Tuesday, May 26, 2015

थंडीच्या दिवसांतली एक ढगाळ संध्याकाळ.....

थंडीच्या दिवसांतली एक ढगाळ संध्याकाळ. बाहेर दाटून आलंय पण दिवसभरात पाऊस काही पडलेला नाही, हवा कोंदट झाली आहे. तुम्ही घरात बसून कंटाळता. जरा बाहेर जाऊन पाय मोकळे करून यावं असा विचार तुमच्या मनात येतो आणि काखोटीला छत्री आणि हातात विजेरी घेऊन तुम्ही बाहेर पडता. हवेत गारवा जाणवतो. तुम्ही नेहमीची पायवाट धरता. चालता चालता गावाबाहेरच्या आडरानाजवळ येता. कितीवेळा या रानातून एक चक्कर मारावी असा विचार मनात येऊन गेला असला तरी तुम्ही यापूर्वी तसं धाडस केलेलं नसतं. आज मात्र तुमची पावलं अचानक रानात शिरतात.
अंधार पडू लागला आहे. झाडांच्या सावल्या लांब लांब होत आहेत. पर्णविरहित फांद्या आपले हात पसरून मिठी मारायच्या बेतात आहेत जशा. आपण रस्ता चुकतोय की काय असा विचार तुमच्या मनात येतो. तुम्ही आजू बाजूला पाहता. चहूकडे फक्त नीरव शांतता असते, नाही म्हणायला मध्येच कुठेतरी एखादा रातकिडा किरकिरतो. वाळक्या पानांवरून तुमच्या पावलांची करकर शांततेचा भंग करते. तुम्ही वेगाने पावले उचलता. यापेक्षा जास्त अंधार पडण्यापूर्वी इथून बाहेर पडायला पाहिजे! अचानक मागून वाळक्या पाने आणि काटक्या मोडल्याचा 'कट्! कट्!' आवाज येतो. कुणीतरी त्या वाळक्या पानांवरून काटक्यांवरून सरपटत येतंय की काय हा विचार तुमच्या मनाला शिवतो. घशाला कोरड पडते. चटचट पावलं उचलत तुम्ही हातातली छत्री आणि विजेरी घट्ट धरता. मागची सळसळ जवळ आल्यागत भासते, आता धूमच ठोकायला हवी - पण कुठे आणि कशी? अशा विचारांत तुम्ही क्षणभर थबकता, आणि तुमच्या पायाला विळखा पडतो. एक अस्फुट किंकाळी तुमच्या घशातून निघते. त्याही स्थितीत तुम्ही थरथरत्या हाताने विजेरी पेटवता.
विजेरीच्या मंद प्रकाशात कुठेतरी उरलीसुरली कातडी लोंबते आहे असा एक मांस झडलेला सांगाडा तुमच्या पायाला गच्च पकडून दात विचकताना तुम्हाला दिसतो. तुमचे हातपाय लटपटतात, त्या थंडीतही दरदरून घाम फुटतो. जिवाच्या निकरानं तुम्ही हातातली छत्री त्या सांगाड्यावर हाणता. पकड थोडीशी ढिली होते; ते पाहून तुम्ही जिवाच्या आकांतानं धूम ठोकता. आपण किती वेळ धावलो याचा तुम्हाला अंदाज लागत नाही, रान अधिकच दाट झालंय. दूरवर एक दिवा लुकलुकताना दिसतो. तुम्ही सगळं त्राण एकवटून दिव्याच्या दिशेनं धावू लागता.
