Wednesday, May 27, 2015

सिद्धगडावर प्रेतात्म्याचं दर्शन..??

माझा एक जुना कलिग .. रोहित पाटील .. रोहितला ट्रेकिंग, हायकिंग ची खूप आवड!! इंजिनिअरिंगला असताना तो "सिद्धगड" किल्ल्यावर ट्रेकिंगला गेला होता. तेव्हाचा हा किस्सा ..
थोडा दुर्लक्षित असलेला हा किल्ला, भीमाशंकरच्या निबिड अरण्यात लपलेला आहे. रोहीत आणि अक्षय असे दोघे बाईकने निघाले. मजा मस्ती करत नारिवली (मुरबाड जवळ) खेड्यात पोचले तेव्हा दुपारचे ४ वाजले होते. दुपारी गावात पाणी वैगरे भरून घेतल, रस्त्याची चौकशी केली तेव्हा त्यांना कळलं गावातून सिद्धगडवाडी नावाच्या वाडीपर्यंत जाव लागत. सिद्धगडवाडीतून किल्ल्यावर जायला २ तास लागतात. सिद्धगडवाडीला जाणारा रस्ता जवळपास निर्मनुष्य आहे आणि भीमाशंकर अभयारण्यातून वाट काढत जावे लागते.
एवढी माहिती कळल्यावर दोघे निघाले. गावातील एक दोन म्हाताऱ्या माणसांनी सांगितले, अंधार होईल, घाबरू नका. कुणी हाका मारल्या ओ देऊ नका. मागे वळून बघू नका. वाडीत पोचलात की आराम करा, रात्री वर जाऊ नका. तरुण रक्त आणि नाईट ट्रेकचा प्रचंड अनुभव गाठीशी असलेल्या दोघांनी हे सल्ले कानामागे टाकत चालायला सुरवात केली.
हिवाळ्याचे दिवस असल्याने, सूर्यास्त लवकर झाला. ते निम्म्या रस्त्यात पण पोचले नसतील, अंधार झाल्याने अक्षय्नी ट्रेकिंगसाठी खास करून घेतलेली battery सुरु केली. गप्पा मारत चालत होते. हळू हळू अंधार गडद झाला, झाडांचे चित्र विचित्र आकार अजून भयानक झाले. नाईट ट्रेक केलेल्या मित्रांना अंदाज आला असेलच किती भयानक दृश्य दिसतात. बराच वेळ चालल्याने दोघ एका झाडाखाली थांबले, पाणी पिऊन, तंबाखू मळून दाताखाली दाबला आणि निघाले. थोडे पुढे जातात तोच, मागून एक माणूस आला, त्यानी ह्यांच्याकडे तंबाखू मागितली, ह्यांनी दिली. वाडीला जाणारा माणुस भेटला म्हणून दोघे जाम खुष झाले. गप्पा रंगल्या. तो वाडीतल्या शाळेत शिकवणारा मास्तर होता, विशाल जावळे म्हणून.
अंदाजे ३ -४ तास ते चालत होते, वाडीचा रस्ता २ -३ तासांचा चालत. निघाले होते साडेपाच ला, पण अजून वाडीच्या खाणाखुणा दिसत नव्हत्या. जंगल संपायला तयार नव्हते. विशाल सारखा हे काय आलंच असा म्हणत होता. आता मात्र रोहितला थोडी भीती वाटायला लागली. म्हाताऱ्याचे बोलणे आठवले. हा आपल्या मागून आला, दिसतोय नॉर्मल पण भूत कुणी बघितलंय का? कुतूहल म्हणून रोहितने त्याचे पाय पण पाहून घेतले, ते पण सरळ होते. अजून अर्धा एक तास गेल्यावर रोहीत अजून घाबरला, त्यानी अक्षयला करंगळी वर करून इशारा केला, तेव्हा ते थांबले. विशालला न कळत इशारा केल्याने तो ४-५ पावले पुढे गेला. त्याने मागे वळून बघताच, रोहितने हात जोडून रामरक्षा म्हणायला सुरवात केली. अक्षयने पण त्याच्या सुरात सूर मिळवला. ते पाहून विशाल जोर जोरात हसायला लागला, म्हणाला याचा काही उपयोग नाही. तुम्हाला मारायचे असते तर कधीच मारले असते. पण तुम्ही मला तंबाखू दिली, माझ्याशी वार्ता केली. बऱ्याच वर्षांनी कोणीतरी बोललं माझ्याशी.. मला तुम्हाला मारायचे नाही. पण आता आल्या पावली परत जा. बोलता बोलता त्याच्या डोळ्यांची बुबुळे पांढरी झाली आणि तो जागेवर नाहीसा झाला. इकडे दोघांच्या पॅन्टीमात्र ओल्या झाल्या. ते उलटे पळत सुटले ते नारिवलीकडे, आणि अर्ध्या पावून तासात नारिवलीत पोचले पण!! म्हाताऱ्यानी सांगितलेल्या विश्वासच्या भोवऱ्यात ते अडकले होते, पण केवळ नशीब बलवत्तर म्हणून तंबाखूवर सुटले. त्यानंतर मात्र दोघांनी कोणताही नाईट ट्रेक केला नाही.
त्यांचा हा किस्सा ऐकल्यावर, मी काही मित्रांसोबत मुद्दामून सिद्धगड नाईट ट्रेक केला, पण आम्हाला असा कोणताही अनुभव आला नाही, हे आमचे दुर्दैव म्हणावे की सुदैव हे त्या रामरायाला ठाऊक !! आम्हाला कळलेली माहिती, वाडीतल्या मास्तरची जंगली प्राण्यांनी शिकार केली होती, त्याचे प्रेतही मिळाले नव्हते. तेव्हापासून तो कधी कधी दिसतो, पण कुणाला काही करत नाही...
तुम्हाला कोणत्या ट्रेकमध्ये असे अनुभव आले आहेत किंवा कोणाकडून ऐकले आहेत ??

No comments:

Post a Comment