाला होता.
"हो हो, आम्ही मेहनत करून केस बनवतो आणि तुम्ही पैसे चारून बेल घेऊन उघड माथ्याने फिरता!"
रमेशही संतापानं थरथरत होता. प्रचंड संताप, आणि असह्य होत असलेली मळमळ ह्यानं रमेशला चक्कर येईलसं वाटू लागलं. त्यानं टेबलावरचा अर्धा भरलेला ग्लास उचलला आणि पाणी पितच केबिनबाहेर पडला. रमेशनं बाहेर पडताच ग्लासावर रूमाल गुंडाळला आणि ग्लास पँटच्या खिशात टाकला.
"शिंदे लवकर एक कॉन्स्टेबल घेऊन इकडे या!" तो कंपनीबाहेर एका झाडाखाली उभा राहून फोनवर बोलत होता.
रमेश पार सैरभैर झाला होता. त्याला वाटलं होतं की त्यानं ही केस क्रॅक केलीय, पण पुन्हा तो अडकला होता. बॉसची कबुली मोबाईलवर व्हिडिओ शूटही झाली होती. पण ती नुसतीच अफेयरची कबुली होती. त्यातून काहीही निष्कर्ष निघत नव्हता. त्याचा बॉसवरचा संशय पक्का झाला होता.
"आता पुन्हा वॉरंट, मग पुन्हा अनेक सार्‍या झडत्या, उलटतपासण्या ह्या सगळ्याला काही अंतच नाहीय का!" रमेश हताश झाला होता.
"रिलॅक्स साहेब! तो कॉन्स्टेबल ग्लास घेऊन गेलाय ना. बॉसचे ठसे क्षमाच्या घरात सापडले तर वॉरंट आणि रिमांड मिळणं अजून सोपं जाईल."
"ते सगळं ठीक आहे हो. पण किती वेळ जाईल ह्या सगळ्यांत आणि बॉसनं खरंच खून केलेला नसेल तर आपण पुन्हा तिथेच!"
"मग काय करायचं?"
रमेश शून्यात बघत होता. "आपल्याकडे आता काय काय दुवे शिल्लक आहेत?"
"हार्डडिस्क!" शिंदे एकदम म्हणाले. रमेशचा चेहरा उजळला.
"आणि हार्डडिस्कला कंपनीत हातही न लावल्याची ग्वाही मला ह्या बॉसनंच दिली होती. चला त्या पोरग्याकडे!"
"मला सांग, हे ऍडमिनिस्ट्रेटरकडून केलं गेलंय, की हॅकरकडून हे तुला कळू शकेल?" रमेश विचारत होता.
"होय, पण मला त्यासाठी कंपनीच्या नेटवर्कमध्ये ऍडमिनिस्ट्रेटर लॉगिन करावं लागेल."
"त्याची काळजी नको." शिंदेंनी आश्चर्यानं रमेशच्या चेहर्‍याकडे पाहिलं. रमेशनं फोन बाहेर काढला आणि कॉन्टॅक्ट्स लिस्टमधून आरतीचा नंबर शोधून फिरवला.
"हे हॅकरचंच काम आहे साहेब. नेटवर्कचा लॉग क्लिन आहे" तो हार्डडिस्क एक्स्पर्ट म्हणाला.
रमेश कसल्याशा विचारात गढला.
"एक महत्वाचा प्रश्न" रमेश आरतीकडे रोखून पाहत म्हणाला. "क्षमाचा लॅपटॉप तिच्याशिवाय अजून कुणी वापरायचं का? कंपनीतलं किंवा कंपनी बाहेरचं!"
"होय सर...."
-------------------------
रमेशच्या डोक्यात अनेक पेटत्या सळया उसळल्या होत्या. डोकं पार भणाणून गेलं होतं. पण तरीही आता शेवटचे धागे जुळवणं भाग होतं, शेवट कितीही विचित्र असला तरी नाटकावर पडदा टाकणं भाग होतं. रमेशची तब्येत पुरती खालावलेली होती. आता तो एक शेवटचा निकराचा धक्का द्यायला निघाला होता.
प्रथम तो खून झालेल्या इमारतीसमोर पोचला. रात्रपाळीचा वॉचमन अजून यायचा होता. शिंदेंना त्यानं पोलिस स्टेशनातून एक फोटो घेऊन यायला पाठवलं होतं. तो आणि हार्डडिस्कवाला गप्पपणे रस्त्याच्या तुरळक रहदारीकडे बघत समोरच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये बसले होते. रमेश विचारांमुळे आणि हार्डडिस्कवाला गोंधळल्यामुळे अस्वस्थ होता. शिंदे आले आणि थोड्याच वेळात वॉचमन आला.
"सोमवारी रात्री मॅडमबरोबर एक माणूस आला होता असं तू म्हणाला होतास बरोबर?"
"होय साहेब!" वॉचमन थोडा गांगरला होता, रमेश खूपच स्ट्रेस्ड वाटत होता, त्यामुळे थोडा गुरकावत होता.