समोर एक पडकी हवेली दिसते. आत प्रकाश आहे. तुम्ही दार ठोठावता. क्षणा दोन क्षणांनी दरवाजा उघडतो. दरवाज्यामागे एक सत्तरीची म्हातारी तुमच्याकडे आश्चर्याने पाहते आहे. 'काय पाहिजे?' म्हणून विचारते. तुम्ही घाईघाईतच तिला आपला किस्सा सांगता. ती दरवाजा उघडून तुम्हाला आत घेते. 'कशाला बाबा या आडरानात फिरायला जायचं, रात्री बेरात्री हे असं निर्जन ठिकाणी जाऊच नये. त्यात खरं काही नसतं, चकवे असतात ते; पण अनुभव घेणारा तिथेच ढेर होतो कधीतरी.' असं म्हणून म्हातारी चहाचा आग्रह करते.
म्हातारीच्या हातचा चहा अमृतासारखा भासतो. चहा पितापिता तुम्ही तिची चौकशी करता. म्हातारी सालसपणे आपली कर्मकहाणी सांगते. 'आडरानातली बापाची इस्टेट आणि म्हातारी, पोरांना नको झाली तशी पोरांनी म्हातारीला मागे ठेवून आपापल्या वाटा पकडल्या.' म्हातारी डोळ्यात पाणी आणून सांगते. 'बर्‍याच दिवसांनी घरात कुणीतरी आलं, रात्र इथेच काढ कुठे जाशील त्या चकव्यात बाहेर? जेवणाचं पाहते, तुझ्या निमित्तानं माझ्याही पोटात चार सुखाचे घास पडतील,' असं म्हणून म्हातारी उठते.
गरमागरम चहाने तुम्हाला हुशारी येते. रानातला प्रकार डोक्यातून मागे पडतो. आडरानात राहणार्‍या म्हातारीबद्दल चुकार विचार मनात येतात. रात्री बेरात्री अनोळखी माणसाला घरात घेणारी म्हातारी मूर्खच दिसते; जीवाची पर्वा नाही की काय हिला? की अगदी एकाकी पडली आहे, कुणास ठाऊक? या वयात अक्कल साथ देत नसावी बहुधा. तुमचे डोळे लबाड स्मित करतात. म्हातारीचा गळा दाबून टाकला तर कुणाला वर्षे न वर्षे कळायचेही नाही! 'आज्जे, तुझ्याशी गप्पा मारायला येऊ का गं आत?' तुम्ही घरात शिरकाव करण्याची संधी शोधता. म्हातारीही आतूनच आत ये हो म्हणून सुचवते.
बाहेरच्या खोलीच्या मानानं स्वयंपाकघरातला उजेड थोडा मंदच वाटतो. समोर चुलीतल्या जाळात एक मोठा हंडा आहे आणि त्यात काहीतरी खदखदतंय. त्याच्या खमंग वासानं तुमच्या पोटात कावळे कोकलतात. तुम्ही आत शिरता. पाय थोडेसे भेलकांडल्यासारखे वाटतात. म्हातारी पाठमोरी आहे; तुमची चाहूल लागते तशी तुम्हाला खुर्चीत बसायची सूचना करते. बसताबसता डोळ्यांपुढे अंधारल्यासारखं वाटतं. तुम्ही डोळे किलकिले करून समोर बघता. म्हातारी मन लावून एका भल्या मोठ्ठ्या सुर्‍याला धार लावते आहे.
'आजे असं चक्करल्यासारखं का वाटतंय?' तुम्ही तिला विचारता. म्हातारी मागे वळते, चुलीच्या प्रकाशात तिचे पांढरे केस आणि सुरकुतलेला चेहरा भयाण दिसतो. 'काही नाही रे बाळा, चहात थोडंसं गुंगीचं औषध घातलं होतं. बर्‍याच दिवसांत मेजवानी झाली नाही बघ. घाबरू नकोस, तुला काहीही त्रास होणार नाही, कळणारही नाही सुरी कशी फिरते ते.'
समोरचा रश्शानं खदखदणारा हंडा आणि सुरीची धार हे सगळं आपल्यासाठी होतं हे तुमच्या लक्षात येतं आणि तुम्ही तिथेच कोसळता.

No comments:

Post a Comment