"किती वाजता साधारण?"
"अं..." तो विचारात गढला.
"लवकर बोल." रमेश गुरकावला.
"सांगतो साहेब...आठ वाजता जवळपास."
'आणि रोहन १०.१५ वाजता' रमेश मनाशीच म्हणाला. "त्याचं वर्णन करू शकशील?"
"नाही साहेब. सांगितलं होतं ना तुम्हाला, तेव्हा एका साहेबांना गाडी बाहेर काढायची होती. त्यामुळे लक्ष दिलं नाही जास्त!"
"तरी! मेंदूवर जोर टाक. काहीतरी आठवेल. जे आठवेल ते सांग"
वॉचमन आठवायचा प्रयत्न करू लागला. रमेश आशाळभूतपणे त्याच्याकडे पाहत होता. शिंदे आणि हार्डडिस्कवाला पूर्ण गोंधळलेले होते. "अं...त्याचे केस बहुतेक कुरळे होते. आणि ... "
"हां...रंग?"
"गोरापान होता साहेब, हाफ स्लीव्ह टीशर्ट होता अंगावर."
रमेशनं आपला मोबाईल पुढे केला, त्यावर क्षमाच्या बॉसचा नुकताच घेतलेला व्हिडिओ होता आणि शिंदेंना आणायला सांगितलेला फोटो पुढे केला. "ह्या दोघांपैकी कुणी असू शकतो?"
वॉचमननं एका फोटोकडे अंगुलीनिर्देश केला.
"आणि हा बाहेर कधी गेला?"
"मोस्टली ९ वाजता साहेब!"
"तुला तर लक्षात नव्हतं ना काही? मग हे कसं ठाऊक?"
"साहेब, मी ह्या फोटोतल्या माणसाला इमारतीतून बाहेर पडताना नऊ वाजता बघितलं कारण आमच्या इमारतीतली एक गाडी गेटमधून आत घेताना पुढेमागे होत होती. तेव्हा ह्याच्या पायावर चढता चढता राहिली. मॅडमबरोबर आत जाणारा हाच असावा असा माझा अंदाज आहे. पण नऊ वाजता बाहेर पडणारा हाच होता. हे मी फोटोवरून नक्की सांगू शकतो."
"नऊच कसं काय?"
"कारण मी त्या आसपास जेवायला जातो साहेब. मी ह्या प्रसंगानंतर लगेच जेवायला गेलो होतो."
"धन्यवाद!" रमेश खुषीनं म्हणाला. मग हार्डडिस्कवाल्याकडे वळून म्हणाला. "चल आता, तू माहिती काढलीयस त्या हार्डडिस्क विकणार्‍याकडे जाऊ!"
आश्चर्यकारकरित्या रमेशची मळमळ कमी होऊ लागली होती. ते वेगानं निघाले होते. रमेश स्वतः जीप चालवत होता. गाडीत एकदम स्तब्ध शांतता होती.
"हा कधी इथून हार्डडिस्क घेऊन जातो?" रमेशनं एक फोटो पुढे केला.
" होय. हा नवाच कस्टमर आहे, पण रेग्युलर आहे. कॉम्प्युटर असेंबलर आहे. जवळच राहतो." डीलर म्हणाला.
"ओके. थँक्यू. माझं काम झालंय!" रमेश एक्साईट होत म्हणाला. शिंदे अजूनही गोंधळलेलेच होते. "खूप थँक्स तू आलास. हे घे रिक्षाला पैसे!" म्हणून रमेशनं हार्डडिस्कवाल्या मुलाला पैसे देऊन बोळवलं.
"शिंदे आपल्याला आपला खुनी सापडला!" रमेशच्या चेहर्‍यावर विजयी भाव होते.
--------------------
"साहेब! नक्की काय करताय तुम्ही!" शिंदे म्हणत होते. रमेश आणि ते एका इमारतीत चढत होते. एका दारासमोर उभं राहून रमेशनं बेल वाजवली. एका मध्यमवयीन माणसानं दरवाजा उघडला.
"अरे तुम्ही? ह्या वेळी?" ते आश्चर्यानं म्हणाले. "क्षमाची आई, हे इन्स्पेक्टर साहेब आलेत!" त्यांनी त्यांच्या पत्नीला हाक मारली. क्षमाचा भाऊही लगबगीनं बाहेर आला. "मला जरासं पाणी मिळेल का? किचन कुठेय मी स्वतःच घेतो." असं म्हणत तो किचनमध्ये शिरलादेखील. मग दोन मिनिटांनी बाहेर आला. आणि शांतपणे सोफ्यावर बसला.
"क्षमाचा खुनी आम्हाला सापडलाय!" रमेश एक एक शब्द जोर देऊन उच्चारत म्हणाला.
"काय? कोण आहे तो?" ते पती-पत्नी एकत्रच म्हणाले.
"सांगतो." रमेश हळूहळू बोलू लागला. "क्षमा एक मॉडर्न मुलगी होती. आणि स्वतः कमावती असल्यामुळे स्वतंत्र. त्यामुळे स्वतःच्या आयुष्याचे सगळे निर्णय ती स्वतः घ्यायची. मुक्त विचारांची आणि तरीही मनस्वी अशी मुलगी होती. त्यामुळे ती विवाहित बॉसच्य प्रेमात पडली आणि गुंततच गेली. तो मात्र ह्या नात्यात फक्त देवाणघेवाण बघत होता. मग तिला हे सगळं लक्षात आल्यावर तिनं अफेयर्स करून त्याचा बदला घ्यायचा प्रयत्न केला. पण ती मनातून अजूनही त्याच्यावरच प्रेम करत होती. तिच्या कॉम्प्युटरच्या हार्डडिस्कवर तिचे आणि तिच्या बॉसचे विविध फोटो होते आणि त्यांचे पर्सनल इमेल्सही. मग एक दिवस काय झालं, एका माणसानं तिचा लॅपटॉप काही कामासाठी म्हणून घेतला आणि तिचे सगळे फोटो पाहिले. त्याला तिची प्रचंड चीड आली आणि कॅरॅक्टरलेस अशी एक इमेज त्याच्या मनात तयार झाली. हा राग त्याच्या मनात धुमसतच होता. त्यातच तिची इतर अफेयर्सही त्याला दिसू लागली आणि त्याचं डोकं फिरलं. त्यानं तिला संपवायचं ठरवलं."
"कोण तो?" आई म्हणाली. क्षमाचा भाऊ भिंतीला टेकून उभा राहून एकटक रमेशकडे पाहत होता.
रमेश तिच्या भावाच्या डोळ्यांत रोखून पाहत म्हणाला, "हाच! क्षमाचा भाऊ आणि तिचा खुनी!"
शिंदेंसकट सगळेच अवाक् झाले.
"आता कबूल करणार की किचनमधल्या सुर्‍याचा फॉरेन्सिक ऍनॅलिसिस करवायचा? की तुझ्या घरात पडलेल्या तमाम हार्डडिस्कांचं किंवा तू ज्यांना असेंबल करून विकतोस, त्यांच्या हार्डडिस्कांचं स्कॅनिंग करवायचं? की नऊ वाजता तुला बाहेर पडताना बघणार्‍या वॉचमनची साक्ष? की तुझ्या इमारतीच्या कोपर्‍यात जाळलेल्या कचर्‍यात पडलेले रक्ताळलेल्या बॅगेचे अवशेष?"
क्षमाचा भाऊ निश्चल उभा होता. त्याच्या डोळ्यांत पश्चात्तापाचा मागमूसही नव्हता.
"पण का?" त्याचे आई-वडिल म्हणाले.
"ऑनर किलिंग!" रमेश एव्हढंच म्हणाला.
"तिचा लॅपटॉप मी बरेचदा घेऊन यायचो. तो बघताना तिचे बॉसबरोबर चालू असलेले धंदे मला कळले. तिचे त्याच्याबरोबरच्या जवळीकीचे फोटो आणि तिचे इतरही मित्रांबरोबरचे फोटो पाहून मला तिची घृणा वाटू लागली होती. तिला मारून टाकूनच आमच्या घराची अब्रू वाचवता आली असती. म्हणून मी आधी तिचे सगळे घाणेरडे चाळे लॅपटॉपवरून मिटवून टाकले आणि त्याच रात्री तिलासुद्धा! ती होतीच त्या लायक!" क्षमाच्या भावाच्या वक्तव्यांनी त्याचे आई-वडील स्तब्ध झाले होते.
"आणि तू? माणूस म्हणायच्या तरी लायक आहेस का?" रमेशनं त्याच्याकडे तुच्छतेनं पाहिलं.
शिंदेंनी एव्हाना पोलिस व्हॅन बोलावली होती.
रमेशनं क्षमाच्या बॉसलाही पुरता पोचवायची व्यवस्था केली.
दोन दिवसांच्या रेस्टनंतर रमेश पुन्हा ऑफिसात आला तेव्हा शिंदेंनी त्याचं टेबल आवरून ठेवलं होतं. सगळ्या घटनाक्रमानंतर रमेशची मळमळ बरीच कमी झाली होती.
"तब्येत कशी आहे साहेब आता?"
"म्हटलं होतं ना शिंदे. पोलिस तपास हाच माझा इलाज आहे!" रमेश स्मितहास्य करत म्हणाला.
एव्हढ्यात एक हवालदार धावत आला.
"साहेब! इमर्जन्सी आहे. दोन गल्ल्या सोडून एका ठिकाणी फायरिंगचा रिपोर्ट आलाय!"
रमेश आल्यापावलीच बाहेर पडला. आणि पाठोपाठ शिंदे.
(समाप्त)

No comments:

Post a Comment